Saturday, 11 March 2023

फिशटॅन्क

 #कथा

#फिशटॅन्क

©स्वप्ना...

        सावी दारातून आत शिरली,... खरंतर शिरतानाच दरवाज्याजवळ असलेल्या सुंदर रांगोळीवरून घराचा अंदाज तिने बांधला होता,...तिला दार उघडल्यापासून लेले काकु तिला बसण्यासाठी जागा करत होत्या,..वर्तमानपत्र,पुस्तकं कुठे कागदी फुलं करतानाच सामान तर कुठे रंग ,ब्रश,..ठिक आहे असू द्या असू द्या म्हणत सावी अवघडून बसली,..छान चकाकत्या तांब्याच्या छोट्या पिपातून तांब्याच्याच लक्ख ग्लासात त्यांनी सावीला पाणी दिलं,छान गार वाळ्याचा मंद सुगंध असलेलं,..सावीला एकदम छान वाटलं,..खरंतर लेले काकु जरा आगळ्या वेगळ्या म्हणूनच जास्त प्रसिद्ध होत्या त्यांचे लेख,चित्र, बागकाम ह्यावर फार चर्चा ऐकून होती सावी,..म्हणून तर आज नेमका नवऱ्याच्या फिश शॉप मध्ये लेले काकूंचा फोन आला,.." फिशटॅन्क मधले दोन फिश गेले सोडून लगेच फिश पाठवा,.."नवऱ्याला संधी मिळाली तूच जा आणि भेट जरा काकुला मग सावीला वाटलं जरा भेटून तरी येऊ ह्या लेले काकुला,.. सगळे म्हणतात एवढी दुःख पेलली तरी एकटी बाई अगदी फ्रेश असते,.. बघू तरी कश्या जगतात ह्या एकट्या,..?सावी विचारात होती तेवढ्यात काकु म्हणाल्या,."चहा घेता,..?स्पेशल चुलीवरचा पण आहे सांगा आवडतो का?नाहीतर गॅसवर करते किंवा सरबत तुम्ही म्हणाल ते करू,.."काकूंच्या ह्या स्वभाव वैशिष्ट्याबद्दल पण सावी ऐकून होती,..घरातुन विन्मुख त्या कोणाला पाठवत नाहीत,..पण चुलीचा चहा सावीला गम्मत वाटली,..ती पटकन म्हणाली,"अय्या चूल पण आहे,..काकु हसुन म्हणाल्या,"तू पहिल्यांदाच अली आहेस घरी,..ये दाखवते तुला माझं गाव,..."खरंतर सावीने नवऱ्याकडून आणि दुकानातल्या नोकर मुलांकडून ऐकलं होतं आणि कॉलनीत देखील बऱ्याच जणांकडून ऐकून होत्या,..पण कोपऱ्यात घर आणि आपली नोकरी त्यामुळे कधी भेटीचा योग आला नव्हता पण आज सगळं जुळून आलं खरतर मध्ये आपलं बाळ पोटात गेल्यावर आपण जेंव्हा रडून वेड व्हायला आलो तेंव्हा नवरोबा म्हंटले होते," हिला लेले काकुंकडे घेऊन जावं,..दुःख कसं स्वीकारायच ते शिकवायला,.."पण जमलंच नाही तेंव्हा,... आपल्यालाही उत्सुकता होतीच भेटण्याची ,..

      तेवढ्यात काकूंचा आवाज आला,.."स्वयंपाकघरातुन इकडे ये ग बागेत,.."सावी स्वयंपाक घरात शिरली,..कोपऱ्यात पाटा वरवंटा होता,..तांब्या पितळेची भांडी काहीसं जून आणि काहीसं नवं असं सगळं होतं,.. ती मागे गेली,..सोनचफ्याचा सुगंध दरवळत होता सावी बाजेवर बसली,..काकूंनी आधण ठेवलं होत,..मातीच्या कुल्लड मध्ये त्यांनी तो खरपूस चहा गळाला,..एक सुंदर अनुभूती सावीला आली,..उत्सुकतेने सावीने विचारलं,.. "काकु आधुनिकतेते हे जून सुद्धा जपलं आहे तुम्ही,..,"काकु हसल्या म्हणाल्या,.."सगळं चकाचक नवीन करून टाकू असं मिस्टर म्हणाले आणि मी विरोध केला,..हे जून ज्यात माझी सासू,अजेसासू जगली तसं 100 टक्के आपण नाही जगू शकणार पण त्यातलं जमेल ते जपलं,..त्यामुळे आयुष्यातलं एकाकीपण जगायला मदत झाली,..आपलीच संस्कृती सोबत आहे म्हंटल्यावर जगणं सोपं झालं,..तुळशीनी मिळणार ऑक्सिजन काय किंवा तांब्याच्या भांड्यातील खनिजे काय ह्यांनी शारीरिक तर नीट ठेवलय पण मनाचं स्वस्थही जपलं आहे ना माझं,..मी एकटी असले तरी ह्या जुन्या नव्याच्या पसाऱ्यात रमून जाते,..मी एकटेपणातून स्वतःला रमवायला शिकले ग,..उगाच मरमर करत स्वच्छता नाही करत तर वेळ छान घालवण्यासाठी ह्या पितळेच्या डब्यातील एक डबा रोज घासते,.. जसा जसा तो लख्ख होतो तसं तस मन पण उजळत माझं,..ही बाग चैतन्याचे धुमारे देते जगण्याला,..हि चूल जळण शिकवते शेवटी राखच होणार हे सत्य सांगते,..ह्यातलं लाकूड सुद्धा सांगत ग निसर्गातल निसर्गातच जाणार,..ह्या अनुभवातून मानसिक खम्बीर झाले ग,..चल हॉलमध्ये बसू म्हणत दोघी तिथे आल्या,..

        लॅपटॉप पासून सगळं हाताळत होत्या काकु,..कोपऱ्यातील फिशटॅन्क तर फारच सुंदर होता,..नितळ पाणी मागच्या वॉलपेपरने ते निळशार आणि शांत दिसत होतं,..सुंदर दगड,..आणि त्यात उत्साहाने फिरणारे मासे,..तिने पटकन आणलेले मासे त्यात सोडले,..क्षणात ते फिशटॅन्क मध्ये सुळसुळ पोहायला लागले,..ती परत मागे जाऊन बसली,..काकु तेवढ्यात ओंजळभर चाफ्याची फुलं घेऊन आल्या,..ती फुलं सावीच्या ओंजळीत देत म्हणाल्या,"निसर्गाने खुप दिलंय ग,..घेता आलं पाहिजे आता हे मासेच बघ ना,....माझा नवरा,मुलगी,मुलगा कार अपघातात गेले आणि वाटलं आता सगळं संपलं,... पण त्यानंतरच्या दिवसात एकटी ह्या फिशटॅन्क कडे बघायचे एक दिवस एक मासा मेला,.. तो त्यातून काढून टाकला तरी बाकीच्या माश्यांची ती आनंदी लय कायम होती,.. बस त्या क्षणी कळलं निसर्ग सांगतोय आपल्याला,..आपली लय जपायची माणसं जेवढं आयुष्य तेवढंच जगतात आपलं कदाचित जास्त असेल पण मग ते काय वेड होऊन इतरांवर ओझं होऊन जगायचं का,..?कारण बऱ्याच नातेवाईकांना वाटलं आता हिला सांभाळाव लागेल कि काय,.. ?माहेरचे काय आणि सासरचे काय अस्वस्थ झाले होते,..पण ह्या माश्यांची शिकवण मनात कोरल्या गेली,..म्हणून ह्या फिशटॅन्कवर माझा फार जीव आहे ग,...आता हे नवीन मासेच बघ ना किती सहजतेने नव्या परिस्थितीला सामोरे जाऊन एकरूप झालेत ना जगण्यात,.... सावीला वाटलं एवढं फिशटॅंकच दुकान आपल्या नवऱ्याचं,..कितीतरीं वेळा आपण हे बघतो,..पण आज लेले काकूंनी नव्याने बघायला शिकवलं,..त्या माश्यांची आणि लेले काकूंची जगण्याची आंनदी लय घेऊन सावी बाहेर पडली,..(repost)

       वाचकहो कथा कशी वाटली नक्की कळवा,..अश्याच कथांचे पुस्तक हवे असल्यास 098228 75780 ह्या no वर msg करा,..असेच blogs वाचण्यासाठी swapna blogs ह्या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा धन्यवाद,..


©स्वप्ना अभिजीत मुळे(मायी)औरंगाबाद.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi