भारत सरकार कोणत्याही भाषेला अभिजात दर्जा देताना पुढील महत्त्वाचे निकष विचारात घेते, त्यात
1. प्राचीनतेचा पुरावा: भाषेचा इतिहास किमान १५०० ते २००० वर्षांपर्यंत मागे जाणारा असावा.
2. स्वतंत्र व्याकरण आणि लेखन परंपरा: भाषा केवळ बोली स्वरूपात नसून शास्त्रशुद्ध व्याकरण आणि साहित्यपरंपरा असावी.
3. मौलिक साहित्य ठेवा: ज्ञानपरंपरा असलेले ग्रंथ आणि साहित्य शतकानुशतके उपलब्ध असावे.
4. सतत वापर आणि टिकाऊपणा: भाषा अद्यापही लोकांमध्ये व्यापक प्रमाणावर वापरली जात असावी.
मराठी भाषा या सर्व निकषांमध्ये योग्य ठरली.म्हणून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला.
सातवाहन काळातील महाराणी नागनिका हिने नाणेघाटात कोरलेला शिलालेख आणि महाराष्ट्रातील लेण्यांमधील अनेक शिलालेख हे आद्य भाषेचे महत्त्वाचे ऐतिहासिक पुरावे आहेत.
मराठीला अभिजात दर्जा : ऐतिहासिक निर्णय
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, डॉ. श्रीकांत बहुलकर, प्रा. मधुकर वाकोडे, सतीश काळसेकर, डॉ. कल्याण काळे, प्रा. आनंद उबाळे, परशुराम पाटील, डॉ. मैत्रेयी देशपांडे आणि अन्य विद्वानांनी केलेल्या सखोल अभ्यासानंतर केंद्र सरकारकडे अहवाल सादर करण्यात आला. त्यानुसार २०२४ मध्ये मराठी भाषेला अभिजात दर्जा बहाल करण्यात आला.
हा सन्मान मराठी भाषिकांसाठी अभिमानास्पद आहे. यामुळे मराठीसाठी स्वतंत्र संशोधन केंद्र, शैक्षणिक अनुदान आणि जागतिक स्तरावर तिची प्रतिष्ठा वाढणार आहे.
दिल्लीतील ऐतिहासिक संमेलन आणि पुढील वाटचाल
अभिजात दर्जा मिळाल्यानंतर प्रथमच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीमध्ये होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार असल्याने हे संमेलन ऐतिहासिक ठरणार आहे.
यामुळे मराठी भाषा संशोधनासाठी अधिक अनुदान आणि केंद्रे स्थापन केली जातील. मराठीचा शैक्षणिक स्तरावर अधिक व्यापक वापर होईल.डिजिटल माध्यमांत मराठीला अधिक संधी निर्माण होतील.
अभिजात मराठीचा अभिमान
मराठी भाषेत एकूण ४२ बोलीभाषा असल्याचे भारतीय विद्वान मानतात. यामध्ये अहिराणी, वऱ्हाडी, कोळी, आगरी, माणदेशी, तंजावर मराठी, कुणबी, महाराष्ट्रीय कोकणी या प्रमुख बोलीभाषा आहेत.
२००० वर्षांहून अधिकचा इतिहास, समृद्ध साहित्यपरंपरा आणि ऐतिहासिक संदर्भ यामुळे मराठीच्या अभिजाततेचा दर्जा अधिक दृढ झाला आहे. आता या अभिजाततेचा उपयोग करून मराठीला जागतिक स्तरावर अधिक दृढ करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. या कार्यात सर्व मराठी भाषकांचाही मोठा सहभाग असणार आहे.
संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेबद्दल अभिमानाने म्हटले आहे—
"माझा मराठीची बोलू कौतुके, परि अमृतातेहि पैजासी जिंके।"
या ओळींमधून त्यांनी मराठी भाषेची महती व्यक्त केली आहे. अमृतालाही पैजेने जिंकणारी ही अक्षरे ज्ञानदेवांच्या प्रत्येक शब्दाशब्दांतून प्रकट झाली.
अशी ही आपली मराठी भाषा वैश्विक ज्ञानभाषा होण्यासाठी आपण सर्वजण सतत प्रयत्नशील राहूया
No comments:
Post a Comment