Wednesday, 29 December 2021

 कोविडच्या प्रादूर्भावातही मुंबई महानगरपालिकेचे काम उत्तम नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे

         मुंबई हे अधिक लोकसंख्येचे प्रगत शहर आहे. या शहराचे जगभर आकर्षण आहे. रोजगारासाठी देशभरातून नागरिकांना मुंबईत यावेसे वाटतेयामुळे लोकसंख्या वाढून महानगरपालिकेवरील ताण वाढतोय. महापालिकेसमोर विविध आव्हाने आहेत. त्यावर मात करून महापालिका उत्तम काम करीत असल्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावास उत्तर देताना सांगितले. एमएमआरडीए ने कोविड रूग्णांसाठी देशातील पहिले जम्बो फील्ड रूग्णालय उभारले. महापालिकेच्या संबंधित सर्वांनी जीव धोक्यात घालून काम केले. कोविड काळात झालेल्या कामांबद्दल निती आयोगासह मुंबईचे सर्वत्र कौतुक झाले. निती आयोगानुसार आरोग्य क्षेत्रात महाराष्ट्र देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे. इज ऑफ डुईंगमध्ये महापालिकेच्या सर्व सेवा ऑनलाईन करण्यात आल्या आहेत. शहरातील दोन हजार किमी रस्ते येत्या पाच-सहा वर्षात काँक्रीटचे केले जातील असेही एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.

 जयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाची प्रशासनाकडून तयारी

22 ठिकाणी पार्किंग तर 260 बसेसची व्यवस्था

            पुणे, दि. 28 : कोरेगावनजिक पेरणेफाटा येथील जयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाची शासनस्तरावरुन नियोजन सुरू असून जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक पूर्वतयारी करण्यात येत आहे. अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांना आवश्यक सोयी-सुविधा मिळाव्यात तसेच शांततामय वातावरणात कार्यक्रम व्हावा यासाठी प्रशासकीय पातळीवर विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.

            जयस्तंभास आकर्षक फुलांची सजावट तसेच सुशोभिकरण करण्यात येणार आहे. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून कार्यक्रमाचे थेट प्रसारण करण्यात येणार आहे. अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांना आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी समाज कल्याण विभाग, जिल्हा प्रशासन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत (बार्टी) मार्फत नियोजन सुरू आहे.

            जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख आणि समाज कल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सूक्ष्म नियोजन करण्यात येत आहे. त्यानुसार पोलिस विभाग, जिल्हा परिषद विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, पी.एम.पी.एल., राज्य परिवहन महामंडळ, अन्न व औषध प्रशासन, राज्य उत्पादन शुल्क विभाग, बार्टी, समाज कल्याण आयुक्तालय, महावितरण कंपनी, जिल्हा माहिती कार्यालय यांच्यासह विविध विभागाकडून आवश्यक कामे करण्यात येत आहेत.

            कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून प्रथमोपचार केंद्र उभारण्यात येत असून ५ सुसज्ज रुग्णवाहिका व १५ इतर रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व खाजगी दवाखान्यात १० टक्के खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून ३१ डिसेंबर व १ जानेवारी रोजी परिसरात ड्राय डे घोषित करण्यात आला आहे.

            अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांची वाहने पार्किंग करण्यासाठी एकूण २२ ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे व तेथून जयस्तंभ येथे जाण्यासाठी पुणे महानगर परिवहन मंडळाच्यावतीने ३१ डिसेंबर व १ जानेवारी रोजी २६० बसची व्यवस्था करण्यात आली आहे.

वाहतूक मार्गात बदल

            चाकण ते शिक्रापूर व शिक्रापूर ते चाकण अशी दोन्ही बाजूकडील जाणारी येणारी सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येईल.

            अहमदनगरकडून पुणे मुंबईकडे येणारी जड वाहने ही शिरुर, न्हावराफाटा, न्हावरा, पारगाव, चौफुला, यवत, हडपसर मार्गे पुण्याकडे येतील. पुण्याकडून अहमदनगरकडे जाणारी जडवाहने खराडी बायपास येथून हडपसर, पुणे-सोलापुर महामार्गाने चौफुला, केडगाव मार्गे न्हावरा, शिरुर, अहमदनगर अशी जातील.

            सोलापुर रस्त्यावरून आळंदी-चाकण भागात जाणारी जड वाहने, माल वाहतूक (टेम्पो ट्रक) ही वाहने हडपसर, मगरपट्टा, खराडी बायपास मार्गे विश्रांतवाडी येथून आळंदी व चाकण येथे जातील.

            मुंबई येथुन अहमदनगरकडे जाणारी जड वाहने, माल वाहतूक (टेम्पो/ट्रक) वाहने वडगांव मावळ, चाकण, खेड, मंचर, नारायणगांव, आळेफाटामार्गे अहमदनगरकडे जातील. मुंबई येथून अहमदनगरकडे जाणारी हलकी वाहने वडगाव मावळ, चाकण, खेड, पाबळ, शिरुरमार्गे अहमदनगर येथे जातील.

            आळंदी- शेलपिंपळगाव बहुळ साबळेवाडी दोन्ही बाजूकडील जाणारी येणारी सार्वजनिक तसेच खाजगी प्रवासी वाहतूक पूर्णपणे बंद असेल. आळंदी मरकळ लोणीकंदकडे जाणारी येणारी दोन्ही बाजूकडील सार्वजनिक तसेच खाजगी प्रवासी वाहतूक पूर्णपणे बंद असेल.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात वाहतूक बदल

            नाशिककडून येणारी मोठी वाहने शिक्रापूरकडे न जाता तळेगाव चाकण चौकातून मोशी व तळेगावकडे जावू शकतील.

            देहूरोड येथे मुंबई जुन्या महामार्गाने येणारी वाहने सेंट्रल चौकातून निगडी पिंपरी-चिंचवडकडे न सोडता सेंट्रल चौकाकडून मुंबई बेंगलोर महामर्गाने सरळ वाकडनाका, चांदणी चौकातून इच्छीत स्थळी जावू शकतील.

            मुंबईकडून एक्स्प्रेस महामार्गाने पुणेकडे येणारी वाहने उर्से टोल नाका येथून मुंबई बेंगलोर महामार्गाने (निगडी मुकाई चौकाकडे न जाता) वाकडनाका व राधा चौक येथून पुणेकडे जावू शकतील.

            मुंबईकडून एक्सप्रेस हायवेने खिंडीतून तळेगावकडे जाणारी वाहतूक वडगाव फाट्याकडे न जाता उर्से टोल नाका येथून देहूरोडकडे जाणारा बाह्यवळण रोडने जावू शकतील.

            नाशिक व तळेगावकडून येणारी वाहतूक तळेगाव चाकण चौकातून शिक्रापूरकडे न जाता मोशी नाशिकफाटा मार्गे पुणे शहरकडे जावू शकतील. 31 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून 1 जानेवारीच्या मध्यरात्रीपर्यंत वाहतुकीत बदल करण्यात आला असल्याची माहिती पिंपरी चिंचवडचे पोलीस उप आयुक्त आनंद भोईटे यांनी दिली.

0000


 महिला व बालविकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली

अंगणवाडी कर्मचारी कृती समितीची बैठक

            मुंबई, दि. 28 : अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या शिष्टमंडळासोबत महिला व बाल विकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. बैठकीत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत चर्चा करण्यात आली.

              राज्यातील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात, पोषण ट्रॅकर ॲपमधील तांत्रिक दोष दूर करण्याबाबत, अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन, पेन्शन, पदोन्नती यासह अन्य मागण्यांबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.

               या बैठकीस महिला व बाल विकास विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन, उपसचिव विलास ठाकूर, एकात्मिक बाल विकास उपायुक्त गोकुळ देवरे, अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे सदस्य उपस्थित होते.

----


 

 'युनिकॉर्न' ! 

व्यावसायिक जगता मध्ये एक 'युनिकॉर्न' म्हणजे १ ते १० बिलियन अमेरिकन डॉलर्स मूल्य असलेला एक स्टार्टअप व्यवसाय. (एक बिलियन डॉलर्स म्हणजे आताच्या बाजार भावानुसार जवळपास साडे सात हजार कोटी रुपये.) एक युनिकॉर्न निर्माण होणे ही अत्यंत दुर्मिळ घटना मानली जाते. प्रचंड मेहनत, नवं कल्पना, व्यावसायिकता अशा अनेक गोष्टींचा संगम साधत तुटपुंज्या पाठबळावर सुरू झालेला एक छोटासा स्टार्टअप युनिकॉर्न मध्ये परावर्तित होतो. 

तर आज या युनिकॉर्न बद्दल सांगायचे कारण म्हणजे २०११ ते २०१४ या काळात जागतिक पातळीवरचे अर्थतज्ज्ञ आपले पंतप्रधान असले तरी दरवर्षी फक्त एक युनिकॉर्न भारतात निर्माण व्हायचा. परंतु २०१४ ला अर्थतज्ज्ञ गेले आणि एक तथाकथित कमी शिकलेला व्यक्ती भारताचा पंतप्रधान झाला. त्या कमी शिक्षित व्यक्तीने मेक इन इंडिया नामक संकल्पना प्रमोट केल्यावर जवळपास ५० हजार नवीन स्टार्टअप भारतात सुरू झाले. आणि २०१४ ते डिसेंबर २०२१ पर्यंत भारताने सर्व युरोपियन देशांना मागे टाकत आतापर्यंत एकूण ५४ युनिकॉर्न निर्माण केले आहेत. 

फक्त २०२१ या एका वर्षामध्येच भारताने कमीतकमी साडे सात हजार कोटी रुपये मूल्य असलेले ४० स्टार्टअप युनिकॉर्न निर्माण केले. यामध्ये BYJU अग्रक्रमावर असून फक्त BYJU चे बाजारमूल्य २१ बिलियन डॉलर्स म्हणजे दीड लाख कोटी रुपयांच्या वर आहे. या भारतीय स्टार्टअप व्यावसायिकांनी अंदाजे १५ लाख कोटी रुपयांचे बाजारमूल्य असलेल्या कंपन्या व २० लाखाच्या वर नवीन रोजगार निर्माण केले आहेत. 

हे फक्त त्यांचे यश नाही तर हे तुमचे आमचे देखील यश आहे. चायनीज मालावर बहिष्कार टाका असे सुचवणारे व्हाट्सएप फॉरवर्ड करणाऱ्या सामान्य लोकांची खिल्ली उडवणारे अतिशहाणे आपण आपल्या आजूबाजूला पाहिले आहेत. पण २०२१ च्या दिवाळीत याच सामान्य लोकांनी चीनला ५० हजार कोटी रुपयांचा तडाखा दिला आहे. सद्य भारत सरकार भीम ऍप-भारत पे आदी ऍप वरून ऑनलाइन व्यवहार प्रमोट करते म्हणून मास्टर कार्ड सारख्या अमेरिकन कंपन्या त्यांच्या सरकारकडे रडत आहेत. पण फक्त परदेशीच नव्हे तर स्वतः अ दर्जाच्या सर्व सुविधा उपभोगत 'उद्योजक म्हणजे आपले शत्रू व गरिबी म्हणजे दागिना' असे बिंबवणाऱ्या समाजवादी,गांधीवादी, कम्युनिस्ट असलेल्या स्थानिक भोंदूबाबांपासून देखील आपल्याला सावध रहायचे आहे. 

भारताच्या पुढे चीन (३०१ युनिकॉर्न ) व अमेरिका (४८७ युनिकॉर्न) असून अंदाजे २०३० पर्यंत भारत या क्षेत्रात चीनला मागे टाकेल. परंतु २०३० पर्यंत कमीतकमी दहा हजार कोटी रुपये मूल्य असलेले ४०० नवीन उद्योजक व त्यापाठोपाठ लाखो रोजगार निर्माण व्हावेत म्हणून आपण देशी ऍप्स, देशी उत्पादनं, देशी सेवा उद्योग यांची खरेदी-विक्री व मौखिक जाहिरात करणे सुरूच ठेवायचे आहे. आपला पैसा आपल्या देशातील समविचारी लोकांच्या खिशातच जाईल याची काळजी आपणच घ्यायची आहे. 

तुषार दामगुडे

 ऐतिहासिक शक्ती विधेयकासह

 अधिवेशनात 24 विधेयके मंजूर

- उपमुख्यमंत्री अजित पवार

         मुंबई, दि. 28 : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात 24 विधेयके संमत करण्यात आली. यामध्ये ऐतिहासिक अशा शक्ती विधेयकाचा समावेश आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे सांगितले.

         महाराष्ट्र विधिमंडळाचे २०२१ चे हिवाळी अधिवेशन संस्थगित झाले. त्यानंतर उपमुख्यमंत्री पवार यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, संसदीय कार्य मंत्री अनिल परब, गृह राज्यमंत्री सतेज पाटील, संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे उपस्थित होते.

         श्री.पवार यांनी सांगितले, या अधिवेशनात एकूण 24 विधेयके दोन्ही सभागृहात मंजूर झाली. एक विधेयक संयुक्त समितीकडे पाठवण्याचा निर्णय झाला. तीन विधेयके मागे घेण्यात आली. या अधिवेशनात मंजूर करण्यात आलेली सगळीच विधेयके महत्वाची होती. या विधेयकांपैकी शक्ती विधेयक हे ऐतिहासिक म्हणावं लागेल. या कायद्यामुळे राज्यातील माता-भगिनींची तसेच लहान मुलांची सुरक्षितता आपण निश्चित केली आहे. राज्यातल्या महिलाशक्तीला बळ देत असताना, पुरुष वर्गावरही विनाकारण अन्याय होणार नाही, याचा समतोल साधण्याचा प्रयत्न आपण शक्ती विधेयकात केला आहे, असे श्री.पवार यांनी सांगितले.

            अधिवेशनात तीन कृषी विधेयके एकमताने मागे घेण्यात आली. अकृषी विद्यापीठे व महाविद्यालयांमध्ये शिक्षकांच्या पदांना संवर्गनिहाय आरक्षण लागू करण्याचे विधेयक देखील महत्वपूर्ण आहे. अधिवेशनात ३१ हजार २९८ कोटी २६ लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर झाल्या. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेण्यात येऊ नये, असा ठराव एकमतानं मंजूर करण्यात आला. तशी शिफारस निवडणूक आयोगाला करण्यात येत आहे. ओबीसी बांधवांच्या राजकीय आरक्षण निश्चितीसाठी, महत्वाचा असलेला इम्पिरीकल डेटा संकलित करण्यासाठी, पुरवणी मागण्यांद्वारे ४३५ कोटी रुपये मंजूर केले, असे श्री.पवार यांनी सांगितले.

            छत्रपती संभाजी महाराजांचे, तुळापूर येथील स्मृतीस्थळ, वढू बुद्रुक येथील स्मारक आणि परिसराचा विकास करण्यात येणार आहे. स्मारक परिसराच्या विकासासाठी १५० कोटी रुपये टप्प्याटप्प्यानं खर्च करणार आहोत. छत्रपती संभाजी महाराजांच्या मातोश्री महाराणी छत्रपती सईबाई महाराज यांच्या राजगडाच्या पायथ्याशी असलेल्या समाधीस्थळ परिसराचाही विकास करण्याचाही निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्राचा अभिमान आणि अस्मिता असलेल्या ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असेही श्री.पवार यांनी सांगितले.

        विदर्भ आणि मराठवाड्याच्या निधी वाटपात अन्याय केलेला नाही. वैधानिक मंडळाच्या निकषानुसारच निधीचे वितरण झाले आहे. मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी पिक विम्याला पर्याय शोधण्यात येत आहे, अशी माहिती श्री.पवार यांनी दिली.

            गेल्या सहा दिवसांत, राज्यातल्या कोरोना रुग्णांची संख्या तिपटीनं वाढली आहे. जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये रुग्णांची संख्या वाढण्याची भीती, आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे. त्याकडेही सर्वांनी गांभीर्यानं बघितलं पाहिजे. राज्यात आणि देशात कोरोनाचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. या पार्श्वभूमीवर, सर्वांनी मास्क वापरणे, वारंवार हात धुणे, सामाजिक अंतर राखणे या नियमांचे पालन करावे, असे आवाहन श्री.पवार यांनी केले.

************



Tuesday, 28 December 2021

 भंडारा जिल्ह्यातील धान पीक नुकसान भरपाई एक महिन्यात देणार

- मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार

            मुंबई, दि. 28 : भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील धान पीक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यात येईल. ही मदत एक महिन्याच्या आत देण्यात येईल, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासांत दिली.

            या विषयाच्या अनुषंगाने सदस्य डॉ. परिणय फुके यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

0000

गडचिरोली प्रकल्पात स्थानिकांना रोजगार देणार

- उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे

            मुंबई, दि. 28 : गडचिरोली जिल्हातील एटापल्ली तालुक्यातील सुरजगड प्रकल्पात स्थानिक सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार देणार असल्याची माहिती उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला दिली.

            राज्यमंत्री तटकरे म्हणाल्या, येथील खाणपट्ट्याचे काम सप्टेंबर 2021 पासून सुरु झालेले असून सुमारे 1500 स्थानिक लोकांना रोजगार मिळाला आहे. येथील काम नक्षलवादी कारावायांच्या पार्श्वभूमीवर पोलीस संरक्षणात सुरु झाले आहे, असेही त्यांनी सांगितले.

            या विषयांवर सदस्य नागोराव गाणार, गिरीश व्यास, जयंत पाटील आदिंनी प्रश्न उपस्थित केला होता.

0000


 

Featured post

Lakshvedhi