सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Wednesday, 27 October 2021
रस्त्यांची कामे करताना गुणवत्तेवर भर द्या
- नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
· महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत
जळगाव शहरातील रस्त्यांसाठी 42 कोटी रुपये मंजूर
मुंबई, दि. 26 : जळगाव शहरातील रस्त्यांच्या कामासाठी महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत 42 कोटी रुपयांचा रस्ते विकास प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांची कामे करताना गुणवत्तेवर भर देऊन दर्जेदार कामे करण्याचे निर्देश नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत जळगाव शहरासाठी मंजूर करण्यात आलेल्या रस्ते विकास प्रकल्पाचा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत आयोजित बैठकीत आढावा घेतला. पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजीव जयस्वाल यांचेसह दूरदृश्य प्रणालीद्वारे जळगाव महानगरपालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता आदी उपस्थित होते.
जळगाव शहरातील रस्त्यांसाठी नगरविकास विभागाने महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत 42 कोटी रुपये मंजूर केले आहेत. शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांची गैरसोय होत असून मुख्य रस्त्यांची कामे तातडीने सुरू करणे गरजेचे आहे, त्यादृष्टीने तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना यावेळी नगरविकासमंत्री श्री. शिंदे यांनी दिल्या. शहरातील रस्त्यांची कामे सुचविण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याच्या सूचनाही श्री. शिंदे यांनी यावेळी दिल्या. या समितीमध्ये जळगावचे जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्तांचा समावेश असेल. रस्त्यांच्या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग अंमलबजावणी यंत्रणा म्हणून काम करणार असून रस्त्यांची कामे करताना ती दर्जेदार करण्यावर भर देण्याचे निर्देशही नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले.
जळगाव शहरातील रस्त्यांची कामे प्राधान्याने होणे आवश्यक आहेत.त्यासाठी महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत मंजूर झालेल्या 42 कोटी रुपयांच्या निधीतून शहरातील प्रमुख रस्त्यांची कामे तातडीने सुरू करण्यासाठी महानगरपालिकेने कार्यवाही करण्याच्या सूचना यावेळी पालकमंत्री श्री. गुलाबराव पाटील यांनी दिल्या. महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत मंजूर झालेल्या १०० कोटी रुपयांच्या निधीपैकी उर्वरित ५८ कोटी रुपयांचा निधी देण्याची मागणी पालकमंत्री श्री. पाटील यांनी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली असता महापालिकेने निधी मागणीचा प्रस्ताव तात्काळ नगरविकास विभागाकडे सादर करण्याचे निर्देश यावेळी नगरविकासमंत्र्यांनी दिले.
अवयवदान वाढविण्यासाठी आराखडा तयार करा
सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या सूचना
मुंबई, दि. 26 : राज्यातील अवयवदान आणि अवयव प्रत्यार्पण वाढण्यासाठी आराखडा तयार करावा, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिल्या.
सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली अवयवदान आणि अवयव प्रत्यार्पणाबाबत आढावा बैठक झाली. त्या बैठकीत त्यांनी या सूचना दिल्या. मंत्रालयातील परिषद सभागृह येथे झालेल्या या बैठकीस आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास, प्रधान सचिव-2 निलीमा करकेटृटा, वैद्यकीय शिक्षण विभाग प्रधान सचिव सौरभ विजय, आरोग्य सेवा आयुक्त एन. रामास्वामी, वैद्यकीय शिक्षण व संशोधन आयुक्त वीरेंद्र प्रताप सिंह, आरोग्य सेवा संचालक डॉ.साधना तायडे, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ.दिलीप म्हैसेकर आदी उपस्थित होते.
श्री. टोपे यांनी सांगितले की, राज्यातील अवयवदान आणि अवयव प्रत्यार्पणाबाबत अद्यापही सुधारणा अपेक्षित आहे. सध्या राज्यातील प्रमुख शहरांमध्येच अवयवदान आणि अवयव प्रत्यार्पणाबाबत कामकाज होते. पण याबाबत राज्यातील छोट्या शहरातही अवयवदान आणि अवयव प्रत्यार्पण वाढायला हवे. अवयव दानाबाबत जनजागृती होण्याची आवश्यकता आहे. सध्या खासगी रुग्णालयांमध्ये अवयव दानाबाबत काम होते. शासकीय दवाखान्यातही अवयवदान व्हायला हवे. यासाठी एक आराखडा तयार करावा, असे निर्देशही श्री.टोपे यांनी दिले.
अवयवदान बाबत काम करणाऱ्या विभागीय प्रतिरोपण समन्वय केंद्रांची संख्या वाढवावी. सध्या पुणे, मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद येथे ही केंद्र आहेत. यापुढे कोल्हापूर, नाशिक, अमरावती, लातूर येथे ही केंद्र सुरू करावी, असे श्री. टोपे यांनी सांगितले.
अवयवदान आणि अवयव प्रत्यार्पणाबाबत लोकांत जागृती करावी. अवयवदानाबाबत लोकांच्या मनातील गैरसमज दूर करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे, असेही त्यांनी सांगितले.
बैठकीस राज्य सल्लागार समितीचे सदस्य डॉ.सुजाता पटवर्धन, डॉ.जी. बी. डावर, डॉ.सुरेंद्र कुमार माथूर, डॉ.राहुल पंडित, आरोग्य विभागाचे उपसचिव शि. मी. धुळे, डॉ.अरुण यादव, डॉ.कैलास जावंदे आदी उपस्थित होते.
Tuesday, 26 October 2021
नागरी संरक्षण जिल्ह्यांमध्ये नागरी संरक्षण स्वयंसेवकांची
नोंदणी व पुनर्नोंदणी प्रक्रिया पुन्हा सुरु
मुंबई, दि. 26 : महाराष्ट्र राज्यातील मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, रायगड व पालघर या नागरी संरक्षण जिल्ह्यांमध्ये नागरी संरक्षण स्वयंसेवकांची नोंदणी व पुनर्नोंदणी प्रक्रिया संचालक, नागरी संरक्षण, महाराष्ट्र राज्य यांच्या मान्यतेने पुन्हा सुरु केली आहे.
ज्या नागरिकांना नागरी संरक्षण दलामध्ये स्वंयसेवक म्हणून सदस्य व्हायचे आहे त्यांनी या विभागाची वेबसाईट http://maharashtracdhg.gov.in वर भेट द्यावी. नागरी संरक्षण स्वयंसेवक नोंदणी व पुनर्नोंदणी फॉर्मस्, दिलेल्या अटी, शर्तीसह डाऊनलोड करुन घ्यावेत. नोंदणी / पुनर्नोंदणी फॉर्म भरुन आपल्या क्षेत्रातील संबंधित नागरी संरक्षण कार्यालयाशी संपर्क साधून स्वत: सादर करावेत आणि पुढील प्रक्रियेबाबतची माहिती घ्यावी. स्वयंसेवक म्हणून आपले योगदान देशसेवेसाठी द्यावे, असे आवाहन नागरी संरक्षण संचालनालय (वरिष्ठ प्रशासिक अधिकारी चालन व भांडार) यांनी केले आहे.
००००
कोकणातील काजू उत्पादकांसाठी अल्प व्याजदरात कर्ज;
राज्य शासनाकडून व्याज दर सवलत योजना
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय
· प्रायोगिक तत्वावर ओला काजूगर काढण्याच्या मशिन लुधियानावरुन मागविणार
· अधिक उत्पन्न देणाऱ्या काजूचे वाण विकसित करण्याच्या कोकण विद्यापीठाला सूचना
मुंबई, दि. 26 : कोकणाच्या शाश्वत विकासासाठी कोकणात मत्स्यव्यवसाय, फळबाग, दुग्धव्यवसायासह पर्यटन वाढीसाठी राज्यसरकार विशेष प्रयत्नशील आहे. त्याचबरोबर कोकणातील काजू उत्पादकांना दिलासा देण्यासाठी काजू उत्पादकांना अल्प व्याजदरात भांडवल उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने संबंधित जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या माध्यमातून व्याज दर सवलत योजना राबविण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आला.
मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती कक्षात काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला कृषी मंत्री दादाजी भुसे, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, फलोत्पादन राज्यमंत्री कु.आदिती तटकरे, आमदार शेखर निकम उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, निसर्गाचे वरदान लाभलेल्या कोकणाच्या सर्वांगिण विकासासाठी राज्य सरकार विशेष प्रयत्नशील आहे. त्याचाच भाग म्हणून कोकणातील काजू उत्पादकांना दिलासा देण्यासाठी संबंधित जिल्हा मध्यवर्ती बँकांच्यामार्फत सवलतीच्या दरात कर्ज उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यासाठी राज्य शासनाच्यावतीने व्याज सवलत योजना तयार करण्यात येणार आहे. तसेच ओल्या काजूगराला अधिक किंमत मिळत असल्याने प्रायोगिक तत्वावर ओला काजूगर काढण्याच्या मशिन लुधियानावरुन मागविण्यात येणार आहेत. या मशिन मागविल्यानंतर ओला काजूगराचे उत्पादन वाढण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर अधिक उत्पन्न देणारे काजूचे वाण विकसीत करण्याच्या सूचना डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.
या बैठकीला नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, राज्य उत्पादन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर, कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत (व्हीसीद्वारे), कुलसचिव डॉ. भरत साळवी (व्हीसीद्वारे), महाराष्ट्र स्टेट को-ऑप. कॅश्यु प्रो. फेडरेशनचे अध्यक्ष धनंजय यादव, मिथिलेश देसाई, खालगाव काजू मद्यार्क व काजू उत्पादक सहकारी संस्थेचे संचालक पंकज दळवी उपस्थित होते.
*****
बचत गटांच्या यशकथा लिखाणाची स्पर्धा
मुंबई, दि. 26 : महिला बचत गटांनी अनेक उपक्रम यशस्वीपणे राबविले असून त्या महिला उद्योग व्यवसायात उभ्या आहेत. या यशस्वी बचतगटांतील महिलाच्या यशकथा उत्तमरित्या लिहित्या जाव्यात आणि त्याचे संकलन व्हावे या उद्देशाने महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्यावतीने ‘कथा यशस्वींनीच्या’ हा राज्यस्तरीय यशकथा लिखाण स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे.
या स्पर्धेकरिता, महिला बचत गटाच्या सामुहिक प्रयत्नातून गावाच्या स्थितीत बदल, महिला बचत गटाकडून नाविन्यपूर्ण व्यवसायाची उभारणी, महिला बचत गटाच्या सामुहिक प्रयत्नातून सदस्यांचे समस्या निराकरण , स्वयंसहायता महिला बचत गटाचे यशस्वी आणि शाश्वत व्यवसाय, महिला बचत गटामार्फत अन्नप्रक्रिया उद्योग, महिला बचत गटामार्फत शेतीपूरक उद्योग व्यवसाय, महिला बचत गटांची डिजिटल साक्षरता आणि त्याचा गटाच्या विकासासाठी उपयोग, महिला बचत गटांचा यशस्वी मत्स्यव्यवसाय, महिला बचत गटाची कोविड 19 प्रादुर्भाव काळातील अद्वितीय कामगिरी (मदत कार्य), महिला बचत गटाची कोविड 19 प्रादुर्भाव काळातील अद्वितीय कामगिरी (व्यवसाय/उद्योग), महिला बचत गटाच्या मदतीने गट सदस्य महिलांचे वैयक्तिक यशस्वी व्यवसाय/ उद्योग, DDUGKY अंतर्गत प्रशिक्षण घेऊन यशस्वीरीत्या रोजगारप्राप्ती आणि RSETI मधून प्रशिक्षित होऊन यशस्वी उद्योग व्यवसाय हे लिखाणाचे विषय आहे.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी उमेदचे कर्मचारी किंवा महिला बचत गटाचे सदस्य असणे आवश्यक असून यशकथा मराठी भाषेत आणि युनिकोडमध्ये लिहिलेली असावी तसेच कमाल 750 शब्दमर्यादा असावी.
ही स्पर्धा जिल्हा आणि तालुका स्तरावरील कर्मचारी/व्यवस्थापक, समुदाय संसाधन व्यक्ती आणि गावस्तरावरील महिला बचत गटाचे सदस्य या तीन गटात होणार आहे. ही स्पर्धा दिनांक 10 नोव्हेंबरपर्यंत 2021 पर्यंत आहे.
या स्पर्धेतील विजेत्यांना राज्यस्तरावर प्रथम पारितोषिक म्हणून रूपये 21 हजार आणि सन्मानपत्र, राज्यस्तरावर द्वितीय पारितोषिक रूपये 15 हजार आणि सन्मानचिन्ह, राज्यस्तरावर तृतीय पारितोषिक रूपये 11 हजार आणि सन्मानचिन्ह तसेच रूपये 2100 चे प्रत्येकी दोन उत्तेजनार्थ पारितोषिक प्रदान करण्यात येतील.
या स्पर्धेच्या संपूर्ण अटी व नियमावलीसाठी या अभियानाच्या राज्य कक्षात आणि जिल्हा कक्षात संपर्क करून या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी भाग घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.हेमंत वसेकर यांनी केले आहे.
0000
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...