Thursday, 5 September 2024

विकसित भारत 2047 साठी ई गव्हर्नन्सचे योगदान महत्वाचेमुख

 वृत्त क्र. 1511

विकसित भारत 2047 साठी ई गव्हर्नन्सचे योगदान महत्वाचे

- मुख्य सचिव सुजाता सौनिक

मुंबई, दि. 4 : राष्ट्रासाठी सुरक्षित, शाश्वत आणि सर्वसमावेशक डिजिटल भविष्यासाठी आपण कार्यरत राहू. ई गव्हर्नन्स संदर्भात झालेल्या  राष्ट्रीय परिषदेतील  चर्चा आणि निर्णयांचा प्रशासनाच्या कामकाजावर भविष्यात कायमस्वरूपी प्रभाव पडेल. या परिषदेमुळे  2047 पर्यंत डिजिटली सशक्त आणि विकसित भारताचे ध्येय साध्य करण्यासाठी प्रवृत्त करेल. यासाठी ई  गव्हर्नन्सचे योगदान महत्वाचे असल्याचे मत मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी आज व्यक्त केले.

ई गव्हर्नन्स विषयक 27 व्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन मुंबई येथे करण्यात आले.  "विकसित भारत : सुरक्षित आणि शाश्वत ई सेवा वितरण" अशी संकल्पना असलेल्या या दोन दिवसीय परिषदेच्या समारोप प्रसंगी श्रीमती सौनिक यांनी मत व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय सचिव व्ही.श्रीनिवास, आय.आय.पी

ए.चे महासंचालक एस.एन. त्रिपाठी, केंद्रीय अतिरिक्त सचिव पुनीत यादव, हरियाणाचे मुख्य माहिती आयुक्त टी.सी. गुप्ता आणि माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव पराग जैन नानुरीया उपस्थित होते. ई गव्हर्नन्स विषयक 27 व्या राष्ट्रीय परिषदेचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 3 सप्टेंबर रोजी करण्यात आला होता.

मुख्य सचिव श्रीमती सौनिक म्हणाल्या की, 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' या योजनेमध्ये माहिती तंत्रज्ञान विभागाचे सचिव पराग जैन यांची मोठी भूमिका आहे. या योजनेत आज 1 कोटी 57 लाख लाभार्थी केले असून 2 कोटी लाभार्थी होईल. या लाभार्थी महिलांचा डेटाबेस तयार करण्याचे काम सुरू असून भविष्यात या डेटाबेसवरून कृत्रिम बुद्धीमत्ता (एआय) आणि ब्लॉकचेनद्वारे ओळख पटविण्यासाठी होईल.  लाभार्थ्यांना थेट लाभ हस्तांतरणासाठी मजबूत डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करत असल्याचेही श्रीमती सौनिक यांनी सांगितले.

मुख्य सचिव श्रीमती सौनिक म्हणाल्या की, आज सर्वांनी आपले कार्य अतिशय गांभीर्याने घेणे खूप महत्त्वाचे आहे.  महाराष्ट्राने केंद्र सरकारच्या पाठिंब्याने उद्दिष्टे साध्य करण्याच्या दिशेने लक्षणीय प्रगती केली आहे. यापुढे धोरणात्मक सहभाग आणि सुधारणा घडवून आणण्यासाठी एक साधन म्हणून त्याचा वापर केला जाणार आहे. यासाठी  डेटा एकत्रीकरणाला प्राधान्य देण्यात येईल. केंद्रीय पोर्टल्सपासून राज्य स्तरापर्यंत माहितीचा  प्रवाह  सुनिश्चित करून लाभार्थी ओळख आणि त्यांच्या मॅपिंग करण्यावर भर देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

या समारोप प्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री डॉ.जितेंद्र सिंग यांचा रेकॉर्डेड संदेश दाखविण्यात आला. कार्यक्रमादरम्यान हरियाणा सरकारच्या सेवा हक्क आयोगाच्या 2023-24 च्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन करण्यात आले.

000

मराठी चित्रपट धोरण निर्मितीसाठी समिती गठित करणार

 मराठी चित्रपट धोरण निर्मितीसाठी समिती गठित करणार

-सांस्कृतिक कार्यमंत्री  सुधीर मुनगंटीवार

 

मुंबई, दि.४ : भारतीय चित्रपट सृष्टीचा पाया मराठी माणसाने रचलेला असून आशयसंपन्न चित्रपटांची परंपरा महाराष्ट्राला लाभलेली आहे. ही परंपरा अधिक समृद्ध करण्याच्या दृष्टीने तसेच मराठी चित्रपटांना व्यापक व्यावसायिक संधी मिळण्याच्या दृष्टीने सांस्कृतिक विभागाच्यावतीने मराठी चित्रपट धोरण तयार करण्यात यावे, त्यासाठीची  समिती गठित करुन या कामास गती  द्यावी. तसेच नागपूर येथे १०० एकरात भव्य चित्रानगरी निर्माण करण्याच्या सूचना सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे दिल्या.

मराठी चित्रपट अनुदानासंदर्भात मंत्रालयात आयोजित बैठकीत मंत्री श्री.मुनगंटीवार यांनी संबंधितांना  सूचित केले. यावेळी  विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, चित्रनगरी मुबंईच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील,  यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी, अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता संघटनेचे, पदाधिकारी, इतर संबंधित उपस्थित होते.

मराठी चित्रपटांच्या अधिक दर्जेदार निर्मितीसाठी पूरक वातावरण आणि  संधीची उपलब्धता वाढवण्याचा सांस्कृतिक विभागाचा प्रयत्न असून त्यादृष्टीने मुबंई आणि कोल्हापूर प्रमाणे नागपूर येथे फिल्मसिटी निर्माण करण्यासाठीची आवश्यक कार्यवाही सुरु करण्याचे मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी या बैठकीत सूचित केले.

विविध पायाभूत सुविधा आणि अनेक महत्त्वपूर्ण बाबींसाठी प्रसिद्ध असलेल्या नागपूरच्या वैभवात आता भर पडणार आहे. अनेक प्रतिथयश साहित्यकार, लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते देणाऱ्या विदर्भाच्या भूमीत चित्रनगरी व्हावी , असे  श्री. मुनगंटीवार म्हणाले.

तसेच अनुदानास पात्र ठरलेल्या चित्रपटात महिला दिग्दर्शिका असलेल्या चित्रपटाला अतिरिक्त पाच लाख रुपयांची प्रोत्साहनपर रक्कम देण्याचा निर्णय ही यावेळी घेण्यात आला. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभागी झालेल्या मराठी चित्रपटांना विना परिक्षण  दुप्पट अनुदान देण्यात येईल. तसेच अनुदानासाठी चित्रपटांचे श्रेणीकरण अ, ब, क या तीन गटात करण्यात यावे, त्यासाठी श्रेणीकरण समिती गठित करण्याच्या सूचनाही मंत्री श्री.मुनगंटीवार यांनी यावेळी दिल्या.

  कोवीड काळातील चित्रपटांच्या बाबतीत स्वतंत्रपणे विचार करुन निर्णय घेतला जाईल,असे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी यावेळी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सरदारांची वास्तू, वस्तू, पुराभिलेख, समाधी यांचे जतन संवर्धन होणार

 छत्रपती शिवाजी महाराजांच्या सरदारांची

वास्तू, वस्तू, पुराभिलेख, समाधी यांचे जतन संवर्धन होणार

- सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार

 

मुंबई, दि. ४ : छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत आणि स्वराज्याच्या इतिहासातील  "सोनेरी पान" आहेत . त्यामुळे प्रेरणादायी अशा तत्कालीन ऐतिहासिक वारसा सांगणाऱ्या, शिवकालीन वास्तू, वस्तू, पुराभिलेख, समाधी यांचे जतन संवर्धन केले गेले पाहिजे. या दृष्टीने छत्रपती शिवाजी महाराजांची सोबत करणाऱ्या सरदारांच्या शौर्याची, पराक्रमाची गाथा भविष्यातील पिढ्यांसाठी मार्गदर्शक, प्रेरक असल्याने हा ठेवा जपण्यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देश वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री  सुधीर मुनगंटीवार यांनी आज दिले.

 पुरातन वारसा जतन-संवर्धन समिती सदस्य आणि अधिकाऱ्यांसोबत  मंत्रालयात आयोजित बैठकीत मंत्री श्री.मुनगुंटीवार यांनी समितीच्या कामाचा सविस्तर आढावा घेतला. या बैठकीला सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्यासह पुरातत्व विभागाचे अधिकारी एस. उगले, समितीचे कार्याध्यक्ष इंद्रजित जेधे, सदस्य अनिकेत बांदल, श्रीनिवास इंदलकर, ऋषिकेश नाईक -निंबाळकर, निळकंठ बावडेकर, अभय राज शिरोळे, रवींद्र कंक, सचिन भोसले, गोरख करंजावणे आदी सदस्य, इतर अधिकारी  उपस्थित होते.

मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समवेत लढणारे मावळे आणि सरदार शूर वीर आणि धैर्यवान होते. रयतेच्या रक्षणासाठी लढणाऱ्या या सरदारांशी संबंधित पुराभिलेख, दस्तऐवज, त्यांनी युद्धकाळात वापरलेल्या वस्तू, शस्त्र, त्यांच्या निवासाचे वाडे शूरतेचा, वीरतेचा व समृद्धीचा वारसा सांगणारे आहेत. ज्यांनी आपल्यासाठी प्राण त्यागले त्यांच्यासाठी आपण वेळ खर्च करून येणाऱ्या  पिढीला सक्षम करणे ही आपली जबाबदारी आहे.

या पुरातन  बाबींचे  विभागाच्या माध्यमातून जतन केले जावे व महाराष्ट्राच्या नव्या पिढीसाठी ते मार्गदर्शक ठरावे, या दृष्टीने समिती सदस्यांनी चर्चा केली. समिती सदस्यांच्या सर्व मागण्यांचा व सूचनांची दखल घेऊन त्या दृष्टीने कार्यवाहीचे निर्देश मंत्री श्री.मुनगंटीवार यांनी  दिले.

सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून  ऐतिहासिक वस्तूंच्या प्रदर्शनासाठी राज्यात अद्ययावत संग्रहालय उभारण्याचा विचार  असून ते देशातले सर्वोत्तम संग्रहालय ठरेल, अशा पद्धतीने त्याचे दर्जेदार काम उभारवयाचे आहे. राज्यातील शिवकालीन वस्तू, सरदारांचे वाडे तसेच त्यांनी वापरलेली शस्त्रे आणि वस्तू यांची यादी तयार करण्याचे निर्देश देखील मंत्री मुनगंटीवार यांनी या बैठकीत दिले. या विषयी क्यू आर कोड सह एक माहिती पुस्तिका व बदलत्या काळानुरूप डिजिटल डॉक्युमेंटेशन केले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वाराचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेतले दर्शन

 तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वाराचे

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेतले दर्शन

 

नांदेड, दि. 4  : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नांदेड येथील दौऱ्यात सुप्रसिद्ध तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारा येथे गुरुग्रंथ साहिब यांचे दर्शन घेतले. यावेळी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनीही गुरुग्रंथ साहिब यांचे दर्शन घेतले.

            तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारा बोर्डाच्यावतीने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचा पारंपारिक पद्धतीने शाल, श्रीफळ देवून सन्मान करण्यात आला. याप्रसंगी राष्ट्रपती महोदयांच्या कन्या इतीश्री याही उपस्थित होत्या. त्यांचाही यावेळी गुरुद्वारा बोर्डाच्यावतीने सत्कार करण्यात आला.

            याप्रसंगी राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, सचखंड गुरुद्वाराचे प्रशासक डॉ. विजय सतबिरसिंगजी, सल्लागार जसवंतसिंग बॉबी, अधिक्षक राज देविंदरसिंगजी, पुजारी बाबा ज्योतिदरसिंगजी जत्थेदार, संत बाबा बलविंदरसिंगजी आदी उपस्थित होते.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची लंगरला भेट

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरुद्वारा येथील दर्शनानंतर तेथे असलेल्या लंगरला भेट देवून पाहणी केली व समाधान व्यक्त केले.

                                    पंतप्रधान स्वनिधी योजनेच्या लाभार्थ्यांशी साधला संवाद

यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पंतप्रधान स्वनिधी योजनेचे लाभार्थी कटलरी व किचन्स, खेळणी व्यवसायिक केतन लक्ष्मण कळसकर व फळे आणि ज्यूस व्यावसायिक समशेरसिंग लालसिंग राठोड यांच्या स्टॉलला भेट देवून त्यांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली.

0000


 


जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल माफी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार शासन निर्णय प्रसिद्ध

  जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल माफी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार शासन निर्णय प्रसिद्ध

 

मुंबई, दि. ०४ : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना गुरुवार दि. ५ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर या कालावधीत पथकर (टोल) माफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. त्यासंबधीचा शासन निर्णय मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर प्रसिद्ध करण्यात आला आहे. मुंबई – बंगळुरु राष्ट्रीय महामार्ग, मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग यावरील आणि इतर सार्वजनिक बांधकाम विभागांच्या रस्त्यांवरील पथकर नाक्यांवर ही सवलत लागू असणार आहे.

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलमाफीसह अन्य सोई सुविधा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश  मुख्यमंत्र्यांनी दि.१४ ऑगस्ट रोजी झालेल्या गणेशोत्सव पूर्वतयारी आढावा बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले होते, त्यानुसार आज सार्वजनिक बांधकाम विभागाने पथकर सवलतीचा शासन निर्णय जारी केला आहे.

या टोलमाफी सवलतीसाठी ‘गणेशोत्सव २०२४, कोकण दर्शन’ अशा आशयाचे स्टीकर्स स्वरुपाचे पथकर माफी पास, त्यावर वाहन क्रमांक, चालकाचे नाव असा मजकूर लिहून ते स्टीकर्स आवश्यक त्या संख्येनुसार परिवहन विभाग, वाहतूक पोलीस/पोलीस, संबंधित प्रादेशिक परिवहन विभाग (आर.टी.ओ.) यांनी समन्वय साधून पोलीस ठाणे, वाहतूक पोलीस चौक्या व आर.टी.ओ. कार्यालयांमध्ये उपलब्ध करुन द्यावेत, असे आदेश देण्यात आले आहेत. हाच पास परतीच्या प्रवासाकरीता देखील ग्राह्य धरण्यात येईल.

तसेच गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसना ही टोल माफी लागू असणार आहे. गणेशोत्सवासाठी ज्या जिल्ह्यातून बसेस येथील त्या ठिकाणच्या पोलीस किंवा आरटीओ यांच्याकडून हे पास एसटी महामंडळाला उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पोलीस व परिवहन विभागाने गणेशोत्सवाच्या काळात पास सुविधा आणि त्यांच्या उपलब्धतेबाबतची माहिती नागरिकांना देण्याच्या देखील सूचना आहेत.

0000

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त कलाशिक्षक सागर बगाडे यांची ‘

 राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त कलाशिक्षक सागर बगाडे यांची

‘दिलखुलास’ कार्यक्रमात मुलाखत

 

मुंबई, दि.4 : राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त कलाशिक्षक सागर बगाडे यांची मुलाखत माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मिती ‘दिलखुलास’ कार्यक्रमात प्रसारित होणार आहे.

केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्यावतीने देशभरातील 50 शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. 5 सप्टेंबर या शिक्षकदिनी या पुरस्कारार्थींना नवी दिल्ली येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील विद्यार्थीप्रिय अशी ओळख असलेले कलाशिक्षक सागर बगाडे यांचा समावेश आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमातील या मुलाखतीत श्री बगाडे  यांनी त्यांचा कलाप्रवास, कलाविश्वात राबविलेले अनोखे उपक्रम तसेच विद्यार्थ्यांचा सहभाग याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखत गुरुवार दि.5 व शुक्रवार दि.6, सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरुन व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲप वर प्रसारित होणार आहे. कोल्हापूर जिल्हा माहिती कार्यालयातील माहिती अधिकारी वृषाली पाटील यांनी ही मुलाखत घेतली आहे.

—000—

केशव करंदीकर/व.स.सं



इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड'ने घेतली पंढरपूरच्या महाआरोग्य शिबिराची नोंद आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत वारकऱ्यांसाठी ठरले 'आरोग्य दूत'

 इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड'ने घेतली पंढरपूरच्या महाआरोग्य शिबिराची नोंद

आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत वारकऱ्यांसाठी ठरले 'आरोग्य दूत'

 

मुंबई, दि. ०४:  "आरोग्याची वारी पंढरीच्या दारी - वर्ष २ रे" या उपक्रमात पंढरपूरच्या आषाढी वारीत या वर्षी १५ लाखांपेक्षा अधिक वारकऱ्यांची रुग्णसेवा यशस्वीरित्या पार पाडत, आरोग्य विभागाने आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या पुढाकाराने वारकऱ्यांसाठी केलेल्या सेवेसाठी नवा इतिहास रचला आहे. पंढरपूरच्या महाआरोग्य शिबिराची नोंद ‘इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डस’ने घेतली असून, हा विक्रम महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे. या उपक्रमात १५ लाखांहून अधिक वारकऱ्यांच्या तपासणीची जबाबदारी पार पाडताना आरोग्य विभाग व आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत हे खऱ्या अर्थाने वारकऱ्यांसाठी आरोग्यदूत ठरले आहेत.

 ‘आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी’ या उपक्रमामुळे पंढरपूरच्या वारीला एक नवी ओळख मिळाली आहे. त्यांचे कार्य नक्कीच कौतुकास्पद आहे, ज्यामुळे अनेक वारकऱ्यांचे जीव वाचले आणि लाखो वारकऱ्यांना तत्काळ उपचार मिळाले. वारी दरम्यान आणि पंढरपूर येथे महाआरोग्य शिबिरात वेळेवर आणि सहज, दर्जेदार उपचार मिळाल्यामुळे वारकऱ्यांनी आरोग्य मंत्री प्रा. डॉ. सावंत यांचे आभार व्यक्त केले आहे.

पंढरपुरातील महाआरोग्य शिबिर ठरले जगातील सर्वात मोठे आरोग्य शिबिर

जगातील सर्वात मोठ्या आरोग्य शिबिराचे आयोजन केल्याबद्दलची नोंद ‘इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डस’ने घेतली आहे. या महाआरोग्य शिबिरात १५,१२,७७४ लोकांना आरोग्य सेवा पुरविण्यात आली आणि त्यासाठी ७,५०० डॉक्टर आणि पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

पालखी मार्ग आणि पंढरपुरातील महाआरोग्य शिबिरात १५ लाखांपेक्षा

अधिक वारकऱ्यांना आरोग्य सेवा

आषाढी एकादशीनिमित्त देहू-आळंदी ते पंढरपूर व इतर जिल्ह्यातून या दरम्यान निघालेल्या पालखी मार्गावर तसेच पंढरपूर येथील महाआरोग्य शिबिरांमध्ये सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत 'आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी' या उपक्रमांतर्गत १५ लाखांपेक्षा अधिक वारकऱ्यांना मोफत आरोग्य तपासणी आणि औषधोपचारात्मक आरोग्य सेवा पुरवून राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने विक्रमी कामगिरी बजावली आहे. राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या उपक्रमाचे हे दुसरे वर्ष आहे.

 देहू-आळंदी ते पंढरपूर व इतर जिल्ह्यातील पालखी मार्गावर आणि पंढरपूर येथे वारकऱ्यांच्या आरोग्य तपासणीसाठी दि. १४ ते १८ जुलै २०२४ या कालावधीत पंढरपुरातील वाखरी, गोपाळपुर, तीन रस्ता, ६५ एकर येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन करून आरोग्य विभागामार्फत वारकऱ्यांना आणि भाविकांना विविध आरोग्य विषयक सेवा पुरविण्यात आल्या.

संतश्रेष्ठ श्री. ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरू श्री. संत तुकाराम महाराज यांच्या पालखीसह राज्यातील विविध जिल्ह्यांतून पंढरपूरला निघालेल्या संतांच्या पालख्या आणि दिंड्यांमध्ये सहभागी झालेल्या लाखो वारकऱ्यांना रस्त्यात काही त्रास जाणवला की लगेच उपचार मिळावेत, यासाठी आरोग्य विभागाने सलग दुसऱ्या वर्षी 'आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी' हा उपक्रम राबविला. या उपक्रमांतर्गत प्रत्येक पाच किलोमीटर अंतरावर एक आपला दवाखाना तयार करून वारकऱ्यांना आरोग्य सेवा पुरविण्यात आली. पालखी मार्गावर गर्दी असल्याने मोठी अॅम्बुलन्स फिरू शकत नाही. त्यामुळे फिरती बाईक अॅम्बुलन्स सज्ज ठेवण्यात आली होती. याशिवाय १०२ व १०८ या अॅम्बुलन्सनेही पालखी मार्गावर सेवा दिली. पालखीमध्ये दिंडी प्रमुखांना आरोग्य कीट देण्यात आली होती. याबरोबरच महिलांसाठी प्रत्येक ठिकाणी हिरकणी कक्षाची सोय करण्यात आली होती. डॉक्टर, नर्स, आरोग्य सहाय्यक, आशा, आरोग्य सेवक, शिपाई, सफाईगार अशा सर्व कर्मचाऱ्यांनी वारीमध्ये सेवा दिली.

‘आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी’ माध्यमातून पालखी मार्गावर आरोग्य विभागातर्फे प्रतिबंधात्मक व उपचारात्मक, आरोग्य संदर्भ सेवा देण्यात आली. वारकरी आणि भाविकांमध्ये आरोग्य शिक्षण व जनजागृती करण्यासाठी विभागामार्फत नावीन्यपूर्ण व कल्पक पद्धतीने उपक्रम राबविण्यात आले. यात आरोग्य दिंडी, चित्ररथ, आरोग्य दूत, संदेश टोपी, आरोग्य प्रदर्शनी, बॅनर्स/ स्टिकर्स, आरोग्य संदेश ऑडिओ व्हिडिओ, समाज माध्यमे, आकाशवाणी व दूरदर्शनद्वारे संदेश प्रसारण, वृत्तपत्र जाहिरात, क्यूआर कोडचे वाटप, आरोग्य ज्ञानेश्वरी यांचा समावेश होता.

Featured post

Lakshvedhi