लाला लजपतराय वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालयाचा सुवर्ण महोत्सव
"केवळ 'पंजाब केसरी' नव्हे; लाला लजपतराय 'हिंद केसरी'": राज्यपाल भगतसिंह कोश्यार.
मुंबई, दि. 28 : थोर स्वातंत्र्यसेनानी लाला लजपतराय यांचे कार्यक्षेत्र अविभाजित पंजाब असले तरीही त्यांचे जीवन कार्य व योगदान संपूर्ण देशासाठी होते. शिक्षण, आरोग्य, संस्कार व समाज जागरणासाठी समर्पित लाला लजपतराय केवळ 'पंजाब केसरी' नव्हते तर खऱ्या अर्थाने 'हिंद केसरी' होते. विद्यार्थी व युवकांनी त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन समाज व देशासाठी योगदान द्यावे, असे आवाहन राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.
लाला लजपतराय जयंती दिनाचे औचित्य साधून मुंबईतील लाला लजपतराय वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालयाच्या स्थापनेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित लाला लजपतराय स्मृती सुवर्ण महोत्सवी व्याख्यान देताना राज्यपाल श्री.कोश्यारी बोलत होते.
लाला लजपतराय पारतंत्र्याच्या ज्या काळात जगले, त्या काळात युवकांनी उच्च शिक्षण स्वतःसाठी नाही तर समाज व देशासाठी घेतले. बाळ गंगाधर टिळक, बंगालचे बिपीनचंद्र पाल यांसह लाला लजपतराय या 'लाल बाल पाल' त्रयीनीं स्वातंत्र्य लढ्याला निश्चित अशी दिशा दिल्याचे राज्यपालांनी सांगितले.
स्वातंत्र्य लढ्यासोबतच लजपतराय यांनी आर्य समाजाच्या माध्यमातून समाजातील जातीव्यवस्था, विषमता यांविरुद्ध लढा दिला तसेच अँग्लो वेदिक महाविद्यालये स्थापन केल्याचे त्यांनी सांगितले. लजपतराय यांनी लोकसेवक मंडळ ही संस्था स्थापन करून जनतेची सेवा केली असे सांगून युवकांनी नोकरी, उद्योग, नवसंशोधन आदी सर्व गोष्टी कराव्या, परंतु त्यासोबतच समाजासाठी योगदान द्यावे असे राज्यपालांनी सांगितले .
लाला लजपतराय स्मृती न्यासाचे अध्यक्ष डॉ. कमल गुप्ता यांनी महाविद्यालयाच्या पन्नास वर्षातील वाटचालीचा आढावा घेतला. महाविद्यालयाने 25 देशीविदेशी संस्थांशी सहकार्य करार केले असल्याचे त्यांनी प्रास्ताविकातून सांगितले. सुरुवातीला राज्यपालांनी लाला लजपतराय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला व सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त तयार करण्यात आलेल्या कोनशिलेचे अनावरण केले.
कार्यक्रमाला लाला लजपतराय स्मृती न्यासाचे विश्वस्त डॉ.सुनील गुप्ता, विनोद गुप्ता, नरेश गुप्ता, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.नीलम अरोरा, उपप्राचार्य डॉ. अरुण पुजारी तसेच महाविद्यालयातील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
000
Maharashtra Governor Koshyari presides Golden Jubilee of Lala Lajpatrai College in Mumbai
Describes Lajpatrai as the 'Lion of India'
No comments:
Post a Comment