Friday, 6 September 2024

राज्यातील विविध देवस्थानांच्या २७५ कोटींच्या विकास आराखड्यांना शिखर समितीची मंजूरी ग्रामीण महाराष्ट्राच्या पर्यटन विकासाला मिळेल चालना

 राज्यातील विविध देवस्थानांच्या २७५ कोटींच्या

विकास आराखड्यांना शिखर समितीची मंजूरी

ग्रामीण महाराष्ट्राच्या पर्यटन विकासाला मिळेल चालना

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला विश्वास

मुंबई, दि. ०५:- श्री चक्रधर स्वामी यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून महानुभाव पंथाच्या रिद्धपूर, भिष्णूर, जाळीचा देव, पोहीचा देव, पांचाळेश्वर या देवस्थानांसह राज्याच्या ग्रामीण भागातील ८ देवस्थानांच्या सुमारे २७५ कोटींच्या विकास आराखड्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या विकास आराखड्यांच्या यशस्वी अंमलबजावणीतून महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाच्या पर्यटन विकासाला चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.

राज्यातील ग्रामीण भागातील तीर्थक्षेत्र, देवस्थान विकास शिखर समितीची बैठक आज मंत्रालयात झाली. बैठकीला मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अतिरीक्त मुख्य सचिव विकास खारगे, नियोजन विभागाचे अतिरीक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव जयश्री भोज यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, यंदाचे वर्ष हे श्री चक्रधर स्वामींचे अष्टशताब्दी जन्मोत्सव वर्ष आहे. तसेच आज त्यांची जयंती आहे, यानिमित्ताने महानुभाव पंथाच्या देवस्थानांच्या विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. भक्तीधाम प्रल्हादपूर येथील श्री संत गुलाबराव महाराज तीर्थक्षेत्र विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, यासाठी दोन टप्प्यात प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच  संत सावता माळी यांचे गाव असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील अरण या गावाला अ वर्ग तीर्थक्षेत्र जाहीर करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

या बैठकीत ग्रामविकास विभागाच्या अमरावती जिल्ह्यातील श्री संत गुलाबराव महाराज तीर्थक्षेत्रासाठी पहिल्या टप्प्यासाठी २५ कोटी, रिद्धपूर तीर्थक्षेत्रासाठी १४.९९ कोटी, बीड जिल्ह्यातील श्री पांचाळेश्वर तीर्थक्षेत्रासाठी ७ कोटी ९० लाख, श्री क्षेत्र पोहीचा देव तीर्थक्षेत्रासाठी ४ कोटी ५४ लाख, जालना जिल्ह्यातील जाळीचा देव तीर्थक्षेत्रासाठी २३ कोटी ९९ लाखाच्या वर्धा जिल्ह्यातील श्री गोविंद प्रभू देवस्थानासाठी १८ कोटी ९७ हजाराच्या विकास आराखड्यास मंजूरी देण्यात आली.

तसेच पर्यटन विभागाच्या नागपूर जिल्ह्यातील धापेवाडा येथील श्री विठ्ठल मंदिर देवस्थानाच्या विकासासाठी १६४.६२ कोटींच्या आणि कोल्हापूर जिल्ह्यातील वडणगे येथील शिव पार्वती तलावाच्या सुशोभीकरणासाठी १४ कोटी ९७ लाखाच्या निधीला मंजूरी देण्यात आली.

'उजनी' च्या 283 कोटींच्या एकात्मिक पर्यटन विकास आराखड्याला शिखर समितीची मान्यता;

कृषी, जल, निसर्ग, धार्मिक पर्यटनासह विनयार्ड पर्यटनाला मिळणार चालना

कोयना नदीतील जलपर्यटनाला चालना मिळून स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार

राज्यातील पर्यटन वाढीसह स्थानिकांना रोजगाराच्या संधी मिळणार

 पर्यटन विकासाला चालना देण्याबरोबरच स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या उजनी (जि. सोलापूर) धरण परिसरातील 282.75 कोटी रुपयांच्या एकात्मिक पर्यटन विकास आराखड्याला देखील आज शिखर समितीने मान्यता दिली. या निर्णयामुळे उजनी धरण परिसरातल्या पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे. तसेच सातारा जिल्ह्यातील पश्चिम घाट परिसरातील एकात्मिक पर्यटन विकास आराखड्यांतर्गत कोयना हेळवाक वन झोनच्या वाढीव 67.85 कोटी रुपयांच्या कामासह लोणार सरोवर विकास आराखड्यांतर्गत मंजूर कामांवरील वाढीव 64.83 कोटी रुपयांच्या मागणीला सुध्दा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समितीने आज मान्यता दिली. या निर्णयामुळे राज्यातील पर्यटन विकासाला गती मिळणार आहे.   

शिखर समितीच्या बैठकीत राज्यातील विविध प्रस्तावांसह उजनीच्या एकात्मिक विकास आराखड्यासह सातारा, लोणार विकास आराखड्यातील वाढीव कामांना मंजूरी देण्यात आली. राज्याच्या विकासाचे मोठे आराखडे अंमलबजावणीसाठी नियोजन विभागाकडे सोपविण्यात आले आहेत. मात्र या आराखड्यांच्या कामाची अंमलबजावणी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत करण्यात येते.  

शिखर समितीच्या बैठकीत सोलापूर जिल्ह्यातील उजनीच्या एकात्मिक विकास आराखड्यासाठी 282.75 कोटी रुपयांच्या आराखड्यास मंजूरी देण्यात आली. यामध्ये धार्मिक पर्यटनासाठी 25 कोटी, जल पर्यटनासाठी 190.19 कोटी, कृषी पर्यटनासाठी 19.30 कोटी, विनयार्ड पर्यटनासाठी 48.26 कोटी रुपयांच्या आराखड्यास मंजूरी देण्यात आली.

सातारा जिल्ह्यातील पश्चिम घाट परिसरातील धार्मिक ऐतिहासिक व निसर्ग पर्यटन स्थळे एकात्मिक पर्यटन विकास आराखड्यांतर्गत कोयना हेळवाक वन झोनच्या वाढीव कामासाठी 67.85 कोटी रुपयांना शिखर समितीच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली. तसेच बुलडाणा जिल्ह्यातील लोणार सरोवराचे जतन, संवर्धन आणि विकास आराखडा अंतर्गत वाढीव 64.83 कोटी कामांना मंजूरी देण्यात आली आहे. या कामांमध्ये सांडपाणी प्रक्रीया, भूमीगत गटार योजनेच्या कामासाठी वाढीव 35.19 कोटी, प्रयोगशाळा स्थापन करण्यासाठी वाढीव 4.44 कोटी, लोणार-मंठा रस्ता बायपास बांधकामासाठी वाढीव 25.20 कोटी रुपयांचे काम करण्यात येणार आहे.

राज्यात १ लाख १७ हजार कोटी गुंतवणुकीच्या विशाल प्रकल्पांना मुख्यमंत्र्यांकडून मान्यता सेमीकंडक्टर, इलेक्ट्रीक वाहन निर्मितीत गुंतवणूक; २९ हजार रोजगार निर्मिती, इलेक्ट्रिक वाहन निर्मितीत महाराष्ट्र अग्रेसर राज्य होणार

  

राज्यात १ लाख १७ हजार कोटी गुंतवणुकीच्या विशाल प्रकल्पांना मुख्यमंत्र्यांकडून मान्यता

सेमीकंडक्टर, इलेक्ट्रीक वाहन निर्मितीत गुंतवणूक; २९ हजार रोजगार निर्मिती,

इलेक्ट्रिक वाहन निर्मितीत महाराष्ट्र अग्रेसर राज्य होणार

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. ५ : राज्यातील मराठवाडा, विदर्भ, पुणे, पनवेल येथे १ लाख १७ हजार २२० कोटी रुपये गुंतवणुकीच्या उच्च तंत्रज्ञानावर आधारित ४ विशाल प्रकल्पांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मान्यता दिली. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्योग विभागाची मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली. या प्रकल्पांमुळे सुमारे २९ हजार रोजगार निर्मिती होणार आहे. आज मान्यता दिलेल्या प्रकल्पांमुळे राज्यात सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रीक वाहन निर्मितीमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले. यामुळे महाराष्ट्राची ओळख ही इलेक्ट्रिक वाहन निर्मिती क्षेत्रामध्ये अग्रेसर राज्य अशी होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

दरम्यान, यापूर्वी जुलै महिन्यात झालेल्या उपसमितीच्या बैठकीत ८० हजार कोटींच्या गुंतवणूक प्रकल्पांना मान्यता देण्यात आली होती. त्यामुळे गेल्या दोन महिन्यात झालेल्या बैठकांमध्ये एकूण दोन लाख कोटींच्या गुंतवणूक प्रकल्पांना मान्यता मिळाली आहे. ज्यामुळे ३५ हजार रोजगार निर्मिती होणार आहे.

मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. उद्योग मंत्री उदय सामंत दरदृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते.  यावेळी मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव डॉ. आय. एस चहल, अपर मुख्य सचिव विकास खारगे, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे उपस्थित होते.

या प्रकल्पांमुळे तांत्रिक नवकल्पना, संशोधन आणि विकासाला चालना मिळून एक मजबूत स्थानिक पुरवठा साखळी विकसित होण्यास मदत होणार आहे. सुक्ष्म,लघू व मध्यम उद्योग घटकांना त्याचा मोठया प्रमाणात फायदा होईल. स्थानिक कामगारांसाठी प्रशिक्षण आणि कौशल्य विकासाच्या संधी उपलब्ध होणार असून, त्यांची रोजगारक्षमता आणि उदयोन्मूख तंत्रज्ञानातील कौशल्य वाढण्यास मदत होणार असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

टॉवर सेमीकंडक्टर कंपनी व अदानी समूह यांच्या संयुक्त विद्यमाने उच्च तंत्रज्ञानावर आधारित सेमीकंडक्टर निर्मितीचा अतिविशाल प्रकल्प पनवेल, जि.रायगड येथे करण्यात येणार आहे. या प्रकल्पामध्ये  पहिल्या टप्प्यात ५८ हजार ७६३ कोटी रूपये तर दुसऱ्या टप्यात २५ हजार १८४ कोटी रूपये अशी एकूण ८३ हजार ९४७ कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. याप्रकल्पामुळे १५ हजार रोजगारनिर्मिती होणार आहे.

दरम्यान, ३० जुलै २०२४ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत आरआरपी इलेक्ट्रॉनिक्स यांच्या सेमीकंडक्टर निर्मितीच्या अतिविशाल प्रकल्पास  मान्यता देण्यात आली आहे. हा प्रकल्प सेमीकंडक्टर निर्मितीचा राज्यातील पहिला प्रकल्प आहे. या प्रकल्पामध्ये लवकरच ओसॅट, चिप्स निर्मिती सुरू होणार आहे. आरआरपी इलेक्ट्रॉनिक्स व टॉवर सेमीकंडक्टर कंपनी यांच्या प्रकल्पांमुळे प्रगत सेमीकंडक्टरची निर्मिती होणार आहे. त्यामुळे याक्षेत्रात महाराष्ट्र  देशात अग्रस्थानी राहणार आहे. देशातील वाढती मागणी पूर्ण करणे व सेमीकंडक्टरची इकोसिस्टीम स्थापित करण्यास देखील चालना मिळणार आहे.

स्कोडा ऑटो  फोक्सवॅगन इंडिया कंपनीचा प्रकल्प पुणे येथे एकात्मिक पध्दतीने स्थापना करण्यात येणार आहे. या प्रकल्पामध्ये एकूण १२ हजार कोटी एवढी गुंतवणूक होणार आहे. त्यामुळे एक हजार रोजगार निर्मिती होणार असून प्रकल्पातून अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित इलेक्ट्रीक व्हेईकलचे निर्मिती केली जाणार आहे. 

टोयोटा किर्लोस्कर मोटार कंपनीचा प्रकल्प राज्याचे इलेक्ट्रीक वाहन प्रोत्साहन धोरणांतर्गत  इलेक्ट्रीक वाहन निर्मितीचा अतिविशाल प्रकल्प छत्रपती संभाजीनगर येथे सुरू करण्यात येणार आहे. या प्रकल्पामध्ये एकूण २१ हजार २७३ कोटी एवढी गुंतवणूक होणार असून त्यामाध्यमातून १२ हजार रोजगार निर्मिती होणार आहे. यामुळे महाराष्ट्राची ओळख ही इलेक्ट्रिक वाहन निर्मिती क्षेत्रामध्ये अग्रेसर राज्य अशी होण्यास मदत होणार आहे.

या प्रकल्पामुळे  तांत्रिक नवकल्पना, संशोधन आणि विकासाला चालना  मिळून एक मजबूत स्थानिक पुरवठा साखळी विकसित होईल.

मराठवाडयातील सुक्ष्म,लघू व मध्यम उद्योग घटकांना त्याचा फायदा होणार आहे. इलेक्ट्रीक वाहनाच्या वापरामुळे हरितगृह वायू उत्सर्जन लक्षणीयरीत्या कमी होऊन हवेची गुणवत्ता आणि हवामान बदल कमी होण्यास हातभार मिळणार आहे.

यापूर्वी जेएसडब्ल्यु ग्रीन मोबिलीटी यांच्या छत्रपती संभाजीगनर येथे इलेक्ट्रीक वाहन निर्मितीच्या प्रकल्पास मान्यता देण्यात आली आहे. टोयोटा किर्लोस्कर मोटर यांचा इलेक्ट्रीक वाहन निर्मितीमध्ये  मोठया प्रमाणात गुंतवणूक होणारा छत्रपती संभाजीनगर येथील दुसरा अतिविशाल प्रकल्प असून या क्षेत्राचा सर्वंकष विकास  होण्यास चालना मिळणार आहे.

रेमंड लक्झरी कॉटन्स यांचा वस्त्रोद्योग धोरणांतर्गत स्पिनींग, यार्न डाइंग, विव्हींग ज्यूट, विव्हींग कॉटन, ज्यूट, मेस्टा, कॉटन ह्या उत्पादनांच्या निर्मितीचा विशाल प्रकल्प अतिरिक्त औद्योगिक विकास महामंडळ नांदगाव पेठ, जि.अमरावती येथे होणार आहे. याप्रकल्पात १८८ कोटी एवढी गुंतवणूक आणि ५५० रोजगार निर्मिती होणार आहे.

अतिवृष्टीमुळे शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानाच्या मदतीसाठी ३०७ कोटी २५ लाखांपेक्षा निधी वितरणास मान्यता

 अतिवृष्टीमुळे शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानाच्या मदतीसाठी

३०७ कोटी २५ लाखांपेक्षा निधी वितरणास मान्यता

- मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील

 

मुंबई, दि. ५ :- राज्यात नोव्हेंबर, २०२३ ते जुलै, २०२४ या कालावधीत  राज्यातील विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे, अतिवृष्टीमुळे शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानापोटी बाधित शेतकऱ्यांना  मदत देण्यासाठी  राज्य शासनाने तीनशे सात कोटी पंचवीस लक्ष एकोणतीस हजाराच्या मदतीचा  निधी वितरीत करण्यास  मंजूरी  दिली आहे.

या निर्णयामुळे बाधित शेतकऱ्यांना मदत व दिलासा मिळणार असून याबाबतचा शासन निर्णय आज ५ सप्टेंबर २०२४ रोजी जारी करण्यात आला आहे, अशी माहिती मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी दिली.

मदत, पुनर्वसन मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले,  दि.२२.६.२०२३ च्या शासन निर्णयान्वये सततचा पाऊस ही नैसर्गिक आपत्ती घोषित करण्यात आली आहे. त्यानुसार नोव्हेंबर, २०२३ मधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीसाठी अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेतीपिकांच्या नुकसानीकरिता सुधारित दराने २ ऐवजी ३ हेक्टरपर्यंत मदत अनुज्ञेय करण्यात आली आहे.  यापूर्वी दि.१० जानेवारी २०२४ व दि.३१ जानेवारी २०२४ च्या शासन निर्णयानुसार अनुक्रमे रु.१४४.१० कोटी व रु. २१ हजार ०९.१२ कोटी इतका निधी नोव्हेंबर व डिसेंबर २०२३ या कालावधीत अवेळी पावसामुळे झालेल्या शेतीपीक नुकसानीकरिता मदत मंजूर करण्यात आलेली आहे. तसेच दि.२ ऑगस्ट २०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये जानेवारी, २०२४ ते मे, २०२४ या कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी रु.५९६.२१ कोटी इतकी मदत मंजूर करण्यात आलेली आहे.

गणेशोत्सवादरम्यान कोकणात जाणाऱ्या मार्गावर जड वाहतूक बंद - मुकम

 गणेशोत्सवादरम्यान कोकणात जाणाऱ्या मार्गावर जड वाहतूक बंद

- सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण

मुंबई, दि.५ : गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने भाविक कोकणात जातात, या पार्श्वभूमीवर कोकणात जाणा-या मार्गावर वाहतूक सुरुळीत राहण्यासाठी जड वाहतूक बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) रविंद्र चव्हाण यांनी आज या संदर्भात मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

मंत्री श्री. चव्हाण म्हणाले की, गणपतीसाठी  मोठ्या संख्येने कोकणवासी आपल्या गावाकडे जातात, त्यामुळे या काळात या मार्गांवर वाहतूकीचे प्रमाण अधिक असते, हे लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने या ठिकाणी पर्यायी  मार्गांचे काम करण्यात आले आहे, जेणेकरुन पर्यायी मार्गावरुन ही वाढीव वाहतूक सहजतेने ये जा करु शकेल. तसेच या काळात कोकणात जाणा-या गाड्यांसाठी गणेशोत्सवानिमित्त दि. १९ सप्टेंबर पर्यंत टोलमाफी करण्यात आल्याची माहिती यावेळी दिली.   मुंबई गोवा महामार्गाचे  काम बीओटी तत्वावर असून या महामार्गावरील १४ ठिकाणी  पुलांचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही,  त्यामुळे या ठिकाणी सर्व्हीस रोडचा वापर करण्यात अडचण येत असल्याने या ठिकाणी रहदारीची समस्या निर्माण होते, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून या महामार्गावरिल प्रलंबित कामे सुव्यवस्थितरित्या गतीने पूर्ण  केली जावी,  यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत वेळोवेळी पाहणी करुन त्याबाबत नियंत्रण ठेवल्या जात आहे. या ठिकाणी पुलाचे काम प्रलंबित असल्याने प्रामुख्याने अ़डचण होत असल्याचे सांगून मंत्री श्री. चव्हाण यांनी  सुरळितरित्या  वाहतूक  करणे  शक्य  होण्यासाठी  कंत्राटदारांनी दर्जेदार काम करणे आवश्यक असल्याचे सांगितले.

गणेशोत्सवानिमित्त गणपती आरती  ॲपची निर्मिती

            गणेशोत्सवात सर्वत्र भक्तीमय उल्हासाचे वातावरण असते, या निमित्ताने विविध आरती एकत्रितपणे उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने ॲप सुरु करण्यात येत असून ravindrchavan.com या युआरएलवर  सर्व आरतीचे व्हीडीओ, ऑडीओ  उपलब्ध करुन देण्यात येत असल्याची माहिती ही मंत्री श्री. चव्हाण यांनी यावेळी दिली.

गणेशोत्सवात कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात  सर्वत्र गणपतीचे आगमन मोठ्या जल्लोषात केली जाते. यामध्ये दहा दिवस विविध आरती, भक्तीगीतांच्याद्वारे गणपतीचे पूजन करण्यात येते, यासाठी सहजतेने  या आरती उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने  आरतीचे  व्हीडीओ, ऑडीओंचे  संकलन  करुन  उपलब्ध करुन देण्यात येत आहे.  त्याचसोबत भविष्यात या माध्यमातून कोकणातील गरजू विद्यार्थ्यांना ऑनलाईन पुस्तके उपलब्ध करुन देण्यासारखे  सामाजिक  उपक्रम  राबवण्याचे  नियोजन  असल्याची  माहिती  मंत्री श्री. चव्हाण यांनी यावेळी दिली.

0


 


व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ओबीसी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास सहा महिन्याची मुदत

  

व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ओबीसी जात वैधता प्रमाणपत्र

 सादर करण्यास सहा महिन्याची मुदत

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती

 

मुंबई, दि.५ : सन २०२४-२५ या वर्षामधील विविध शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी (अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांसहित) इतर मागास वर्ग (ओबीसी) प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र प्राप्त झालेल्या उमेदवारांना सद्य:स्थितीत जात वैधता प्रमाणपत्र सादर  करण्यास सहा महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

मंत्री श्री. पाटील म्हणाले, राज्यातील विविध अभ्यासक्रमांच्या  प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करावे लागते. इतर मागास वर्ग (ओबीसी) प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र प्राप्त विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यास अडचणी येत आहेत. याबाबत  विद्यार्थी,पालक, सामाजिक संघटना यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.त्या अनुषंगाने  विद्यार्थ्यांना दिलासा मिळावा यासाठी हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग (एसईबीसी) प्रवर्गाप्रमाणेच इतर मागास वर्ग (ओबीसी) प्रवर्गातील उमेदवारांकरिता ही मुदत देण्यात आली आहे, असेही मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले

            सदर प्रवर्गातील उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याकरिता, प्रवेशासाठी अर्ज करण्याच्या अंतिम दिनांकापासून सहा महिन्यांचा कालावधी देण्यात येत आहे.  सहा महिन्यांच्या कालावधीमध्ये संबंधित उमेदवाराने जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील. अन्यथा अशा उमेदवारांचे प्रवेश रद्द होतील व त्याबाबत संबंधित उमेदवार स्वतः जबाबदार राहतील. याबाबतचा  शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीच्या “मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे” दूरदूरश्य संवाद प्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे

 मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीच्या

मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे

दूरदूरश्य संवाद प्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण

मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

              ठाणे दि.05 (जिमाका ): मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनी करावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीच्या मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्ष लोकार्पण सोहळ्यात  केले. शिक्षक दिनाचे औचित्य साधून भारतरत्न गानसम्राज्ञी मंगेशकर नाटयगृह येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

यावेळी आमदार प्रताप सरनाईक, मिरा-भाईंदर-वसई -विरार शहर पोलीस आयुक्त मधुकर पांडे, अतिरिक्त आयुक्त अनिकेत मानोरकर, शहर अभियंता दीपक खांबित, उपायुक्त कल्पिता पिंपळे, उपायुक्त डॉ. सचिन बांगर, उपायुक्त (मुख्यालय) संजय दोंदे, महापालिका अधिकारी व विद्यार्थी उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, विद्यार्थ्यांना आपण सुरक्षित आहोत असे  वाटणे गरजे आहे. कोणत्याही प्रकारची भिती मनात वाटू नये. सी.सी.टीव्ही लाईव्ह फुटेज पाहता येणार आहे. यामुळे चुकीच्या प्रकाराला आळा बसणार आहे. विद्यार्थ्याची सुरक्षा महत्वाची आहे. शालेय शिक्षण विभागात नियम कडक करण्यात आले आहेत. सर्वांनी सावधगिरीने काम केले पाहिजे. आपले राज्य शिक्षण क्षेत्रात अन्य राज्यांच्या पुढे आहे. शालेय शिक्षणात आपल्या राज्याचे नाव अग्रेसर राहिले पाहिजे. महात्मा ज्योतीबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचा पाया भक्कम केला आहे. महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले आहे. शाळेमध्ये कर्मचारी नियुक्ती करताना त्यांची पार्श्वभूमी नीट तपासून  घ्या. शाळांमध्ये शालेय तक्रार पेटी ठेवा. संस्था चालकांनी आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडा. अत्याचार करणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई केली जाईल. शक्ती कायदा तयार करुन मंजूरीसाठी केंद्राकडे पाठविला आहे. गुन्हेगाराला कायद्याची भीती वाटली पाहिजे. मुलींच्या सुरक्षेसाठी जे उपाय करणे गरजेचे आहेत ते करीत आहोत. आपण निर्भय-निश्चिंत राहा. सरकार तुमच्या पाठीशी आहे. आज शिक्षक दिन आहे. शिक्षक म्हणजे गुरुजन आहेत. शासनाच्यावतीने आपणाला जे लागेल ते आम्ही देवू. आपल्या शहराचे व देशाचे नाव मोठे करा. महिला पोलिसांनी शाळांमधून नियमित गस्त वाढवायला हवी.

यावेळी प्रास्ताविकात आयुक्त संजय काटकर म्हणाले की, 12 लाख लोकसंख्या असणारे मिरा-भाईंदर महानगर आहे. महानगरपालिकांच्या 36 शाळा आहेत. 10 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मिरा-भाईंदर महानगरपालिका  शाळांमध्ये 200 सी.सी टीव्ही  बसविण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना  सर्व सुविधा देण्यात येत आहे. 1 ते 10 वी पर्यंत शिक्षण मोफत आहे. फुटेजची नेहमी तपासणी करणे. चुकीचा प्रकार घडल्यास कठोर कारवाई करण्यात येईल. सी.सी.टीव्ही " बसविण्याची नियम खाजगी शाळांना सुध्दा लागू  आहे. तशा त्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशानुसार व आयुक्त श्री. काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कक्ष सुरू झाला असून या कक्षाद्वारे विद्यार्थांच्या विशेषतः विद्यार्थिनींच्या सुरक्षितेचा प्रश्न अतिशय संवेदनशीलपणे हाताळण्यासाठी उचलले महत्त्वाचे पाऊल आहे.

अत्याधुनिक सर्व्हर आणि विशेष कार्यप्रणालीयुक्त असा यु.पी.एस. जनरेटर बॅकअप असलेल्या नियंत्रण कक्षात एकाच वेळी साधारण एक हजार सी.सी.टी.व्ही. कॅमेऱ्यांवर नजर ठेवणारी अद्यावत यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. या कक्षात संगणक, व्हीडिओ वॉल, सभाकक्ष, एक बॅकअप सर्व्हर, देखरेख ठेवण्यासाठी असलेले अधिकारी व कर्मचारी आणि प्रशस्त वातानुकूलित जागा असलेल्या या कक्षात सद्य:स्थितीत मनपा शाळा यांच्यावर लक्ष केंद्रित केले असून भविष्यात मिरा भाईंदर शहरातील सर्व खाजगी शाळेतील सी.सी.टी.व्ही. कॅमेरे सुद्धा या उपक्रमात समाविष्ट करण्यात येतील. या नियत्रंण कक्षात कार्यरत असलेले पथक मनपा शाळेतील सीसीटीव्ही फुटेज सकाळी सात ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तपासण्याचे व त्याचे जतन करण्याचे काम करतील. मिरा भाईंदर महानगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी उचललेल्या या महत्त्वपूर्ण पावलामुळे भविष्यात घडणाऱ्या अनुचित घटनांवर कायमस्वरूपी आळा बसून हा विषय अतिशय संवेदनशीलपणे हाताळण्यात नक्कीच मदत होणार 

डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेसाठी 15 सप्टेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

  

डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेसाठी 

15 सप्टेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 

मुंबई दि.५ :अल्पसंख्याक विकास विभागामार्फत "डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना" सन २०२४-२५ मध्ये राबविण्यात येत आहे. राज्यातील धर्मादाय आयुक्त अथवा वक्फ बोर्डाकडे नोंदणीकृत व मुंबई शहर जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रातील मदरसांनी विहित अटी व शर्तीची पूर्तता करुन सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाकरिता विहित नमुन्यातील अर्जासह परिपुर्ण प्रस्ताव, जिल्हाधिकारी, मुंबई शहर, जुने जकात घर, शहीद भगतसिंग मार्ग, फोर्ट, मुंबई ४००००१ यांचेकडे १५ सप्टेंबर, २०२४  पर्यंत सादर करावेत.

             याबाबतचा अधिक तपशील महाराष्ट्र शासनाच्या https://mdd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. मदरसांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करण्याचा अंतिम दिनांक १५ सप्टेंबर, २०२४ आहे. यानंतर प्राप्त होणारे प्रस्ताव स्वीकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.

            जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त झालेले प्रस्ताव दि.१५ ऑक्टोबरपर्यंत शासनास सादर करतील, अशी माहिती मुंबई शहरचे जिल्हा नियोजन अधिकारी जी.बी.सुपेकर यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे.

000000

दत्तात्रय कोकरे/विसंअ

Featured post

Lakshvedhi