कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डी विमानतळावरील
विमानांच्या ‘पार्किंग’ ची सुविधा वाढवा
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
मुंबई, दि. 19 : नाशिक आणि परिसरातील आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डी विमानतळाचे उर्वरित काम नियोजित वेळेत पूर्ण करावे. त्याचबरोबर विमानतळावरील विमानांच्या ‘पार्किंग’च्या सुविधेत वाढ करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या (एमएडीसी) संचालक मंडळाची 92 वी बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे झाली. अपर मुख्य सचिव (विमान चालन) संजय सेठी, मुख्यमंत्री यांच्या अपर मुख्य सचिव अश्विनी भिडे, सचिव डॉ.श्रीकर परदेशी, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे, सिडको चे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, मुख्यमंत्री यांचे गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे आदी यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, शिर्डीमध्ये विमानांच्या पार्किंगचे दर इतर विमानतळाच्या तुलनेत कमी ठेवण्यात यावेत. शिर्डीचे महत्व आणि आगामी काळात येथे येणाऱ्या भाविकांची वाढणारी संख्या विचारात घेता विमानतळजवळ पंचतारांकित हॉटेलची सुविधा असणे अत्यंत गरजेचे आहे, यासाठी जागा सुनिश्चित करुन नामांकित हॉटेल्स कंपन्यांना येथे निमंत्रित करावे. यवतमाळ येथील विमानतळाची धावपट्टीची लांबी वाढविण्याची आवश्यकता असल्याचे सांगून त्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश त्यांनी दिली. जेथे खासगी कंपन्या विमानतळ चालवण्यास घेतात तथापि मध्येच ते बंद पडतात, अशा ठिकाणी दंड आकारण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
No comments:
Post a Comment