Thursday, 11 May 2023

जपानच्या शिष्टमंडळाने घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट.

 जपानच्या शिष्टमंडळाने घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट.

जपान सरकारतर्फे भेटीचे निमंत्रणl.

            मुंबई, दि. ११ : जपानचे कॉन्सुलेट जनरल डॉ. फुकाहोरी यासूकाटा यांच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर निवासस्थानी भेट घेऊन विविध विषयावर चर्चा केली. यावेळी डॉ. यासूकाटा यांनी जपान केंद्र सरकारच्या वतीने उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांना जपान भेटीचे निमंत्रण दिले.


            यावेळी उपमुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी, विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे, जपानचे कॉन्सुल मोरी रायको, कनेको टोशीहिरो, जपान कॉन्सुलेट जनरलचे राजकीय सल्लागार विवेक कुलकर्णी उपस्थित होते.


            यावेळी उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस आणि डॉ. यासूकाटा यांच्यामध्ये भारत-जपान संबंध, सांस्कृतिक देवाणघेवाण, उद्योग, व्यापार यामध्ये सहकार्य वाढविण्याबाबत आणि संबंध अधिक दृढ होण्याविषयी चर्चा झाली.


            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, मुंबईतील विविध पायाभूत सुविधेच्या कामात जपानचे मोठे योगदान आहे. जपानच्या तंत्रज्ञानाचा ठिकठिकाणी वापर होत असून या माध्यमातून जपान आणि महाराष्ट्राचे संबंध अधिक वृद्धिंगत होत आहेत. जपानची जनता आणि सरकारचा आम्ही नेहमीच आदर करीत आलो आहोत.


            डॉ. यासूकाटा यांनी यावेळी जपान केंद्र सरकारच्या वतीने श्री. फडणवीस यांना जपान भेटीचे निमंत्रण दिले, मार्च २०२४ अखेर कधीही सात दिवसांचा दौरा केला जाऊ शकेल. या काळात विविध जपानी कंपन्यांना भेटी देता येणार आहेत. याचदरम्यान सांस्कृतिक देवाणघेवाण, भारतीय समुदायांशी भेटी घेण्याचे नियोजन आहे. २०१२ मध्ये गुजरातचे तत्कालिन मुख्यमंत्री आणि सध्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनाही जपान भेटीचे निमंत्रण देण्यात आले होते. सध्या भारतातून उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांना जपान दौऱ्याचे निमंत्रण देण्यात आल्याची माहिती डॉ. यासूकाटा यांनी दिली.


००००

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi