ऑलिंपिकमधल्या भारताच्या यशाची पायाभरणी करणाऱ्या
स्वर्गीय खाशाबा जाधव यांना उपमुख्यमंत्र्यांची आदरांजली
मुंबई, दि. 14 :- 1952 च्या हेलसिंकी ऑलिंपिकमध्ये कुस्तीचे कांस्यपदक जिंकून देशाला पहिले वैयक्तिक ऑलिंपिक पदक मिळवून देणारे महान कुस्तीपटू पैलवान खाशाबा जाधव यांचा आज स्मृतीदिन. महाराष्ट्राच्या मातीतल्या कुस्तीला सातासमुद्रापार गौरव मिळवून देणाऱ्या, ऑलिंपिकमधल्या भारताच्या आजच्या यशाची पायाभरणी सत्तर वर्षांपूर्वी करणाऱ्या महाराष्ट्राच्या महान सुपुत्रास, पैलवान खाशाबा जाधव यांना स्मृतीदिनी उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले आहे.
००००
स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या स्मृतीदिनानिमित्त
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भावपूर्ण आदरांजली
मुंबई, दि. 14 :- “महाराष्ट्राच्या राजकारणातले सदाबहार, हसतमुख, दिलखुलास व्यक्तिमत्व असलेल्या माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांनी कृषी, उद्योग, व्यापार, शिक्षण, आरोग्य, सहकार, कला, क्रीडा, संस्कृती अशा अनेक क्षेत्रात महाराष्ट्राला अव्वलस्थानी नेले. पायाभूत सुविधा उभारताना महाराष्ट्राचा प्रगत, पुरोगामी, सुधारणावादी विचार जाणीवपूर्वक जपला. महाराष्ट्राच्या राजकारणाला सुसंस्कृत चेहरा दिला. सर्वांना सोबत घेऊन राज्याला पुढे नेणारे सर्वमान्य, अजातशत्रू व्यक्तिमत्व म्हणून स्वर्गीय विलासराव देशमुख कायम स्मरणात राहतील,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या कार्याचे स्मरण करुन त्यांना स्मृतीदिनानिमित्त भावपूर्ण आदरांजली वाहिली.
स्वर्गीय विलासराव देशमुख यांना आदरांजली वाहताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, बाभळगावच्या सरपंचपदापासून राज्याच्या मुख्यमंत्रीपदापर्यंत, पुढे केंद्रीय मंत्रीपदापर्यंतचा त्यांचा प्रवास संघर्षाचा, कठोर परिश्रमांचा होता. या प्रदीर्घ प्रवासात राज्यातील जनतेच्या सुख-दु:खांशी समरस होऊन त्यांनी काम केले. जनतेला मदतीसाठी सहज उपलब्ध होऊ शकणारे ते नेते होते. त्यांच्याकडे विकासाची दूरदृष्टी, प्रशासकीय कौशल्य होते. नेतृत्व, वक्तृत्व, कर्तृत्व या तिन्ही आघाड्यांवर त्यांनी त्यांचे श्रेष्ठत्व सिद्ध केले. मुंबई महानगराच्या विकासात त्यांचे योगदान कायम स्मरणात राहील. स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या स्वप्नातील पुरोगामी, प्रगत, संवेदनशील, सुसंस्कृत महाराष्ट्र घडवणे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.
No comments:
Post a Comment