सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Thursday, 14 October 2021
Wednesday, 13 October 2021
#क्या भात है!!
---आमटीभात... वरणभात... दहीभात... ताकभात... कालवणभात... पिठलंभात... केशरीभात... वगैरे
सांप्रत काळात भारत देशात डाएट नावाच्या फॅडने किंवा स्टाईलने भात किंवा तांदूळ ह्या आपल्या लाडक्या आणि आवडत्या अशा पदार्थावर फार मोठी कुरघोडी करायला लावली आहे.
विकेट किपिंग करताना जांभया दिल्याबद्दल पाकिस्तानी कॅप्टन सरफराज अहमद जितका बदनाम झालाय त्यापेक्षा काकणभर जास्तच बदनामी डाएट ह्या प्रकाराने भाताची केलेली आहे. आणि समस्त भारतीयांसाठी ही गोष्ट खचितच महान चिंतेची बाब आहे.
भा र त ह्या शब्दाची व्युत्पत्तीच मुळात 'भात जेवण्यात रत असलेल्या लोकांचा देश' अशी व्हायला हवी होती आणि तेच जास्त संयुक्तिक झालं असतं नाही का. ज्या देशाच्या नावातच भात लपलेला आहे अशा लोकांनी भात सोडणे किंवा वजन वाढते म्हणून त्याला त्यागणे म्हणजे ऑस्ट्रेलियाने स्लेजिंगचा त्याग केल्यासारखं होईल.
भारतीय माणसाने आमटी भाताला नाही म्हणणे म्हणजे आमटीभाताचा घोर अपमान, म्हणजे स्टीव्ह बकनरने सचिनला नॉट आऊट देण्यासारखं आहे. बकनरने सचिनला खोटं आऊट देऊन आपलं नाव राखावं आणि आपण आमटीभात जेवून आपलं.
मी एक भारतीय आहे. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत आणि देशातल्या प्रांतागणीक विविधतेने नटलेल्या भाताच्या परंपरांचा मला अभिमान आहे.
उत्तरेला काश्मीरी पुलाव पासून ते दक्षिणेकडील तामिळ रस्सम भाता पर्यंत, द्वारकेच्या गुज्जू कढी खिचडी पासून ते ओरिसा, बंगालच्या माछ भातापर्यंत, महाराष्ट्रातल्या केशरी भाता पासून ते हैदराबादेलतल्या बिर्याणी पर्यंत, कर्नाटकातल्या भिसीब्याळी अन्नम पासून ते लखनवी बिर्याणी पर्यंत भाताच्या सर्व परंपरांची आणि विविधतेने नटलेल्या परंपरांची मला आवड आणि अभिमानही आहे.
भारतात शेतीचं युग असल्यापासून आद्य पिकांमध्ये असलेलं धान्य सर्वार्थाने तांदूळच असेल. अनेक वर्षं चुलीवर शिजत असलेला भात गॅसवर आला आणि पेज हा पदार्थ गायब व्हायला सुरुवात झाली.
कुकर ह्या प्रकाराने भात शिजवण्याची पद्धत क्रिकेट मधल्या टी ट्वेंटीसारखी करून ठेवली आहे. मॅच चालू होऊन कधी संपते हे कळतही नाही. एरव्ही सोय म्हणून मान्य आहे पण निवांत असू तेव्हा गॅसवर खरी 'कसोटी' म्हणजे कुकर शिवाय भात लावायला हवा.
अस्सल भाताची मजा त्यात आहे. खरंतर तांदूळ शिजवायला ठेवून त्याचा अप्रतिम सुगंध हळूहळू स्वयंपाकघरात पसरायला हवा. पण कुकर फिल्डिंगला येतो आणि त्याला ह्या सुगंधाचा कॅच काही पकडता येत नाही. तो कायम ड्रॉपच होतो.
भाताची एक गम्मत आहे. भात हा एकटा कधीच नांदत नाही. तो जेव्हा एकटाच असतो तेव्हा त्याचं रुक्ष पिंड होतं. पण त्याच्या मुदीला गोडंवरणाची, लिंबाच्या फोडीची, आणि वरून तुपाच्या धारेची साथ मिळाली आणि एखाद तुळशीपत्राचं टॉपिंग मिळालं की त्याचा नैवेद्य होतो, पण वरणभात तुप आणि लिंबू 🍋 किंवा लिंबाचं लोणचं म्हणजे स्वर्ग सुखच. रिष्ता वही है किंतू सोच नई है.
गोडंवरण भात म्हणजे हृषीकेश मुखर्जींचा सिनेमा असेल तर नाॅनव्हेज बिर्याणी ही वेबसिरीज आहे. रसिक माणूस या दोन्ही गोष्टी एकत्र एन्जॉय करू शकतो. जो एकावरच अडून राहतो त्याचं आयुष्य अगदीच निरस आणि एकसुरी ठरतं.
वरण, आमटी, रस्सा, रस्सम, कालवण, कढी, सांबार, पिठलं हे भाताचे शाश्वत सोबती आहेत. त्यांना कुणीही भाता पासून वेगळं करू शकत नाही, त्यांनी भाताची साथ शेवटपर्यंत देणं अलिखित नियम आहे.
डाळीच्या प्रमाणासोबत त्या दोघांचं नातं घट्ट होत जातं. कधीकधी आमटीची माया पातळ होते आणि भाताच्या उदार फटींमधून द्रव पदार्थ ताटभर पसरतो. सुखाच्या आठवणीं सारखी डाळच शिल्लक राहते. अशावेळी त्यांचा संसार अर्ध्यावरती डाव मोडल्याचा भास होतो. भातुकलीच्या खेळामधल्या राजाराणी सारखा.
चिंचं, गूळ, आमसूल, आगळ, कढिलिंबं, मिरच्या, कैरी, शेगटाच्या शेंगा, क्वचित वांगी, टोमॅटो खरे टेस्टमेकर्स आहेत. नागपुरात वांगी भात अतिशय आवडता आहे त्यांच्यामुळे गेमला एलिगन्स आहे. ही व्यंजनं ज्याला आवडत नाहीत, त्याचं आयुष्य फोल आहे.
जीरा राईसमधलं तडतडलेलं जिरं, दही बुत्तीमधली उडदाची डाळ, पुलावातलं तमालपत्र, कढी खिचडीमधली लवंग, काश्मिरी पुलावामधले काजू इत्यादी इत्यादी जेवणाच्या कहानणीमधले ट्विस्टस आहेत, ते शोधून ज्याला एन्जॉय करता आले त्याचं खाद्य जीवन आनंदी आणि परीपूर्ण ठरतं.
आमटी आणि भाताचा संसार मला उमा महेश्वरांच्या संसारसारखा वाटतो.
जेवणाने कितीही वेगवेगळे अवतार घेतले तरी सरतेशेवटी संध्याकाळी भात आमटी बरोबर पानात समोर आला की पोटात अगोदरच शांतता नांदायला लागते, आणि व्वा तोंडातून आपसूकच येतो
मऊ भात किंवा गरगट्ट भात ह्या बरोबर मेतकुटाने वेळ मारून नेता येते. थोडा ओव्हर रेटेड. बाकी परफॉर्मन्स फक्त वेळ मारून नेण्या इतकाच.
भाताची खरपुडी म्हणजे अगदी कव्हर ड्राइव्ह. सायीच्या दुधाची किंवा सायीच्या दह्याची साथ मिळाली की सोनेपे सुहागा असतो. मग त्याबरोबर तोंडी लावायला कही लागतंच असं नाही
फोडणीचा भात हा नाईट वॉचमन असतो. आदल्या रात्रीचा त्याचा गेम दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सेशनपर्यंत आरामात चालतो. शेंगदाणे आणि सांडगी मिरची हे दोघे नॉन स्ट्रायकिंग एन्डला असले की, चुरचुरीत फोडणीच्या भाताचा गेम विशेष बहरतो वगैरे.
खिचडीची तुलना कशाशीही होऊ शकत नाही. कमी वेळात अगदी मनसोक्त खाता येईल आणि तृप्ततेचा आनंद देऊन जो रोल दिया है उसको निभानेका फर्ज वो बहोत अच्छे तरिकेसे अदा करती है. आणि कढीची साथ असेल तर स्वर्गसुखाचा आनंद देण्यात कसूर करत नाही.
पोट व पिच बिघडलंय आणि विकेट पडताहेत अश्या सिच्युएशनमध्ये पिचवर उभं राहायलाच हवंय, कंटाळा आलाय आणि तरीही एक बाजू सांभाळायची आहे, अचानक घरी कोणीतरी आलंय आणि आस्कींग रेट वाढला आहे, किंवा अगदी हौस म्हणून साग्रसंगीत टेक्निकल आणि निवांत बॅटिंग करायची आहे- अश्या सगळ्याला पर्याय फक्त राहुल द्रविड आणि खिचडी हाच असू शकतो. साथीला भाजलेला पोह्याचा पापड, सांडगी मिरची, एखादी कोशिंबीर असली तर नुसती इनिंग सांभाळली जात नाही तर फॉलोऑन मिळालेली अख्खी मॅच जिंकली जाऊ शकते.
रात्रीच्या जेवणात भातापेक्षा सूप सलाड घेणाऱ्या लोकांचं मला कौतुक वाटतं. आणि त्यांना समाधान असतं डाएट सांभाळल्याचं.
(सूप आणि सलाड लोकं रात्रीच्या जेवणात 'घेतात'. हे केवळ तुम्हाला दाखवण्यासाठी की आम्हीं तुमच्यापेक्षा वेगळे आहोत.तुम्ही मात्र भात 'जेवता').
एकंदरीतच आमटी भाताचं पोटभर जेवण म्हणजे उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म असतं. दाल रोटी खाओ, प्रभू के गुण गाओ ही अध्यात्माची पहिली पायरी असली तर कोन नाय कोनचा, डाळ भात लोनचा, हे जीवनाचं गुह्यतम गुढ ज्ञान आहे.
क्षोत्रं चक्षु: स्पर्शनंच रसनं घ्राणमएवच ह्या सर्वांना सोबत घेऊन जो हे ज्ञान प्राप्त करतो त्याला संसारात काहीच कमी राहत नाही.
इतिश्री आमटीभात पुराण संपूर्णम्
राज्यातील नाट्यगृहे 22 ऑक्टोबरपासून सुरु होणार
सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांची माहिती
· पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत शासन निर्णय जारी
मुंबई, दि. 12 : कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर राज्यातील नाट्यगृहे मार्गदर्शक सूचनांच्या अधिन राहून नियंत्रित स्वरुपात येत्या 22 ऑक्टोबरपासून सुरु करण्यास मान्यता देण्यात येत असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिली.
पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केली असून याबाबतचा शासन निर्णय 11 ऑक्टोबर 2021 रोजी निर्गमित करण्यात आला आहे.महसूल व वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन विभाग, मदत व पुनर्वसन विभाग तसेच सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या प्रचलित मार्गदर्शक सूचनांनुसार नाट्यगृहांचे नियमन केले जाईल.
नाट्यगृह / रंगभूमीची परिवास्तू (देखाव्यांसहित)सुरक्षित अंतराबाबतच्या मानकांनुसार प्रवेशद्वारे समुचित ठिकाणी जमिनीवर खुणा आखण्यात याव्यात.नेमलेल्या व्यक्तींना पडदा, पडद्यामागील वस्तू इत्यादी हाताळण्याची परवानगी देण्यात येईल. नाट्य कलाकारगण आणि कर्मचारी यांनी नियमितपणे त्यांची स्वतःची वैद्यकीय तपासणी करून घेणे आवश्यक आहे.सर्व देखाव्यांची व कलाकारांसाठी असलेल्या कक्षांची दररोज धूम्र फवारणी करणे आवश्यक राहील.देखावे, प्रसाधनगृहे आणि रंगभूषा कक्ष यांच्या नियमित स्वच्छतेबाबत वेळापत्रक आखावे, स्वच्छतागृहांची वेळेवर स्वच्छता केल्याची खातरजमा करावी.मुखपट्टया आणि मुख संरक्षक कवच (फेस शिल्ड) लावणे बंधनकारक आहे, आणि नाटय कर्मचारीवृंदाला हात स्वच्छ करण्यासाठी निर्जंतुक द्रव उपलब्ध करून द्यावे. कोणत्याही अतिथींना- कलाकारांच्या कक्षांमध्ये जाण्यास अजिबात परवानगी दिली जाणार नाही. ज्या कोणाकडून, जी साधने (संगीत व्यवस्था / लॅपटॉप / माइक / प्रकाश योजना इत्यादी) हाताळली जातील त्यांनीच ती वापरावीत, याबाबत दक्षता घेण्यात यावी. नाट्यगृहांची नियमितपणे स्वच्छता/ निर्जंतुकीकरण / धूम्र फवारणी, इत्यादी करण्यासाठी, सर्व नाट्यगृह व्यवस्थापनांनी उपाययोजना करणे बंधनकारक आहे.
कलाकारांचे व्यवस्थापन
कोणत्याही अतिथीस, नाटकाच्या प्रयोगापूर्वी किंवा प्रयोगानंतर कलाकाराला किंवा इतर नाट्य कर्मचारीवर्गाला रंगमंचावर / कलाकारांच्या कक्षांमध्ये जाऊन भेटण्याची परवानगी दिली जाणार नाही.रंगभूषाकाराने सत्रापूर्वी आणि सत्रानंतर त्याचे हात साबणाने / निर्जंतुक द्रवाने (Sanitizer) धुतले पाहिजेत.रंगभूषेच्या रंगाचे मिश्रण, वापरल्यानंतर फेकून देता येण्याजोग्या रंगपाटीवर करावे आणि शक्यतो, प्रत्येक अभिनेत्यासाठी केवळ एका ब्रशचा रंग लावण्याच्या साधनाचा वापर करावा. शक्यतो प्रत्येक अभिनेत्यासाठी, ब्रश / कंगवे वेगळे राखून ठेवावेत, जेणेकरून एकमेकांचे ब्रश / कंगवे दूषित होणार नाहीत. केसांचे ब्रश व कंगवे आणि पुन्हा वापरता येण्याजोगे रंगभूषेचे ब्रश योग्य निर्जंतुक द्रावणाने स्वच्छ करण्यात यावेत. अभिनेत्याने (अभिनेत्यांनी त्यांची स्वत:ची रंगभूषा / केशभूषा स्वतःच करून येण्याबाबत विचार केला जावा. व्यक्ती व्यक्तींच्या संपर्काच्या दरम्यान केशभूषा व रंगभूषा करताना, व्यक्तिगत संरक्षकसाधने (पीपीई) वापरावी व अशी सूचना देण्यात येत आहे. रंगभूषाकार किंवा केशभूषाकार यांनी मुख संरक्षक कवच (laco-shields) लावले पाहिजे. रंगभूषा कक्ष किमान 6 फुट दूर असला पाहिजे. वापरल्यानंतर फेकून देता येण्याजोग्या रंगभूषा संचाचा आणि ब्रशचा वापर करण्याचीआणि प्रत्येक वापरानंतर त्या संचाची विल्हेवाट लावण्याची सूचना देण्यात येत आहे. प्रत्येक वापरापूर्वी आणि वापरानंतर सर्व ध्वनी व प्रकाश योजनेच्या सामग्रीचे निर्जंतुकीकरण करण्यात यावे. सर्व कलाकारांनी स्वतःच्या आरोग्याची स्वतःच देखरेख करावी आणि कोणत्याही आजाराबाबत तात्काळ राज्य व जिल्हा मदत क्रमांकांवर (हेल्पलाईन) कळवावे.
सर्वसाधारण मार्गदर्शक सूचना :-
प्रेक्षागाराबाहेर, सामाईक क्षेत्रांमध्ये आणि प्रतीक्षा क्षेत्रांमध्ये नेहमी किमान सहा फूट इतके पर्याप्त सुरक्षित अंतर राखावे. नेहमी तोंडाला मुखपट्टी(मास्क) बांधणे /कपड्याने तोड झाकणे (मुखावरण लावणे) अनिवार्य आहे.परिवास्तुच्या प्रवेशाच्या व निर्गमनाच्या मार्गावर तसेच सामाईक क्षेत्रांमध्ये हात स्वच्छ करण्यासाठी, प्राधान्याने हाताचा स्पर्शरहित पद्धतीने घेता येणारे निर्जंतुक द्रव उपलब्ध ठेवावे.श्वसनविषयक शिष्टाचाराचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. खोकताना/ शिंकताना प्रत्येकाने स्वतःचे तोंड व नाक टिप कागदाने (टिश्यू पेपर) / हात रुमालाने / कोपराने पूर्णपणे झाकून घेणे आणि वापरलेल्या टिप कागदाची (टिश्यू पेपर) योग्य प्रकारे विल्हेवाट लावणे आवश्यक आहे.सर्वांनी स्वताच्या आरोग्याची स्वतःच देखरेख करावी आणि कोणत्याही आजाराबाबत तात्काळ राज्य व जिल्हा मदत क्रमांकांवर (हेल्पलाईन) कळवावे.थुंकण्यास सक्त मनाई असेल.
आरोग्य सेतु उपयोजन (अॅप) सुसंगत साधनांवर स्थापित (installed) करून ते दिवसभर सुरू ठेवावयाचे आहे. तसेच बालकलाकारा व्यतिरिक्त सर्व कलाकार / कर्मचारी वर्गाचे संपूर्ण कोविड प्रतिबंधक लसीकरण ( दोन डोस व दुसऱ्या डोस नंतर १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झालेला असणे आवश्यक असेल.) झालेले असणे आवश्यक असेल. बाल कलाकारांची आरोग्य सेतू अॅप वरील आरोग्यस्थिती सुरक्षित असणे आवश्यक राहील तसेच त्यांची आरोग्य दृष्ट्या वारंवार तपासणी होणे आवश्यक राहील. तसेच प्रेक्षकांचे कोविड प्रतिबंधक लसीकरण झाले असणे अथवा आरोग्य सेतुवरील त्यांची आरोग्य स्थिती "सुरक्षित" अशी दर्शविलेली असणे आवश्यक राहील.
प्रवेश द्वारांवर कर्मचाऱ्यांची/भेटी देणाऱ्यांची तापमान तपासणी करण्यात यावी. लक्षणे नसलेल्या व्यक्तींनाच केवळ परिवास्तूत प्रवेश करण्याची मुभा देण्यात येईल. सर्व प्रवेश द्वारांवर आणि कार्यक्षेत्रामध्ये हात निर्जंतुक करण्याची सोय उपलब्ध करण्यात यावी. प्रेक्षागाराच्या आणि परिवास्तूच्या प्रवेशाच्या आणि निर्गमनाच्या ठिकाणी प्रेक्षकांकरिता रांगेसाठी आखीव खुणा करण्यात येतील. गर्दी होऊ नये म्हणून, लोकांना, एकमेकांमध्ये अंतर ठेवून रांगेने बाहेर सोडण्यात यावे. एखाद्या मल्टिप्लेक्समध्ये विविध पडद्यांवर तसेच एकल पडद्यावर लागोपाठच्या प्रदर्शनांच्यामध्ये पुरेसा कालावधी ठेवण्यात येईल, जेणेकरून प्रेक्षक रांगेतून, एकमेकांमध्ये अंतर ठेवून आत जाण्याची बाहेर पडण्याची सुनिश्चिती करता येईल. गर्दी टाळण्यासाठी एकापेक्षा अधिक प्रवेश व निर्गमद्वारे वापरण्यात यावीत.
नाट्यगृहांचा वापर त्यांच्या एकूण आसन क्षमतेच्या 50 टक्क्यांपेक्षा अधिक करण्यात येणार नाही. नाट्यगृहांच्या प्रेक्षागारामधील आसन व्यवस्था ही पर्याप्त सुरक्षित अंतर राखले जाईल अशा प्रकारे केली असली पाहिजे. जोडपत्र एक मध्ये आदर्श आसन व्यवस्थेचा नमुना दिलेला आहे.तिकीट आरक्षणाच्या वेळी ( ऑनलाईन आरक्षणाच्या आणि तिकीट खिडकीवरील तिकिटांच्या विक्रीच्या, अशा दोन्ही वेळी), जी आसने वापरावयाची नसतील त्यांवर "आसनांचा वापर करू नये" अशी स्पष्ट खूण करण्यात येईल.
नाट्यगृहांमध्ये "आसनांचा वापर करू नये" अशी खूण केलेल्या आसनांचा लोकांनी वापर करू नये म्हणून, त्यांवर एकतर फित लावण्यात येईल किंवा फ्लोरोसेंट मार्करने खूण करण्यात येईल, जेणेकरून नेहमीच पर्याप्त सुरक्षित अंतराची सुनिश्चिती होईल.
वाहनतळ परिसरातील आणि परिवास्तूच्या बाहेरील गर्दीचे योग्य व्यवस्थापन करताना, सुरक्षित अंतराबाबतच्या मानकांचे यथायोग्यपणे पालन केले जात असल्याची सुनिश्चिती करण्यात येईल\उद्वाहनांमध्ये सुरक्षित अंतराबाबतच्या मानकांचे यथायोग्यपणे पालन करून, लोकांची संख्या मर्यादित ठेवण्यात येईल.मध्यंतरामध्ये सामाईक जागा, व-हांडे (लॉबी) आणि प्रसाधनगृहे या ठिकाणी गर्दी होऊ नये याची दक्षता घेतली पाहिजे. प्रेक्षकांनी मध्यंतरामध्ये ये-जा करणे टाळावे याकरिता. त्यांना प्रोत्साहित करण्यात यावे. प्रेक्षागारातील वेगवेगळ्या रांगांमध्ये बसलेल्या प्रेक्षकांना एकमेकांमध्ये अंतर राखून ये-जा करता यावी याकरिता दीर्घकाळाचे मध्यंतर ठेवता येईल.
तिकिटे देणे/त्यांची पडताळणी करणे/त्यांची रक्कम भरणे यांकरिता तसेच, खाद्य पदार्थ व पेये यांकरिता ऑनलाइन आरक्षण, इ-वॉलेट, क्यूआर कोड स्कॅनर, इत्यादींसारख्या डिजिटल संपर्करहित व्यवहारांना अधिक प्राधान्य दिले पाहिजे. संपर्काचा (व्यक्तीचा शोध घेणे सुकर व्हावे म्हणून. तिकीट आरक्षण करतेवेळी संपर्क क्रमांक नोंदवून घेण्यात येईल. तिकीट कार्यालयात बॉक्स ऑफिस)) तिकीट खरेदी दिवसभरासाठी सुरू ठेवण्यात येईल. तसेच तिकीट विक्री खिडक्यांवरील गर्दी टाळण्यासाठी आगाऊ तिकीट आरक्षण उपलब्ध करून देण्यात येईल. प्रत्यक्षात खिडकीवर तिकीट काढतेवेळी गर्दीला आळा घालण्यासाठी पर्याप्त सुरक्षित अंतराबाबतच्या मानकांचे पालन करून, तिकीट कार्यालयात पुरेशा प्रमाणात खिडक्यांची व्यवस्था करण्यात येईल.तिकीट कार्यालयात रांगेचे व्यवस्थापन करताना, सुरक्षित अंतर ठेवण्याच्या दृष्टीने जमिनीवर खुणा (फ्लोअर मार्कर्स) करण्यात येतील.
संपूर्ण परिवास्तू, सामाईक सुविधा यांचे तसेच लोकांकडून सामाईकपणे हाताळल्या जाणाऱ्या सर्व गोष्टी, जसे की, दांडे(handles), कठडे (railing) इत्यादींचे वारंवार
निर्जंतुकीकरण केल्याची खात्री करण्यात येईल. प्रत्येक नाट्य प्रयोगानंतर प्रेक्षागाराचे निर्जंतुकीकरण करण्यात येईल.तिकीट कार्यालय, खाद्य-पेयपदार्थ विक्री स्थळे, कर्मचाऱ्यांचे वैयक्तिक चीजवस्तूंचे खण, स्वच्छतागृहे, सार्वजनिक जागा आणि अंतर्गत कामकाज पाहणारे कार्यालय (back office) क्षेत्रे यांची नियमित स्वच्छता व निर्जंतुकीकरण केल्याची खात्री करण्यात येईल.निर्जंतुकीकरण करणा-या कर्मचारीवर्गाच्या सुरक्षिततेसाठी उपाय योजण्यात येतील. जसे की, हातमोजे, बूट, मुखपट्टया, व्यक्तिगत संरक्षक साधने (पीपीई) इत्यादींच्या संयुक्तिक वापरासाठी पर्याप्त तरतुदी करण्यात येतील.कोणतीही व्यक्ती कोरोनाबाधित आढळल्यास, परिवास्तुचे निर्जंतुकीकरण हाती घेण्यात येईल.
कामाच्या सर्व ठिकाणी कर्मचाऱ्यांनी मुखावरण (फेस कव्हर) लावणे बंधनकारक असून अशा मुखावरणाचा पुरेसा साठा उपलब्ध करून ठेवण्यात यावा. वयस्क कर्मचारी, गर्भवती महिला कर्मचारी व वैद्यकीय उपचाराधीन कर्मचारी अशा, अधिक जोखीम असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांनी जास्त खबरदारी घ्यावी. अशा कर्मचाऱ्यांना लोकांशी थेट संपर्क आवश्यक असणारी व लोकांसमोर जावे लागणारी कामे विशेष करून देण्यात येऊ नयेत. कामाच्या ठिकाणी सुरक्षितता राखण्याच्या दृष्टीने अधिकाधिक सजग राहण्याचा भाग म्हणून सर्व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या भ्रमणध्वनीमध्ये (मोबाईल) आरोग्य सेतू अॅप स्थापित करून अद्ययावत केले असल्याची नियोक्त्यांनी खात्री केली पाहिजे. सर्व कर्मचाऱ्यांकडून स्वताच्या आरोग्याची स्वतःच देखरेख केली जात असल्याची आणि कोणताही आजार झाल्यास त्याबाबत तात्काळ कळवले जाण्याची खात्री करण्यात यावी.
प्रमुख प्रवेश द्वारे, ऑनलाईन, डिजिटल तिकीट विक्री ठिकाणे, तसेच प्रसाधनगृहे व हांडे (लॉबी), यांसारखी सार्वजनिक ठिकाणे येथे काय करावे आणि काय करू नये याबाबतच्या सूचना लावण्यात येतील. परिवास्तूच्या आत आणि बाहेर मुखपट्टी लावणे, सुरक्षित अंतर राखणे व हातांची स्वच्छता राखणे यांबाबतच्या लोकोपयोगी घोषणा तसेच घ्यावयाची खबरदारी व करावयाच्या उपाययोजना यासंबंधातील विनिर्दिष्ट घोषणा ह्या नाटय प्रयोगापूर्वी. मध्यंतरामध्ये आणि नाट्यप्रयोगाच्या शेवटी करण्यात येतील.वरील ठिकाणांच्या बाहेरील बाजूस व आतील बाजूस ठळकपणे, कोविड-१९ च्या संबंधातील प्रतिबंधात्मक उपाययोजनांवरील भित्तीपत्रके/ उभे फलक/ ध्वनीफित वाजविण्यासाठी तरतुदी केल्या गेल्याच पाहिजेत. कोविड- 19 संदर्भातील जनजागृतीकरिता सार्वजनिक आरोग्य विभाग / संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांकडून "माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमे संदर्भातील ध्वनीफित प्रयोगापूर्वी व मध्यतरांत वाजविण्यात याव्यातच.
वातानुकूलनासाठी/ वायुवीजनासाठी केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे अनुपालन करण्यात येईल, ज्यांमध्ये, इतर गोष्टींबरोबरच पुढील बाबींवर भर दिलेला आहे: सर्व वातानुकूलन उपकरणाचे तापमान २४ ते ३० अंश सेल्सिअस या मर्यादेत असले पाहिजे. सापेक्ष आर्द्रता ही ४० ते ७० टक्क्यांच्या मर्यादेत असली पाहिजे.शक्य होईल तितक्या प्रमाणात हवेचे पुनर्चक्रण टाळण्यात यावे. शक्य होईल तेवढी, ताजी हवा मिळण्याची व्यवस्था असली पाहिजे. समोरासमोरील वायुवीजन हे पुरेशा प्रमाणात असले पाहिजे.
कोविड १९ च्या संबंधातील लक्षणे किंवा बेफिकिर वर्तन यांबाबत प्रेक्षागार व्यवस्थापकाच्या/व्यवस्थापकांच्
वापरून एक- रांग पद्धतीचा अवलंब करावयाचा आहे..केवळ आवेष्टित खाद्यपदार्थ व पेय पदार्थ यांनाच परवानगी देण्यात येईल. सभागृहाच्या/प्रेक्षागाराच्या आत खाद्यपदार्थांची व पेय पदार्थांची पोचवणी करण्यास मनाई करण्यात येईल. खाद्यपदार्थाच्या व पेय पदार्थाच्या क्षेत्रात सुरक्षित अंतराचे पालन होत असल्याची व गर्दीला आळा घातला जात असल्याची खातरजमा व्यवस्थापनाकडून करण्यात येईल. खाद्यपदार्थाच्या व पेय पदार्थाच्या कचऱ्याची सुरक्षितपणे विल्हेवाट लावली जात असल्याबाबत परिवास्तूच्या व्यवस्थापनाकडून खातरजमा करण्यात येईल. कोविड-१९ च्या व्यवस्थापनाबाबतचे राष्ट्रीय निर्देश तसेच गृह कार्य मंत्रालय, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, महाराष्ट्र शासन इत्यादींनी जारी केलेली संबंधित मार्गदर्शक तत्त्वे यांचे सर्व कार्यामध्ये व व्यवहारांमध्ये काटेकोरपणे पालन करण्यात येईल.
००००
बंदिस्त सभागृहे आणि मोकळया जागेत 22 ऑक्टोबरपासून
सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यास मान्यता
सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांची माहिती
मुंबई, दि. 12 : कोविड पार्श्वभूमीवर राज्यातील बंदिस्त सभागृहे आणि मोकळया जागेत होणारे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यास 22 ऑक्टोबरपासून मान्यता देण्यात आली असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिली. राज्य शासनाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक तत्वांच्या अधीन राहून ही मान्यता देण्यात येत असून याबाबतचा शासन निर्णय 11 ऑक्टोबर 2021 रोजी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत निर्गमित करण्यात आला आहे.
बंदिस्त सभागृहे तसेच मोकळया जागेत सांस्कृतिक कार्यक्रम सादर करताना कोविड संदर्भातील केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या कोणत्याही निर्बंधाचा भंग होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. या मार्गदर्शक तत्वांनुसार सभागृहात प्रवेश देताना थर्मल टेस्टद्वारे प्रेक्षकांच्या शारीरिक तापमानाची चाचणी घेऊनच प्रवेश देणे ही सभागृह व्यवस्थापनाची / आयोजकांची जबाबदारी असणार आहे.बंदिस्त सभागृहाच्या एकूण बैठक क्षमतेच्या 50 टक्के इतक्या मर्यादेपेक्षा प्रेक्षक संख्या जास्त असु नये याची काळजी घेण्यात यावी.बंदिस्त सभागृहातील व्यासपीठ व प्रेक्षकांमध्ये शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार सामाजिक अंतर राखणे (किमान 6 फुट) आवश्यक असेल. याशिवाय बैठक व्यवस्थेत सामाजिक अंतर राखणे आवश्यक राहिल.
बंदिस्त सभागृहातील सादरकर्त्या कलाकारांनी वेळोवेळी वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक राहिल.आरोग्य सेतू उपयोजन (अॅप) सुसंगत साधनांवर स्थापित (installed) करून ते दिवसभर सुरू ठेवावयाचे आहे. तसेच बालकलाकारां व्यतिरिक्त सर्व कलाकार / आयोजक व साह्यभूत कर्मचारी वर्गाचे संपूर्ण कोविड प्रतिबंधक लसीकरण ( दोन डोस व दुसऱ्या डोरा नंतर 14 दिवसांचा कालावधी पूर्ण झालेला असणे आवश्यक असेल. ) झालेले असणे आवश्यक असेल. बाल कलाकारांची आरोग्य सेतू अॅप वरील आरोग्य स्थिती सुरक्षित असणे आवश्यक राहील तसेच त्यांची आरोग्य दृष्ट्या वारंवार तपासणी होणे आवश्यक राहील. तसेच प्रेक्षकांचे कोविड प्रतिबंधक लसीकरण झाले असणे अथवा आरोग्य सेतुवरील त्यांची आरोग्य स्थिती "सुरक्षित" अशी दर्शविलेली असणे आवश्यक राहील.
सभागृहातील सर्व परिसर / खोल्या / प्रसाधन गृहे वेळोवेळी स्वच्छ करणेबाबत सभागृह व्यवस्थापनाने वेळापत्रक आखाने व प्रसाधन गृहांची वेळेवर स्वच्छता केल्याची खातरजमा करावी. तसेच, वेळोवेळी निर्जंतुकीकरण करणे गरजेचे आहे. बंदिस्त सभागृहात उपस्थित सर्वांनी मास्क लावणे आवश्यक असेल. सभागृहातील कार्यक्रमाच्या वेळी वापरण्यात येणारे सर्व उपकरणांचे निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे. कार्यक्रमासाठीची सहाय्यक कामे त्या-त्या कामांसाठी नेमून दिलेल्या व्यक्तींनीच करणे गरजेचे आहे. कार्यक्रमासाठी लागणारी साधन-सामुग्री ( संगीत व्यवस्था / लॅपटॉप / माईक / प्रकाश योजना इ.) जी कोण व्यक्ती हाताळणार असतील, त्यांनीच ती वापरावी याबाबत दक्षता घेण्यात यावी. शक्यतो ज्याने त्याने स्वतःचीच साधनसामुग्री वापरावी. बंदिस्त सभागृहामध्ये रंगभूषाकाराची आवश्यकता असेल तर त्यांनी पीपीई कीट धारण करणे आवश्यक आहे.
बंदिस्त सभागृहात प्रवेश करतेवेळी गर्दी होणार नाही याची दक्षता आयोजकांनी घेणे आवश्यक आहे. यास्तव, सुरक्षित अंतराबाबतच्या मानकांनुसार प्रवेशद्वारे व समुचित ठिकाणी जमिनीवर खुणा आखण्यात याव्यात. कोणत्याही प्रेक्षकांना कलाकार कक्षात जाण्यास परवानगी नसेल. परिवास्तूच्या प्रवेशाच्या व निर्गमनाच्या मार्गावर तसेच सामाईक क्षेत्रांमध्ये हात स्वच्छ करण्यासाठी प्राधान्याने हाताचा स्पर्शरहित पध्दतीने घेता येणारे निर्जंतुक द्रव्य उपलब्ध ठेवावे. श्वसनविषयक शिष्टाचाराचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. खोकताना / शिकताना प्रत्येकाने स्वतःचे तोंड व नाक टिप कागदाने (टिश्यू पेपर) / हात रुमालाने / कोपराने पूर्णपणे झाकून घेणे आणि वापरलेल्या टिप कागदाची (टिश्यू पेपर) योग्य प्रकारे विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. सभागृहातील कार्यक्रम संपल्यानंतर सभागृहाचे निर्जंतुकीकरण करण्यात यावी. जनजागृतीचा भाग म्हणून सभागृहाच्या दर्शनी ठिकाणी कोविड-19 च्या संबंधातील प्रतिबंधात्मक उपाययोजनांवरील भित्तीपत्रके / उभे फलक झळकविण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात. सभागृह वातानुकुलीन असेल अशा ठिकाणी तापमान 24 ते 30 अंश सेल्सिअस या मर्यादेत असले पाहिजे.खाद्य व पेय पदार्थाच्या क्षेत्रामध्ये शक्य असेल तेथे तेथे अनेक विक्री केंद्रे उपलब्ध करून देण्यात यावीत. प्रत्येक विक्री केंद्रावर सुरक्षित अंतर राखण्यासाठी, जमिनीवर चिकट-पट्टया (स्टिकर) वापरून एक- रांग पद्धतीचा अवलंब करावयाचा आहे. केवळ आवेष्टित खाद्यपदार्थ व पेय पदार्थ यांनाच परवानगी देण्यात येईल. सभागृहाच्या/प्रेक्षागाराच्या आत खाद्यपदार्थांची व पेय पदार्थाची पोचवणी करण्यास मनाई करण्यात येईल.
आयोजक व कार्यक्रमासाठी सहाय्य करणारे कर्मचाऱ्यांसाठी मार्गदर्शन तत्वे जारी बंदिस्त सभागृहात काम करणा-या सर्व कर्मचा-यांनी कामाच्या ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक राहील. ज्येष्ठ कर्मचारी, गर्भवती महिला कर्मचारी, ज्यांची रोगप्रतिकारक क्षमता कमी आहे, असे कर्मचारी यांना ज्या ठिकाणी जास्त जनसंपर्क असलेल्या ठिकाणी कामासाठी नेमण्यात येऊ नये व त्यांची अधिकची काळजी घेण्यात यावी.कामाच्या ठिकाणी अधिक सुरक्षिततेचा उपाय म्हणून सर्वांनी "आरोग्य सेतू" अॅपचा वापर करावा. सर्व कर्मचा-यांनी आपल्या आरोग्याबाबत सजगता दाखवावी व आपल्या असणाऱ्या आजाराच्या तात्काळ व्यवस्थापनाच्या निदर्शनास आणावे.
बंदिस्त सभागृहाव्यतिरीक्त मोकळ्या जागेत आयोजित होणारे कार्यक्रमांसाठीची नियमावली
मोकळ्या जागेतील कार्यक्रमासाठी 6 - 6 फुटांवर खुणा करून त्यानुसार लोक बसण्याची / उभे रहाण्याची व्यवस्था करावी. त्यानुसार प्रेक्षक बसतील / उभे राहतील, याची संयोजकांनी दक्षता घ्यावी. सादरीकरण करणा-या कलाकारांपासून प्रेक्षक कमीत कमी 6 फुट अंतरावर असावेत.कार्यक्रम / कला सादर होणाऱ्या ठिकाणी प्रेक्षकांना मास्क घालणे अनिवार्य राहील. बालकलाकारांव्यतिरिक्त सर्व कलाकार / कर्मचारी वर्गाचे संपूर्ण कोविड प्रतिबंधक लसीकरण ( दोन डोस व दुसऱ्या डोस नंतर 14 दिवसांचा कालावधी पूर्ण झालेला असणे आवश्यक असेल.) झालेले असणे आवश्यक असेल. बाल कलाकारांची आरोग्य सेतू अॅप वरील आरोग्य स्थिती सुरक्षित असणे आवश्यक राहील तसेच त्यांची आरोग्यदृष्ट्या वारंवार तपासणी होणे आवश्यक राहील. तसेच प्रेक्षकांचे कोविड प्रतिबंधक लसीकरण झाले असणे अथवा आरोग्य सेतुवरील त्यांची आरोग्य स्थिती "सुरक्षित" अशी दर्शविलेली असणे आवश्यक राहील. थुंकी उत्पन्न करणारे पदार्थ जसे की तंबाखूजन्य पदार्थ व पान
.बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट)
एक हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचा अहवाल तयार करावा
कृषीमंत्री दादाजी भुसे यांची यंत्रणांना कार्यवाहीची सूचना
मुंबई दि. 13 : मा.बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) अंतर्गत राज्यात विविध प्रकल्प सुरु करण्यासंदर्भातील कार्यवाही सुरु आहे. येत्या कालावधीत राज्यात सुमारे एक हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांबाबतचा अहवाल तयार करण्याची कार्यवाही करण्याची सूचना कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी दिल्या. भौगोलिक चिन्हांकन (जी.आय.) असलेल्या स्थानिक पिकांनाच प्राधान्य देण्यात यावे, असे निर्देशही त्यांनी दिले.
मंत्रालयात मा.बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पाच्या कामासंदर्भातील आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस कृषि विभागाचे सचिव एकनाथ डवले, कृषि आयुक्त तथा स्मार्ट प्रकल्पाचे संचालक धीरज कुमार, अतिरिक्त प्रकल्प संचालक दशरथ तांभाळे, ग्राम सामाजिक परिवर्तन प्रतिष्ठानचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजाराम दिघे आदिंसह अन्य अधिकारी उपस्थित होते.
कृषि मंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी अर्जदार समुदाय आधारित संस्थांच्या निवडीसाठी केलेली कार्यवाही, यंत्रणानिहाय समुदाय आधारित संस्था निवडीचे सूचक लक्षांकांची माहिती घेतली. राज्यातील कृषी विकासाच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्वाचा आहे. त्यामुळे या प्रकल्पाची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने होणे अपेक्षित आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांना त्यांचा लक्षांक दिला आहे. या योजनेअंतर्गत प्रकल्प अहवाल वेळेवर तयार करावा. प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी जिल्हानिहाय शिफारस अर्ज संख्या, त्यांची वर्गवारी, अर्जांची पिकनिहाय प्रमाण, उपप्रकल्पाची सरासरी किंमत या अनुषंगाने बैठकीत चर्चा झाली.
श्री.भुसे म्हणाले, राज्यातील विविध पिकांच्या कार्यक्षम मूल्य साखळ्या विकसित करणे. त्यात संघटित शेतकऱ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी, सरकारी योजना-प्रकल्पांच्या माध्यमातून यापूर्वी संघटित केलेल्या शेतकऱ्यांच्या शेतमालावर प्रक्रिया करून तो थेट खासगी उद्योजकांना विक्रीसाठी बाजार जोडणी व्यवस्था करण्याच्या उद्देशाने हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाचे काम करताना स्थानिक आणि जी आय मानांकन असलेल्या पिकांना प्राधान्य देण्यात यावे. याचबरोबर आपण संस्थांना जसे अनुदान देतो त्याचप्रमाणे कामाची गतीही वेळोवेळी तपासणे गरजेचे आहे. असे निर्देशही कृषीमंत्री श्री. भुसे यांनी यावेळी दिले.
०००
कृषी व अन्न प्रक्रिया उद्योगात महाराष्ट्राचा ब्रॅण्ड तयार करणार
- कृषीमंत्री दादाजी भुसे
शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळण्यासाठी उद्योग वाढीस मिळणार चालना
मुंबई, दि. 13 : शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळण्यासाठी कृषी व अन्न प्रक्रिया उद्योगवाढीस चालना देण्याचे शासनाचे धोरण आहे. कृषी व अन्न प्रक्रिया उद्योगात महाराष्ट्राचा ब्रॅण्ड तयार करण्यावर भर देण्यात येत असल्याचे प्रतिपादन कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी केले. त्यासाठी ‘विकेल ते पिकेल’ची संकल्पना राबवणे, मूल्यसाखळी विकसित करणे, कृषी मालाला भाव मिळण्यासाठी विपणन आराखडा तयार करणे आदी बाबींना प्राधान्य देण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
कृषि व अन्नप्रक्रिया संचालनालयाच्या कामासंदर्भातील आढावा बैठक मंत्रालयात झाली. त्यावेळी कृषीमंत्री श्री. भुसे बोलत होते. कृषी सचिव एकनाथ डवले, उपसचिव सुशील खोडवेकर, कृषी आयुक्त धीरजकुमार, सहसचिव बाळासाहेब रासकर, उपसचिव एच.जी. म्हापणकर, कृषी व अन्न प्रक्रिया संचालक श्री. नागरे, आत्माचे प्र. संचालक के. एस. मुळे आदींची यावेळी उपस्थिती होती.
यावेळी कृषीमंत्री श्री. भुसे म्हणाले, कृषी व अन्न प्रक्रिया हा राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा विषय आहे. त्यामुळे या संचालनालयात नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी-कर्मचारी यांनी हे महत्व ओळखून राज्याची या क्षेत्रात नवी ओळख निर्माण होईल, या पद्धतीने काम करणे अपेक्षित आहे. बचत गट, शेतकरी, शासन, खासगीरित्या या उद्योगात काम करणारे घटक या सर्वांनी एकत्रितपणे अन्न प्रक्रिया उद्योगाच्या विकासासाठी काम करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
कृषी विभागामार्फत राज्य आणि केंद्र शासनाच्या कृषी विषयक योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. कृषी प्रक्रिया उद्योगात प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग (पीएमएफएमई), मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना, प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट), नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क (मॅग्नेट), प्रधानमंत्री किसान संपदा योजना, राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना अभियान, कृषी प्रक्रिया आणि निर्यात विकास प्राधिकरण अशा विविध योजना आणि कार्यक्रमांच्या माध्यमातून काम होत आहे. हे काम एकत्रितरित्या व्हावे. राज्यातील शेतकऱ्यांच्या कृषी मालावर प्रक्रिया होऊन त्यांना आर्थिक सक्षमता यावी यासाठी काम सुरु असल्याचे श्री. भुसे यांनी स्पष्ट केले.
कृषि व अन्न प्रक्रिया संचालनालयाचे कामकाज अधिक गतिमान होण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरु असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. त्याबाबत श्री.भुसे म्हणाले, कृषी प्रक्रियेशी संबंधित सर्व योजनांची एकत्रित अंमलबजावणी, शेतकऱ्यांना ई-मार्केटींग आणि ई-प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन देणे, शेतकऱ्यांच्या शेतमालाला निर्यातीसाठी प्रोत्साहन आदी बाबी महत्वाच्या आहेत. त्यावर कार्यवाही अधिक गतीने होणे गरजेचे आहे.
यावेळी कृषी व अन्न प्रक्रिया उद्योगाबाबतचे विपणन आराखडा व इतर बाबींसंदर्भातील सादरीकरणही करण्यात आले.
उमेद अभियानाअंर्तगत महिला बचतगटांना
गोट बँकेचा लाभ मिळण्यासाठी प्रस्ताव सादर करावा
- महिला व बालविकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर
मुंबई दि. 12 : ग्रामीण भागात 'आमुलाग्र' आणि 'क्रांतीकारी' बदल घडवून आणणारा 'गोट बँक हा प्रयोग आहे. यामुळे ग्रामीण भागात विकास आणि स्वयंपूर्णतेचे एक नवे पर्व सुरू होईल. बचतगटांतील महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी 'गोट बँक हा प्रयोग राबविला जात असून महिला आर्थिक विकास महामंडळाबरोबरच उमेद अभियानाअंर्तगत महिला बचतगटांना गोट बँकेचा लाभ मिळण्यासाठी प्रस्ताव सादर करावा, असे मत महिला व बालविकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी सांगितले.
राज्यात गोट बँक उपक्रमाबाबत मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीस ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ, गोट बँकेचे संचालक नरेश देशमुख, माजी जिल्हा परिषद सभापती जयवंतराव देशमुख, गोट बँकेचे ट्रस्टी अभिजीत देशमुख, सामाजिक संस्थेचे प्रतिनिधी जितेंद्र ठाकूर आदी उपस्थित होते.
महिला व बालविकास मंत्री ॲड. ठाकूर म्हणाल्या, शेती व्यवसायाला जोडधंदा म्हणून गोट बँक हा उपक्रम लोकाभिमुख करण्याचा शासनाचा मानस आहे. अर्थशास्त्रातल्या 'कंपाऊंडींग'च्या सुत्रानूसार 'गोट बँक ही संकल्पना आहे. 'गोट बँक ऑफ कारखेडा'चा प्रयोग अत्यंत यशस्वी झाला आहे.
ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, एखाद्या गावात गोट बँक स्थापन केल्यानंतर या संकल्पनेचे दृष्य परिणाम दाखविण्यासाठी त्यांना कारखेडासारखे कामाचे 'मॉडेल' उभे करणे आवश्यक आहे. 'गोट बँकेच्या माध्यमातून ग्रामीण भागात आर्थिक क्रांती होईल. उमेद अभियानाअंर्तगत महिला बचत गट समुहाचा गोट बँकेत सहभाग व्हावा, असेही श्री.मुश्रीफ म्हणाले.
जनतेच्या मनात पोलीसांबद्दल विश्वास निर्माण करा
– गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील
· गृहमंत्र्यांनी घेतली वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची राज्यातील गुन्ह्यांसदर्भात आढावा बैठक
मुंबई दि. 12 : सर्वसामान्य जनतेच्या मनात पोलिसांची चांगली प्रतिमा निर्माण करणे तसेच यंत्रणेबद्दल विश्वास निर्माण करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. यासाठी राज्यातील पोलीस यंत्रणांनी प्रयत्न करावेत, असे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले.
पोलीस महासंचालक कार्यालयात राज्यातील गुन्ह्यांसंदर्भात आढावा बैठक आज घेण्यात आली. या बैठकीला अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, पोलीस महासंचालक संजय पांडे, मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, अपर पोलीस महासंचालक राजेंद्र सिंग, संजय वर्मा, अनुपकुमार सिंग, विनय कारगावकर, सुहास वारके, विशेष पोलीस महानिरिक्षक रविंद्र सेनगांवकर, सह आयुक्त मिलींद भारंबे, विश्वास नांगरे-पाटील यांसह इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना श्री वळसे पाटील म्हणाले की, अलीकडच्या काळात घडणाऱ्या घटनांमुळे पोलीस दलाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. पोलिसांची प्रतिमा सुधारण्यासाठी पोलिसांनाच प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. आपल्या कामगिरीवर समाधानी न राहता यंत्रणेतील शेवटच्या घटकाने जनतेप्रती संवेदनशील राहण्यासोबतच संवाद आणि संपर्क वाढविण्याची गरज आहे. गुन्ह्यांची उकल करण्यासाठी तसेच कामगिरी सुधारण्यासाठी आपुलकीची भावना आवश्यक असल्याचे ही त्यांनी स्पष्ट केले.
राज्यात गुन्हे घडतात त्याचा तपास पूर्ण होतो. परंतु वर्षानुवर्षे न्यायालयात खटले सुरू राहतात. न्यायालयात प्रलंबित असलेल्या अशा खटल्यांचा मागोवा घेऊन आरोपीला शिक्षा होण्याबरोबरच त्या शिक्षेची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीसांनी दक्ष रहावे. कोणत्याही घटनेचा तपास, गुन्हा नोंद अथवा अन्य अनुषंगीक कार्यवाही व कारवाई विहित मुदतीत पुर्ण होणे आवश्यक आहे. त्यासाठी योग्य नियोजन करण्याच्या सूचना श्री. वळसे पाटील यांनी यावेळी दिल्या. तसेच सर्व यंत्रणेनी नागरिकांना न्याय देण्याच्या दृष्टीने कर्तव्य पार पाडले पाहिजे. तसेच सज्जतेवर भर दिला पाहिजे. असेही स्पष्ट केले.
आज तंत्रज्ञानाने प्रत्येक क्षेत्रात आमुलाग्र बदल घडून आणलेला आहे. याचा परिणाम म्हणजे कल्पकतेचा वापर करून मोठया प्रमाणावर गुन्हे घडताना आढळत आहेत. पोलिसांनी सायबर सुरक्षेसाठी नवनवीन प्रयोग, संशोधन आणि तसेच गुन्हे उकल करण्याच्या विविध पद्धतीचा वापर करण्यावर भर देण्यात यावा. असेही त्यांनी यावेळी सांगितले.
पोलीस ठाण्यात आलेल्या प्रत्येक घटकाच्या छोटया-छोटया स्वरुपाच्या तक्रारींची तात्काळ दखल घेऊन त्यावर योग्य ती कार्यवाही केली तर जनतेच्या मनातील पोलीसांबद्दलचा विश्वास वाढेल आणि त्यातूनच मोठया स्वरुपाचे गुन्हे टाळता येणे सहज शक्य होईल. यासाठी प्रत्येक कर्मचारी आणि अधिकाऱ्याची भूमिका अत्यंत महत्वाची आहे.
श्री वळसे पाटील यांनी राज्यातील महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांचा आढावा घेतला. एकूण गुन्ह्यांचे स्वरूप आणि माहिती घेतली असता परिचित व्यक्तींकडूनच गुन्हे घडल्याचे प्रमाण जास्त असल्याचे आढळून येत आहे. पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यासाठी आलेल्या महिलेची तात्काळ तक्रार नोंदवून घेण्यात यावी तसेच त्यांना योग्य तो दिलासा व विश्वास देण्यात यावा. तसेच या तक्रारीची गांभीर्याने दखल घेऊन जलदगतीने तपास पूर्ण करून संबंधित महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत असे सांगून दक्षता समित्या नव्याने कार्यन्वित करण्याचे निर्देशही यावेळी दिले.
पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी तसेच व्यवस्थेच्या आधुनिकीकरणासाठी राज्य शासनाने लक्ष केंद्रित केले असून त्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येईल असेही श्री वळसे पाटील यांनी सांगितले.
आज झालेल्या या बैठकीत गृहमंत्र्यांनी मुंबई शहर व राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला. मागील काही वर्षातील गुन्हयांची आकडेवारी व विश्लेषण तसेच गुन्हेगारीमध्ये होणाऱ्या वाढ नियंत्रणासाठी करावयाच्या उपाययोजनाबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
अंमली पदार्थाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच NDPS कायदयांतर्गत करण्यात येणाऱ्या कारवाईबाबतही सविस्तर आढावा घेतला. तसेच महिला अत्याचार संबंधित गुन्हयांचा तसेच कारवाईबाबत देखील सविस्तर आढावा घेण्यात आला.
पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी पोलीस दलाची कार्यक्षमता व कामगिरी अधिक प्रभावी करण्यासाठी सुचनांची तातडीने अंमलबजावणी करण्यात येईल
पदोन्नतीमधील आरक्षण कायम ठेवण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात राज्य शासन बाजू मांडणार
----
राज्य मंत्रिमंडळाचा महत्वपूर्ण निर्णय
पदोन्नतीमधील आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात असलेल्या विशेष अनुमती याचिका क्र. 28306/2017 मध्ये शासनाची बाजू मांडण्यासंदर्भात आज राज्य मंत्रिमंडळात चर्चा झाली.
मागासवर्गीयांची पदोन्नती व सरळ सेवेतील प्रतिनिधित्वाची माहिती संकलित करून त्यांचे शासन सेवेतील आरक्षण निश्चित करण्यासाठी गठित करण्यात आलेल्या मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील समितीने सादर केलेल्या अहवालावर देखील आज चर्चा करण्यात आली. यासंदर्भात मंत्रिमंडळाने खालीलप्रमाणे निर्णय घेतला आहे -
1. राज्यघटनेच्या अनुच्छेद 16 (4) (ए) द्वारे अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीचे पदोन्नतीमध्ये पुरेसे प्रतिनिधित्व नाही असे राज्याचे मत असल्यास अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींना पदोन्नती मध्ये आरक्षण देता येईल अशी तरतूद करण्यात आली आहे. तसेच पदोन्नती मध्ये आरक्षण देण्याकरिता माननीय सर्वोच्च न्यायालयाने विहित केलेल्या अपुरे प्रतिनिधित्व व प्रशासकीय कार्यक्षमता या दोन निकषांची पूर्तता होत असल्यामुळे राज्यात अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांना पदोन्नती मध्ये आरक्षण देता येईल.
2. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रमाणेच विमुक्त जाती (अ), भटक्या जमाती(ब), भटक्या जमाती(क), भटक्या जमाती(ड), व विशेष मागास प्रवर्ग यांचे देखील पदोन्नतीमध्ये पुरेसे प्रतिनिधित्व नाही,असे उक्त समितीच्या अहवालातून निदर्शनास आले आहे. त्यामुळे विमुक्त जाती(अ), भटक्या जमाती(ब), भटक्या जमाती(क), भटक्या जमाती(ड), व विशेष मागास प्रवर्ग यांनादेखील पदोन्नतीमध्ये आरक्षण देणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र आरक्षण अधिनियम 2001 प्रमाणे अनुसूचित जाती ,अनुसूचित जमाती, विमुक्त जाती(अ), भटक्या जमाती(ब), भटक्या जमाती (क), भटक्या जमाती (ड) व विशेष मागास प्रवर्ग यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्यात आले आहे. ते कायम ठेवण्यात यावे,असे मत सर्वोच्च न्यायालयातील याचिकेमध्ये राज्यातर्फे मांडण्यात यावे.
3. वरील बाबी मा.सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणण्यासाठी अतिरिक्त शपथपत्र दाखल करण्यात यावे.
4. सदर प्रकरणी मा.सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यासाठी आवश्यकतेनुसार ज्येष्ठ विधिज्ञांची विशेष समुपदेशी म्हणून नियुक्ती करण्यात यावी.
-----०-----
Featured post
-
नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी जर्मनीत प्रशिक्षण व करिअरची सुवर्णसंधी -वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ · महाराष्ट्र-बाडेन...
-
टी.एन. शेषन हे भारताचे निवडणूक आयुक्त (Chief Election Commissioner) म्हणून 1990–1996 या काळात अत्यंत कठोर, निर्भीड आणि सुधारक म्हणून ओळखले ...
-
कोण होता 'चेन्दरू मडावी'...? (विदेशी फिल्म ला ऑस्कर मिळवून देणारा जगातला एकमेव भारतीय आदिवासी मोगली चेन्दरू मडावी...) एक ...