Sunday, 17 September 2023

ओबीसी आरक्षणाला धक्का नाही, कोणताही अन्याय होणार नाही

 ओबीसी आरक्षणाला धक्का नाही, कोणताही अन्याय होणार नाही


– उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


नागपुरात सुरु असलेल्या साखळी उपोषणस्थळी उपमुख्यमंत्र्यांची भेट


            नागपूर, दि. 16 : ओबीसी समाजाला असलेल्या आरक्षणात कोणतेही नवीन वाटेकरी येणार नाहीत आणि ते कमी देखील होऊ देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात दिली.


            राष्ट्रीय ओबीसी महासंघ आणि सर्वशाखीय ओबीसी कुणबी ओबीसी महासंघाच्या वतीने नागपुरात सुरु असलेल्या साखळी उपोषणस्थळी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट देऊन त्यांच्या मागण्या समजून घेत त्यांना संबोधित केले. आ. प्रवीण दटके, आ. समीर मेघे, बबनराव तायवाडे, सुधाकरराव कोहळे, परिणय फुके, आशीष देशमुख व इतर नेते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.


            यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आज संभाजीनगर येथील उपोषणकर्त्यांची सुद्धा भेट घेतली. ओबीसींच्या आरक्षणात नवीन वाटेकरी येणार नाहीत किंवा ते कमी होऊ देणार नाही. ओबीसींवर अन्याय होणार नाही, ही राज्य सरकाची ठाम भूमिका आहे. मराठा समाजाची जी अपेक्षा आहे, ती मी मुख्यमंत्री असताना जे आरक्षण दिले होते, ते परत मिळावे, ही आहे. यासाठी क्युरेटिव्ह याचिका दाखल करण्यात आली असून, न्या. भोसले समितीने सूचविलेल्या उपाययोजना सुद्धा हाती घेण्यात आल्या आहेत.


            आता न्या. शिंदे समिती गठीत करण्यात आली. ज्यांचे मत आहे की ते आधी कुणबी होते आणि त्यांना नंतर मराठा ठरविण्यात आले, त्याची तपासणी करण्यासाठी ही समिती आहे. एक महिन्यात त्यांचा अहवाल येईल. दोन समाज एकमेकांसमोर उभे ठाकावे, अशी परिस्थिती नाही किंवा तशी सरकारची भावना नाही. प्रत्येक समाजाचे प्रश्न स्वतंत्रपणेच सोडविले पाहिजे, या मताचे आम्ही आहोत, असेही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.


            ओबीसी समाजासाठी 26 विविध जीआर आम्ही काढले होते. त्यातील अनेक निर्णय अंमलात आले आणि काहींवर अंमलबजावणी होते आहे. प्रत्येक जिल्ह्यात वसतीगृहाबाबत परवाच बैठक झाली. काही ठिकाणी जागा किरायाने घेण्याची सुद्धा तयारी केली आहे. शिष्यवृत्तीचे प्रश्न सोडविण्यात आले आहेत. आता तर ओबीसींसाठी 10 लाख घरांची मोदी आवास योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. तुमच्या ज्या अन्य मागण्या आहेत, त्याबाबत येत्या आठवडाभरात मुंबईत राष्ट्रीय ओबीसी महासंघ आणि अन्य संघटनांची एकत्रित बैठक घेतली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे विश्वकर्मा योजनेचा शुभारंभ करणार आहे, ती ओबीसींच्या हिताची योजना आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.


कंत्राटी भरती ही तात्पुरतीच!


            कंत्राटी भरतीसंदर्भात जाणिवपूर्वक अफवा पसरविल्या जात आहेत. एक बाब स्पष्टपणे सांगतो की, नियमित आस्थापनेवरील कोणत्याही जागा कंत्राटी पद्धतीने भरल्या जाणार नाहीत. 75 हजार पदभरतीचा निर्णय आम्ही घेतला आणि कार्यवाही सुरु केली. आता ती भरती दीड लाखांच्या घरात जात आहे. ती कायमस्वरुपी भरती प्रक्रिया पूर्ण होईस्तोवर कंत्राटी पद्धतीने तात्पुरत्या स्वरूपात पदभरती करावी लागते, कारण काम थांबू शकत नाही. कायमस्वरुपी भरतीला वर्ष-दीड वर्ष लागतात. राज्यात ही पद्धत फार पूर्वीपासून आहे. कंत्राटी भरतीचा हा निर्णय सुद्धा गेल्या सरकारनेच घेतलेला आहे, त्यात आम्ही केवळ कामगारांना थेट त्यांच्या खात्यात पैसे मिळतील, अशी सुधारणा केली. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका. ही केवळ तात्पुरती व्यवस्था आहे. युवकांवर कोणताही अन्याय होणार नाही, असेही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले.

ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणासाठी १०७६ कोटींची वाढीव तरतूदमराठवाड्यातील १२ लाखांपेक्षा जास्त महिलांना लाभ

 ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणासाठी १०७६ कोटींची वाढीव तरतूदमराठवाड्यातील १२ लाखांपेक्षा जास्त महिलांना लाभ


            उमेदच्या माध्यमातून ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणासाठी १०७६ कोटींची वाढीव तरतूद करण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. स्वयं सहायता समूहांसाठी फिरत्या निधीत तसेच कम्युनिटी रिसोर्स पर्सन्स (समुदाय संसाधन व्यक्तींच्या) मानधनात वाढ करण्यात आली आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यामध्ये एक लाख २४ हजार गटांना रुपये २४८.१२ कोटी वितरीत करण्यात येणार आहेत. मराठवाड्यातील १२ लक्ष ४५ हजार महिलांना आणि मराठवाड्यातील ८ हजार ८३३ समुदाय संसाधन व्यक्तींना त्याचा प्रत्यक्ष लाभ होणार आहे.


            स्वयं सहाय्यता गटांना देण्यात येणा-या 15 हजार रुपये फिरता निधीमध्ये वाढ करुन ती रक्कम 30 हजार रुपये करण्यात आली आहे. सर्व स्वयंसहाय्यता गटांसाठी रुपये ९१३ कोटी खेळते भांडवल म्हणून राज्य शासनाकडून देण्यात येतील.


            त्याचप्रमाणे समुदाय संसाधन व्यक्तींना दरमहा देण्यात येणारे तीन हजार रुपये मासिक मानधनात वाढ करुन दरमहा सहा हजार रुपये मासिक मानधन करण्यात आलेले आहे. यासाठी राज्य शासनाने वाढीव 163 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.


            राज्यात एकूण सहा लाख आठ हजार स्वयंसहाय्यता गटांची स्थापना करून साधारण ६० लाखापेक्षा जास्त महिलांना या कार्यक्रमात सामावून घेतलेले आहे. यापैकी मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये एक लाख २४ हजार स्वयंसहाय्यता गटांमध्ये साधारणपणे १२ लाख २३ हजार महिलांचा समावेश आहे. अभियानांतर्गत गटांना सुरवातीच्या टप्प्यात दिले जाणारे खेळते भांडवल केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे महाराष्ट्रातील तीन लाख ८८ हजार गटांना रुपये ५८२ कोटी वितरीत केलेले आहेत, त्यापैकी मराठवाड्यामध्ये ८३ हजार ५९३ गटांना रुपये १२५ कोटी रकमेचे वितरण करण्यात आलेले आहे. यामध्ये अधिकचे खेळते भांडवल महिलांना उपलब्ध होऊन जास्तीत जास्त रोजगार व स्वयंरोजगार मिळवून देण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करीत आहे.

Saturday, 16 September 2023

मुंबई, पुणे, पालघर, रत्नागिरी येथेआंतरराष्ट्रीय गणेश महोत्सवाचे आयोजन

 मुंबई, पुणे, पालघर, रत्नागिरी येथेआंतरराष्ट्रीय गणेश महोत्सवाचे आयोजन


- पर्यटन मंत्री गिरीश महाजन

            मुंबई, दि. 16 : पर्यटनाला चालना देण्यासाठी, पारंपारिक कला व संस्कृतीची ओळख देशी-विदेशी पर्यटकांना करुन देण्यासाठी तसेच गणेशोत्सवला आंतरराष्ट्रीयस्तरावर पर्यटनात्मक प्रसिद्धी आंतरराष्ट्रीय गणेश महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. 19 ते 28 सप्टेंबर या कालावधीत मुंबई, पुणे, पालघर व रत्नागिरी येथे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.


          मंत्री श्री. महाजन म्हणाले की, राज्यात पर्यटकांना मोठ्या प्रमाणात आकर्षित करण्यासाठी पर्यटन संचालनालयाद्वारे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. गणेशोत्सव हा कला, सांस्कृतिक वारसा तसेच लोकांचे एकात्मतेचे दर्शन घडविण्याचे माध्यम आहे. पारंपारिक कला व सांस्कृतिक ठेवा जगापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या महोत्सवाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. महोत्सवा दरम्यान विविध राज्यातील पर्यटनाशी निगडीत भागधारक, ट्रॅव्हल एजंट, टूर ऑपरेटर्स, प्रवासी पत्रकार व समाजमाध्यम प्रभावक तसेच विदेशी वाणिज्य दुतावासाचे प्रतिनिधी यांना आमंत्रित करण्यात येणार आहे. त्यांना मुंबई, पुणे, पालघर व रत्नागिरी येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ तसेच रत्नागिरीतील गणेश दर्शन तसेच सांस्कृतिक वैभव दाखविण्याचा अभिनव उपक्रम राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.


            सदर महोत्सवांतर्गत गेटवे ऑफ इंडिया येथे श्री गणेशाच्या विविध स्वरुपांवर केंद्रीत विशेष सांस्कृतिक केंद्रांची उभारणी, वाळूशिल्प, मॉझेक आर्ट, स्क्रॉल आर्टचे प्रदर्शन, गेटवे ऑफ इंडियाच्या भव्य दर्शनी भागावर प्रोजेक्शन मॅपींगच्या माध्यमातून देशभक्तीपर यशोगाथा कथन करणारे कार्यक्रम, महाराष्ट्राचे पारंपारिक आदिवासी वारली संस्कृतीचे दर्शन घडविणारे वारली कलेचे कार्यशाळा, विविध कारागिरांद्वारे निर्मित हस्तकला वस्तुचे कलादालन, पारंपारिक कला व लोककला संस्कृतीचे दर्शन घडविणारे सांस्कृतिक कार्यक्रम 10 दिवसीय गणेशोत्सव महोत्सवांतर्गत विविध ठिकाणी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी आयोजित करण्यात येणार आहेत.


आंतरराष्ट्रीय गणेशोत्सवाच्या माध्यमातून सांस्कृतिक पर्यटनात वाढ : प्रधान सचिव राधिका रस्तोगी


            गणेशोत्सव या सणाला ऐतिहासिक वारसा आहे. राज्यात साजरा होणारा गणेशोत्सव हा अनेक देशी आणि विदेशी पर्यटकांना आकर्षित करत असतो. आपण आपली संस्कृती या महोत्सवाच्या माध्यमातून इतरांना सांगू शकतो. आंतरराष्ट्रीय गणेश महोत्सवाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय पर्यटक आणि सांस्कृतिक जाणकारांची उपस्थिती लाभणार आहे. महाराष्ट्राच्या विशाल आणि दहा दिवस चालणाऱ्या या गणेश महोत्सवामध्ये गणेश भक्त, पर्यटन प्रेमी यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन श्रीमती रस्तोगी यांनी केले केले.


००००

१७ सप्टेंबर ते १६ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत सेवा महिना राबविण्यात येणार

 १७ सप्टेंबर ते १६ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत

सेवा महिना राबविण्यात येणार

            मुंबई, दि. १६ : राज्यात १७ सप्टेंबर ते १६ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत सेवा महिना राबविण्याबाद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी सूचना केल्यानुसार शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.


            राज्य शासनाच्या विविध क्षेत्रीय कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांबाबत नागरिकांना मोठ्या प्रमाणावर माहिती प्राप्त करून देणे, त्यांना विविध योजनांचा योग्य लाभ घेता येण्यासाठी नागरिकांमध्ये जागरूकता वाढावी. यासाठी सेवा महिना अंतर्गत विशेष मोहिम व लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात येणार आहे.


            या सेवा महिना कालावधीत आपले सरकार सेवा पोर्टल, महावितरण पोर्टल, डी. बी. टी. पोर्टल, नागरी सेवा केंद्र,सार्वजनिक तक्रार पोर्टल (पब्लिक ग्रिव्हियन्स पोर्टल), विभागाच्या संकेतस्थळावर प्राप्त झालेल्या व प्रलंबित असलेल्या सर्व अर्जांचा मोहिम स्वरुपात निपटारा करण्यात येणार आहे.


            यामध्ये तांत्रिक अडचणीमुळे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत प्रलंबित पात्र लाभार्थ्यांना लाभ देणे, प्रलंबित फेरफार नोंदीचा निपटारा करणे. पात्र लाभार्थ्यांना शिधापत्रिकांचे वितरण, मालमत्ता हस्तांतरण नोंद घेणे, नव्याने नळ जोडणी देणे, मालमत्ता कराची आकारणी करणे व मागणी पत्र देणे, प्रलंबित घरगुती विद्युत जोडणीस मंजुरी देणे, मालमत्ता हस्तांतरणानंतर विद्युत जोडणीमध्ये नवीन मालमत्ताधारकाचे नाव नोंदविणे, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजने अंतर्गत सिंचन विहिरीकरिता अनूसुचित जमातीच्या लाभार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी, दिव्यांग प्रमाणपत्र देणे, अनूसुचित जमातीच्या लाभार्थ्यांना प्रलंबित वन हक्क पट्टे मंजूर करणे. (अपिल वगळून), नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र देणे, विवाह नोंदणी प्रमाणपत्र देणे, आधार कार्ड सुविधा, पॅन कार्ड सुविधा, नवीन मतदार नोंदणी, जन्म-मृत्यू नोंद घेणे व प्रमाणपत्र देणे, शिकाऊ चालक परवाना, रोजगार मेळावा, सखी किट वाटप, महिला बचत गटास परवानगी देणे, महिला बचत गटास प्राधान्याने रोजगार उपलब्ध करून देणे, लसीकरण, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र, प्रशिक्षित उमेदवारांना रोजगार उपलब्ध करून देणे आदी सेवांचा आता यामध्ये अंतर्भाव करण्यात आला आहे.

            सेवा महिन्यामध्ये सर्व शासकीय विभांगाकडील सेवा हक्क अधिनियमाअंतर्गत अधिसूचित केलेल्या सेवा विषयी प्रलंबित कामांचा विहित कालमर्यादेमध्ये निपटारा करण्याकरिता कार्यपद्धती निश्चित करण्याच्या व अंमलबजावणीकरिता सर्व संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यात येणार आहे.


000


 

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

 मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा


 


            मुंबई, दि. 16 : राज्यपाल रमेश बैस यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त राज्यातील आणि विशेषतः मराठवाड्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.


            ‘मराठवाडा येथील प्रत्येक व्यक्तीकरिता दिनांक १७ सप्टेंबर हा अविस्मरणीय दिवस आहे. यंदा मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. मुक्ती संग्रामात अनेक ज्ञात – अज्ञात देशभक्त नागरिकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले होते. मराठवाड्याच्या सर्वच जिल्ह्यांमधील लोकांचे या लढ्यामध्ये भरीव योगदान होते. मुक्ती संग्राम दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त मी सर्व हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहतो तसेच जनतेला मराठवाडा मुक्ती दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो’, असे राज्यपाल रमेश बैस यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.


००००



Maharashtra Governor greets people on Marathwada Mukti Sangram Din


 


      Mumbai, 16th Sept : The Governor of Maharashtra Ramesh Bais has greeted the people of Maharashtra, particularly those from Marathwada on the occasion of Marathwada Mukti Sangram Din.


      In a message, the Governor has said : The day, 17th September is memorable for every single person from Marathwada. A number of known and unknown patriotic citizens sacrificed their lives in the liberation movement. The contribution of various districts from Marathwada in the liberation movement was significant.


      I offer my humble tributes to all the martyrs who laid down their lives in the Marathwada Mukti Sangram, and convey my greetings to the people on the memo

rable occasion.


0000


सुप्रशासन आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल गौरव

 


सुप्रशासन आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल गौरव


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना


डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी पुरस्कार


 


            मुंबई दि. 16 :- स्वराज्य मॅगझीनच्यावतीने गुड गव्हर्नन्स (सुप्रशासन) आणि महाराष्ट्रात पायाभूत सुविधा क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी पुरस्कार प्रदान करण्यात आला.


            पाँडेचेरीत 'पाँडी लिट फेस्टिव्हल'मध्ये हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला. पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबईत हा पुरस्कार स्वराजचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसन्न विश्वनाथन आणि संपादकीय संचालक आर. जगन्नाथन यांच्या हस्ते स्वीकारला.


            स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरुप असून उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी पुरस्काराची रक्कम दुष्काळ निवारण उपाययोजनांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला दिली आहे.


            पुरस्कार स्वीकारल्यानंतर भावना व्यक्त करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असण्यामध्ये डॉ. शामाप्रसाद मुखर्जी यांचे अमूल्य योगदान आहे. डॉ. मुखर्जी आणि पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रेरणेनुसारच आमची वाटचाल सुरू आहे. सुशासन हा एकप्रकारे प्राणवायूच असतो. तो असेल तर किंमत नसते आणि नसला तर अस्वस्थता वाढते. सुशासन हा प्रशासनाचा पाया आहे. विविध क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या उभारणीमुळे नागरिकांचे जीवनमान उंचावते आहे, अशी भावना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी व्यक्त केली.


            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या कल्पकतेने गेल्या काळात अनेक क्रांतिकारी निर्णय आणि सुधारणांद्वारे प्रशासकीय कामकाजात आमूलाग्र बदल घडले असून उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या दूरदृष्टीमुळे अनेक पायाभूत सुविधा प्रकल्प इतिहासात मैलाचा दगड ठरत आहेत.


            जनतेशी सहजतेने जवळीक साधण्याचे कसब, ध्येयासक्त, प्रामाणिक, आधुनिक तंत्रज्ञानातील जाणकार यांसारख्या गुणांनी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस हे देशात ओळखले जातात, अशा शब्दात उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा गौरव मानपत्रात करण्यात आला आहे.


-----000-------

छत्रपती संभाजीनगर महसुली विभाग, धाराशिव जिल्हा नामकरण फलकाचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण

 छत्रपती संभाजीनगर महसुली विभाग, धाराशिव जिल्हा नामकरण फलकाचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण





            छत्रपती संभाजीनगर, दि. 16 : छत्रपती शिवाजी महाराज की जय... छत्रपती संभाजी महाराज की जय... या जयघोषाच्या निनादात छत्रपती संभाजीनगर महसुली विभागाचे आणि धाराशिव जिल्हा नामकरण फलकांचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज करण्यात आले.


            मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर आज मंत्रिमंडळ बैठकीसाठी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्यांचे छत्रपती संभाजीनगर येथे आगमन झाले. स्मार्ट सिटी कार्यालयात मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. पवार आणि मंत्रिमंडळातील सहकारी उपस्थित होते.


            यावेळी छत्रपती संभाजीनगर महसुली विभाग आणि धाराशिव जिल्हा, तालुका, गाव या नामकरण फलकाचे अनावरण मुख्यमंत्री श्री. शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी दिलेल्या छत्रपती शिवाजी महाराज की जय... छत्रपती संभाजी महाराज की जय या जयघोषामुळे परिसर दुमदुमला.


००००

Featured post

Lakshvedhi