Thursday, 28 September 2023

स्वच्छतेसह श्रमदान उपक्रमातनागरिकांनी उस्फूर्त सहभाग घ्यावा

 स्वच्छतेसह श्रमदान उपक्रमातनागरिकांनी उस्फूर्त सहभाग घ्यावा


‘दिलखुलास’, ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात प्रधान सचिव डॉ. के. एच. गोविंदराज यांची मुलाखत


 


            मुंबई, दि. 27 : राज्यात १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत स्वच्छता पंधरवडा राबविण्यात येत असून १ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजेपासून ‘स्वच्छतेसाठी एक तारीख- एक तास’ हा उपक्रम राबिण्यात येत आहे. या उपक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. के. एच. गोविंदराज यांनी ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून केले आहे.


            देशात स्वच्छतेची चळवळ उभी रहावी यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘स्वच्छता हीच सेवा’ हे अभियान देशभरात राबविण्यात येत आहे. स्वच्छता मोहिमेची यशस्वीपणे अंमलबजावणी करण्यात महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर राहिला आहे. स्वच्छता हे अभियान केवळ कागदावर न राहता त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी झाली पाहिजे. या अभियानाला चळवळीचे स्वरूप आले पाहिजे, यासाठी जन सहभाग अत्यंत गरजेचा आहे. त्याअनुषंगानेच राज्यात १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत स्वच्छता पंधरवडा राबविण्यात येत आहे. या पंधरवड्याअंतर्गत १ ऑक्टोबर रोजी ‘एक तारीख- एक तास’ स्वच्छतेसाठी श्रमदान हा उपक्रम राबविण्यात येत आहे. हा उपक्रम काय आहे, याचे नियोजन व अंमलबजावणी कशा प्रकारे करण्यात येणार आहे, याबाबत नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. गोविंदराज यांनी ‘दिलखुलास’ आणि 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमातून माहिती दिली आहे.


            माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत शुक्रवार दि.29 आणि शनिवार दि. 30 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व 'न्यूज ऑन एआयआर' या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून ही मुलाखत शनिवार, दि. 30 सप्टेंबर, 2023 रोजी सायंकाळी 7.30 वा. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ऐकता येणार आहे. निवेदक सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.


महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक


ट्विटर - https://twitter.com/MahaDGIPR


फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR


यू ट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR


००००

आरोग्य विभागातील रिक्त पदांसाठी मेगा भरती;2 लाख 56 हजार 897 अर्ज प्राप्त

 आरोग्य विभागातील रिक्त पदांसाठी मेगा भरती;2 लाख 56 हजार 897 अर्ज प्राप्त


 


            मुंबई, दि. 27 : सार्वजनिक आरोग्य विभागातील रिक्त पदांचा अनुशेष दूर करून भरती करण्यासाठी आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत प्रयत्नरत होते. त्यांच्या पाठपुराव्यामुळे भरतीची प्रक्रिया सुरू झाली. याबाबत त्यांनी विविध बैठकाही घेतल्या. ही भरती प्रक्रिया टीसीएस कंपनीमार्फत राबविण्यात येत आहे. भरती प्रक्रिया गतीने व पारदर्शकपणे पूर्ण करण्यासाठी आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी कंपनीच्या प्रतिनिधींसमवेत घेतलेल्या बैठकीत निर्देशही दिले आहेत. तसेच याबाबत विभागाने कंपनी प्रतिनिधीसोबत नियतकालिक आढावा बैठक घेऊन भरती प्रक्रियेला गती देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. त्यानुसार विभागातील रिक्त पदांच्या मेगा भरतीची प्रक्रिया गतीने पुढे सरकत आहे.


                आरोग्य विभागाच्या गट ‘क’ व ‘ड’ मधील भरतीसाठी 2 लाख 56 हजार 897 अर्ज प्राप्त झाले आहेत. गट ‘क’मधील एकूण 55 संवर्गातील 6 हजार 949 रिक्त पदे असून ‘ड’ गटातील 4 हजार 10 रिक्त पदे आहेत. अशाप्रकारे एकूण 10 हजार 949 पदांसाठी आरोग्य विभगाने जाहिरात प्रसिद्धीस दिली. या जाहिरातीस प्रतिसाद मिळत तब्बल 2 लाख 56 हजार 897 अर्ज प्राप्त झाले. यामध्ये गट ‘क’ मधील रिक्त पदांसाठी 1 लाख 42 हजार 206 आणि ‘ड’ गटातील रिक्त पदांकरीता 11 हजार 649 अर्जांचा समावेश आहे. आरोग्य विभागातील रिक्त पदे 8 परिमंडळ क्षेत्रात विभागलेली आहेत. गट ‘क’चे नियुक्ती प्राधिकारी उपसंचालक, आरोग्य सेवा आहेत.


               आरोग्य विभागातील विविध संवर्गातील रिक्त पदांच्या भरतीसाठी विभागाने 28 ऑगस्ट 2023 रोजी जाहिरात प्रसिद्ध केली. भरतीसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 22 सप्टेंबर 2023 होती. भरती प्रक्रियेत अर्ज स्वीकारण्याचा कालावधी आता संपला असून लवकरच पुढील कार्यवाही होणार आहे. भरतीमुळे आरोग्य विभागातील विविध रुग्णालयांमधील रिक्त पदे भरली जाणार आहेत. यामुळे मनुष्यबळाअभावी आरोग्य व्यवस्थेवर पडत असलेला ताण कमी होणार आहे. नागरिकांना विनाविलंब व सुलभ आरोग्य सुविधा पुरविणे शक्य होणार आहे. ही भरती प्रक्रिया पूर्ण करून रिक्त जागांवर मनुष्यबळ नियुक्त करण्याचे काम लवकरात लवकर केले जाणार आहे. या भरतीमुळे आरोग्य यंत्रणा निश्चितच अधिक बळकट होणार आहे.

दिवेआगारच्या सुपारी संशोधन केंद्राच्या विस्तारीकरणास मान्यता

 दिवेआगारच्या सुपारी संशोधन केंद्राच्या विस्तारीकरणास मान्यता


- कृषी मंत्री धनंजय मुंडे


 


            मुंबई, दि. 27 : दिवेआगार ता.श्रीवर्धन, जि. रायगड येथील सुपारी संशोधन केंद्राच्या विस्तारीकरणास मान्यता देऊन यासाठी 5 कोटी 64 लाख 31 हजार रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.


            मंत्रालयात आज दिवेआगार ता.श्रीवर्धन येथील सुपारी संशोधन केंद्र, गिरणे, ता.तळा येथे खार भूमी संशोधन केंद्र आणि किल्ला, ता.रोहा येथील काढणी पश्चात तंत्रज्ञान व्यवस्थापन महाविद्यालयाचे श्रेणीवर्धन करुन बी.टेक (फूड टेक्नॉलॉजी) महाविद्यालय सुरु करण्याबाबतची आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी मंत्री श्री.मुंडे बोलत होते. यावेळी महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे, कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव अनुप कुमार, कृषी विद्यापीठाचे अधिकारी व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.


            मंत्री श्री.मुंडे म्हणाले की, दिवेआगार येथे 5 एकर जागेत सुपारी संशोधन केंद्राच्या विस्तारीकरणास त्वरीत मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी पाच कोटी 64 लाख 31 हजार रुपयांची निधीची तरतूद करण्यात आली आहे. किल्ला, ता.रोहा येथील काढणीपश्चात तंत्रज्ञान व्यवस्थापन महाविद्यालयाचे श्रेणीवर्धन करुन बी.टेक (फूड टेक्नॉलॉजी) महाविद्यालय सुरु करण्याबाबतचा आराखडा डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांनी सादर करावा. तसेच विद्यापीठाला गिरणे, ता. तळा येथे दिलेल्या जागेत उभारण्याच्या खारभूमी संशोधन केंद्राचा आराखडा तयार करुन मान्यतेसाठी सादर करण्याचे निर्देशही मंत्री श्री.मुंडे यांनी यावेळी दिले.


            हे आराखडे तयार करताना कोकणातील नारळ, सुपारी, आंबा या फळपिकांसोबतच विविध प्रकारच्या मसाला पिकांचाही संशोधनात समावेश करावा, तसेच श्रीवर्धन रोठा सुपारीला जीआय मानांकन मिळविण्यासाठी कार्यवाहीला गती देण्यात यावी, अशा सूचना महिला व बालविकास मंत्री कु. तटकरे यांनी केल्या.

राज्यात १ ऑक्टोबरला ज्येष्ठ नागरिक दिवस साजरा होणार

 राज्यात १ ऑक्टोबरला ज्येष्ठ नागरिक दिवस साजरा होणार


 


             मुंबई, दि. २७ : राज्यात सर्वत्र १ ऑक्टोबर हा दिवस जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. याबाबत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने परिपत्रक निर्गमित केले आहे.


      राज्यात सर्व जिल्हाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय, निमशासकीय कार्यालये, महानगरपालिका व नगरपालिका, नगर परिषदांमार्फत जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस आयोजित करण्यात येणार आहे. या दिनानिमित ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध कार्यक्रम / उपक्रम राबविण्यात यावेत.ज्येष्ठ नागरिक दिवसानिमित्ताने सार्वजनिक पदयात्रा, प्रभात फेऱ्या, सभा, विशेष कार्य केलेल्या ज्येष्ठांचा व ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करणाऱ्या बिगर सरकारी संस्थांचा सत्कार, गौरव, आरोग्य शिबीर, चर्चासत्र / परिसंवाद इ. कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच या कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठी कायदे व योजना विषयक बाबींचा माहिती, वृध्दांचे हक्क, ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधा, ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन इत्यादीबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.


            ज्येष्ठ नागरिकांचे समाजातील स्थान विचारात घेता त्यांना वृध्दापकाळ चांगल्या तऱ्हाने घालविता यावा, त्यांचे जीवन सुसह्य व्हावे, शारिरीक/मानसिक आरोग्य सुस्थितीत रहावे, वृध्दापकाळामध्ये त्यांच्या आर्थिक क्षमता, कामाचा हक्क, शिक्षणाचा हक्क आणि सार्वजनिक मदत मिळविण्यासाठी राज्याचे सर्वसमावेशक धोरण सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने दि. ०९ जुलै २००८ रोजीच्या शासन निर्णयान्वये निर्गमित करण्यात आले आहे. या शासन निर्णयातील तरतूदीनुसार १ ऑक्टोबर हा दिवस राज्यात "जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस" (International Day of Older Person) साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

तळाशी जाताजाता, आधी अंगावर लादलेली कौतुकाची निर्माल्य उतरवून ठेवायची..

 तळाशी जाताजाता,

आधी अंगावर लादलेली कौतुकाची निर्माल्य उतरवून ठेवायची..

मग अपेक्षांचा अबीरबुक्का तरंगू द्यायचा पाण्यावर,

अलंकारांचं ओझं हलकं करायचं,

कालांतराने 

स्वतःला गोंडस बनवणारे रंगाचे थर विरघळू द्यायचे ..

इतरांनी आपल्यावर चढवलेले श्रद्धेच्या पताका,

दैवत्वाची झालर ,

सोडून द्यायची,


आणि त्याच मातीचा भाग व्हायचं 

जिथून आपण आलो होतो.


पुन्हा एकदा तितकंच गोंडस रूप घेऊन येण्या साठी .


बाप्पा जाताजाता सुद्धा बरंच काही शिकवून जातो .


बरंच काही शिकवून जातो.

तुझे येणे, तुझे जाणे ? आणि आमचे उगा मिरवणे....

 तुझे येणे, तुझे जाणे ?

आणि आमचे उगा मिरवणे....


अनादी,अनंत तो एक !

त्याला काय कोण बनवेल 

अन् बुडवेल ?


अनंत पिढ्या आल्या...

अनंत पिढ्या गेल्या....

तो तरीही उरला...



रोजच क्रोध, मोह, मत्सर विसर्जित व्हावा....

हिशोब आजच्या भावनांचा आजचं पूर्ण व्हावा...

असा तो रोजंच का 

न पुजावा ?....


रोज नव्याने मनी तो

असा जागवावा....

अन् उत्सव आयुष्याचा रोज नव्याने साजरा व्हावा..

🙏🙏🙏🙏🙏

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त प्राध्यापककेशव सांगळे यांची ‘दिलखुलास’ मध्ये मुलाखत

 राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त प्राध्यापककेशव सांगळे यांची ‘दिलखुलास’ मध्ये मुलाखत


 


            मुंबई, दि. 27 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास' कार्यक्रमात राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त वीरमाता जिजाबाई टेक्नॉलोजिकल इन्स्टिट्यूट (व्हीजेटीआय), मुंबई येथील उच्च शिक्षण विभागातील प्रा. केशव सांगळे यांची मुलाखत प्रसारित करण्यात येणार आहे.


            शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या शिक्षकांना केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून दरवर्षी ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात येते. यंदाच्या पुरस्काराच्या मानकरी ठरलेल्या देशभरातील शिक्षकांची यादी जाहीर झाली असून यामध्ये व्हीजेटीआय मुंबई येथील उच्च शिक्षण विभागातील प्रा. सांगळे यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. या निमित्ताने प्रा. सांगळे यांनी आपल्या वाटचालीबद्दल, शैक्षणिक क्षेत्रातील संशोधन व योगदानाबद्दल ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून माहिती दिली आहे.


            ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत सोमवार दि. 2, मंगळवार दि. 3, आणि बुधवार दि. 4 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व 'न्यूज ऑन एआयआर' या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. सहायक संचालक सागरकुमार कांबळे यांनी ही मुलाखत घेतली आहे.


०००

Featured post

Lakshvedhi