Tuesday, 24 December 2024

मुस्लिम, ईसाई, सिख, बौद्ध, पारसी, और जैनअल्पसंख्यांक समुदायातील विद्यार्थ्यांनी परदेश शिष्यवृत्तीसाठी 31 डिसेंबरपर्यंत अर्ज करावेत

 अल्पसंख्यांक समुदायातील विद्यार्थ्यांनी परदेश शिष्यवृत्तीसाठी 31 डिसेंबरपर्यंत अर्ज करावेत


            मुंबई, दि.24 : अल्पसंख्यांक समुदायातील विद्यार्थ्यांसाठी परदेशात पदव्युत्तर पदवी व पी.एच.डी. अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. या योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती निवडीसाठी सन 2024-25 करिता पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत असून विद्यार्थ्यांनी दि. 31 डिसेंबर 2024 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन कार्यालय अधीक्षक समाज कल्याण मुंबई शहर यांनी केले आहे.

अल्पसंख्याक विभागामार्फत सन 2024-25 मध्ये राज्यातील अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांकरिता परदेशात पदव्युत्तर पदवी व पी.एच.डी. अभ्यासक्रमांसाठी परदेश शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत  विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यासाठी  अल्पसंख्याक विभागाने मंजुरी दिलेली आहे.

याबाबत शासनाच्या www.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर ताज्या घडामोडींमध्ये विस्तृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

अल्पसंख्याक परदेश शिष्यवृत्ती योजनेच्या अटी व शर्ती आणि लाभार्थी निवड प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे.

            1)  विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा.

2) विद्यार्थी अल्पसंख्याक समुदायातील घटकातील असावा.पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी 35 वर्षे व  

     पीएचडी साठी 40 वर्षे कमाल वयोमर्यादा असेल.

3) विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त नसावे. ( विवाहित महिला  

    उमेदवारांनी पतीकडील कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्नाचा दाखला देणे आवश्यक आहे. जर

    विवाहित महिला उमेदवार विधवा,  घटस्फोटीता असून वडिलांकडे वास्तव्यास असल्यास महिला

    उमेदवाराने वडिलांकडील कुटुंबाच्या उत्पन्नानुसार अर्ज केल्यास तसे कायदेशीर कागदपत्रे सादर करणे  

    आवश्यक आहे.)

4) परदेशी शिष्यवृत्ती योजनेंतर्गत दोन वर्षे कालावधीचा एमबीए अभ्यासक्रम अनुज्ञेय राहील. शिष्यवृत्ती

     द्यावयाच्या एकूण जागेपैकी 30% जागांवर मुलींची गुणवत्तेनुसार निवड करण्यात येईल. जर

     त्याप्रमाणात मुलींचे प्रवेश अर्ज प्राप्त न झाल्यास त्या जागेवर मुलांची गुणवत्तेनुसार निवड करण्याचे

    अधिकार निवड समितीला राहतील.

5) एकाच कुटुंबातील जास्तीत जास्त दोन मुलांना परदेश शिष्यवृत्तीचा लाभ देता येईल. त्यापेक्षा जास्त

     मुलांना परदेश शिष्यवृत्ती लागू राहणार नाही. यासाठी पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी तसे प्रतिज्ञापत्र

     करून देणे बंधनकारक असेल.

6) पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी पदवी परीक्षेत व पीएचडी साठी पदव्युत्तर

     परीक्षेत किमान 55% गुण असणे आवश्यक आहे. ही पदवी किंवा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम त्याने

     अर्जाच्या दिनांकाला उत्तीर्ण केलेला असावा.परदेशातील शिक्षण संस्था ही जागतिक क्रमवारीत (QS

     World University Rank) 200 च्या आत असावी.

अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, मुंबई शहर यांचे कार्यालय प्रशासकीय इमारत भाग 1, चौथा मजला, आरसी मार्ग, चेंबूर मुंबई 71 येथे संपर्क साधावा, असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.


विदेशी, किरकोळ मद्य विक्रीच्या दुकानांसाठी बंद करावयाच्या वेळेत शिथिलता,24,25, 31 डिसेबर2024

 विदेशी, किरकोळ मद्य विक्रीच्या दुकानांसाठी बंद करावयाच्या वेळेत शिथिलता

 

मुंबई, दि. 24 मुंबई दारुबंदी कायदा, 1949 अंतर्गत मुंबई विदेशी मद्य नियमावली 1953 व महाराष्ट्र देशी मद्य नियमावली 1973 अंतर्गत विविध तरतुदीनुसार मुंबई शहर जिल्ह्यातील किरकोळ, विदेशी मद्य विक्रीच्या दुकानांना बंद करावयाच्या वेळेत शिथिलता देण्यात आली आहे. ही शिथिलता दि 24, 25 व 31 डिसेंबर, 2024 पर्यंत देण्यात आली आहे, मुंबई शहराचा जिल्हाधिकारी संजय यादव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे

एफएल-2 (विदेशी मद्य किरकोळ विक्रीचे दुकान) रात्री 10.30 ते पहाटे 1वाजेपर्यंत, उच्च दर्जाची व अतिउच्च दर्जाची श्रेणीवाढ मिळालेल्या एफएल 2 अनुज्ञप्ती यांना रात्री 11.30 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 1 वाजेपर्यंत, एफएलबीआर -2 आणि एफएलडब्ल्यू -2 यांना रात्री 10.30 वाजेपासून ते दुसऱ्या दिवशी पहाटे 1 वाजेपर्यंत, एफएल-3 (परवाना कक्ष) एफ एल-4 (क्लब अनुज्ञप्ती) यांना पोलीस आयुक्तालय परिक्षेत्रासाठी रात्री दीड ते पहाटे पाच वाजेपर्यंत आणि इतर क्षेत्राकरिता रात्री 11.30 ते पहाटे 5 वाजेपर्यंत शिथिल असणार आहे.

बिअर बार मध्यरात्री 12 वाजेपासून ते दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजेपर्यंत, वाईन बार मध्यरात्री 12 वाजेपासून ते दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजेपर्यंत, ई-2 मध्यरात्री 12 ते पहाटे 5 वाजेपर्यंत शिथीलता असणार आहे.

सीएल -3 अनुज्ञप्ती यांना महानगरपालिका तसेच ‘अ’, व ‘ब’ वर्ग नगरपालिका क्षेत्रातील अनुज्ञप्तींसाठी रात्री 11 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 1 वाजेपर्यंत व इतर ठिकाणी रात्री 10 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 1 वाजेपर्यंत शिथिलता असणार आहे.  ही वेळेची शिथिलता 24,25 व 31 डिसेंबर रोजी असेल, असे आदेशान्वये मुंबई शहरचे जिल्हाधिकारी संजय यादव यांनी कळविले आहे

पाणलोट यात्रेच्या' माध्यमातून पाणलोट विकासाची चळवळ उभारणार

 पाणलोट यात्रेच्या' माध्यमातून पाणलोट विकासाची चळवळ उभारणार

- मंत्री संजय राठोड

मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी विभागाच्या कामकाजाचा घेतला आढावा

 

मुंबई, दि. 24: केंद्र शासनाच्या ग्रामीण विकास मंत्रालय अंतर्गत भूसंपादन विभाग व महाराष्ट्र राज्यात मृदा व जलसंधारण विभागामार्फत प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना- पाणलोट विकास घटक 2.0 (PMKSY 2.0) योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी 'पाणलोट यात्रेचे' आयोजन करण्यात आले आहे. 'पाणलोट यात्रेच्या' माध्यमातून राज्यात पाणलोट विकासाची चळवळ उभारण्यात येईल असे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी सांगितले.

मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी मंत्रालयात मृद व जलसंधारण विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी विभागातील विविध प्रकल्प, कामकाज आणि 'पाणलोट यात्रेची' अंमलबजावणी याबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी  मृद व जलसंधारण विभागाचे सचिव गणेश पाटील, उपसचिव मृदुला देशपांडे, प्रादेशिक जलसंधारण अधिकारी श्री. कलशेट्टी, मुख्य अभियंता विजय देवराज, अवर सचिव प्रकाश पाटील व देवेंद्र भामरे, याचबरोबर दूरदृश्य प्रणालीद्वारे पोपटराव पवार आणि विविध संस्थांचे प्रमुख व प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. 

मृद व जलसंधारण मंत्री श्री. राठोड म्हणाले की, राज्याला पाण्याच्या क्षेत्रात समृद्ध व शाश्वत उपाययोजना करण्यासाठी जलसंधारण विभागाच्या माध्यमातून सर्वोतपरी प्रयत्न करण्यात येणार आहेत. यासाठी विशेष कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे. पाणलोट प्रकल्पांविषयी जनजागृती निर्माण करणे, थेट शेतकऱ्यांना या विषयाबद्दल शिक्षित करणे, तसेच लोकांमध्ये पाणलोट प्रकल्पांविषयी आपुलकीची भावना निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला आहे. यासाठी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना- पाणलोट विकास घटक 2.0 अंतर्गत 'पाणलोट रथयात्रे' चे आयोजन करण्यात येणार आहे. ही रथयात्रा जानेवारी 2025 मध्ये आयोजित केली जाणार असून, या प्रकल्पाच्या माध्यमातून या योजनेविषयी व्यापक जनजागृती केली जाईल. या योजनेंतर्गत राज्यातील 30 जिल्ह्यांमध्ये 140 प्रकल्प कार्यरत असून त्याचे क्षेत्र 5.65 लाख हेक्टर एवढे आहे. यासाठी केंद्र व राज्यशासन असे 60:40 यानुसार निधीचे प्रमाण असणार आहे. 'पाणलोट रथयात्रे' च्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना पाणलोट प्रकल्पांचे महत्त्व समजावून सांगण्यात येईल. यामुळे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेती अधिक समृद्ध करण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे. या यात्रेच्या माध्यमातून गावागावात जनचळवळ उभारून जनतेच्या सहकार्याने पाणलोट शाश्वत विकास होण्यासाठी काटेकोरपणे नियोजन करावे, अशा सुचनाही देखील यावेळी मंत्री श्री राठोड यांनी यावेळी दिल्या. 

यावेळी विभागाचे सचिव गणेश पाटील यांनी पाणलोट यात्रेची राज्यात कशा प्रकारे अंमलबजावणी करण्यात येणार आहे याची माहिती दिली. या बैठकीत जलसंधारण क्षेत्रातील शाश्वत विकास, मृदा संरक्षण, जलसंपदा व्यवस्थापन आणि ग्रामविकास यासंबंधी योजनांवर चर्चा करण्यात आली.

 

पशुसंवर्धन विभागातील योजनांना गती देणार

 पशुसंवर्धन विभागातील योजनांना गती देणार

 

       राज्यातील पशुसंवर्धन विभागाचाही यावेळी श्रीमती मुंडे यांनी आढावा घेतला. विभागाची स्थापना आणि वाटचाल,विभागाची ध्येय धोरणे, राज्यातील पशुधन, राज्य व केंद्र पुरस्कृत योजना, एकात्मिक सर्वेक्षण योजना पशुगणना, जिल्हा वार्षिक योजना,विदर्भ मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प, पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ यासह राज्यातील पशुसंवर्धन विभागातील योजनांना गती देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येतील.

            यावेळी बैठकीला महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिध्देश कदम, पशुसंवर्धन विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, पर्यावरण  व वातावरणीय बदल विभागाचे प्रधान सचिव प्रविण दराडे, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव अविनाश ढाकणे यासह इतर अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

            यावेळी उपस्थित अधिकारी यांनी विभागाच्या योजना, सद्यस्थिती व भविष्यातील नियोजन याबाबत सविस्तर माहितीचे सादरीकरण केले.

 

****

 


पर्यावरण व वातावरणीय बदल याबाबतच्या योजनांचा नियोजित आराखडा तयार करा पर्यावरण आणि वातावरणीय बदल

 पर्यावरण व वातावरणीय बदल याबाबतच्या योजनांचा नियोजित आराखडा तयार करा पर्यावरण आणि वातावरणीय बदल

-मंत्री पंकजा मुंडे

 

मुंबई,दि. 24 : पर्यावरण व वातावरणीय बदल याबाबत राबविण्यात येणाऱ्या योजना, भविष्यातील ध्येय धोरणे, घनकचरा व्यवस्थापन, माझी वसुंधरा अभियान, पाणी, हवा प्रदुषण, नदी व तलाव संवर्धन, पर्यावरण जतन व संवर्धन जनजागृती उपक्रमांविषयी सुनियोजित आराखडा तयार करण्याच्या सूचना पर्यावरण आणि वातारवणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी  सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित विभागाच्या आढावा बैठकीत दिल्या.

            मंत्री श्रीमती मुंडे म्हणाल्या की, राज्यातील घनकचरा व्यवस्थापन, पाणी, हवा प्रदूषण नियंत्रण, नदी व तलाव संवर्धन, पर्यावरण जतन व  संवर्धन जनजागृतीपर उपक्रम, राज्यस्तरीय नदी संवर्धन योजना, सागर तटीय विशेष राखीव क्षेत्र नियमन, स्थानिक स्वराज्य संस्थाचे घनकचरा व्यवस्थापन, प्लॅस्टीक निर्मुलन, राज्य नदी संवर्धन योजना, महाराष्ट्र पर्यावरण माहिती प्रणाली केंद्र, सृष्टी मित्र पुरस्कार, माझी वंसुधरा अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करणे, पर्यावरणपूरक वातावरणासाठी मार्गदर्शक तत्वे तयार करणे, जैविक कचरा नियमावली, पर्यावरण  जतन व संवर्धनासाठी राज्य, जिल्हा व ग्रामपातळीवर समित्या कार्यरत करणे, पर्यावरण क्लब स्थापन करणे. पाणथळ जागांचे संवर्धन यासाठी विशेष प्रयत्न करणे याबाबत सविस्तर नियोजन करण्यात यावे. त्यानुसार राज्यातील पर्यावरण विभागातील कामांना गती देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येतील.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात घेतला वित्त-नियोजन व उत्पादनशुल्क विभागाचा आढावा करचोरी, करगळती रोखण्याबारोबर परिणामकेंद्रित काम करा

 उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात घेतला

वित्त-नियोजन व उत्पादनशुल्क विभागाचा आढावा

 

करचोरी, करगळती रोखण्याबारोबर परिणामकेंद्रित काम करा

-उपमुख्यमंत्री अजित पवार

 

मुंबई, दि. 24 :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘वित्त व नियोजन’सह ‘राज्य उत्पादन शुल्क’ यादोन्ही विभागांची आज आढावा बैठक घेतली. श्री पवार यांनी करसंकलन आणि महसुलवाढीच्या प्रक्रियेत सुसुत्रता, सुधारणा आणत परिणामकेंद्रित काम करण्याचे निर्देश यावेळी दिले. अधिकाऱ्यांनी पारदर्शकतेवर भर देऊन करचोरी, करगळती रोखण्याच्या कामात हयगय करु नये, असे यावेळी सांगितले.

यावेळी वित्त व नियोजन विभागाचे राज्यमंत्री ॲड. अशिष जयस्वाल, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओमप्रकाश गुप्ता, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, वस्तू व सेवा कर विभागाचे राज्य आयुक्त आशीष शर्मा, वित्त विभागाच्या (वित्तीय सुधारणा) सचिव शैलजा ए., लेखा व कोषागारे विभागाचे सचिव डॉ. रामास्वामी एन., राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपसचिव रविंद्र औटे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सह आयुक्त विश्वनाथ इंदिसे, सहआयुक्त सुनिल चव्हाण, अपर आयुक्त यतीन सावंत, उपायुक्त सुभाष बोडखे, उपायुक्त शंकर जगताप आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीदरम्यान प्रलंबित योजना, आवश्यक निधी, राज्याच्या उत्पन्नाचा आढावा घेतला. राज्यातील महसुली सुधारणा, शेती विकास, औद्योगिक गुंतवणूक आणि रोजगार निर्मिती यांसारख्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. श्री. पवार यांनी यावेळी शेतकऱ्यांच्या आणि सामान्य नागरिकांच्या कल्याणासाठी वित्तीय योजना आणण्यावर भर देण्याच्या सूचना दिल्या.

 

हरित उर्जेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकरी दुसरी हरित क्रांती घडवतील

 हरित उर्जेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकरी दुसरी हरित क्रांती घडवतील

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्प 2.0 चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

 

मुंबई दि.२४ : राज्यभरात सौर उर्जेचा वापर करणारे सौर ग्राम तयार करण्यात येत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होणार असून भविष्यात या हरित उर्जेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकरी दुसरी हरित क्रांती घडवतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्प 2.0 अंतर्गत वाशिम जिल्ह्यातील उंबरठा आणि धाराशिव जिल्ह्यातील नारंगवाडी येथील प्रकल्पांचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले. यावेळी मुख्य सचिव सुजाता सौनिक, ऊर्जा विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव आभा शुक्ला, जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर, गृहनिर्माण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव वल्सा नायर-सिंह, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, सहकार विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरा, मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेमुळे शेतकऱ्यांना दिवसा शाश्वत आणि मोफत वीज उपलब्ध होईल. राज्यातील शेतकऱ्यांना 16 हजार मेगावॅट इतकी वीज देतो. हे सर्व फीडर सौरऊर्जेवर आणण्याचे काम दोन वर्षापासून सुरू केले आहे. टप्प्याटप्प्याने हे सर्व फिडर सौर उर्जेवर आणण्यात येतील. शेतकऱ्यांना दिवसाही वीज उपलब्ध होऊ शकेल, असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला उंबरठा आणि नारंगवाडी गावातील शेतकरी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते.

0000

Featured post

Lakshvedhi