चला ! देशापुढे महाराष्ट्राच्या बचतीचा आदर्श ठेवूया !
ज्या ज्या वेळी देशावर संकट येते, त्या त्या वेळी महाराष्ट्र हा दिल्लीच्या मदतीला धावून जातो. “हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला ” ही महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांपासूनची आपली भूमिका आजही तितकीच जिवंत आहे. युद्ध असो, टंचाई असो, महापूर असो की महामारी-महाराष्ट्राने प्रत्येक संकटात देशाच्या पाठीशी उभे राहत मदतीचा नवा आदर्श निर्माण केला आहे. पश्चिम आशियातील वाढते तणाव आणि त्यातून निर्माण झालेल्या जागतिक आर्थिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर आज देश पुन्हा एका मोठ्या आव्हानासमोर उभा आहे. या संकटाचा कालावधी किती असेल हे आपल्या हातात नसले, तरी या अशा काळात संयम, शिस्त आणि बचत यामधून देशाच्या अर्थकारणाला बळ देण्याचे मोठे काम महाराष्ट्र करु शकतो.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या संदर्भात सर्वप्रथम देशवासियांना खर्च कमी करण्याचे आवाहन केले, हे आवाहन राष्ट्रहितासाठी जीवनशैली बदलण्याचे आहे. 'जितकी बचत, तितकी राष्ट्रसेवा' हा संदेश त्यांनी अत्यंत स्पष्टपणे दिला आहे. अनावश्यक इंधन वापर टाळणे, सार्वजनिक वाहतुकीचा अधिक वापर करणे, ‘वर्क फ्रॉम होम’ला प्रोत्साहन देणे, स्वदेशी उत्पादनांचा स्वीकार वाढवणे, रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी करणे, ऊर्जा बचत करणे अशा अनेक बाबींवर त्यांनी भर दिला. या सूचनांचा विचार करता महाराष्ट्र शासनानेही तातडीने व्यापक उपाययोजनांची अंमलबजावणी सुरु केली आहे.
No comments:
Post a Comment