उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, संपूर्ण देशात तसेच राज्यात आज 'एक तास स्वच्छतेसाठी' अभियान सुरु आहे. हे अभियान वर्षभर सातत्याने सुरु ठेवायचे आहे. प्रत्येक नागरिकाने स्वच्छतेसाठी पुढाकार घेतल्यास देशामध्ये क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही. स्वच्छ भारत अभियानाच्या निमित्ताने देशात कोट्यवधी स्वच्छतागृहे उभी राहिली. पिण्याचे शुद्ध पाणी कोट्यवधी लोकांच्या घरापर्यंत पोहोचले आहे. स्वच्छतेचे महत्व पटवून देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. नगरविकास विभागाने घनकचरा टाकण्यात येणारी सुमारे १९ हजार ९४० ठिकाणे शोधून काढली आहेत. त्यांच्या स्वच्छतेचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. राज्यभर स्वच्छताविषयक लोकसहभागाचे ६ हजार ३१७ कार्यक्रम होणार आहेत. स्वच्छता मित्रांसाठी आरोग्य शिबिरे घेण्यात येणार आहेत. त्याचबरोबर स्वच्छ हरित महोत्सवदेखील घेण्यात येणार आहे. यासमवेतच प्रभात फेरी, स्वच्छता कामगार सन्मान, पायाभूत सुविधांचे लोकार्पण, सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा सन्मान, सर्वोत्कृष्ट नागरी स्वयंसेवक सन्मान असे विविध उपक्रम ‘स्वच्छता ही सेवा’ या अभियानामध्ये राबविले जाणार आहेत, असे देखील एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.
स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कार्याची दखल घेऊन बृहन्मुंबई महानगरपालिकेने स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या ज्या वसाहती आहेत, त्या ठिकाणी अधिकाधिक सुविधा पुरविण्याचे काम हाती घेतले आहे. त्यांच्या मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी अनेक योजना राबविल्या जात आहेत. स्वच्छता कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी महानगरपालिका आरोग्य शिबिरे घेत आहे, हे निश्चितच कौतुकास्पद आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने यापूर्वी 'डीप क्लीन ड्राईव्ह' अभियान राबविले. अभियानाच्या माध्यमातून मोठे काम झाले. त्याचा मोठा परिणाम झाला. अशाच प्रकारचे स्वच्छता अभियान पुन्हा राबवायचे आहे, असेही त्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment