Tuesday, 12 July 2022

घातक

 घातक... विनीत वर्तक ©


काही दिवसांपूर्वी भारताच्या डी.आर.डी.ओ. ने 'घातक' या जेट विमानाची चाचणी घेतली. सोशल मिडिया आणि बातम्यांच्या माध्यमातून याबद्दल अनेक ठिकाणी लिहिलं गेलं. पण सामान्य माणसापर्यंत मानवरहीत एका जेट विमानाची चाचणी भारताने घेतली इतपत ज्ञान पोहोचलं. पण प्रत्यक्षात तसं नव्हतं. ही चाचणी अनेक अर्थाने वेगळी होती. घातकच्या चाचणीने भारताने भविष्यात येऊ घातलेल्या अनेक तंत्रज्ञानांना आपलंसं केलं आहे याची नोंद जगाने घेतली आहे. येत्या काळात संपूर्ण युद्धनीती बदलविण्याची ताकद असलेलं हे तंत्रज्ञान आहे. त्यामुळेच भारताने नक्की घातकच्या चाचणीतून काय मिळवलं? या चाचणीचे भविष्यात काय परिणाम होणार? नक्की यातून आपण कोणती तंत्रज्ञानं विकसित केलेली आहेत? हे जाणून घेणं महत्वाचं आहे. 

घातक हे डी.आर.डी.ओ. बनवत असलेलं (UCAV) म्हणजेच stealthy unmanned combat air vehicle चं छोटं स्वरूप आहे. त्याच्या नावात दोन गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत, त्यातच घातक का महत्वाचं आहे याचं उत्तर लपलेलं आहे. एक म्हणजे stealth technology. ( अदृश्य राहण्याचं तंत्रज्ञान ). आपल्यापैकी प्रत्यकाच्या कानावर stealthy हा शब्द पडला असेल. हे असं तंत्रज्ञान आहे ज्यात अनेक तंत्रज्ञानांचा संगम आहे. ज्यांचा वापर करून एखादी वस्तू हवेत रडारवरून अदृश्य करता येऊ शकते अथवा ती अदृश्य राहते. जर आपण वेगवेगळ्या तंत्रज्ञानाने हवेत प्रवास करणाऱ्या गोष्टीचा व्हिसिबल स्पेक्ट्रम, इन्फ्रारेड रडार सिग्नेचर, रेडिओ फ्रिक्वेन्सी तसेच इलेक्ट्रॉनिक रेडिएशन या सर्व गोष्टी नियंत्रित किंवा त्या बाजूला काढू शकलो. तर अशी वस्तू हवेत प्रवास करत असताना रडारवरून अदृश्य रहाते, यालाच stealth technology ( अदृश्य राहण्याचं तंत्रज्ञान ) असं म्हणतात. भारताकडे आजवर असं तंत्रज्ञान नव्हतं. जगात फक्त अमेरिका आणि इस्राईलकडे असं स्टेल्थ तंत्रज्ञान असल्याचं म्हटलं जातं. भारत त्यामुळेच स्टेल्थ तंत्रज्ञान शिकण्यासाठी गेली काही दशके काम करत आहे. 

Aeronautical Development Establishment (ADE), Defence Research and Development Organisation (DRDO) आणि भारतीय हवाई दल यांनी मिळून स्टेल्थ पद्धतीच्या यूकॅव्ह च्या निर्मितीसाठी काम सुरू केलं. आधी ऑरा नावाने २००९ साली या प्रोजेक्टची सुरूवात झाली होती. पण २०१५ साली तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी या प्रोजेक्टला प्रत्यक्षात आणण्यासाठी आर्थिक पाठबळ दिलं आणि याचं नामकरण 'घातक' असं करण्यात आलं. त्यांनी २०१६ मधे या प्रोजेक्टसाठी तब्बल २३० कोटी रुपयांची तरतूद केली होती. येणाऱ्या काळात ड्रोनचं वाढतं महत्व आणि भारताला स्टेल्थ तंत्रज्ञानाची गरज त्यांनी ओळखली होती. यानंतर भारताच्या या दोन्ही संस्थांनी वायूदलासोबत मिळून गेली ५-७ वर्षं हे तंत्रज्ञान भारतात विकसित केलं. आपण शिकलेल्या तंत्रज्ञानाची चाचणी घेण्यासाठी २०२० मध्ये या तंत्रज्ञानाचं छोटं स्वरूप ज्याला Stealth Wing Flying Testbed (SWiFT) असं म्हटलं गेलं त्यावर काम सुरू करण्यात आलं. याचं वजन साधारण १ टन ( साधारण १००० किलोग्रॅम ) इतकं निश्चित करण्यात आलं. २०२१ पर्यंत याची निर्मिती आणि जमिनीवरील सगळ्या चाचण्या यशस्वी केल्यानंतर वेळ होती ती प्रत्यक्ष उड्डाणाची. 

जेव्हा तुम्ही एखादं स्टेल्थ यूकॅव्ह ( stealthy unmanned combat air vehicle) बनवत असतात तेव्हा तुम्हाला अनेक तंत्रज्ञानं एकाच वेळी शिकून त्यांचं एकत्रीकरण करावं लागतं. तुम्ही एक विमान बनवता जे स्वतःहून उड्डाण करेल, स्वतःहून हवेत मार्गक्रमण करेल, स्वतःहून जमिनीवर उतरेल, ज्याची चाकं ते स्वतःहून पोटात घेईल, स्वतःहून ती उतरण्याच्या वेळी पोटातून बाहेर काढेल, उड्डाण भरताना आणि उतरताना हवेतील कोन, जागा, वेग याचं सर्व नियंत्रण स्वतः करेल, स्वतःहून कंट्रोल टॉवरशी संपर्क प्रस्थापित करेल. वातावरणातील बदलांशी स्वतः जुळवून घेईल एवढं सगळं करून आपल्यासोबत मिसाईल, बॉम्ब, लेझर गायडेड मिसाईल अशी अत्याधुनिक आयुधं घेऊन शत्रूच्या गोटात प्रवेश करून आपलं लक्ष्य साध्य करेल. इतकं सगळं करताना शत्रूच्या रडारवरून अदृश्य राहील. आपण वाचताना दमून जाऊ इतकं किचकट यातील प्रत्येक तंत्रज्ञान आहे. या सर्वांचं एकत्रीकरण करून त्याला प्रत्यक्ष मूर्त स्वरूप देणं हे तितकं कठीण आहे. त्यामुळेच जगातील मोजक्या देशांकडे आजवर असं तंत्रज्ञान आहे. 

१ जुलै २०२२ रोजी डी.आर.डी.ओ. ने घातकच्या छोट्या स्वरूपाची यशस्वी चाचणी घेऊन आपल्या पुढल्या प्रवासाचा मार्ग मोकळा केला आहे. घातकचं मॉडेल हे अमेरिकेच्या प्रसिद्ध बी-२ स्टेल्थ बॉम्बर विमानाशी मिळतंजुळतं आहे. ज्याला फ्लाईंग विंग डिझाईन म्हटलं जातं. याचं डिझाईन करताना स्टेल्थ हे सगळ्यात टॉप प्रायोरिटी वर ठेवण्यात आलेलं आहे. याच्या इंजिनाची पाती कुठून दिसणार नाही अश्या प्रकारे याची रचना आहे. तसेच यात वापरण्यात आलेलं मटेरियल कंपोझिट आणि यावर दिला गेलेला रंग सुद्धा रडारचे सिग्नल शोषणारा आहे. ज्यामुळे घातक हे रडारवर संपूर्णपणे अदृश्य राहील. १ जुलैला केलेली चाचणी प्रामुख्याने घातकमधील यंत्रणा आपापसात योग्य ताळमेळ राखून हवाई प्रवास करू शकतात की नाही याची तपासणी करण्यासाठी होती. ज्यात हे स्विफ्ट मॉडेल यशस्वी ठरलं आहे. त्याचसोबत त्याच्या स्टेल्थ तंत्रज्ञानाचीही चाचणी घेतली गेली आहे. अर्थात त्याबद्दल पब्लिक डोमेनमध्ये काही सांगण्यात येणार नाही. कारण अश्या गोष्टी गुप्त ठेवलेल्या असतात. स्विफ्ट ची यशस्वी चाचणी भारताच्या पाचव्या पिढीतील स्वबळावर निर्माण होत असलेल्या Advanced Medium Combat Aircraft (AMCA) साठी एक मैलाचा दगड ठरली आहे. 

स्विफ्टच्या यशस्वी चाचणीनंतर पहिलं घातक हे २०२५ पर्यंत चाचणीसाठी तयार असेल. घातक आपल्यासोबत २००० किलोग्रॅम वजनाची मिसाईल, लेझर गायडेड बॉम्ब, प्रिसिजन गायडेड बॉम्ब आणि मिसाईल ( बालाकोट हल्यात वापरली गेलेली स्पाईस सारखी मिसाईल त्याचसोबत राफेल सोबत विकत घेतलेलं हॅमर सारखं मिसाईल ) घेऊन जाऊ शकणार आहे. हवेत तब्बल ३०,००० फूट पर्यंत उंच जाण्याची आणि जवळपास १.२ मॅक ( १५०० किलोमीटर / तास ) वेगाने जाण्याची क्षमता असेल. घातक सुपरसॉनिक वेगाने प्रवास करणारं जगातील पहिलं स्टेल्थ यूकॅव्ह ( stealthy unmanned combat air vehicle) असेल. ३०० किलोमीटरपर्यंत लक्ष्याचा वेध घेऊ शकणार आहे. याची सगळ्यात मोठी उपयुक्तता म्हणजे स्टेल्थ असल्यामुळे रडार यंत्रेणेने सुरक्षित असलेल्या शत्रूच्या एखाद्या बेसची सुरक्षा यंत्रणा भेदून किंवा तिला सुगावा लागू न देता मिसाईल स्ट्राईक करण्यात सक्षम असेल. ज्यात हा संपूर्ण बेस बेचिराख होऊ शकतो. तसेच घातक हे संपूर्णपणे उपग्रह यंत्रणांशीही जोडण्यात येईल. ज्यामुळे ज्याच्या मार्गाची सर्व यंत्रणा जमिनीवरून नाही तर भारताच्या अवकाशात असलेल्या उपग्रहांवरून नियंत्रित केली जाऊ शकेल. ( अमेरिका अश्या पद्धतीने आपल्या स्टेल्थ यूकॅव्हचं नियंत्रण करण्यात सक्षम आहे. भारत स्वबळावर हे तंत्रज्ञान विकसित करत असल्याचे अनेक रक्षा तज्ञांचे म्हणणे आहे. ) 

घातक हे नावाप्रमाणेच शत्रूसाठी घातक ठरणारं तंत्रज्ञान आहे. स्विफ्टच्या चाचणीने भारताने या तंत्रज्ञानात मारलेली मजल जगापुढे आलेली आहे. येत्या ३ वर्षात घातक चाचणीसाठी तयार झालेलं असेल तोवर भारताने स्टेल्थ सोबत इतर अनेक तंत्रज्ञानाला स्वबळावर निर्माण करून आत्मनिर्भरतेकडे एक उंच उडी घेतलेली असेल. १ जुलैला झालेली चाचणी नुसती एखाद्या मानवविरहित जेट विमानाची चाचणी नव्हती, तर बदलणाऱ्या युद्धाच्या पटावर भारताची एक चाल होती. या चालीने भारत जगाच्या तुलनेत कुठे मागे नाही आणि स्वबळावर असं कठीण तंत्रज्ञान निर्माण करण्यात सक्षम असल्याचं सिद्ध झालं आहे. तूर्तास स्विफ्टच्या यशस्वी चाचणीसाठी सर्व वैज्ञानिक, अभियंते, कर्मचारी आणि खाजगी कंपन्या यांना माझा कडक सॅल्यूट. राष्ट्र सुरक्षिततेत त्यांचं योगदान नेहमीच वरच्या स्थानावर राहील. 

या प्रसंगी भारताचे माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांचा विशेष उल्लेख करावासा वाटतो. कारण त्यांनी दूरदृष्टीमुळे घातकच्या निर्मितीसाठी आर्थिक पाठबळ दिलं गेलं, ज्याची फळे आज आपण चाखत आहोत. त्यांच्या स्मृतीस माझा साष्टांग नमस्कार. 

जय हिंद!!!

फोटो शोध सौजन्य :- गुगल 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.

https://vartakvinit.blogspot.com/2022/07/blog-post.html

या पोस्टचा इंग्रजी अनुवाद माझ्या ब्लॉगवर उपलब्ध आहे. त्याची लिंक खाली शेअर केलेली आहे. 

https://vartakvinit.blogspot.com/2022/07/deadly-vinit-vartak.html

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi