Thursday, 18 January 2024

अत्याधुनिक डिजिटल आरोग्य सेवा मिळणार दावोस येथे हिताची एमजीआरएम नेटशी भागिदारी राज्यातील पायाभूत आरोग्य सुविधांत क्रांती होईल

  अत्याधुनिक डिजिटल आरोग्य सेवा मिळणार

दावोस येथे हिताची एमजीआरएम नेटशी भागिदारी

राज्यातील पायाभूत आरोग्य सुविधांत क्रांती होईल

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

            मुंबई दि. १८ : राज्यातील १२ कोटी जनतेला अत्याधुनिक डिजिटल सेवेद्वारे गुणवत्तापूर्णजलद आणि सुलभ आरोग्य सेवा मिळणार आहे. या संदर्भात स्वित्झर्लंडमधील दावोस येथे हिताची एमजीआरएम नेटशी भागिदारी करण्यात आली असून त्यामुळे आरोग्य क्षेत्रात परिवर्तन होईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

             एमएसटीएआर या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आरोग्य सेवा देण्यासाठी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत मुख्यमंत्र्यांनी विविध मुद्द्यांवर काल चर्चा केली.

            एमएसटीएआर हा एक नाविन्यपूर्ण प्लॅटफॉर्म असून आयुष्मान भारत डिजिटल मिशन अनुरूप डिजिटल आरोग्य सेवा राज्यातील जनतेला देण्याची सुविधा यामध्ये आहे.

            या भागिदारीमुळे राज्यातील आरोग्याच्या पायाभूत सुविधांमध्ये क्रांती होईल. नागरिकांना कोणत्याही अडथळ्याशिवाय दर्जेदार आणि आधुनिक आरोग्य सेवा मिळेल. शिवाय प्रत्येकाचे आरोग्य रेकॉर्ड अद्ययावत ठेवण्यात येईल. रिमोट पद्धतीने वैद्यकीय चाचण्या व तपासणी करण्यात येतील.  

            यासंदर्भात मुख्यमंत्री म्हणाले की, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांना चांगली आरोग्य सेवा देणे हे आमचे उद्दिष्ट्य आहे.यामुळे या सेवा देण्याचा दर्जा उंचावण्यास मदत होईल.

            हिताची एमजीआरएम नेटचा एमएसटीएआर प्लॅटफॉर्म हा नाविन्यपूर्ण उपक्रम आहे.आरोग्य सेवा देण्यातील अडचणी ओळखून सुलभरीत्या या सेवा देण्याची व्यवस्था यात विकसित करण्यात आली आहे. या भागिदारीमुळे राज्यातील आरोग्याच्या पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात तांत्रिक प्रगती होऊन त्या अधिक कार्यक्षम बनतील.

0000

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त शुक्रवारी ‘ग्रंथचर्चा व अभिवाचन’

 मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त

शुक्रवारी ग्रंथचर्चा व अभिवाचन

 

            मुंबईदि. 18 : मराठी भाषा विभागामार्फत दिनांक 14 ते 28 जानेवारी या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्यावतीने मंडळाचे अध्यक्ष डॉ.सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्यावतीने प्रकाशित झालेल्या भारतीय विरागिनी’ या पुस्तकावर ग्रंथचर्चा व अभिवाचन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. शुक्रवार दिनांक 19 जानेवारी 2024 रोजी सकाळी 11 वाजता रवींद्र नाट्यमंदिरप्रभादेवीमुंबई येथे हा कार्यक्रम होईल.

            ग्रंथचर्चा व अभिवाचन कार्यक्रमात डॉ.अरुणा ढेरे व डॉ.सिसिलिया कार्व्हालो हे चर्चक म्हणून तसेच श्रीमती योजना शिवानंद यांचा अभिवाचक म्हणून सहभाग असणार आहे. भारतीय पातळीवरील काव्यविश्वात स्त्रियांच्या कवितेचे स्थान स्वतंत्र आणि महत्त्वाचे असून काश्मीरच्या लल्लेश्वरीपासून तामिळनाडूच्या अवैयारपर्यंत आणि गुजरात-राजस्थानच्या मीरेपासून ओरिसाच्या माधवी दासीपर्यंत मध्ययुगीन स्त्रीसंतांची काव्यरचना ही भारतीय काव्यधारांतली अतिशय सशक्त अशी धारा आहे. एकूणच गौतम बुद्धाच्या काळापासून सतराव्या-अठराव्या शतकातल्याम्हणजे सुमारे दोन हजार वर्षाच्या कालखंडातल्या भारतीय विरागिनींचा विचार केवळ पारमार्थिक नव्हेतर भारताच्या सांस्कृतिक क्षेत्रातही महत्त्वाचा आहे.

            या कवयित्रींची - संत आणि भक्त अशा स्त्रियांची कालसंबद्ध पार्श्वभूमीत्यांनी निवडलेले भक्तिमार्गत्यांचा परमार्थविचारलौकिकाविषयीची त्यांची दृष्टीत्यांनी केलेले कौटुंबिक आणि सामाजिक संघर्षत्यांची जीवनसाधना आणि त्यांनी व्यक्त केलेले स्त्रीत्वाचे संवेदन यांचे दर्शन मराठी साहित्यविश्वात एकत्रितपणे व्हावे आणि मराठी विरागिनींचे भारतीय भक्तिक्षेत्राशी असलेले नाते स्पष्ट व्हावेअशा भूमिकेने प्रस्तुत ग्रंथ हा मौलिक व संदर्भमूल्य असलेला ग्रंथ आहे.

            हा कार्यक्रम सर्वांकरिता खुला असून सर्व नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावाअसे आवाहन महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सचिव डॉ.मीनाक्षी पाटील यांनी केले आहे.

0000

दिलखुलास’मध्ये खादी ग्रामोद्योग मंडळाचे बिपिन जगताप यांची मुलाखत

 ‘दिलखुलास’मध्ये खादी ग्रामोद्योग मंडळाचे

बिपिन जगताप यांची मुलाखत

 

            मुंबईदि. 18 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘मध महोत्सव 2024’ या विषयावर महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन जगताप यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.

            खादी ग्रामोद्योग मंडळामार्फत 18 व 19 जानेवारी 2024 रोजी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटरसभागृह येथे देशातील पहिला मध महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. मंडळामार्फत आयोजित करण्यात आलेल्या या मध महोत्सवाचा मुख्य उद्देशत्याचे नियोजन व अंमलबजावणी कशा प्रकारे करण्यात येत आहे याविषयीची माहिती मंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जगताप यांनी 'दिलखुलासकार्यक्रमातून दिली आहे.

            'दिलखुलासकार्यक्रमात उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जगताप यांची मुलाखत शुक्रवार दि. 19 जानेवारी 2024 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या राज्यातील सर्व केंद्रांवरून व 'न्यूज ऑन एआयआरया मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. निवेदक प्रफुल्ल साळुंखे यांनी ही मुलाखत घेतली आहे.


पर्यटन सदिच्छा दूत म्हणून नवेली देशमुख पर्यटन उपक्रमात सहभागी होणार

 पर्यटन सदिच्छा दूत म्हणून नवेली देशमुख

पर्यटन उपक्रमात सहभागी होणार

- पर्यटनमंत्री गिरीश महाजन

 

             मुंबई, दि. १८ : राज्यातील पर्यटन स्थळांची अधिकाधिक प्रचार व प्रसिध्दी व्हावी याकरिता,माजी मिस इंडिया युनिव्हर्स नवेली देशमुख यांची सन २०२४-२५ या वर्षाकरिता राज्याची पर्यटन सदिच्छा दूत म्हणून राज्य शासनाने नियुक्ती केली आहे. नवेली देशमुख या राज्यभरात ‘पर्यटन सदिच्छा दूत’ म्हणून राज्यातील पर्यटन स्थळांची अधिकाधिक प्रचार व प्रसिध्दी करण्यासाठी सहभागी होतीलपर्यटन विभागातर्फे आयोजित केल्या जात असलेल्या मुंबई फेस्ट‍िवल २०२४ मध्येही सहभागी होणार असल्याची माहिती पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

           पर्यटन मंत्री श्री. महाजन म्हणाले की, राज्याला ७२० किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे. उत्कृष्ट प्राचीन मंदिरे, अजिंठा - वेरूळ सारखी इ.स. सन पूर्व दुसऱ्या शतकातील लेणी, वन्यजीव, थंड हवेची ठिकाणे, विविध धार्मिक स्थळे ही पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाची स्थाने आहेत. राज्यात देशांतर्गतच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राकडे पर्यटकांचा ओघ दिवसेंदिवस वाढत आहे. हाच विचार घेऊन महाराष्ट्र शासन राज्यात समृद्ध आणि जबाबदार पर्यटन योजना राबवत आहे.

            देशातील बहुतांश राज्यात पर्यटनाची व्यापक प्रसिद्धी करण्यासाठी शासनातर्फे विविध उपक्रम राबवून पर्यटकांना आकर्षित करण्यात येते. त्याकरीता अनेक क्षेत्रातील नामांकित व्यक्तींना सहभागी करून पर्यटन क्षेत्रातील विविध स्थळांची प्रसिद्धी करण्यात येत असते. याच धर्तीवर महाराष्ट्र राज्याची ‘ॲम्बेसेडर ऑफ यूथ टुरिझम’ म्हणून मिस इंडिया ठरलेली नवेली देशमुख यांची राज्य शासनाने राज्याची पर्यटन सदिच्छा दूत म्हणून नियुक्ती केली आहे.

                  पर्यटन सदिच्छा दूत नवेली देशमुख या  छत्रपती संभाजीनगर येथील आहेत. नवेली या यूथ आयकॉन म्हणून विविध शासकीय विभागात योगदान देतील. राज्यातील पर्यटन स्थळांची जास्तीत जास्त प्रचार व प्रसिध्दी करण्यासाठी त्या पर्यटन विभागामार्फत राबविण्यात येणा-या विविध पर्यटन महोत्सव,रोड शो विविध कार्यक्रमात त्या सहभागी होणार आहेत.पर्यटन विभागातर्फे आयोजित केल्या जात असलेल्या मुंबई फेस्ट‍िवल २०२४ मध्येही प्रचार व प्रसिध्दीसाठी सहकार्य करत आहेत.

                 पर्यटन सदिच्छा दूत नवेली देशमुख आपल्या निवडीबाबत म्हणाल्या की, राज्यातील पर्यटन स्थळांची जास्तीत जास्त प्रचार व प्रसिध्दी करण्यासाठी मी प्रयत्न करेन. नव्या पिढीची आयकॉन म्हणून काम करताना युवा पिढीला साजेसे प्रचाराचे उपक्रम पर्यटन विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येतील. शाश्वत विकासासाठी पर्यावरणपूरक पर्यटनाला महत्व देण्यासाठी तसेच जबाबदार पर्यटनाची प्रसिध्दी करणार आहे. पर्यटन विभागातर्फे आयोजित केल्या जात असलेल्या मुंबई फेस्ट‍िवल २०२४ मध्येही मी सहभागी असून नऊ दिवस चालणाऱ्या या उपक्रमांचा जास्तीत जास्त प्रचार करण्यासाठी प्रयत्न करीत आहे, असेही त्यांनी सांगितले.

असंघटित कामगारांच्या गृहप्रकल्पाचे प्रधानमं‌त्र्यांच्या हस्ते सोलापूर जिल्ह्यात 19 जानेवारी रोजी लोकार्पण

 असंघटित कामगारांच्या गृहप्रकल्पाचे प्रधानमं‌त्र्यांच्या हस्ते

सोलापूर जिल्ह्यात 19 जानेवारी रोजी लोकार्पण

 

            मुंबईदि. १८ : सोलापूर जिल्ह्यातील रे नगरकुंभारी येथील असंघटित क्षेत्रातील लाभार्थ्यांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ३० हजार घरकुलांचा प्रकल्प सुरू आहे. या प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील १५,०२४ घरांचे लोकार्पण शुक्रवार १९ जानेवारी रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

                हा गृह प्रकल्प देशातील सर्वात मोठा गृहप्रकल्प असून असंघटित क्षेत्रातील 30 हजार कामगारांच्या घरकुलाच स्वप्न यामुळे साकार होत आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते 9 जानेवारी 2019 रोजी झाले होते.

गृहप्रकल्पाविषयी थोडक्यात माहिती

             देशातील पहिलाच असंघटित कामगारांसाठीचा गृहप्रकल्प आहे. हा प्रकल्प ३६५ एकर जागेवर असून प्रकल्पामध्ये एकूण ८३३ इमारती आहेत. प्रत्येक इमारतीत ३६ घरे आहेत. कचरा उचलणारेविडी कामगारबांधकाम कामगारवस्त्रोद्योग कामगार इत्यादी असंघटित क्षेत्रातील  लाभार्थ्यांसाठी ही घरकुले आहेत.

            केंद्र व राज्य शासनाच्या अनुदानाव्यतिरिक्त पायाभूत सुविधा व बीज भांडवलाकरिता राज्य शासनाने अर्थसाहाय्य दिले आहे. पाणीपुरवठावीजपुरवठासांडपाणी व्यवस्था यांसारख्या मूलभूत सुविधांबरोबरच सोलार व डिजिटल पत्ता या सुविधाही पुरविण्यात आल्या आहेत. या प्रकल्पामध्ये उजनी जलाशयातून पाणी पुरवठामलशुद्धीकरण केंद्र (STP) स्वतंत्र घनकचरा व्यवस्थापन यंत्रणाशाळाअंगणवाडीखेळाचे मैदानरुग्णालयकौशल्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्र, रुफटॉप सोलर योजनारेन वॉटर हार्वेस्टिंग या सुविधा आहेत.

*****

1201 कोटींच्या पाणीपुरवठा व मलनि:सारण प्रकल्पांचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 19 जानेवारी रोजी भूमिपूजन पीएम स्व-निधी योजनेच्या लाभार्थ्यांना होणार कर्जाचे वितरण

 1201 कोटींच्या पाणीपुरवठा व मलनि:सारण प्रकल्पांचे

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 19 जानेवारी रोजी भूमिपूजन

पीएम स्व-निधी योजनेच्या लाभार्थ्यांना होणार कर्जाचे वितरण

            मुंबईदि. 18 : पाणीपुरवठ्याबाबत जल सुरक्षित करण्याच्या व शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याच्या हेतूने अमृत 2.0 अभियानांतर्गत राज्यातील विविध शहरांमध्ये पाणीपुरवठा आणि प्रक्रिया प्रकल्प राबविण्यात येत आहेत. कल्याण-डोंबिवलीउल्हासनगरभिवंडी-निजामपूरसाताराशेगाव व भद्रावती या शहरात हाती घ्यावयाच्या पाणीपुरवठा, तर सांगली शहरातील मलनिःसारण प्रकल्पांचे भूमिपूजन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. 1,201 कोटी रुपये किंमतीच्या या प्रकल्पांमुळे या शहरांतील नागरिकांना शुद्ध पाण्याचा शाश्वत पुरवठा तसेच मलनि:स्सारण सुविधा उपलब्ध होणार आहे. याचबरोबर प्रधानमंत्री श्री.मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधीचे (पीएमस्वनिधी) प्रातिनिधीक स्वरूपात वितरण करण्यात येईल.

अमृत 2.0 अभियान

            देशातील शहरे पाणीपुरवठ्याबाबत जल सुरक्षित करण्याच्या व शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याच्या हेतूने केंद्र शासनाने सन 2015 मध्ये अमृत अभियान सुरू केले आहे. 2021 पासून अमृत 2.0 अभियान या नावाने हे अभियान अधिक व्यापक स्वरुपात राबविण्यात येत आहे. अमृत 2.0 अभियानातील प्रकल्पांची कामे सन 2026 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत.

            या अभियानात राज्यातील 145 शहरांचे 28315 कोटी रुपये किंमतीचे 312 प्रकल्प केंद्र शासनाने मंजूर केले आहेत. या अभियानातून 41.47 लाख इमारतींना नळ जोडणीद्वारे शुद्ध पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यात येणार असून 38.69 लाख इमारतींना मलनिःसारणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या अभियानातून शहरातील सरोवर पुनरुज्जीवन आणि उद्यान विकासाचे प्रकल्प देखील राबविले जाणार असून त्याचा या शहरातील नागरिकांना फायदा होणार आहे.

            भूमिपूजन करण्यात येणाऱ्या सात शहरांतील प्रकल्पांपैकी भिवंडी-निजामपूर येथील पाणीपुरवठा प्रकल्पाचा प्रस्तावित खर्च 426.04 कोटी रूपये इतका असून या माध्यमातून 84 हजार 500 नवीन नळ जोडणीद्वारे एक लाख 77 हजार 087 घरांना लाभ मिळणार आहे. या प्रकल्पाची प्रक्रिया क्षमता 143 एमएलडी इतकी आहे. शेगाव येथील पाणीपुरवठा प्रकल्पाचा प्रस्तावित खर्च 161.97 कोटी रूपये असून या प्रकल्पाच्या माध्यमातून 2662 हून अधिक नवीन जोडण्यांद्वारे 12 हजार 920 घरांना लाभ मिळू शकणार आहे. या प्रकल्पात पाणी प्रक्रिया क्षमता 11 एमएलडीने वाढून 34.89 एमएलडी पाणी पुरवठा करण्यात येईल.

            उल्हासनगर येथील पाणीपुरवठा प्रकल्पाच्या माध्यमातून 40 हजार 709 नवीन नळ जोडण्यांद्वारे 46 हजार 840 घरांना लाभ दिला जाणार आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च 126.58 कोटी रुपये अपेक्षित आहे. सातारा येथील पाणीपुरवठा प्रकल्पाची प्रक्रिया क्षमता 15 एमएलडीने वाढणार असून 7328 नवीन जोडण्यांद्वारे 50 हजार 454 घरांना लाभ मिळणार आहे. या प्रकल्पासाठी 102.56 कोटी रूपये इतका खर्च येणार आहे. कल्याण-डोंबिवली येथील 77.58 कोटी रूपयांच्या पाणीपुरवठा प्रकल्पाच्या माध्यमातून एक हजार नवीन नळ जोडण्या दिल्या जाणार असून याचा लाभ 12 हजार 100 घरांना मिळणार आहे. तरचंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथील पाणीपुरवठा प्रकल्पात 5980 नवीन पाणी जोडण्यांद्वारे 7314 घरांना लाभ मिळेल. या प्रकल्पाची पाणी प्रक्रिया क्षमता 7.79 एमएलडीने वाढणार असून या प्रकल्पाचा खर्च 52.87 कोटी रूपये इतका अपेक्षित आहे.

            सांगली येथील सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाचा प्रस्तावित खर्च 253.41 कोटी रूपये इतका असून 41 हजार 277 नवीन जोडण्यांद्वारे एक लाख चार हजार 172 घरांना त्याचा लाभ होईल. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची क्षमता 59 एमएलडीने वाढविण्यावर भर देण्यात आला आहे.

पीएम स्व - निधी योजनेच्या लाभार्थ्यांना कर्जाचे वितरण

            कोविड 19 च्या प्रादुर्भावानंतर पथविक्रेत्यांना त्यांचा व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी खेळत्या भांडवलाचा पतपुरवठा तातडीने प्रदान करण्यासाठी पीएम स्व-निधी योजना अंमलात आणली. राज्यात 17 जून 2020 पासून या केंद्र पुरस्कृत योजनेची यशस्वीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. केंद्रीय गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालयाने राज्याला दिलेले सहा लाख 60 हजारांचे उद्दिष्ट नोव्हेंबर अखेर पूर्ण झाल्याने केंद्राने 22 नोव्हेंबर 2023 रोजी सुधारित उद्दिष्ट दिले आहे. त्यानुसार या योजनेच्या सोलापूर शहरातील लाभार्थ्यांना प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात कर्जाचे वाटप करण्यात येणार आहे.

0000

पीएम स्व - निधी योजनेच्या लाभार्थ्यांना कर्जाचे वितरण

 पीएम स्व - निधी योजनेच्या लाभार्थ्यांना कर्जाचे वितरण

            कोविड 19 च्या प्रादुर्भावानंतर पथविक्रेत्यांना त्यांचा व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी खेळत्या भांडवलाचा पतपुरवठा तातडीने प्रदान करण्यासाठी पीएम स्व-निधी योजना अंमलात आणली. राज्यात 17 जून 2020 पासून या केंद्र पुरस्कृत योजनेची यशस्वीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. केंद्रीय गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालयाने राज्याला दिलेले सहा लाख 60 हजारांचे उद्दिष्ट नोव्हेंबर अखेर पूर्ण झाल्याने केंद्राने 22 नोव्हेंबर 2023 रोजी सुधारित उद्दिष्ट दिले आहे. त्यानुसार या योजनेच्या सोलापूर शहरातील लाभार्थ्यांना प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात कर्जाचे वाटप करण्यात येणार आहे.


Featured post

Lakshvedhi