Sunday, 26 December 2021

 राज्यातील अंगणवाडी सेविकांना साडी खरेदीसाठी

रक्कम बॅंक खात्यात थेट हस्तांतरि

            मुंबई दि. 24 : पोषण अभियानअंतर्गत अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना प्रत्येकी दोन हातमाग साड्या विकत घेण्यासाठी ही रक्कम थेट कर्मचा-यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार असून प्रति साडी रु. 400/- प्रमाणे दोन साड्यांकरीता रु.800/- प्रत्येक अंगणवाडी सेविकांच्या बँक खात्यात थेट हस्तांतरित (DBT)  करण्यात येणार आहे.  या संबंधीचा महिला व बालविकास विभागाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून हा शासन निर्णय शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे

०००.

 त


००००

 राज्यात आज मध्यरात्रीपासून नवे निर्बंध लागू, रात्री ९ ते सकाळी ६ यावेळेत जमावबंदी

सर्व प्रकारच्या समारंभांमध्ये उपस्थितांच्या संख्येवर निर्बंध

कोरोना संसर्ग वाढू द्यायचा नसेल तर सर्वांनी आरोग्याचे नियम पाळावेत

- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

            मुंबई दि. 24 : राज्यातील वाढत्या कोविड प्रादुर्भावाचा विचार करून राज्य शासनाने संसर्ग रोखण्यासाठी काही निर्बंध लागू केले आहेत. ते आज मध्यरात्रीपासून लागू राहतील.

            विशेषत: युरोप तसेच युकेमध्ये ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे रुग्णसंख्या दुप्पट वेगाने वाढत आहे. जगातील ११० देशांमध्ये ओमायक्रॉनचा प्रसार झाला आहे. या विषाणुच्या प्रसाराचा वेग जास्त असल्याने सध्या काही प्रमाणात निर्बंध लावावेत व पुढील काळात याचा प्रसार बघून अधिक निर्बंध लावण्याबाबत विचार व्हावा असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. संसर्ग वाढू द्यायचा नसेल तर सर्वांनी जबाबदारीने आरोग्याचे नियम पाळणे, मास्क व्यवस्थित वापरणे आवश्यक आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

            एवढेच नव्हे तर केंद्रीय आरोग्य विभागाने देखील सर्व राज्यांसाठी संसर्ग रोखण्याकरिता पुरेशी काळजी घेण्यास व उपाययोजना करण्यास सांगितले आहे. सध्याच्या निर्बंधाचे स्वरूप हे प्राथमिक स्वरूपाचे असून ते आताच न लावल्यास भविष्यात अधिक कठोर निर्बंध लावण्याची वेळ येऊ शकते, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

            राज्यात देखील गेल्या दोन दिवसात एक हजारापेक्षा जास्त पॉझिटिव्ह रुग्ण दिसून येत आहेत. ख्रिसमस उत्सव, लग्न समारंभ, नवीन वर्षाचे स्वागत यामुळे गर्दी वाढून संसर्गाचा धोका वाढण्याची मोठी शक्यता असल्यामुळे आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ प्रमाणे संपूर्ण राज्यात काही अतिरिक्त निर्बंध लावण्याचे ठरवण्यात आले आहे.

            आज दिनांक २४ डिसेंबर २०२१ रोजी मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आलेल्या आदेशात खालीलप्रमाणे अतिरिक्त निर्बंध असतील.

· संपूर्ण राज्यभर सर्व सार्वजनिक ठिकाणी ५ पेक्षा जास्त व्यक्तींच्या एकत्र येण्यावर रात्री ९ ते सकाळी ६ यावेळेत बंदी असेल.

· लग्न समारंभासाठी बंदिस्त सभागृहांमध्ये एकावेळी उपस्थितांची संख्या १०० च्या वर नसेल आणि खुल्या जागेत ही संख्या २५० च्या वर नसेल किंवा या जागेच्या क्षमतेच्या २५ टक्के यापैकी जे कमी असेल ते.

· इतर सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांसाठी देखील उपस्थितांची संख्या १०० च्या वर नसेल आणि खुल्या जागेत ही संख्या २५० च्या वर नसेल किंवा या जागेच्या क्षमतेच्या २५ टक्के यापैकी जे कमी असेल ते.

· उपरोक्त दोन्ही कार्यक्रमांव्यतिरिक्तच्या कार्यक्रमांसाठी बंदिस्त जागेत जिथे आसनक्षमता निश्चित आहे अशा ठिकाणी क्षमतेच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त नसेल तसेच जिथे आसनक्षमता निश्चित नाही अशा ठिकाणी २५ टक्के उपस्थिती असेल. अशा प्रकारच्या सर्व कार्यक्रमांमध्ये ते जर खुल्या जागेत होत असतील तर आसनक्षमतेच्या २५ टक्के पेक्षा जास्त उपस्थिती नसेल.

· क्रीडा स्पर्धा, खेळाचे समारंभ यासाठी कार्यक्रम स्थळाच्या आसन क्षमतेच्या २५ टक्क्यांपेक्षा जास्त उपस्थिती नसेल.

· वरीलपैकी कोणत्याही प्रकारात न मोडणाऱ्या समारंभ किंवा एकत्र येण्याच्या कार्यक्रमात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण उपस्थितांची संख्या किती असावी हे निश्चित करेल. असे करतांना २७ नोव्हेंबर २०२१ चे आपत्ती व्यवस्थापनाच्या आदेशाचे पालन होईल असे बघितले जाईल.

· उपहारगृहे, जीम, स्पा, चित्रपटगृहे, नाट्यगृहे या ठिकाणी क्षमतेच्या ५० टक्के उपस्थिती राहील. या सर्वांना त्यांची संपूर्ण क्षमता तसेच ५० टक्के क्षमतेची संख्या जाहीर करावी लागेल.

· याशिवाय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास आवश्यक वाटेल तिथे निर्बंध लावता येतील आणि ते करण्यापूर्वी त्यांनी जनतेस त्याची कल्पना देणे आवश्यक राहील.

· जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन जिथे आवश्यक वाटेल तिथे अधिक कठोर निर्बंध लावता येतील. अशा परिस्थितीत देखील जनतेला निर्बंधाची योग्य ती माहिती देणे आवश्यक राहील.

 विधानसभेत २४ विभागांच्या ३१ हजार २९८ कोटी २६ लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर

पायाभूत सुविधा आणि विकास प्रक्रियेची कामे थांबणार नाहीत

- उपमुख्यमंत्री अजित पवार

            मुंबई, दि. 24 : गेल्या पावणेदोन वर्षांहून अधिक काळ महाराष्ट्र कोविड संकटाशी लढत असतानाही पायाभूत सुविधा आणि विकास प्रक्रियेची कामे कुठेही थांबणार नाहीत याची काळजी राज्य शासनाने घेतली आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सांगितले.

            विधानसभेत एकूण २४ विभागांच्या ३१ हजार २९८ कोटी २६ लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या. इतर मागास प्रवर्गाच्या इम्पिरिकल डेटासाठी 435 कोटी रुपयांची पुरवणी मागणी मंजूर करण्यात आली आहे.

            विधानसभेत पुरवणी मागण्यांवर ‍चर्चा करण्यात आली. या चर्चेला उपमुख्यमंत्री श्री. पवार उत्तर देताना म्हणाले की, या पुरवणी मागण्यांवरील सदस्यांनी केलेल्या सूचनांचा विचार संबंधित विभागाचे सर्व मंत्री आवर्जून करतील. गेल्या पावणेदोन वर्षांहून अधिक काळ देशासह महाराष्ट्र कोविडशी लढत असून या काळात आपला आर्थिक विकासाचा वेग काहीसा मंदावला. मात्र, असे असले तरी आरोग्य यंत्रणा सक्षम करतानाच पायाभूत सुविधा आणि विकास प्रक्रिया कुठल्याही टप्प्यावर थांबणार नाही याची काळजी राज्य शासनामार्फत घेण्यात येत आहे. सिडको, म्हाडा आणि नगरविकास विभागासाठी करण्यात आलेल्या सूचनांचा संबंधित विभागाचे मंत्री नक्कीच विचार करतील असे सांगून बीडीडी चाळींचा पुनर्विकास हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून राज्यातील नागरिकांना हक्काचे घर देण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. त्यामुळे याबाबत करण्यात आलेल्या सूचनांचाही अभ्यास करण्यात येईल. 

            सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्राम विकास विभाग, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, महसूल व वन विभाग, वित्त विभाग, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, गृह विभाग, उद्योग, उर्जा व कामगार विभाग, नियोजन विभाग, महिला व बाल विकास विभाग, कृषी व पदुम विभाग आणि आदिवासी विकास विभाग या विभागांसाठी पुरवणी मागण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद करण्यात आली आहे. ३१ हजार २९८ कोटी २६ लाख रुपयांच्या स्थूल पुरवणी मागण्या मंजूर झाल्या असल्या तरी त्याचा प्रत्यक्ष निव्वळ भार हा २६ हजार ५७६ कोटी ३ लाख रुपये इतका आहे.

            पुरवणी मागण्यांवरील चर्चेत विधानसभा सदस्य गणेश नाईक, अनिल पाटील, राजन साळवी, मंगलप्रभात लोढा, सरोज अहिरे, बळवंत वानखेडे, रवींद्र चव्हाण, अबु आझमी, रवी राणा, कैलास गोरंट्याल, कालिदास कोळंबकर, मंजुळा गावीत, संजय केळकर, आसिफ शेख रशीद, सचिन कल्याण शेट्टी, रोहित पवार,नमिता मुंदडा, श्रीनिवास वनगा, मेघना साकोरे, विकास ठाकरे, संदीप दुर्वे, रमेश कोरगावकर, राजेश पवार, लहू कानडे, रईस शेख, डॉ. देवराव होळी, चंद्रकांत नवघरे, विक्रमसिंग सावंत, मनीषा चौधरी, कृष्णा गजभिये, समाधान अवताडे, मोहन हंबरडे यांनी सहभाग घेतला.

००००

 स्मार्ट योजनेच्या अंमलबजावणीसाठी


कालबद्ध आराखडा तयार करण्यात येणार

- मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार

            मुंबई, दि. 24 : शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणाऱ्या स्मार्ट योजनेच्या अंमलबजावणीसाठी कालबद्ध आराखडा तयार करण्यात येईल, असे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत सांगितले.

            राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासंदर्भातील तारांकित प्रश्न प्रश्नोत्तराच्या तासात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, कुणाल पाटील, समीर कुमावत यांनी उपस्थित केला होता.

            श्री. वडेट्टीवार म्हणाले की, स्मार्ट योजनेची अंमलबजावणी करण्यासंदर्भात लवकरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात येईल. शेतकऱ्यांना देण्यात येणारे गट शेती थकित अनुदान याबाबत ही लवकरच निर्णय घेण्यात येईल. दोन वर्षांपूर्वी शासनाने शेतकऱ्यांना 20 हजार कोटी रुपयांची कर्ज माफी दिली होती. यामध्ये नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. याची अंमलबजावणी करण्यासाठी शासन सकारात्मक आहे. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करण्याबाबत नियोजन करण्यात येत आहे. तेलंगणा राज्यात ज्याप्रमाणे शेतकऱ्यांना मदत करण्यात येते त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कशी मदत करता येईल याचा अभ्यास कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्यासमवेत स्वत: करणार असून याचा अहवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सादर करण्यात येईल, असेही श्री.वडेट्टीवार यांनी सांगितले.

0000

राज्याची आर्थिक परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर

शेतकऱ्यांना तत्काळ अनुदान देण्यात येणार

- उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत माहिती

            मुंबई, दि. 24 : पावणे दोन वर्षांहून अधिक काळ महाराष्ट्र कोविड महामारीशी लढत असून सध्या आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यावर भर देण्यात ये असून त्यामुळेच राज्याची आर्थिक परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर तत्काळ शेतकऱ्यांना देण्यात येणारे अनुदान देण्यात येईल असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सांगितले.

            महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेंतर्गत नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याबाबतचा तारांकित प्रश्न विधानसभा सदस्य प्रकाश आबिटकर, डॉ. संदीप धुर्वे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला होता.

            श्री. पवार म्हणाले की, शासन शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी कटिबद्ध आहे गेल्या दोन वर्षांत कोविडमुळे राज्याची आर्थिक परिस्थिती कमकुवत झाली आहे. लॉकडाऊनमुळे एक ते दीड लाख कोटींचे उत्पन्न घटले आहे. आर्थिक परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर उर्वरित शेतकऱ्यांना तत्काळ मदत देण्यात येणार आहे. तसेच कर्ज वेळेत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंतचे पिक कर्ज शून्य टक्के व्याजाने देणारे महाराष्ट्र एकमेव राज्य आहे. शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी निर्णय घेतले होते. दोन लाखांपर्यंत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी‌ तर दोन लाखाच्यावर कर्ज असणाऱ्यांनी वरच्या‌ कर्जाची परतफेड केल्यास त्यांनाही दोन लाखांची माफी आणि ज्यांनी कर्जाची वेळेत परतफेड केली अशा शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. या योजनेतंर्गत ३१ लाख ८१ हजार शेतकऱ्यांना पात्र ठरवत २० हजार २९० कोटींचे वाटप करण्यात आले आहे. काही शेतकऱ्यांना पुरवणी मागण्यात तरतूद केल्याप्रमाणे मदत मिळेल. तर उर्वरित सर्व शेतकऱ्यांना पुढील अर्थसंकल्पात मदत जाहीर करण्यात येणार आहे.

0000

शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करण्यासंदर्भात

 क्षेत्रीय स्तरावरुन पाठपुरावा सुरु

- सहकार मंत्री बाळासाहेब पाटील

            मुंबई, दि. 24 : शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करण्यासंदर्भात क्षेत्रीय स्तरावरुन पाठपुरावा सुरु असल्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी विधानसभेत सांगितले.

            हिंगोली तालुक्यातील सेनगाव तालुक्यात शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासाठी बँककेडून दुर्लक्ष होत असल्याबाबतचा तारांकित प्रश्न विधानसभा सदस्य तान्हाजी मुटकुळे, प्रशांत बंब, प्रकाश सोळंके यांनी प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला होता.

            श्री. पाटील म्हणाले की, बँकाकडून शेतकऱ्यांना पुनर्गठन आणि पीककर्ज देण्यास दुर्लक्ष होत नाही. सन 2021-22 च्या खरीप हंगामात सेनगांव तालुक्यातील राष्ट्रीयकृत बँका, ग्रामीण बँका आणि जिल्हा मध्यवर्ती बँकांनी एकूण 16 हजार शेतकऱ्यांना 977.86 लाख कर्ज वाटप केलेले आहे. बँकांनी शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करण्याबाबत क्षेत्रीय स्तरावरुन पाठपुरावा सुरु असल्याचेही श्री.पाटील यांनी सांगितले.

0000

 मोरगाव, थेऊर, सिद्धटेक, महड व पाली येथील

देवस्थान विकासासाठी सर्वंकष कार्यवाही करावी

- उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हe

            मुंबई, दि. 23 : अष्टविनायक देवस्थानातील मोरगाव, थेऊर, सिद्धटेक, महड व पाली या पाच देवस्थानांच्या विकासासाठी सर्वंकष कार्यवाही करण्याच्या सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दिल्या.

            दि 11 ते 13 डिसेंबर रोजी उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी अष्टविनायक देवस्थान आराखड्याच्या अंमलबजावणीबाबत या पाच देवस्थानांचा पाहणी दौरा करुन भाविकांसाठी आवश्यक सोयीसुविधांचा आढावा घेतला. त्यावेळी संबंधीत देवस्थानचे व गावातील पदाधिकारी तसेच शासकीय अधिकारी उपस्थित होते. अष्टविनायक देवस्थानांना जगभरातून अनेक भाविक भेटी देत असतात. कोरोना महामारी कालावधीत या देवस्थानांना भाविकांना भेट देता आली नाही. कोरोनासंदर्भातील निर्बंध शिथिल केल्यानंतर अनेक भाविक अष्टविनायक दर्शनासाठी येत आहेत. भाविकांना आवश्यक सोयीसुविधा आणि त्यांच्या व्यवस्थेसंदर्भात पुणे, अहमदनगर व रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निर्देश दिले असल्याचे उपसभापती डॉ.गोऱ्हे यांनी सांगितले.

            पुणे जिल्ह्यातील मोरगाव देवस्थानच्या आढावा बैठकीत भक्त निवासाची व्यवस्था करावी, अन्नछत्र सुरू करावे. थेऊर देवस्थान मंदिर परिसराबाबत थेऊर फाटा ते थेऊर या रस्त्याची दुरुस्ती व मंदिराजवळील रस्ते दुरुस्ती करावेत, असे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे यांना देण्यात आले आहेत.

            अहमदनगर जिल्ह्यातील सिद्धटेक येथील दौंड ते सिद्धटेक मंदिरापर्यंतचा रस्ता दुरुस्ती, भीमा नदीच्या घाटाचे सुशोभीकरण, मंदिर परिसरात हायमास्ट दिवे लावणे, उपलब्ध 40 कोटी रुपयांच्या निधीतून करण्यात येणाऱ्या आराखड्याचे प्रारूप सादर करावे, असे निर्देश अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले आहेत.

            रायगड जिल्ह्यातील महड देवस्थानतील सुविधांबाबत झालेल्या बैठकीत महड फाटा ते महड देवस्थान मार्गावर हायमास्ट दिवे लावण्यासाठी उपसभापती डॉ.गोऱ्हे यांनी पाच लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला. या ठिकाणी महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छता गृह बांधावे, तलावाचे सुशोभिकरण करणे, खोपोली ते पाली हा रस्ता दुरुस्त करावा तसेच पाली देवस्थानमध्ये ग्रामीण पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करून भाविकांना शुद्ध पाणी उपलब्ध करावे, बायपास रस्ता पूर्ण करावा, असे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, रायगड यांना देण्यात आले, असल्याचेही डॉ.गोऱ्हे यांनी सांगितले.

0000


 'पढेगा भारत' जिओ टीव्ही एज्युकेशन चॅनेलचे उद्घाटन

देशाला पुढे नेण्याची क्षमता शिक्षणातच - राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

पुणे, दि. 25 : देशाला पुढे नेण्याची क्षमता शिक्षणात आहे. शिक्षण क्षेत्रात लावल्या जात असलेल्या नित्यनूतन शोधातूनच आपल्याला प्रगती साधायची आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

पिंपरी येथील आचार्य अत्रे रंग मंदिर येथे आयोजित कार्यक्रमात राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या हस्ते जिओ टीव्ही ओटीटी प्लॅटफॉर्मवरील 'पढेगा भारत' चॅनेलचे उद्घाटन झाले. कार्यक्रमास केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, राष्ट्रीय विमुक्त जाती भटक्या जमाती आयोगाचे अध्यक्ष दादा इदाते, पिंपरी- चिंचवड महानगर पालिकेच्या महापौर उषा ढोरे, ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, माजी खासदार डॉ. अमर साबळे, 'पढेगा भारत' च्या अध्यक्षा वेणू साबळे आदी उपस्थित होते.

कल्पना करायची असेल तर उच्च दर्जाची करावी, असे सांगून राज्यपाल म्हणाले, साहसाचा संकल्प केला तर आपल्या हातून उत्कृष्ट दर्जाचे काम घडू शकते. माजी प्रधानमंत्री दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांनी साहसवादाचे कृतीशील उदाहरण घालून दिले. आता पाश्चात्य देशांपेक्षा आपल्या संस्कृतीकडे जग आपल्याकडे आशेने पाहत आहे. मुले ही आपल्यासाठी देवासमान असून त्यांना आपल्याला पुढे न्यायचे आहे. त्यासाठी आभासी 'डिजिटल' सोबतच प्रत्यक्ष अशा 'व्हिजिटल' अशा दोन्ही पद्धतींचा अवलंब करावा लागेल, असेही श्री. कोश्यारी म्हणाले.

'पढेगा भारत' हे चॅनेल शिक्षणासाठी महत्वपूर्ण माध्यम ठरेल, असा विश्वास व्यक्त करून सांस्कृतिक संवर्धनासाठी आर्टिफिशीयल इंटेलिजन्स बरोबरच अध्यात्मिक इंटेलिजन्सलाही महत्त्व द्यावे लागेल, असेही राज्यपाल यावेळी म्हणाले.

डॉ. कराड म्हणाले, सध्याचे युग हे तंत्रज्ञानाचे युग असून त्यात जो अधिक स्पर्धात्मक राहील तोच पुढे जाईल. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणत. शिक्षणाच्या माध्यमातूनच आपली प्रगती होणार असून ‘पढेगा भारत’ने हे ज्ञानदानाचे पवित्र काम उत्कृष्ट पद्धतीने करुन चांगले डॉक्टर, प्राध्यापक, तंत्रज्ञ, उद्योजक आदी सर्वच क्षेत्रातील लोक घडवावेत. दूरचित्रवाणी हे दृकश्राव्य माध्यम असून त्याचा शिक्षणासाठी अधिक चांगला उपयोग होईल, असेही ते म्हणाले.

डॉ. माशेलकर म्हणाले, अल्प खर्चात उच्च दर्जाचे शिक्षण हे उद्दिष्ट असले पाहिजे. शिक्षणाचा विस्तार, वेग, शाश्वतता, गुणवत्ता याकडे लक्ष देण्याची गरज आहे. 'राईट टू एज्युकेशन' बरोबरच 'राईट एज्युकेशन' आणि 'राईट वे ऑफ एज्युकेशन' हे आताच्या काळात महत्त्वाचे ठरणार आहे. कृतिशील, गतिशील शिक्षणाद्वारे ज्ञानाबरोबरच व्यक्तिसंवर्धन आणि मूल्यवर्धन घडवायचे आव्हान आपल्याला पेलायचे आहे. तंत्रज्ञानाच्या सहकार्याने हे शक्य होत आहे. बुद्धिमत्ता, तंत्रज्ञान आणि आत्मविश्वास यातूनच नवी पिढी घडणार आहे, असेही ते म्हणाले.

श्री. इदाते म्हणाले, गौतम बुद्धांची प्रज्ञा, शील आणि करुणा ही तत्वे आत्मसंवर्धनासाठी महत्त्वपूर्ण आहेत. शिक्षणातील महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदींचे कार्य मार्गदर्शक आहे. त्या मार्गावर चालत अमर साबळे यांनी सुरू केलेले ‘पढेगा भारत’ अभियान शिक्षणाला व्यापक स्वरूप देईल असेही ते म्हणाले.

डॉ. नितीन करमळकर म्हणाले, कोवीड काळात शिक्षण ठप्प झाले आणि आपण ऑनलाइन शिक्षणाकडे वळून त्याचे स्वरूप व्यापक केले. शालेय शिक्षण ते उच्च दर्जाच्या स्पर्धा परीक्षा एकाच प्लॅटफॉर्मवर आणण्याचा हा चांगला प्रयत्न आहे. केवळ डिजिटल नव्हे तर दर्जेदार शिक्षण यातून मिळेल असा विश्वास व्यक्त केला.

 वेणू साबळे यांनी स्वागत करून पढेगा भारतच्या कामाचा आढावा घेतला व नवीन चॅनेलची माहिती दिली. यावेळी आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, जिओ चे प्रतिनिधी दीपक शिवले आदी उपस्थित होते.

00000

महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्थेचा उद्घाटन समारंभ

अध्यापक विकास संस्था नवा दृष्टीकोन देणारी ठरेल - उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे दि. 25 : शिक्षण क्षेत्रात वेगाने घडत असलेल्या बदलांच्या पार्श्वभूमीवर अध्यापकांनी नवे ज्ञान आणि तंत्रज्ञान स्वीकारणे गरजेचे असून अध्यापकांना त्यासाठी आवश्यक नवा दृष्टीकोन देण्यास महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था उपयुक्त ठरेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्थेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार गिरीश बापट, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी आदी उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले, आजचा विद्यार्थी इंटरनेटच्या माध्यमातून जगाशी जोडला गेला आहे. तो अभियांत्रिकी, वैद्यकीय, चित्रपट, नाटक, कला, संस्कृती, नवे शोध आदी क्षेत्राबाबत अधिक जागरूक आहे. शिक्षक आणि संस्थाचालकांनी विद्यार्थ्यांच्या पुढे राहण्यासाठी नवा दृष्टीकोन स्वीकारण्याची गरज आहे. अध्यापक विकास संस्थेच्या माध्यमातून नव्या युगातील आधुनिक ज्ञान आणि प्राध्यापकांच्या नेतृत्व गुणांचा विकास करणे शक्य होईल. चांगले शिक्षक घडविण्यासाठी ही संस्था उपयुक्त ठरेल.

गुरु-शिष्य परंपरेचा गौरवशाली वारसा महाराष्ट्राने समृद्ध केला

देशाला गुरु-शिष्य परंपरेचा गौरवशाली वारसा लाभला आहे. हा वारसा समृद्ध करण्याचे काम महाराष्ट्राने केले आहे. महात्मा जोतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्यासारख्या ध्येयनिष्ठ गुरुजनांनी शिक्षणांची गंगा शेतकरी, कष्टकरी बहुजन समाजाच्या घरापर्यंत नेण्याचे काम केले, महिलांना शिक्षणाचे दरवाजे खुले केले. ध्येयनिष्ठ शिक्षणसेवेची परंपरा आजचे शिक्षकही पुढे नेत आहेत.

माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी विद्यार्थ्यांना नवा वैज्ञानिक दृष्टीकोन देण्याचे कार्य केले. जयंत नारळीकर, जि.प. शाळेचे शिक्षक रणजित सिंह डिसले यांच्यासारख्या अनेक शिक्षकांचे कार्य मौलिक आहे. बदलत्या काळाची गरज लक्षात घेता अध्यापकांनी ही परंपरा पुढे नेण्यासाठी एका विषयापुरते मर्यादीत न रहाता ज्ञानकक्षा रुंदावण्याचा प्रयत्न करावा. ज्ञानासोबत नव्या संकल्पना मांडण्यासाठी आणि जगातील इतर भाषा, संस्कृती शिकण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहीत करावे, असे आवाहन श्री. पवार यांनी केले.

बुद्धीवंतांना अधिक ज्ञानवान करणारी संस्था

अध्यापक विकास संस्थेमुळे शिक्षणाचा दर्जा सुधारेल, शिक्षण क्षेत्रात अमूलाग्र सुधारणा घडून येतील. जगातील नव्या ज्ञानाचा उपयोग प्राध्यापकांना झाल्यास त्याचा फायदा नव्या पिढीला होईल. संस्थेची इमारत प्रशिक्षणार्थींचा उत्साह वाढविणारी आहे. संस्थेत गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण देताना त्यात सातत्य राखणे महत्वाचे आहे. संस्थेत असलेल्या सुविधा आणि दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणामुळे ही संस्था अध्यापकांना अधिक ज्ञानवान करणारी ठरेल, असेही श्री. पवार म्हणाले.

पुणे येथे सारथी संस्था, सहकार भवन, कृषी भवन, कामगार भवन, नोंदणी भवन, शिक्षण आयुक्तालय आदी संस्था पुढील 50 वर्षांचा विचार करून उभारण्यात येत आहे. अध्यापक विकास संस्थेतही भविष्याचा विचार करून अधिक उन्नत सुविधा निर्माण कराव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्रातील शैक्षणिक क्षेत्र सुदृढ होण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल - उदय सामंत

श्री. सामंत म्हणाले, प्राध्यापकांना प्रशिक्षण देणारी देशातील ही पहिली संस्था आहे. विद्यार्थी केंद्रबिंदू मानून त्याला आधुनिक शिक्षण मिळावे या उद्देशाने अध्यापक विकास संस्थेची स्थापना करण्यात आली. अनेक नामवंत संस्था या संस्थेसोबत काम करीत आहेत. इन्फोसिसने सामाजिक दायित्व निधीच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्याचे मान्य केले आहे. देशातील हा अशा प्रकारचा पहिलाच सामंजस्य करार आहे. प्राध्याकांसमवेत शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही आधुनिक स्वरुपाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हा 60 कोटींचा प्रकल्प असून त्याचा हा पहिला टप्पा आहे. हा प्रकल्प देशपातळीवर आदर्शवत ठरेल असा विश्वास श्री.सामंत यांनी व्यक्त केला.

उच्च शिक्षणाशी संबंधित सर्व कार्यालये संस्थेच्या इमारतीत एकाच ठिकाणी असतील. संस्थेतील अद्ययावत स्टुडिओमधून राज्य व संघ लोकसेवा आयोग परीक्षेविषयी विद्यार्थ्यांना आणि खाजगी संस्थेतील प्राध्यापकांना प्रशिक्षण देण्यात येईल. आधुनिकरित्या प्रशिक्षित प्राध्यापक चांगले ज्ञानदान करतील आणि राज्यातील शैक्षणिक क्षेत्राला त्यामुळे अधिक बळकटी मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ऑक्स्फर्डला ‘पुणे ऑफ वेस्ट’ म्हणून ओळखले जाईल - आदित्य ठाकरे

श्री. ठाकरे म्हणाले, शिक्षक हे आजच्या काळातील तंत्रज्ञान आहे. त्यामुळे तंत्रज्ञानाप्रमाणे त्यांनाही अद्ययावत करणे गरजेचे आहे, त्यादृष्टीने प्रशिक्षण महत्त्वाचे आहे. पुढची पिढी घडविण्याचे कार्य शिक्षक करतात. नवा देश, नवी पिढी घडविण्यासाठी शिक्षक आणि शिक्षण महत्त्वाचे आहे. महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्थेच्या माध्यमातून असे कार्य होईल आणि त्यातून देशाला नवी दिशा दिली जाईल. देशासह जगभरातील प्राध्यापक या संस्थेला भेट देण्यासाठी पुण्यात येतील. आज शिक्षण पद्धतीत केले जाणारे बदल आणि निर्माण करण्यात येणाऱ्या सुविधा लक्षात घेता येत्या काळात ऑक्स्फर्डला ‘पुणे ऑफ वेस्ट’ म्हणून ओळखले जाईल, असा विश्वास श्री. ठाकरे यांनी व्यक्त केला. नव्या शिक्षण पद्धतीत विद्यार्थ्यांमधील जिज्ञासा वाढविण्यावर भर देण्यात यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

खासदार बापट यांनी संस्थेच्या उभारणीबाबत समाधान व्यक्त करून ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि प्राध्यापकांना संस्थेचा उपयोग व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

प्रास्ताविकात संस्थेचे कार्यकारी संचालक निपुण विनायक यांनी संस्थेची माहिती दिली. नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणात शिक्षकांचे प्रशिक्षण हे महत्त्वाचे अंग आहे. राज्यातील 4 हजारपेक्षा अधिक महाविद्यालये आणि दीड हजार तंत्र शिक्षण महाविद्यालयातील सुमारे 1 लाख प्राध्यापकाना प्रत्येक टप्प्यावर प्रशिक्षण देणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य आहे. राज्यातील सर्व विद्यापीठे संस्थेचे उपकेंद्र राहतील आणि त्याद्वारे प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

मान्यवरांच्या हस्ते जे.जे. महाविद्यालयाने तयार केलेल्या संस्थेच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. बोधचिन्ह तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कारदेखील उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. गडचिरोली येथील युवकांना व्यवसायाभिमुख प्रशिक्षण देणाऱ्या नागपूर येथील ज्ञान फाऊंडेशन संस्थेचे संस्थापक अजिंक्य कोटावार यांना पर्यावरण मंत्री श्री.ठाकरे यांच्या हस्ते 'यंग सोशल इनोव्हेटर' म्हणून गौरविण्यात आले.

कार्यक्रमाला आमदार अतुल बेनके, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, संचालक उच्च व तंत्रशिक्षण विभाग डॉ. धनराज माने, तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. अभय वाघ, तंत्रशिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. विनोद मोहितकर, विद्यापीठातील अधिकारी, पदाधिकारी, प्राचार्य

 *मालवणी चिमटो* 👌

*बायको* : काय हो तुम्ही जेव्हा माका बघुक इल्लात तेव्हा मी कुठल्या रंगाची साडी घातलेलय काय आठवता का काय तुमका? 

*नवरा* : 🙄नाय गो बाय, आत्महत्या करुची वेळ इली कि कोण बघता येणारी ट्रेन कोकण कन्या हा कि जनशताब्दी ?

😁😁🤦🏻‍♂️🤦🏻‍♂️

Featured post

Lakshvedhi