सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Friday, 13 October 2023
लोकसभा 2024 निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने घेतला आढावा
लोकसभा 2024 निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर
निवडणूक आयोगाने घेतला आढावा
मुंबई, दि. 12 : राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातील मतदार याद्यांचे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर करण्याबाबतचा कार्यक्रम सुरु आहे. लोकसभा निवडणुका-2024 मध्ये होणार असून त्या दृष्टीने राज्यातील मतदार याद्या अद्ययावत असण्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम महत्वाचा आहे. तसेच लोकसभा निवडणुकांची पूर्व तयारी सर्व जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडून सुरु आहे. या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाचे उपायुक्त हिर्देशकुमार यांच्या नेतृत्वाखाली आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथकाने राज्याचा दौरा केला. या पथकामध्ये एन. एन. बुटोलिया, वरिष्ठ प्रधान सचिव सौम्यजित घोष, सचिव, सुमनकुमार दास, सचिव, भारत निवडणूक आयोग यांचा समावेश होता.
या पथकाने राज्यातील सर्व जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या समवेत सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे बैठक घेऊन मार्गदर्शन केले. या बैठकीमध्ये सर्व जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी वरील मुद्यांच्या अनुषंगाने आपापल्या जिल्ह्यांचे विस्तृत सादरीकरण आयोगासमोर केले. यावेळी मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, सहमुख्य निवडणूक अधिकारी म. रा. पारकर तसेच मुख्य निवडणूक कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीमध्ये भारत निवडणूक आयोगाने तसेच मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांनी सर्व विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्या अचूक व अद्ययावत करण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन केले. त्यानुसार राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये 18-19 वर्षे वयोगटातील मतदार नोंदणींची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी प्रयत्न करावेत. ज्यामध्ये शाळा, महाविद्यालय, विविध आस्थापनांमध्ये विशेष मोहीम राबविणे, मतदार साक्षरता मंडळ, स्वयंसेवी संस्था तसेच महाविद्यालयातील स्वयंसेवकांच्या मदतीने या वयोगटातील अधिकाधिक तरुणांचे नाव मतदार यादीत समाविष्ट करणे, मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडून महाविद्यालयनिहाय मतदार नोंदणीचा आढावा नियमित घेणे, इ. उपयायोजना सुचविल्या.
राज्यातील महिला तसेच दिव्यांग व्यक्तींची मतदार नोंदणीची टक्केवारी वाढविण्यासाठी विशेष मोहीम राबवीत ग्रामसभांमध्ये मतदार याद्यांचे वाचन करुन टक्केवारी वाढविण्याचे निर्देश दिले. मतदार यादींमधील दुबार तसेच मृत व्यक्तींची नावे वगळण्याबाबत करावयाच्या कार्यवाहीचे मार्गदर्शन आयोगाने केले. मतदान केंद्रांमध्ये सर्व किमान आवश्यक सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, असे निर्देश यावेळी देण्यात आले. त्याचप्रमाणे लोकसभा निवडणुका-2019 मधील मतदानाची राष्ट्रीय सरासरी तसेच राज्य सरासरीपेक्षा कमी सरासरी असलेल्या विधानसभा मतदारसंघाकडे विशेष लक्ष देऊन तेथील मतदानाची आकडेवारी वाढविण्याच्या दृष्टीनेही आयोगाने उपाययोजना सुचविल्या. तसेच, मतदार याद्यांच्या अद्ययावतीकरणामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना राष्ट्रीय मतदानाच्या दिवशी सन्मानित करण्यात येईल, असेही मुख्य निवडणूक अधिकारी यांनी सांगितले.
****
बचतगटाच्या उत्पादनांना जलद, परवडणाऱ्या दरात वाहतूक सेवा उपलब्ध होणार
बचतगटाच्या उत्पादनांना जलद, परवडणाऱ्या
दरात वाहतूक सेवा उपलब्ध होणार
– महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे
टपाल खाते व महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्यात सामंजस्य करार
मुंबई, दि. 12 : महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी माविम आणि टपाल खात्यामार्फत पोस्टल वीक अंतर्गत मेल्स आणि पार्सल दिवसानिमित्त दादर येथील हॉटेल कोहिनूर येथे आयोजित कार्यक्रमाला व्हीडिओ संदेशाद्वारे शुभेच्छा दिल्या. यावेळी महाराष्ट्राचे मुख्य पोस्टमास्टर जनरल के.के. शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत महिला आर्थिक विकास महामंडळाचे प्रशासन व वित्त विभागाचे महाव्यवस्थापक रवींद्र सावंत व महाराष्ट्राचे पोस्ट मास्टर जनरल (मेल्स आणि बीडी) अमिताभ सिंग यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
टपाल खाते व ‘माविम’ यांच्यातील सामंजस्य करारामुळे महिलांची आर्थिक उन्नती होणार असून महिला आर्थिक विकास महामंडळाच्या बचतगटांना देश-विदेशात विना अडथळा व जलदरित्या आपली उत्पादने पाठवणे आता सहज शक्य होणार आहे. या पुढे जाऊन टपाल विभाग महिलांनी उत्पादित केलेल्या मालाची विक्रीसाठी मदत करणार आहे. हा उपक्रम प्रथम प्रायोगिक प्रकल्प म्हणून रायगड आणि ठाणे जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. त्यानंतर राज्यातील इतर जिल्ह्यात विस्तार करण्यात येईल, असे महिला व बाल विकास मंत्री कु. तटकरे म्हणाल्या.
या करारमुळे करारामुळे सीएमआरसी या टपाल खात्याच्या वाहतूक बीएनपीएल (BNPL - Book Now Pay Later) व्यवस्था म्हणून काम पाहतील. या व्यवस्थेमुळे सीएमआरसी त्यांच्या कार्यक्षेत्रातील महिलांच्या उत्पादनांची कॅशलेस आणि कॅश ऑन डिलिव्हरी पद्धतीने विक्री करू शकणार आहेत. यामुळे महिलांची उत्पादने महाराष्ट्र राज्यातच नव्हे, तर देश विदेशात पोहचविणे शक्य होणार आहे.
मंत्री कु. तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘माविम’ नाविण्यपूर्ण उपक्रम राबवत आहे. बचतगटांच्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. टपाल विभागाची देशभरात १ लाख ६० हजार कार्यालये आहेत. ‘माविम’च्या गटांना पिकअप सुविधा देखील टपाल खात्याकडून पुरविण्यात येणार आहे. या गटांना जास्त सेवा वापरल्यास सवलत देखील देण्यात येईल. त्यामुळे जास्तीत जास्त महिला बचतगटांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन ‘माविम’च्या व्यवस्थापकीय संचालक डॉ. इंदू जाखड यांनी केले.
या श्री. सिंग यांनी प्रास्ताविक केले. डॉ. अजिंक्य काळे यांनी आभार मानले.
शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून शेती क्षेत्रात उन्नती साधावी
शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून शेती क्षेत्रात उन्नती साधावी
- राज्यपाल रमेश बैस
नाशिक, दि. 12 (विमाका नाशिक) : शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून शेती केल्यास शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती साधण्यास निश्चितच मदत होईल. असे प्रतिपादन राज्यपाल तथा विद्यापीठांचे कुलपती रमेश बैस यांनी केले.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ येथे आयोजित नाशिक जिल्हा आढावा बैठकीत ते बोलत होते.
यावेळी बैठकीस राज्यपालांच्या सचिव श्वेता सिंघल, उपसचिव रवींद्र धुर्जड, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलीस महानिरिक्षक बी. जी. शेखर पाटील, जिल्हाधिकारी जलज शर्मा, पोलीस अधीक्षक (ग्रामीण) शहाजी उमाप, आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त नयना गुंडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, उपवनसंरक्षक (पूर्व) उमेश वावरे, उपवनसंरक्षक (पश्चिम) पंकज गर्ग, सहाय्यक आयुक्त (समाजकल्याण) देवीदास नांदगावकर महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्राम सडक योजना, महाराष्ट्र वीज वितरण कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.
राज्यपाल श्री. बैस म्हणाले की, शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेल्या शेतमालास शेतकरी उत्पादक कंपन्यांची जोड दिल्यास शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध होऊन शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होण्यास मदत होईल. बेघरांना हक्काचे घर मिळण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना राबविण्यात येते. ग्रामीण भागात या योजनेचा लाभ देताना प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, सौर उर्जा योजनेचा लाभही अंतर्भूत करावा. जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी पिण्याचे पाणी, शौचालय सुविधा असणे अत्यावश्यक आहे. विद्यार्थ्यांची आवड लक्षात घेऊन ऑनलाईन प्रणालीचा वापर करून विद्यार्थ्यांना एक विदेशी भाषेचे शिक्षण घ्यावे, अशा सूचना राज्यपाल श्री. बैस यांनी दिल्या.
यावेळी राज्यपाल श्री. बैस यांनी जिल्हा परिषद, कृषी विभाग, महानगरपालिका, समाजकल्याण, आदिवासी विकास वनविभाग, नगरपालिका प्रशासन, महसूल / पुरवठा, पाटबंधारे विभाग, रोजगार हमी योजना, विद्युत वितरण कंपनी यांचा आढावा घेतला.
विभागीय आयुक्त श्री. गमे म्हणाले की, जिल्ह्यात ५६ हजार १०८ वनहक्क दावे प्राप्त असून त्यापैकी ३२ हजार ५४२ दावे पात्र ठरविण्यात आले आहे. उर्वरित दाव्यांवर कार्यवाही सुरू आहे. झोपडपट्टी भागात एस.आर.ए. योजना राबविण्यासाठी शासनास प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. पैठणी उद्योगसाठी लागणारे रेशीम जिल्ह्यातच उत्पादीत होण्याच्या दृष्टीने रेशीम शेतीला प्रोत्साहन देण्यात येत असल्याचे आयुक्त श्री. गमे यांनी सांगितले.
यावेळी पोलीस महानिरीक्षक डॉ.बी.जी. शेखर पाटील यांनी ‘एक कॅमेरा पोलिसांसाठी’ या उपक्रमासोबत इतर उपक्रमांची माहिती दिली. ग्रामीण तसेच अतिदुर्गभ भागातील माता व बालमृत्यू टाळण्यासाठी गर्भवती मातांचे सर्वेक्षण करून त्यांना प्रसूतीपूर्वीच रुग्णालयांत दाखल करण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी दिली. ‘मनरेगा’अंतर्गत राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमात मिशन भगीरथ प्रयास व मॉडेल स्कूल प्रकल्पांची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मित्तल यांनी दिली. आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त श्रीमती गुंडे यांनी शासकीय, अनुदानित व एकलव्य आश्रमशाळांची माहिती यासोबतच आदिवासी विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनांची माहिती दिली.
बैठकीपूर्वी राज्यपाल श्री. बैस यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, कुलसचिव भटू प्रसाद पाटील, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य अनिल कुलकर्णी, जयदीप निकम आदी उपस्थित होते.
०००००००
कौशल्य विकासाद्वारे युवकांची भविष्याकडे वाटचाल
कौशल्य विकासाद्वारे युवकांची भविष्याकडे वाटचाल
- राज्यपाल रमेश बैस
राज्यपालांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा घेतला आढावा
नाशिक, दि. 12 (विमाका नाशिक) : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून उच्च शिक्षण घेऊन बाहेर पडणारे विद्यार्थी आजच्या स्पर्धेच्या युगात यशाची शिखरे गाठत आहेत. कौशल्य विकासावर आधारित अभ्यासक्रमातून अनेक युवकांना रोजगार मिळतोय. या शिक्षणाद्वारे तरुण पिढी तयार होत असून आजच्या स्पर्धेच्या युगात कौशल्य शिक्षण हे पारंपरिक पदवीधरांपेक्षा अधिक रोजगारक्षमता निर्माण करते, असे प्रतिपादन राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी केले.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या आज झालेल्या आढावा बैठकीत राज्यपाल श्री. बैस बोलत होते. यावेळी आमदार तथा व्यवस्थापन मंडळाच्या सदस्य सरोज अहिरे, राज्यपालांच्या सचिव श्वेता सिंघल, उपसचिव रवींद्र धुर्जड, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे, कुलसचिव भटू प्रसाद पाटील, व्यवस्थापक मंडळ सदस्य डॉ. जयदीप निकम, अनिल कुलकर्णी, विद्यापीठाचे वित्त अधिकारी डॉ. गोविंद कतलाकुटे, अंतर्गत गुणवत्ता आश्वासन केंद्राचे संचालक डॉ. राम ठाकर उपस्थित होते.
मुक्त आणि दूरस्थ शिक्षण वंचितांसाठी आशेचा किरण
राज्यपाल श्री. बैस म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद मोदी यांनी तरुणांना स्वावलंबी करण्यासाठी कौशल्य विकासाचा संदेश दिला आहे. झपाट्याने बदलणाऱ्या जगात मुक्त आणि दूरस्थ शिक्षणाचे महत्त्व कमी लेखता येणार नाही. महाराष्ट्र हे शैक्षणिक क्षेत्रात आघाडीवरील राज्य आहे. विद्यापीठाने राज्यभरातील आणि त्यापलीकडील विद्यार्थ्यांना सर्वोत्तम कार्यक्रम आणि कौशल्ये प्रदान करून उच्च शिक्षणातील वारसा कायम ठेवला पाहिजे. यासाठी आपण सर्व एकत्र येऊन असे भविष्य घडवू जिथे शिक्षण ही अमर्याद शक्यता उघडण्याची गुरुकिल्ली असेल. भाषेच्या अडचणी मुळे शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी सर्व अभ्यासक्रम मराठी भाषेतून आणावा, अशा सूचना सर्व विद्यापीठांना करण्यात आल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.
मुक्त विद्यापीठाने वंचित घटकापर्यंत ज्ञानगंगा पोहोचवावी
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने 48 विविध कौशल्य कार्यक्रम सुरू केले आहेत. ही आनंदाची बाब आहे. विद्यापीठाने गेल्या वर्षी 61 हजार तरुणांना कुशल केले आहे. जे कौतुकास्पद आहे. गृहिणी, दुकानदार, शाळा सोडलेल्या आणि तुरुंगातील लोकांमध्येही उच्च शिक्षण घेण्याची इच्छा आणि क्षमता असते. इतर समुदायांच्या तुलनेत आदिवासींमध्ये उच्च शिक्षणाची नोंदणी खूपच कमी आहे. येथेही विद्यापीठाने उपयुक्त भूमिका बजावावी. त्यासाठी विद्यापीठाने त्यांच्यापर्यंत पोहचण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही श्री.बैस यांनी सांगितले.
उच्च शिक्षणाचा खर्च वाढत असला तरी, विद्यार्थ्यांची संख्या सध्याच्या 5 लाखांवरून 10 लाखांपर्यंत दुप्पट करण्याचा प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2035 पर्यंत उच्च शिक्षण साध्य करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यामुळे शिक्षणातील एकूण नोंदणी प्रमाण 50 टक्क्यांपर्यंत वाढविणे आवश्यक असून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने या चळवळीत आघाडीवर रहावे. याशिवाय, यशस्वी अभियंते, वास्तूविशारद, सरकारी अधिकारी आणि बांधकाम व्यावसायिकांसोबत मजबूत भागीदारी निर्माण केली पाहिजे. तसेच विद्यापीठाने दूरदर्शी विचाराने तयार केलेला 25 वर्षांचा आराखडा कौतुकास्पद असून त्याबद्दल श्री बैस यांनी विद्यापीठाचे अभिनंदन केले.
विद्यापीठ निर्माण करणार प्रत्येक जिल्ह्यात ‘मधमाश्यांचे गाव’
विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू प्रा. राम ताकवले यांच्या नावाने विद्यापीठाने एक संशोधन केंद्र उभारले आहे, ही अतिशय चांगली बाब आहे. विद्यापीठाने प्रत्येक जिल्ह्यात उपकेंद्र सुरू करण्याची योजना आखली आहे. विद्यापीठ महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात मधमाश्यांचे गाव (मधुमाक्षी गाव) निर्माण करणार आहे. विद्यापीठाचा हा निर्णय स्वागतार्ह असून विद्यापीठाला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवल्याबद्दल कुलगुरू डॉ. सोनवणे यांचे अभिनंदन राज्यपाल श्री. बैस यांनी केले.
कुलगुरू प्रा. सोनवणे यांनी सादरीकरणाद्वारे विद्यापीठाच्या कार्याची माहिती दिली.
यावेळी राज्यपाल श्री. बैस यांनी रेड क्रॉस सोसायटी नाशिकच्या कार्याची माहिती सदस्यांकडून जाणून घेत कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी रेड क्रॉस सोसायटी सदस्य डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते.
0000
भारुड: कळणारी भाषा आणि पेलणारे तत्त्वज्ञान..
भारुड: कळणारी भाषा आणि पेलणारे तत्त्वज्ञान..
काट्याच्या अणीवर वसले तीन गाव ।
दोन ओसाड एक वसेचिना ॥
वसेचिना तिथे आले तीन कुंभार ।
दोन थोटे एका घडेचिना ॥
घडेचिना त्याने घडली तीन मडकी ।
दोन कच्ची एक भाजेचिना ॥
भाजेचिना त्यांत रांधले तीन मूग ।
दोन हिरवे एक शिजेचिना ||
शिजेचिना तेथे आले तीन पाहुणे ।
दोन रुसले एक जेवेचिना ॥
ज्ञानदेव म्हणे याचा तो अनुभव ।
सद्गुरूवाचुनि कळेचिना ||
एक बारीकसा बाभळीसारखा काटा.. त्याचं अणुकुचीदार टोक ते केवढंसं.. त्यावर तीन गावं वसली म्हणे..! त्या गावांची नावं सत्त्व,रज,तम.. किंवा त्रिगुणात्मक प्रकृती. खरं पाहिलं तर एका वेळी, एका ठिकाणी या तिघांपैकी एकच गुण राहू शकतो. तिघांचं असं गुण्यागोविंदाने एकत्र राहणं केवळ अशक्य. त्यामुळे खरं तर ही गावं वसणं केवळ अशक्य!
माउली म्हणतात.. या गावात पुढे तीन कुंभार आले, मडकी घडवायला! त्या कुंभारांची नावं… ब्रह्मा, विष्णू आणि महेश! हे तीन देव म्हणजे सृष्टी घडवणारे कुंभार! पण उत्पत्ती करणाऱ्याकडे पालनाचा विषय नाही आणि पालन, संहार करणाऱ्याला उत्पत्तीचं ज्ञान नाही. दोन थोटे आहेत आणि एक काही घडवत नाही म्हणून मातीला घटाचा आकार मिळण्याची शक्यताच नाही.
या न वसलेल्या गावात, न आलेल्या कुंभारांकडून न घडलेल्या मडक्यात तीन मूग रांधले....दोन कच्चे, एक शिजेचिना…स्थूल, सूक्ष्म आणि कारण देह रूपी तीन मूग रांधले. त्यापैकी विषयसुख आणि काम क्रोधाने लिंपलेले रज-तम हे कायमच हिरवे, अपरिपक्व राहणार आणि सत्व मूळचा परिपक्व असल्याने शिजण्याचा प्रश्नच येत नाही.
काहीच शिजत नाही अशा गावात तीन पाहुणे आले… म्हणजे भूत, वर्तमान, भविष्य असे तीन काळ आले.
भूतकाळ हा नेहमीच असमाधानी, वर्तमान हव्यासात मग्न आणि भविष्य नेहमीच अनिश्चित.. म्हणून हे पाहुणे जेवलेच नाहीत.. त्यांचं समाधान कधी झालंच नाही.
थोडक्यात, न वसलेली गावं, थोटे कुंभार, न घडलेली मडकी, त्यात न शिजलेले मूग, आणि न जेवलेले पाहुणे या सगळ्या अशक्य वाटणाऱ्या अशा गोष्टी रंगवत रंगवत ही कथा पुढे जाते.
सुजनहो!
मग, प्रश्न असा येतो, की कशा कळाव्यात या गोष्टी? सर्वसामान्य बुद्धीला न पेलणाऱ्या, न झेपणाऱ्या गोष्टी अशक्य म्हणून सोडून देता येतीलही.
पण आत्मज्ञान ही अशीच अशक्य वाटणारी गोष्ट मात्र सद्गुरुकृपा असेल तर शक्य होऊ शकते असं माउलींना अखेरीस सांगायचंय.
ज्ञानदेव म्हणे याचा तो अनुभव ।
सद्गुरूवाचुनि कळेचिना ||
‘आत्मज्ञान ही सहजसाध्य गोष्ट नव्हे; आणि म्हणून हे आत्मज्ञान गुरुकृपेशिवाय मिळणं केवळ अशक्य..’ अध्यात्मशास्त्रातील हा महत्वाचा सिद्धांत मांडण्यासाठी माउली हे भारुड रचतात; सर्वसामान्यांना ‘पेलणारे’ तत्त्वज्ञान ‘कळणाऱ्या’ भाषेत सांगतात...
भारुड शब्दाची व्युत्पत्ती:
भारूड या शब्दाच्या दोन व्युत्पत्ती सांगतात. भारुंड नावाचा दोन तोंडांचा पक्षी आहे. भारुड देखील असे ‘द्विमुखी’ असते. सध्या सोप्या लोकवाणीतून बोलणारे, पण वस्तुतः काही शाश्वत सत्य सांगणारे! त्याच्या या द्व्यर्थी स्वभावामुळे, त्याला या दुतोंडी भारुंड पक्षावरून ‘भारुड’ हे नाव मिळालं असावं असं म्हटलं जातं.
भारुड हा शब्द ‘बहु-रूढ’ या शब्दाचा अपभ्रंश असावा असंही म्हणतात. ’बहुजनांमध्ये रूढ’ असणाऱ्या विषयांवर आधारित रचना किंवा ‘जनसमुदायावर आरूढ असणारे लोकगीत’ म्हणजे भारुड अशीही या शब्दाची व्युत्पत्ती सांगितली जाते.
भारूडांचा उगम आणि लोकभूमिका:
गावगाड्यात रुजलेल्या परंपरागत सर्वमान्य व्यक्तिरेखा हे भारुडाचे उगमस्थान आहे. गावात पहाटेच्या प्रहरी ‘वासुदेव’ येतो. हा वासुदेव ‘जागे व्हा’ असे सांगताना नुसतेच डोळे उघडा असे सांगत नाही, तर ज्ञानदृष्टीने जगाकडे पाहण्यास शिकवतो. ‘बये दार उघड’ म्हणणारा ‘पोतराज’ देवीकडे प्रार्थना करतो, हातातल्या पट्ट्याने जणू विकारांवर फटके मारतो. ‘गोंधळी’ हातात संबळ घेऊन जगदंबेचा भक्तिमार्ग रुजवतो. ‘जागल्या’ रात्री गस्त घालतो तेंव्हा नेहमी जागृत राहा, सतर्क रहा याचीच आठवण करून देत असतो. ज्ञानाची दिवटी पेटवणारा आणि अज्ञानाचा अंध:कार नाहीसा करणारा ‘भुत्या’ लोकभाषेत काही सांगत असतो....
मध्ययुगीन काळात, यासारख्या असंख्य लोकभूमिका महाराष्ट्रात वावरत होत्या. जोशी, वाघ्या मुरळी, कोल्हाटी, पांगुळ, सरवदा, दरवेशी, मलंग, भालदार, चोपदार....अशा असंख्य...! महाराष्ट्रीय संतानी या लोकभूमिकांचा समाज प्रबोधनासाठी पुरेपूर उपयोग करून घेतला. या प्रतीकात्मक भूमिकातून रूपकात्मक काव्याची पेरणी केली...यातूनच ‘भारुड’ ही फार मोठी लोकपरंपरा उभी राहिली.
भारूड म्हटल्यावर सर्वात प्रथम आठवतात नाथमहाराज आणि त्यांचं हे भारूड...
‘अग ग ग ग ग विंचू चावला...
विंचू चावला हो…
काम क्रोध विंचू चावला..
तेणे माझा प्राण चालला..’
माणसाला विंचू चावला, तर अत्यंतिक वेदना होतात, हा झाला या ओळीचा सरळ आणि समाजमान्य अर्थ.
पण, काम क्रोध आदी षड्रिपूंनी विंचवाप्रमाणे दंश केला, तर त्या वेळेपुरती वेदना तर होईलच, पण आयुष्यभर या विंचवाची नांगी यातना देत राहिल… असा मूळ अर्थाला बाधा न आणता अधिक अर्थ पुढे उलगडत जातो.
एकनाथ महाराज पुढे म्हणतात,
‘...या विंचवाला उतारा.. सत्वगुण लावा अंगारा…’
विंचू म्हणजे भौतिक लालसा! यात गुंतलेल्या जीवाला सत्त्वगुणाचा अंगारा लावा, म्हणजेच त्याला परमार्थाकडे न्या.. असे सूचित करणारी, मूळ शब्दाचा केवळ वाच्यार्थ नाही, तर त्यापलीकडील गूढार्थ सांगणारी.. अशी ही बहुअर्थ प्रसवणारी भारुडं!
भारुडात संतकवींची काव्यप्रतिभा खरोखरच बहरला येते. मुळातच, संतकाव्याला मराठी सारस्वतात अभिजात काव्याचा मान आहे. त्यात, संतांनी रचलेली भारुडे म्हणजे, या अभिजात काव्याला नृत्य, नाट्य, संवाद, विनोद, संगीत, निरुपण या सर्वांची कलात्मक आणि रसात्मक जोड! या सर्वामुळे भारुड हा काव्यप्रकार संतकाव्यात एखाद्या मानबिंदूप्रमाणे शोभून दिसला.
‘आम्ही वारीक वारीक करू हजामत बारीक..’
सेना महाराजांच्या भारूडातील न्हावी म्हणतोय...अशी हजामत करू, की अविवेकाची शेंडी खुडून टाकलीच समजा…!
‘त्रिगुणाची मूस केली, ज्ञानाग्नीने चेतविली..’
समर्थांच्या भारूडातील जातिवंत सोनाराने, चार पुरुषार्थांच्या विटा लावल्यात, त्रिगुणांची मूस केलीय. सोनार ज्याप्रमाणे अशुद्ध सोने मुशीत घालून तापवतो, त्याप्रमाणे, समर्थांच्या या सोनाराने सर्व कर्मे ब्रह्मार्पण करून मुशीत घातली… ती ज्ञानाग्नीने चेतविली.. लौकिक रुपकाला अलौकिकाचा स्पर्श झाला....
‘सासरा माझा गावी गेला, तिकडंच खपवी त्याला
भवानीआई रोडगा वाहीन तुला….’
एकनाथ महाराजांच्या भारुडात जीवरूप नारी साकडं घालते भवानीआईला.. तो अहंकाररूपी सासरा खपूदे तिकडेच.. त्या कल्पनारूपी सासूलाही मूठमाती दे. ममतारुपी नणंदेचं द्वेष नावाचं कार्टं किरकिर करतंय...खरुज होऊदे त्याला.. भवानीआई सोडव मला.. रोडगा वाहीन…
हे वाचतांना सहज मनात आलं, श्रीखंड पुरीचा श्रीमंती नैवेद्य नाही अर्पण केला आपल्या लोककवींनी… सर्वसामान्य जनांची जाडी भाकरी, रोडगा... तोच दिला आपल्या आईला…. खरंच … भारूड अभिजनांपेक्षा, बहुजनांच्या सोबत अधिक राहिलं...अधिक रमलं...
किती लिहावं भारुडाबद्दल..? एकट्या नाथांचेच भारुडाचे दीडशे विषय आणि भारुडांची संख्या साडेतीनशे! यावरून आपल्याला संतसाहित्यातील या अमोलिक काव्यप्रकाराची व्याप्ती समजून यावी!
पेलणारं तत्वज्ञान कळणाऱ्या भाषेत रुजवणाऱ्या सर्व संतकवींचे, विशेषतः एकनाथ महाराजांचे आणि त्यांच्या भारुडांचे स्मरण.. आजच्या नाथषष्ठीच्या पुण्यदिनी!
डॉ अपर्णा बेडेकर..
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...