मुंबई ते सुरजागड विकासाचा महामार्ग
· महाराष्ट्राची १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे वाटचाल
गडचिरोली ते मुंबई उद्योग, पायाभूत सुविधा आणि पर्यावरणपूरक विकासाला गती
- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. २२ : “विकसित भारत २०४७” च्या दिशेने वाटचाल करताना महाराष्ट्र वेगाने पुढे जात असून, मुंबईपासून गडचिरोलीतील सुरजागडपर्यंत विकासाचा नवा एक्सप्रेसवे उभारण्यात येणार आहे. उद्योग, आधुनिक पायाभूत सुविधा, वेगवान दळणवळण, कौशल्य विकास, गृहनिर्माण आणि पर्यावरणपूरक प्रकल्पांच्या माध्यमातून राज्याचा सर्वांगीण विकास साधला जात आहे. या व्यापक विकास आराखड्यामुळे महाराष्ट्राची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचणार असल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
‘दि हिंदू कॉन्क्लेव्ह’ मध्ये “मुंबई ते सुरजागड – समृद्धीचा महामार्ग” या विषयावर बोलताना त्यांनी राज्यातील पायाभूत सुविधा, उद्योग, गृहनिर्माण, परिवहन, पर्यावरण आणि गडचिरोलीसारख्या दुर्गम भागांतील विकासाचा विस्तृत आढावा मांडला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मुंबई हे देशाचे आर्थिक केंद्र आणि गडचिरोलीसारखे दुर्गम भाग हे नैसर्गिक व औद्योगिक संपत्तीने समृद्ध असल्याचे सांगत त्यांनी राज्यातील विकास केवळ महानगरांपुरता मर्यादित न ठेवता तो ग्रामीण, आदिवासी आणि मागास भागांपर्यंत पोहोचवण्यावर शासनाचा भर असल्याचे स्पष्ट केले. समृद्धी महामार्ग, मेट्रो जाळे, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, औद्योगिक कॉरिडॉर, स्टील प्रकल्प आणि कौशल्य विकास केंद्रांमुळे राज्यात रोजगारनिर्मितीला मोठी चालना मिळाली असून कोस्ट टू फॉरेस्ट असा विकासाचा प्रवास गेल्या काही वर्षांत घडवून आणला आहे.
No comments:
Post a Comment