विकासाचे ग्रोथ इंजिन म्हणून शहर विकासाला शासनाचे प्राधान्य
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महानगरपालिका आयुक्त आणि नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यशाळेत शहरांच्या सर्वांगीण विकासावर भर देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन
मुख्यमंत्र्यांनी मांडला शहर विकासाचा रोडमॅप
पुणे दि. १५ : विकासाचे ग्रोथ इंजिन म्हणून शहर विकासाला केंद्र आणि राज्यशासन प्राधान्य देत असून गेल्या १० वर्षात नागरीकरणासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यात आली आहे. शहरी भागातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी, त्यांना उत्तम सुविधा देण्यासाठी चांगल्या योजना राबविल्यास राज्य शासनातर्फे स्थानिक स्वराज्य संस्थांना सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
नगरविकास विभागातर्फे राज्यातील महानगरपालिका आयुक्त आणि नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकरिता यशदा येथे आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, अतिरिक्त मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता, प्रधान सचिव डॉ. के. एच. गोविंदराज आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक नागरी लोकसंख्या असलेले दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे. विकासाची प्रक्रिया नागरिकरणाभोवती फिरते. शिक्षण, आरोग्य, रोजगार, मनोरंजन या चार गोष्टींसाठी नागरिक शहराकडे आकर्षित होतात. असे असताना विकासासोबत वाढत्या शहरीकरणाचा योग्यरितीने विचार न केल्याने शहर विकासाचे योग्य धोरण करण्यात आले नाही आणि त्यामुळे शहरातील समस्या निर्माण झाल्या. राज्यात ६ कोटी लोक ४५० शहरात राहतात. ही शहरे सुंदर करता आली तर ५० टक्के जनतेचे जीवनमान उंचावता येईल.
No comments:
Post a Comment