Friday, 11 March 2022

 विधानसभा लक्षवेधी :

ग्रामपंचायतीमध्ये आता स्वयंचलित पर्जन्यमापक यंत्र

- मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार

            मुंबई, दि. 10 : राज्याच्या ग्रामीण भागातील पावसाची अचूक मोजणी, वादळवाऱ्याचा वेग व पर्जन्यमानाच्या अचूक नोंदींसाठी राज्यातील ग्रामपंचायतीमध्ये स्वयंचलित पर्जन्यमापक यंत्र बसविण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत दिली.

            सदस्य डॅा. राहुल आहेर यांनी राज्यात अतिवृष्टी, पूर, वादळ वाऱ्यांमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानभरपाईबाबत लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. त्याला उत्तर देतांना श्री. वडेट्टीवार बोलत होते.

            मदत व पुनर्वसन मंत्री श्री. वडेट्टीवार म्हणाले, राज्यात अतिवृष्टी, पूर, चक्री वादळांमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व राज्य शासनाच्या निकषानुसार निविष्ठा अनुदान स्वरुपात मदत देण्यात येते. नुकसानग्रस्त भागातील बाधीत शेतकऱ्यांना राज्य शासनाने वेळोवेळी मदत केली आहे.

            विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्रातील नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व राज्य शासनाच्या निकष व प्रशासकीय अहवालानुसार वाढीव मदत देण्यात आली आहे. मात्र, निकषानुसार पात्र असूनही नुकसान भरपाईपासून वंचित असणाऱ्या शेतकऱ्यांबाबत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रस्ताव मागविण्यात येईल व त्यानुसार पात्र नुकसानग्रस्तांना मदत दिली जाईल, असे श्री. वडेट्टीवार यांनी सांगितले.

            मदत व पुनर्वसन मंत्री श्री. वडेट्टीवार म्हणाले, चांदवड व देवळा मंडळामध्ये पर्जन्यमानाच्या तफावतीमुळे नुकसान भरपाईपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्याकडून पुन्हा चौकशी करून अहवाल मागविण्यात येईल. या अहवालानुसार नुकसानग्रस्तांना मदत दिली जाईल. पर्जन्य मानातील तफावतीमुळे शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहू नये यासाठी ग्रामीण भागातील पावसाची अचूक मोजणी, वादळवाऱ्याचा वेग व पर्जन्यमानाच्या अचूक नोंदींसाठी राज्यातील ग्रामपंचायतीमध्ये स्वयंचलित पर्जन्यमापक यंत्र तसेच वाऱ्याचा वेग मोजण्यासाठी ‘वातकुकुट यंत्र’ बसविण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये ही शासनाची प्रामाणिक भावना आहे. असेही श्री. वडेट्टीवार यांनी यावेळी सांगितले.

            सदस्य बाळासाहेब आजबे, सुधीर मुनगंटीवार, आशिष जैस्वाल, योगेश कदम आदींनी चर्चेत सहभाग घेवून उपप्रश्न उपस्थित केले होते.



No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi