राज्यात योग आयोग स्थापन करण्याच्या प्रक्रियेला गती देणार
-राज्यमंत्री माधुरी मिसाळ
मुंबई, दि. २५ : राज्यात योग आयोग स्थापन करण्याची प्रक्रिया गतीने राबविण्यात येणार असून त्यासोबतच स्वतंत्र आयुष मंत्रालय स्थापन करण्याबाबतही शासन सकारात्मक पावले उचलत असल्याचे राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत सांगितले.
विधानसभेत सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केलेल्या अर्धा तास चर्चेला उत्तर देताना राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी ही माहिती दिली.
राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या, २०१६ मध्ये राज्याने संबंधित विधेयक मंजूर करून राष्ट्रपतींच्या मान्यतेसाठी पाठविले होते. मात्र, २०१९ मध्ये केंद्र सरकारकडून राज्यस्तरीय आयोगाची गरज नसल्याचे पत्र प्राप्त झाल्याने हे विधेयक स्थगित ठेवण्यात आले. त्यानंतर ८ एप्रिल २०२५ रोजी मंत्रिमंडळ बैठकीत ते विधेयक मागे घेण्यात आले. दरम्यान, राजस्थान, हरियाणा आणि गुजरात या राज्यांनी योग व नॅचरोपॅथी क्षेत्रात स्वतंत्र धोरणे आणि कायदे अमलात आणल्याचा दाखला देत महाराष्ट्रातही त्याच धर्तीवर योग आयोग स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यासाठी नवीन विधेयक तयार करण्यात आले असून ते सध्या विधि व न्याय विभागाकडे विचाराधीन आहे. प्रस्तावित आयोगाकडून नोंदणी प्रक्रियाही राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यासोबतच राज्यात केंद्राप्रमाणे स्वतंत्र आयुष मंत्रालय स्थापन करण्याबाबतची मागणी मुख्यमंत्र्यांकडे मांडण्यात आली असल्याची माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी यावेळी दिली. योग व नॅचुरोपॅथी क्षेत्रातील पाच वर्षांच्या अभ्यासक्रमाला राज्य शासनाने मान्यता दिली असून सातारा, कोल्हापूर आणि संभाजीनगर येथे हे अभ्यासक्रम सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. योग आयोगाच्या स्थापनेसाठी आवश्यक प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्यात येईल, तसेच आयुष मंत्रालय स्थापनेची कार्यवाहीही पुढे नेण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
०००००
No comments:
Post a Comment