Sunday, 19 September 2021

 साकीनाका प्रकरणी तपासात कुठलाही हलगर्जीपणा नसल्याबद्दल

राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे समाधान

·       मुख्यमंत्र्यांनी स्वत: आयोगाच्या उपाध्यक्षांना बोलविले चर्चेस

 

            मुंबई दि. 13 : साकीनाका येथे महिलेवरील बलात्कार आणि त्यानंतर तिच्या झालेल्या मृत्यू प्रकरणी एकूणच पोलिसांनी त्वरेने सुरु केलेल्या तपासावर राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने समाधान व्यक्त केले आहे. राज्यशासन याप्रकरणी संपूर्ण न्याय देईल असा विश्वास व्यक्त करताना आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदार यांनी या घटनेत राजकारण आणता कामा नये असे देखील स्पष्ट केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदार यांना या घटनेच्या अनुषंगाने स्वत: चर्चेसाठी बोलावून या घटनेकडे राज्यशासन गांभिर्याने पहात असून पिडीतेच्या कुटूंबास योग्य आर्थिक सहाय्य देण्यात येईल व तिच्या मुलांच्या पालनपोषणाची जबाबदारी देखील पार पाडण्यात येईल, असे आयोगास सांगितले.

            सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटीलमुख्य सचिव सिताराम कुंटेपोलीस महासंचालक संजय पांडेमुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंहगृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तवसामाजिक न्याय विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अरविंद कुमारमहिला बाल कल्याण विभागाच्या सचिव आय. एस. कुंदनपोलीस आयुक्त हेमंत नगराळेसह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटीलमिलिंद भारंबे आदिंची उपस्थिती होती.

पिडीत महिलेच्या कुटूंबास तातडीने आर्थिक सहाय्य

            मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले, पिडीत महिलेच्या मुलांना, परिवारास महिला बाल कल्याण विभागाच्या मनोधैर्य योजनेतून तसेच सामाजिक न्याय विभागाच्या अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये आर्थिक सहाय्य तातडीने दिले जाईल. या महिलेच्या मुलांच्या शिक्षण व पालन-पोषणाच्या बाबतीतही संबंधित विभागांना वेगाने कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्याचे आयोगाच्या उपाध्यक्षांना सांगितले.

अनाथनिराश्रित महिलांसाठी घरांबाबत विचार

            मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणालेज्या निराश्रित व अनाथ महिला रस्त्यांवर राहतात त्यांच्यासाठी राज्य सरकार व केंद्र सरकार मिळून घरकूल योजना सुरू करता येते का यासंदर्भात विचार करता येवू शकतो. यासंदर्भात आयोगाने अशा स्वरुपाची योजना आखण्याविषयी केंद्र शासनास सूचना करावी असेही मुख्यमंत्री म्हणाले.

तपासात हलगर्जीपणा नसल्याबद्दल समाधान

            राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदार यांनीही घटना घडताच अवघ्या काही वेळात पोलिसांनी धाव घेतली व महिलेस मदत केली. त्याचप्रमाणे पुढे देखील वेगाने तपास करुन आरोपीस अटक केली याविषयी समाधान व्यक्त केले. पोलिसांना धन्यवाद देवून ते म्हणालेपिडीत महिलांना आपण न्याय देवू शकतो हे दाखविण्यासाठी प्रशासनाने चांगली पावले उचलली आहेत. आता लवकरात लवकर खटला जलदगती न्यायालयात उभा करुन गुन्हेगारास फाशीची शिक्षा द्यावी जेणेकरुन गुन्हेगारांना धाक राहील.

            पोलीस आयुक्त हेमंत नगराळे म्हणालेही घटना कळता क्षणी दहा मिनिटात पोलीस घटनास्थळी पोहचलेएवढेच नाही तर जखमी अवस्थेत पडलेल्या महिलेस स्वत: टेम्पो चालवत पोलीसांनी तिला रुग्णालयात पोहोचवले.

राजा ठाकरे यांची तातडीने नियुक्ती

            मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी तातडीने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेवून विशेष सरकारी अभियोक्ता यांची हा खटला न्यायालयात उभा राहण्याअगोदरच नियुक्ती करण्यात यावी असे निर्देश दिले होते. त्याप्रमाणे प्रसिद्ध वकील राजा ठाकरे यांची तातडीने नियुक्ती करण्यात आल्याची माहिती देखील यावेळी पोलीस आयुक्तांनी दिलीयावर आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदार यांनी समाधान व्यक्त केले.  

सीसीटिव्ही कॅमेऱ्यांचे जाळे वाढवणार

            ही घटना सीसीटिव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. मुंबई शहरात 5 हजार सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून 7 हजार कॅमेरे बसविणे सुरु आहे अशी माहिती देवून सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील म्हणाले कीशहरातील सर्व मॉल्ससंस्थादुकाने यांना रस्त्याच्या दिशेकडील कोनात कॅमेरे बसविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अशारीतीने शहरात सुमारे 50 हजारापेक्षा जास्त कॅमेरे कार्यरत आहेत अशी माहिती त्यांनी दिली.

००००


 राज्यातील स्थलांतरीत ऊस तोडणी कामगारांना सामाजिक सुरक्षितता योजनांचे

लाभ देण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे

उपमुख्यमंत्री अजित पवार

·       ऊस तोडणी कामगारांच्या पाल्यांसाठी राज्यात उभारण्यात येणार वसतिगृहे

·       ऊस तोडणी कामगारमुकादमासह वाहतुक कामगारांना मिळणार ओळखपत्रे

·       कै. गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळ तातडीने कार्यान्वित करण्याची प्रक्रिया सुरू

 

          मुंबईदि. 15 : महाराष्ट्रातील साखर उद्योग हा प्रमुख उद्योग असून राज्यातील साखर कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या स्थलांतरीत ऊस तोडणी कामगारांना सामाजिक सुरक्षितता योजनांचे लाभ देण्यासाठी राज्य शासनाच्या सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे. तसेच राज्यातील स्थलांतरीत ऊस तोडणी कामगारांच्या जिल्हानिहाय संख्येचे प्रमाण लक्षात घेऊन त्यांच्या पाल्यांसाठी वसतिगृहांची उभारणी करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. त्याचप्रमाणे राज्यातील स्थलांतरीत ऊस तोडणी कामगारमुकादम आणि वाहतुक कामगारांची नोंदणी करुन त्यांना ओळखपत्र देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

          सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या मागणीप्रमाणे ऊस तोडणी कामगारांच्या प्रश्नांसाठी तसेच कै. गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळ तातडीने कार्यान्वित करण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती कक्षात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

          यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटीलमहसूल मंत्री बाळासाहेब थोरातसार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपेकौशल्य विकास मंत्री नवाब मलिकग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफकृषी मंत्री दादाजी भुसेसहकार मंत्री बाळासाहेब पाटीलसामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेराष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

          उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणालेराज्यात सुमारे १०१ सहकारी आणि ८७ खासगी साखर कारखा्रन्यांमध्ये मिळून अंदाजे आठ ते दहा लाख ऊस तोडणी कामगार राज्यातील विविध जिल्ह्यांतून स्थलांतरीत होऊन काम करतात. या स्थलांतरीत ऊस तोडणी कामगारांना सामाजिक सुरक्षितता योजनांचे लाभ मिळणे आवश्यक आहे. स्थलांतरीत ऊस तोडणी कामगारांना सामाजिक सुरक्षितता योजनांचे लाभ मिळवून देण्यासाठी राज्य शासनाच्या संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे,  स्थलांतरीत ऊस तोडणी मजूरांच्या पाल्यांच्या शिक्षणाचा प्रश्न महत्वाचा असून राज्यातील ज्या भागांतून अधिक ऊस तोडणी मजूर स्थलांतर करतातत्या ठिकाणी वसतिगृहाची उभारणी करण्यात यावी. ही वसतिगृहे दर्जेदार पध्दतीने उभारण्यात यावीत. सध्या मंजूर झालेल्या वसतीगृहाव्यतिरिक्त ज्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर ऊसतोड कामगार राहतात त्या ठिकाणीही वसतिगृह सुरू करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.  यामध्ये सर्व सोयीसुविधां पुरविण्याच्या सूचनाही  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. तसेच राज्यातील ऊस तोडणी कामगारमुकादम आणि वाहतुक कामगारांची नोंदणी करण्यात येणार असून त्यांना ओळखपत्रे देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

          सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी यावेळी कै. गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळातर्फे राबविण्यात येणाऱ्या योजना व इतर बाबींची माहिती दिली.

*****

 सोनाली नवांगुळ व मंजूषा कुलकर्णी यांचे

साहित्य अकादमी पुरस्काराबद्दल राज्यपालांकडून अभिनंदन

 

मुंबई दि १९ - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सोनाली नवांगुळ व मंजूषा कुलकर्णी यांचे साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे.

 

               सोनाली नवांगुळ यांना मध्यरात्रीनंतरचे तास’ या अनुवादित कादंबरीसाठी तर डॉ. मंजूषा कुलकर्णी यांना प्रकाशवाटा’ या  पुस्तकाच्या संस्कृत अनुवादासाठी साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाल्याचे समजून आनंद वाटला.

 

               सोनाली नवांगुळ व डॉ. मंजूषा कुलकर्णी यांनी प्रतिकूल परिस्थितीवर धैर्याने मात करीत पुरस्कार प्राप्त केल्याचे समजून विशेष अभिमान वाटला. उभय लेखिकांचे हार्दिक अभिनंदन करतो व भविष्यातही त्यांचेकडून साहित्यसेवा घडो या शुभेच्छा देतोअसे राज्यपालांनी आपल्या अभिनंदनपर पत्रात म्हटले आहे.

               ०००


 


 


 

 *शिवसेना अलिबाग शहर आढावा बैठक  जिल्हा प्रमुख तथा आमदार श्री. महेंद्रशेठ दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली .यावेळी जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य श्री. संतोषजी निगडे , शहर प्रमुख श्री संदीप पालकर , माजी शहरप्रमुख श्री. अर्जुन पाटील, उपशहर प्रमुख श्री. वसंत जैन, प्रल्हाद पाटील, महिला आघाडीच्या जितेंश्री ताई पाटील, महिला शहर संघटीका तनुजा ताई पेरेकर, उपशहर महिला संघटीका रंजनाताई शिंदे , पंकज झाडेकर, शाखा संघटक  ऋषिकेश सूर्यगंध, मनमित पाटील, शाखा प्रमुख अक्षय म्हात्रे , मनीष पेरेकर , शाखा प्रमुख श्री. सुनील ढोरे, निलेश शिंदे पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी आमदार महेंद्र शेठ दळवी यांनी मार्गदर्शन  करताना अलिबाग नगरपालिका निवडणुक सर्वतोपरी ताकदीने निवडणुकीत सामोरे जाण्याची तयारी करणार असल्याची ग्वाही कार्यकर्त्यांना दिली. आणि नगरपालिकेत विजय मिळविणार असल्याची घोषणा केली. यावेळी शहरातील मोठ्या संख्येने  कार्यकर्ते उपस्थित होते.*

Featured post

Lakshvedhi