Friday, 15 September 2023

खुल्या भूखंडाच्या दत्तक धोरणाबाबत सद्य:स्थितीसह भविष्यातील नियोजनाबाबत पारदर्शकता राखावी

 खुल्या भूखंडाच्या दत्तक धोरणाबाबत सद्य:स्थितीसह भविष्यातील

नियोजनाबाबत पारदर्शकता राखावी


- मंत्री मंगलप्रभात लोढा


            मुंबई, दि. १५ : खुल्या भूखंडाच्या दत्तक धोरणाबाबत (ओपन स्पेस ॲडाप्शन पॉलिसी) मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिका प्रशासन आणि नागरिकांची संयुक्त बैठक मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात झाली.


             आपल्या प्रशासनात पारदर्शकता असावी यासाठी पालकमंत्री लोढा यांनी मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत किती मोकळे भूखंड आहेत, त्या पैकी किती भूखंडावर उद्याने आहेत, मैदाने किती आहेत, किती जागा दत्तक धोरणात येऊ शकतात या बद्दलची सर्व माहिती ३० दिवसांत महानगरपालिकेच्या संकेस्थळावर प्रकाशित करावी, असे सांगितले. भूखंडाची सद्य:स्थिती तसेच त्याबद्दलचे भविष्यातील नियोजन नागरिकांपर्यंत पोहोचावे जेणेकरून पारदर्शकता टिकवता येईल आणि नागरिकांचा विश्वास अधिक वृध्दिंगत होईल, असे त्यांनी सांगितले.


            या बैठकीसाठी महानगरपालिकेचे अधिकारी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, विविध सिटीझन फोरमचे प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीमध्ये ओपन स्पेस ॲडाप्शन पॉलिसी म्हणजे नक्की काय, या मधील तरतुदी काय आहेत, यामध्ये काय बदल आवश्यक आहेत, तसेच ह्या धोरणात्मक निर्णयाची गरज आहे का यासारख्या विविध विषयांवर नागरिकांनी आपली मते मांडली. पालकमंत्री श्री. लोढा यांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना या सर्व सूचना लक्षात घेऊन त्या अनुषंगाने पाऊले उचलण्याचे सूचवले. त्याचप्रमाणे ओपन स्पेस पॉलिसीचा मसुदा संकेतस्थळावर उपलब्ध असून नागरिकांनी तो व्यवस्थित वाचून आपल्या सूचना द्याव्यात, असेही आवाहन पालकमंत्र्यांनी केले आहे.

महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा परराष्ट्र धोरणात समावेश करण्याची परिसंवादात मागणी

 महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा परराष्ट्र धोरणात समावेश करण्याची परिसंवादात मागणी


‘स्त्रीवादी परराष्ट्र धोरण आणि स्त्रियांवरील अत्याचार व हिंसाचार प्रतिबंधासाठी धोरण’ या विषयावरील परिसंवाद संपन्न.


            मुंबई दि.१५: सर्व क्षेत्रांशी निगडित स्त्रीवादी धोरण तयार करणे आवश्यक असून त्यामुळे स्त्रियांना संरक्षण मिळेल. समाजातील पुरुष मानसिकता बदलणे आवश्यक आहे. आजच्या कार्यक्रमातील मुद्द्यांची राज्य सरकार दखल घेणार असून त्याबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे. परदेशातील भारतीय महिलांची फसवणूक होते त्यांना मदत करण्यासाठी सामाजिक संस्था आणि शासनाच्या माध्यमातून त्यांना मदत करणे आवश्यक आहे त्याकरिता धोरण बनवण्याची गरज असल्याचे मत विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.


            विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. गोऱ्हे यांच्या पुढाकाराने आज दुपारी विधानभवनात "स्त्रीवादी परराष्ट्र धोरण आणि स्त्रियांवरील अत्याचार व हिंसाचार प्रतिबंधासाठी धोरण" या विषयावर एकदिवसीय परिसंवाद आयोजित करण्यात आला. त्यावेळी उपसभापती डॉ. गोऱ्हे बोलत होत्या. यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर म्हणाले की, आजच्या परिसंवादातून नक्कीच नवीन विचारांची देवाण- घेवाण होण्यास मदत होईल. लिंग समानता, स्त्रियांवरील अत्याचार, हिंसाचार यावर चर्चा होऊन त्यावर उपाययोजना होणे आवश्यक आहे. महिलांच्या सशक्तीकरणासाठी या परिसंवादाचे आयोजन केल्याबद्दल डॉ. गोऱ्हे यांचे त्यांनी आभार मानले.


            मेक्सिकोचे महावाणिज्यदूत अडोल्फो गार्सिया एस्ट्राडा म्हणाले की, स्त्रियांवरील हिंसाचार रोखण्याबाबत उपाययोजना करण्यात येत आहेत. यामध्ये स्थानिक लोकांच्या सहभागाची आणि त्यांच्या मदतीची आवश्यकता आहे. ज्या स्त्रियांना हिंसाचाराला सामोरे जावे लागत आहे, त्यांना मानसिकदृष्ट्या, विधी व न्याय विभागाद्वारे मदत करणे आवश्यक आहे. मुलींच्या अपहरणाचे प्रमाण वाढत असून ते रोखण्यासाठी काम होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.


            जर्मनीचे महावाणिज्यदूत एचिम फॅबिग म्हणाले की, जर्मनीतील स्त्रियांवरील अत्याचाराला आळा बसण्यासाठी महिला मंत्र्याच्या अंतर्गत स्वतंत्र विभाग तयार करण्यात आला आहे. याविषयावर एकत्रित येऊन काम करण्याची आवश्यकता आहे. लोकांना समजण्यासाठी स्थानिक भाषेत कायदे तयार करण्यात आले आहेत. घरगुती हिंसाचारासाठी विशिष्ट क्रमांकाची हेल्पलाईन तयार करण्यात आलेली आहे.


            ऑस्ट्रेलियाचे महावाणिज्यदूत मॅजेल हाइंड म्हणाले की, सर्वच क्षेत्रात लिंग समानता असायला पाहिजे. महिलांच्या सशक्तीकरण होणे महत्वाचे आहे. कॅनडाच्या महावाणिज्यदूत दिदराह केली म्हणाल्या की, जेंडर बेस गुन्ह्यांसंदर्भात डिजिटल टेक्नॉलॉजीचा वापर कॅनडाने केला आहे. जपानच्या महावाणिज्यदूत डॉ. यासुकाता फुकाहोरी म्हणाल्या की, महिलांवरील अत्याचार हा सामाजिकतेसोबत सांस्कृतिकदृष्ट्या महत्वाचा विषय आहे. जपानमध्ये स्त्री- पुरुष असा भेदभाव न करता समान कायदा अवलंबला जात असल्याचे सांगितले.  


            नेदरलॅण्डच्या महावाणिज्यदूत बार्ट डी जोंग म्हणाल्या की, १ नोव्हेंबर रोजी आंतरराष्ट्रीय फेमिनिजम कार्यक्रम घेणार असल्याचे सांगितले. भारतातील महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी त्यांच्या कौशल्य विकासावर भर देणे गरजेचे आहे. नेदरलॅण्डमध्ये अत्याचारित महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी एकच मध्यवर्ती केंद्र आहे. त्याद्वारे महिलांना मदत करण्यात येत असल्याचे सांगितले. रशियाच्या उपमहावाणिज्यदूत एलेना रेमेझोवा म्हणाल्या की, पीडित महिलांना मानसिकदृष्ट्या आणि कायदेशीर मदत करणे आवश्यक असल्याचे सांगितले.  


            मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर म्हणाले की, स्त्रिया आजही आर्थिक निर्णय घेऊ शकत नाहीत. पोलिसांच्यावतीने महिलांच्या सशक्तीकरणासाठी योजना राबविण्यात येत आहेत. लहानपणापासून मुलांमध्ये आणि मुलींमध्ये भेदभाव केला जातो. या मानसिकतेत बदल करणे गरजेचे आहे. लोकांची मानसिकता बदलण्याची गरज आहे. मुलींचे संरक्षण मुंबई पोलिसांकरिता प्राथमिकता असल्याचे श्री. फणसाळकर यांनी सांगितले.       


            महिला व बालविकास आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे म्हणाले की, काही देशांसोबत महिलांच्या प्रश्नांवर विचारांची देवाण- घेवाण होणे आवश्यक आहे. महिलांच्या सबलीकरणासाठी सर्वस्तरावर प्रयत्न होणे गरजेचे आहे. स्त्री आधार केंद्र विश्वस्त जेहलम जोशी म्हणाल्या की, कोविड काळात ज्या स्त्रिया विधवा झाल्या आहेत, त्यांना संस्थेच्या वतीने स्त्रियांना मानसिकदृष्ट्या आधार देण्याचे काम करण्यात आले. गणेशोत्सव, नवरात्र यादरम्यान लहान मुलींचे अपहरण होऊ नये याकरिता स्त्री आधार केंद्रातील महिला पोलिसांसोबत स्वयंसेवक म्हणून काम करत असतात. पीडित स्त्रियांना स्थानिक पातळीवर मदत मिळणे आवश्यक आहे. त्यांना मानसिक आधार देणे गरजेचे आहे. महिलांच्या जागृतीसाठी सरकारच्या महिलांकरिता असलेल्या योजनांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवली जावी. यावेळी जर्मनीचे अचिम फॅबिग, फ्रान्सच्या जो-मार्क सेरे शार्ले, झेलम जोशी यांच्यासह सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांची ‘दिलखुलास’ कार्यक्रमात मुलाखत

 खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती

रवींद्र साठे यांची ‘दिलखुलास’ कार्यक्रमात मुलाखत

 

            मुंबईदि. १५ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलासकार्यक्रमात महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांची मुलाखत प्रसारित करण्यात येणार आहे.

            खादी ग्रामोद्योग मंडळामार्फत ग्रामीण क्षेत्रातील गरजू लोकांना रोजगारकारागीर व बलुतेदार यांच्या उद्योगाचे स्थैर्यस्वयंरोजगाराच्या क्षेत्राची व्यापक प्रमाणात वृध्दी करणे तसेच कारागिरांचे तांत्रिक कौशल्य वाढविण्यास निवडक ग्रामोद्योगांचे प्रशिक्षण देणेतयार मालाच्या विक्रीस मदत करणे इत्यादी कामे प्रामुख्याने केली जात आहेत. लघु उद्योग तसेच ग्रामीण कारागीर यांच्या जीवनमानामध्ये आमूलाग्र बदल घडविणे हे मंडळाचे मुख्य ध्येय असून ग्रामीण कारागिरांनी तयार केलेल्या मालाला हक्काची बाजारपेठ मिळवून देणे करीता मंडळ प्रभावी योजना राबवत आहे. मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना आणि उपक्रमांबाबत मंडळाचे सभापती श्री. साठे यांनी  दिलखुलास कार्यक्रमातून माहिती दिली आहे. 

            दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत सोमवार दि.18 आणि मंगळवार दि. 19 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व 'न्यूज ऑन एआयआरया मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. मंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन जगताप यांनी ही मुलाखत घेतली आहे.

000

हैदराबाद मुक्ती संग्राम: मराठवाड्याचा रोमहर्षक स्वातंत्र्यलढा! माहितीपटाचे 17 सप्टेंबरला समाजमाध्यमांवरून प्रसारण

 हैदराबाद मुक्ती संग्राम: मराठवाड्याचा रोमहर्षक स्वातंत्र्यलढा!माहितीपटाचे 17 सप्टेंबरला समाजमाध्यमांवरून प्रसारण


 


            मुंबई, दि. 15 : मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्ताने ‘हैदराबाद मुक्ती संग्राम: मराठवाड्याचा रोमहर्षक स्वातंत्र्यलढा!’ या माहितीपटाचे प्रसारण माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांवरून 17 सप्टेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता होणार आहे.


या माहितीपटाचे थेट प्रसारण पुढील लिंकवरुन पाहता येणार आहे.


यू ट्यूब – https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR


फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR


एक्स – https://twitter.com/MahaDGIPR


            मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचा अमृत महोत्सवी सांगता समारंभनिमित्ताने रविवार 17 सप्टेंबरला माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाची निर्मिती असलेल्या या माहितीपटाचे प्रसारण होणार आहे. या माहितीपटाचे दिग्दर्शन चंद्रकांत कुलकर्णी, लेखन अजित दळवी, विषयतज्ज्ञ प्रा. डॉ. सुधीर गव्हाणे आणि निवेदन विनय आपटे यांचे आहे.


            हा माहितीपट म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही एक वर्ष, एक महिना आणि 2 दिवसाने उशिराने मिळालेल्या स्वातंत्र्य लढ्यातील मराठवाड्याच्या सहभागाची तेजस्वी कहाणी आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाले पण दक्षिण भारतातल्या हैदराबाद संस्थानातील काळरात्र संपली नव्हती. हैद्राबादचा तत्कालिन निजाम मीर उस्मान अली याने भारतात सामील न होता आपले संस्थान स्वतंत्र ठेवण्याच्या इराद्याने येथील जनतेवर अत्याचार आणि मुस्कटदाबीचे षडयंत्र आरंभले होते. निजामाच्या या जुलूमशाहीचे तख्त उधळून लावण्यासाठी जनतेने स्वयंस्फूर्तीने स्वातंत्र्यासाठी दिलेल्या ऐतिहासिक लढ्याची माहिती चित्ररुपाने देण्यात आली आहे.


०००

हृदयविकारग्रस्त बालकांची मंत्री सुरेश खाडे यांनी घेतली भेट

 हृदयविकारग्रस्त बालकांची मंत्री सुरेश खाडे यांनी घेतली भेट

            मुंबई, दि. १५ : सांगली जिल्ह्यातील हृदयविकार असलेल्या ० ते १८ वर्षे वयोगटातील ४६ बालकांना मुंबई येथील एसआरसीसी बाल रुग्णालयात हृदय शस्त्रक्रियेसाठी दाखल करण्यात आले. हृदय शस्त्रक्रिया झालेल्या बालकांची व पालकांची आज कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी रुग्णालयात जाऊन भेट घेतली. शस्त्रक्रिया झालेल्या बालकांशी संवाद साधून त्यांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस केली. मुलांना रुग्णालयात योग्य उपचार मिळतील व बालके रोगमुक्त होऊन घरी जातील याबाबत पालकांनी निश्चिंत रहावे, असा धीर देत मंत्री श्री. खाडे यांनी पालकांना आश्वस्त केले.


            सांगली जिल्ह्यात राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत इको तपासणी शिबिरामध्ये तपासणी केलेल्या २०५ बालकांपैकी ६० बालकांवर हृदय शस्त्रक्रियेची गरज असल्याचे निदर्शनास आले. ‘आयुष्मान भव:’ योजनेंतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमामधून ४६ बालकांना एसआरसीसी रुग्णालयात मोफत शस्त्रक्रियेसाठी दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी १७ बालकांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. तर उर्वरित रुग्णांच्या शस्त्रक्रिया दोन दिवसांत पूर्ण होतील. रुग्णालयातील बालस्नेही वातावरण, डॉक्टरांनी केलेले योग्य उपचार आणि रुग्णालयाने पालकांना दिलेली सुविधा यामुळे बालक आणि पालकांच्या चेहऱ्यावर आनंद आहे. यासाठी रुग्गालयातील सर्व डॉक्टर, प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मंत्री श्री. खाडे यांनी आभार मानले.


            पालकमंत्री श्री. खाडे, सांगली जिल्हा प्रशासन आणि एसआरसीसी रुग्णालयातील डॉक्टरांचे पालकांनीही आभार मानले. सांगलीपासून मुंबईपर्यंत बालकांची व आमची सर्व काळजी घेतली, असे पालक जगन्नाथ पाटोळे यांनी सांगितले.


            यावेळी एसआरसीसी बाल रुग्णालयाचे संचालक झुबिन परेरा, प्रशासकीय अधिकारी चेतन पाटील, अमित केरकर, सिराज शेजवलकर उपस्थित होते. डॉ. प्रिया प्रधान, डॉ. प्रदीपकुमार कौशिक, डॉ. गौरवकुमार, डॉ.सुप्रतिम सेन, डॉ. क्षीतिज सेठ यांनी बालकांवर शस्त्रक्रिया केल्या.

पायाभूत विकास कामांच्या उभारणीतसार्वजनिक बांधकाम विभागाचे महत्वपूर्ण योगदान

 पायाभूत विकास कामांच्या उभारणीतसार्वजनिक बांधकाम विभागाचे महत्वपूर्ण योगदान


- सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण


 


            मुंबई, दि. 15 : राष्ट्राच्या प्रगतीत पायाभूत सुविधांची उपलब्धता अत्यावश्यक बाब आहे. या विकास कामांच्या उभारणीत सार्वजनिक बांधकाम विभागाचे महत्वपूर्ण योगदान आहे. या व्यापक जबाबदारीच्या जाणिवेने सर्वांनी गुणवत्तापूर्ण काम करत उत्कृष्टतेचा मानदंड प्रस्थापित करावा, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले.


            भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांच्या जन्मदिनी आयोजित "उत्कृष्ट अभियंता पुरस्कार सन २०२१-२२ व २०२२-२३" कार्यक्रमात मंत्री श्री. चव्हाण बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा पाटणकर- म्हैसकर, सचिव (रस्ते) सदाशिव साळुंखे, सचिव (बांधकामे) संजय दशपुते, सहव्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, नागपूर सुधाकर सु. मुरादे, मुख्य वास्तूशास्त्रज्ञ अनिता खेरडे, सा.बां. प्रादेशिक विभाग, मुंबईचे मुख्य अभियंता रणजित हांडे, मुख्य अभियंता, सा.बां. प्रादेशिक विभाग, कोकण शरद राजभोज, मुख्य अभियंता, विद्युत सा.बां. प्रादेशिक विभाग संदीप पाटील यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.


            मंत्री श्री.चव्हाण म्हणाले की, प्रत्येकाला चांगले काम करत प्रगती करण्याची संधी मिळत असते. त्या संधीचा योग्य उपयोग करुन स्वतःसोबतच आपल्या विभागाचा, राज्याचा, देशाचा नावलौकीक आपण वाढवू शकतो. पुरस्कार म्हणजे जबाबदारी असते. प्रधानमंत्री यांच्या संकल्पनेतून देशाच्या अमृतकाळात नवीन कामाची उभारणी करण्यात येणार आहे. यामध्ये सक्रिय सहभाग घेत या अमृतकाळाला अधिक चांगले करण्यात आपण सर्व आपल्या परीने निश्चितच हातभार लाऊ शकतो. काम करताना प्रत्येकाने आपल्याला जीवनगौरव पुरस्कार प्राप्त होईल, या विचारातून दर्जेदार काम करण्याची वृत्ती वाढीस लावावी.


            रस्ते, पूल, इमारती कोणत्याही प्रकारचे काम करताना आपल्या विभागाला एक मानदंड प्रस्थापित करता येऊ शकतो. ज्या माध्यमातून आपल्या विभागाची सोबतच आपली प्रतिमा आपण उंचावू शकतो. उत्कृष्ट काम करत पुरस्कार मिळवलेल्या सर्व विजेत्यांच्या कामातून निश्चितच ही प्रेरणा निर्माण होत जाईल, अशा गुणवत्तापूर्ण कामाची परंपरा ते निर्माण करतील. सर्वांमध्ये क्षमता आहेत,कामाचा अनुभव आहे. त्याला योग्य न्याय देत मिशन मोडवर काम करावे. ते करत असताना आपले स्वास्थ,कामाची गुणवत्ता याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे, असे आवाहन मंत्री श्री.चव्हाण यांनी केले.


            अपर मुख्य सचिव श्रीमती म्हैसकर म्हणाल्या की, अभियांत्रिकी क्षेत्र प्रगत होत गेले. त्याप्रमाणे आपली संस्कृती प्रगत होत गेली आहे. अभियांत्रिकी हे सर्व संकल्पना, स्वप्नांना प्रत्यक्ष मूर्तस्वरुप देणारे क्षेत्र आहे. त्याच पद्धतीने आपल्या सार्वजनिक बांधकाम विभागाला ही एक परंपरा आणि भारतरत्न विश्वेश्वरैय्या यांच्या सारख्या अभियंत्याचा वारसा लाभलेला आहे, या पार्श्भूमीवर प्रत्येकाने अधिक चांगले काम करण्याची आपली जबाबदारी यशस्वी पार पाडली पाहिजे. 


            यावेळी सार्वजनिक विभागामार्फत याच वर्षापासून देण्यात येणा-या पहिल्या जीवन गौरव पुरस्काराने संजय श्रीकृष्ण भोंगे, मुख्य अभियंता (स्वेच्छा निवृत्त) यांना गौरवण्यात आले. यावेळी सन २०२१-२२ मधील एकूण ४३, तर तसेच सन २०२२-२३ या वर्षातील ४१ जणांना उल्लेखनीय कामगिरीसाठी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. संकल्पचित्र मंडळामार्फत तयार करण्यात आलेल्या नमुना संकल्पचित्र पुस्तिकेचे प्रकाशनही करण्यात आले. तसेच नमुना संकल्पचित्र पुस्तिका तयार करणाऱ्या अभियंत्यांचा गौरव करण्यात आले. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ येथे केलेल्या उत्कृष्ट कामांबद्दल अभियंत्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. साळुंखे यांनी केले. सचिव श्री.दशपुते यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. आभार प्रदर्शन प्रमोद बनगोसावी, अधीक्षक अभियंता, मुंबई सा.बां. मंडळ, मुंबई यांनी मानले.


००००

नॉर्वेची कंपनी एफओडी आणि ‘सत्व’ ग्रीन एनर्जीच्या

 नॉर्वेची कंपनी एफओडी आणि ‘सत्व’ ग्रीन एनर्जीच्या


 पदाधिकाऱ्यांनी घेतली पालकमंत्री दीपक केसरकर यांची भेट


 


            मुंबई, दि. 15 - नॉर्वेची कंपनी फ्लोटिंग ऑफशोर डिसॅलिनेशन (एफओडी) आणि भारतीय कंपनी ‘सत्व’ ग्रीन एनर्जीच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांची भेट घेतली. समुद्राच्या पाण्यापासून शुद्ध पाणी बनविण्यासाठी प्रकल्प उभारण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.


            समुद्राच्या खारट पाण्यापासून शुद्ध पाणी उपलब्ध करून देणारा ‘ऑफशोअर डिसॅलिनेशन शिप प्लांट’ बसवण्यास कंपनीच्या तेर्जे हलवॉरसेन, करण मेनन, जशेर कनियामपूरम यांनी स्वारस्य व्यक्त केले आहे. या जहाजामुळे जमिनीवरील गुंतवणुकीचा खर्च आणि त्याच्याशी संबंधित इतर भांडवली गुंतवणूक खर्च वाचू शकतो. तसेच हा प्रकल्प किनारपट्टीवरील भागात एका ठिकाणाहून दुसरीकडे हलवता येणार आहे. अनियमित मान्सून आणि कमी होणाऱ्या भूजल पातळीच्या पार्श्वभूमीवर कंपनीने ही नाविन्यपूर्ण उपाययोजना पुढे आणली असल्याचे यावेळी सांगण्यात आले.


00000

Featured post

Lakshvedhi