सातारा जिल्ह्यात गुन्हेगारीच्या प्रमाणात घट; पोलीस प्रशासन सजग, सतर्क
- गृह राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर
मुंबई, दि. १८ : सातारा जिल्ह्यात गंभीर गुन्हेगारीच्या प्रमाणात घट होत आहे. सन २०२४ च्या तुलनेत २०२५ मध्ये गंभीर गुन्ह्यांमध्ये घट झाली आहे. गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन सजग असून या विषयी सतर्कतेने काम करत असल्याचे गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांनी विधानपरिषदेत सांगितले.
सदस्य शशिकांत शिंदे यांनी सातारा जिल्ह्यातील गुन्हेगारीतील वाढ या विषयी विधान परिषदेत उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य सचिन अहिर यांनी उपप्रश्न विचारत सहभाग घेतला.
गृह राज्यमंत्री डॉ.भोयर म्हणाले, सातारा शहर व जिल्ह्यात सन २०२४ मध्ये ३१८ गंभीर गुन्ह्यांची नोंद झाली होती तर २०२५ मध्ये १९४ गंभीर गुन्ह्यांची नोंद झाली आहे. सातारा शहरात २२ जानेवारी २०२६ रोजी घडलेल्या हत्या घटना प्रकरणातील १५ आरोपींपैकी ११ जणांना अटक करण्यात आली असून उर्वरित चार आरोपींचा शोध सुरू आहे.
सातारा जिल्ह्यातील ज्या पोलीस अधिकाऱ्यांविरोधात तक्रार करण्यात आली होती त्या तक्रारींची पोलीस महासंचालक कार्यालयामार्फत चौकशी करण्यात आली होती. तथापि, विधिमंडळ सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार पुन्हा चौकशी सुरू करण्यात आली आहे. या चौकशीत जे अधिकारी दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असेही गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment