Friday, 29 December 2023

झाडाच्या मुळांपासून पूल बनण्याची गोष्ट !

 झाडाच्या मुळांपासून पूल बनण्याची गोष्ट !


- ‘लिव्हिंग रूट ब्रीज’ किती वर्षांनी बनतो?
(मेघालय डायरी ५)

मेघालयातील सर्वांत मोठे आकर्षण म्हणजे झाडांच्या मुळांपासून तयार केलेले पूल अर्थात ‘लिव्हिंग रूट ब्रीज’. तिथे असे पूल जागोजागी आहेत. काही गावांमध्ये तर त्यांची संख्या शंभराच्या घरात आहे, असे स्थानिकांकडून समजते. 

त्यांचा उपयोग काय?... तर पाण्याचे प्रवाह किंवा खोल दरी ओलांडून पलीकडे जाण्यासाठी. आपल्या गरजांसाठी स्थानिक संसाधनांचा किती चांगला वापर करता येतो, याचे हे उत्तम उदाहरण. पूर्वीच्या काळी, अगदी ३० - ४० वर्षांपूर्वीपर्यंत फारशी आधुनिक साधने नसताना या पुलांमुळे दळणवळण किती सुकर झाले असावे, याची कल्पना करता येते. कारण तिथला धो-धो पाऊस आणि डोंगर-दऱ्यांची भूरचना.

आताही या पुलांचा उपयोग होतो, पण सध्याच्या काळात त्यांचा सर्वाधिक उपयोग पर्यटनासाठी होतो. हे पूल पर्यटकांना आकर्षित करतात. या पुलांवरून चालणे, त्यावर उभे राहून फोटो काढणे... हे सर्वत्र पाहायला मिळते. 

पण हे पूल किती जुने आहेत, एक पूल तयार होण्यासाठी किती वर्षे लागतात, ते नेमके कसे तयार केले जातात... असे अनेक प्रश्न घेऊन मी तिथे गेलो होतो. अनेकांशी बोलून, ते प्रत्यक्ष पाहून या गोष्टी उलगडण्याचा प्रयत्नही केला. त्यातून हे पूल बनण्याची गोष्ट समजली. ती फारच भन्नाट आहे.

तिथले अनेक पूल हे काही शतकांपासून अस्तित्त्वात आहेत. पूर्वी पाण्याचे प्रवाह ओलांडणे, विशेषत: पावसाळ्यात शक्य होत नसे. इतर वेळीसुद्धा ते पोहून जाणे किंवा पायी पाण्यातून जाणे सोयीचे नसे. त्यासाठी हे पूल. हे पूल करण्यासाठी गरज असते ती पारंब्या असलेल्या झाडांची. भारताच्या संदर्भात सांगायचे तर वडाच्या झाडाची.

जिथे पूल हवा आहे, तिथे प्रवाहाच्या एका काठावर असे झाड असावे लागते किंवा लावावे लागते. वडाचे झाड चांगले वाढले की त्याला पारंब्या येण्यासाठी साधारणपणे वीसेक वर्षे लागतात. पण केवळ सुरुवातीला येणाऱ्या पारंब्या असून चालत नाहीत. या पारंब्या जमिनीला लागतात तेव्हा त्यांना उप-पारंब्या फुटणे (ब्रँचिंग) सुरू होते. 

या उप-पारंब्या फुटल्या, वाढायला लागल्या की लोक एका किनाऱ्यापासून दुसऱ्या किनाऱ्यापर्यंत बांबूचा सांगाडा तयार करतात. पारंब्या जशा वाढतील, तशा त्यांना या सांगाड्यातून विणून घेतात आणि मग या पारंब्या जाडजूड होण्याची वाट पाहतात. त्यासाठी आणखी वीसेक वर्षे जातात. मग या पुलावर मोठाले गोटे टाकून त्याला मजबुती दिली जाते, मुळ्यांमधे असलेल्या फटी बुजवल्या जातात. मग तो पूल वापरण्याजोगा बनतो.

म्हणजे झाड लावल्यापासून हा पूल वापरण्यायोग्य होईपर्यंत सारे सुरळीत पार पडले तर चाळीस-पन्नास वर्षे लागतात. त्यानंतरही त्याची काळजी घ्यावी लागते. पाण्याच्या प्रवाहासोबत वाहणारे दगडगोटे, शिळा यांच्यामुळे मुळीचा एखादा भाग खराब झाला तर तिथून संपूर्ण पूल खराब व्हायला सुरुवात होऊ शकते. म्हणून त्याची देखभाल-दुरुस्ती महत्त्वाची.

या पुलावरून चालता-चालता किंवा तो पाहत असताना हे सारं समजून घेणं हा वेगळीच अनुभव असतो. त्यासाठी मेघालयलाच जावे लागते आणि हे समजून घ्यायचे असेल तर “भवताल”ची सोबत असावी लागते.

- अभिजित घोरपडे
........

Exclusive Meghalaya - Kaziranga

नेहमीच्या गोष्टींपलीकडचं काही समजून घेण्यासाठी,
चलो मेघालय
(26 Feb - 4 March 2024)
 
9545350862

(बॅच फुल्ल होण्यापूर्वी संपर्क साधा.)

- भवताल टीम

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi