भारताच्या ‘जीडीपी’मध्ये क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा
मोठा वाटा असेल
- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अॅन्ड एन्टरटेन्मेंट समिट - २०२५ (वेव्हज) चे
प्रधानमंत्री यांच्या हस्ते शानदार उद्घाटन
मुंबई, दि. १ : भारताची ऑरेंज इकॉनॉमी म्हणजे कंटेंट, क्रिएटिविटी आणि कल्चर हे तीन स्तंभ आहेत. भारताच्या क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा काही वर्षांत ‘जीडीपी’मध्ये (सकल देशांतर्गत उत्पन्न) मोठा वाटा असेल. जगातील अॅनिमेशन मार्केट ४३० अब्ज डॉलरहून अधिक असून पुढील १० वर्षांत ते दुप्पट होणार असल्याचे मानले जाते. भारताच्या अॅनिमेशन आणि ग्राफिक्स इंडस्ट्रीसाठी वेव्हज परिषदेमुळे यशाचे दार उघडले जात असल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एन्टरटेन्मेंट समिट २०२५ अर्थात ‘वेव्हज’ परिषदेचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शानदार उद्घाटन झाले. मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेंशन सेंटरमध्ये झालेल्या या कार्यक्रमात राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वे, माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव, परराष्ट्र व्यवहार मंत्री एस.जयशंकर, माहिती प्रसारण राज्यमंत्री डॉ.एल.मुरुगन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह देशविदेशातील मान्यवर उपस्थित होते.
भारतीय चित्रपट आता जगभरात सर्वदूर पोहोचले आहेत. आज १०० पेक्षा अधिक देशांमध्ये भारतीय चित्रपट प्रदर्शित होतात. परदेशातील प्रेक्षक भारतीय चित्रपट केवळ बघत नाहीत, तर त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करतात. अनेक विदेशी प्रेक्षक आता सबटायटल्ससह भारतीय कंटेंट पाहतात हे भारतीय सिनेमाचे वैशिष्ट्य आहे. भारत आज फिल्म प्रॉडक्शन, डिजिटल कंटेंट, गेमिंग, फॅशन आणि म्युझिक यांचे जागतिक केंद्र बनले असल्याचे श्री.मोदी यांनी यावेळी सांगितले.
No comments:
Post a Comment