पाचाड येथे रायगड विकास प्राधिकरणाच्या
माध्यमातून सोयी सुविधांची उभारणी
- सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार
मुंबई, : रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड येथील राजमाता जिजाऊ समाधीस्थळी रायगड विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून सर्व सोयी सुविधांची उभारणी करण्यात येत असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड आशिष शेलार यांनी विधानपरिषदेत दिली.
सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शेलार बोलत होते. यावेळी सदस्य विरोधी पक्ष नेते अबादास दानवे, सदस्य प्रवीण दरेकर यांनी चर्चेमध्ये सहभाग घेतला.
रायगड किल्ला आणि परिसराच्या विकासासाठी रायगड विकास प्राधिकरणाची स्थापना करण्यात आल्याची माहिती देऊन सांस्कृतिक कार्य मंत्री शेलार म्हणाले की, रायगड विकास प्राधिकरणास शासनाने 600 कोटींचा निधी दिला आहे. हा निधी त्यांच्याकडे वर्गही करण्यात आला आहे. पाचाड येथील राजमाता जिजाऊ यांच्या समाधीस्थळाची जागा आता भारतीय पुरातत्व विभागाकडे आहे. त्यांचे निकष आणि नियमांनुसार या परिसरात सोयी सुविधा उभारण्यासोबतच सुशोभिकरणाचे काम करण्यात येत आहे. तसेच रायगडचा परिसर जागतिक वारसास्थळ म्हणून जाहीर होण्याच्या अंतिम टप्प्यात आले. त्यामुळे याठिकाणी जागतिक दर्जाच्या सोयी सुविधा उभारण्यात येत आहेत. यामध्ये पाचाडच्या परिसराचाही समावेश आहे. जवळच उपलब्ध असलेल्या पर्यटन विभागाच्या जागेमध्येही पर्यटकांसाठी सुविधा निर्माण करण्यात येतील. तसेच सातारा जिल्ह्यातील संगम माहुली येथील छत्रपती शाहू महाराज यांची समाधी आणि महाराणी ताराराणी यांच्या समाधीस्थळाचेही संवर्धन करण्यात येणार आहे. सिंदखेडराजा येथील राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळाचे जतन आणि सवंर्धन करण्यात येत असल्याची माहितीही सांस्कृतिक कार्य मंत्री शेलार यांनी दिली.
No comments:
Post a Comment