Thursday, 14 September 2023

पर्यावरणपूरक गणेशमूर्ती रंगशाळेत घडलेमुख्य सचिवांमधील कलाकाराचे दर्शन

 पर्यावरणपूरक गणेशमूर्ती रंगशाळेत घडलेमुख्य सचिवांमधील कलाकाराचे दर्शन


       मुंबई , दि १४ : प्रत्येकात एक कलाकार दडलेला असतो. त्याला वाट करुन देण्यासाठी एखादी छोटी संधीही पुरेशी असते. याचाच अनुभव आज मंत्रालयाच्या त्रिमूर्ती प्रांगणात आला. प्रशासनाचा भार सांभाळणारे मुख्य सचिव मनोज सौनिक आणि गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनीही पर्यावरणपूरक गणपती रंगवून त्यांच्यातील दडलेल्या कलाकाराचे दर्शन घडविले.


            ...प्रसंग होता, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशमूर्तींच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि हातकागद संस्था पुणे यांच्या सयुंक्त विद्यमाने त्रिमूर्ती प्रांगणात आयोजित केलेल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती रंगशाळेचे. या कार्यशाळेत उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव राधिका रस्तोगी, खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रविंद्र साठे, खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर विमला, महाराष्ट्र राज्य लघु उद्योग महामंडळाचे व्यवस्थापकिय संचालक डॉ.राजेंद्र निंबाळकर, उद्योग विभागाचे उपसचिव श्रीकांत पुलकुंडवार यांनीही सहभाग घेऊन गणपती रंगवण्याचा आनंद लुटला.


            श्री गणरायाला १४ विद्या आणि ६४ कलांचे अधिपती मानले जाते. स्वातंत्र्यपूर्व काळापासून लोकमान्य टिळकांनी सुरु केलेला गणेशोत्सव आज महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात साजरा केला जातो. हा गणेशोत्सव पर्यावरणाला पूरक व्हावा यासाठी महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ मातीच्या गणपतीला प्रोत्साहन देण्याचे काम करीत आहे. यासाठीच मंत्रालयात आयोजित कार्यशाळेत सहभागी होत मुख्य सचिवांनी निसर्गाशी अनुरुप होत गणेशोत्सव साजरा करण्याचा संदेश दिला. त्यांनी खादी व ग्रमोद्योग मंडळ आणि हातकागद संस्थांमधील कर्मचाऱ्यांसोबत तन्मयतेने गणपती रंगवण्याचा आनंद घेतला.  


            हातकागद संस्था पुणे यांनी कागदाच्या लगद्यापासून बनवलेल्या गणेशमूर्ती आणि पेस्टल रंग रंगकाम करण्यासाठी उपलब्ध करून दिले होते.


0000



 


 


 


७५ टक्के पेक्षा जास्त तक्रारदारांच्या गाऱ्हाण्यांचे निवारण

 ७५ टक्के पेक्षा जास्त तक्रारदारांच्या गाऱ्हाण्यांचे निवारण

लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांच्या कामकाजाचा ४९ वा वार्षिक  अहवाल  राज्यपालांना सादर

           

            मुंबईदि. १३ : लोक आयुक्त न्यायमूर्ती वि. मु. कानडेयांनी  सन २०२१ मधील लोक आयुक्त व  उप लोक आयुक्त यांच्या कामकाजासंबंधीचा ४९ वा वार्षिक एकत्रित अहवाल  राज्यपाल रमेश बैस यांना नुकताच सादर केला.

            न्यायमूर्ती श्री. कानडे म्हणाले कीया संस्थेने त्यांच्या सांविधिक स्वातंत्र्याचा पूर्ण वापर करून निःपक्षपातीपणे आणि जलद गतीने नागरिकांच्या तक्रारीचे निवारण करण्याचे प्रयत्न सुरु ठेवले आहेत. प्राप्त झालेल्या तक्रारीमध्ये सखोल चौकशी केल्यानंतर केलेल्या शिफारशीमध्ये बहुधा विभागाच्या कामकाजामध्ये सुधारणा करण्यासाठी उपयुक्त सूचना केल्या जातातजेणेकरून संबंधित विभागाचे कामकाज अधिक कार्यक्षम व निःपक्षपातीपणे करण्यास मदत होते.

            राज्य शासनाने किंवा शासनाच्या वतीने किंवा विवक्षित सार्वजनिक प्राधिकारांनी केलेल्या प्रशासकीय कार्यवाहीचे अन्वेषण करण्यासाठी आणि पीडित व्यक्तींकडून अशा कार्यवाहीबाबत आलेल्या गाऱ्हाण्यांवर आणि अभिकथनांवर तोडगा काढण्यासाठी निर्माण केलेल्या या संस्थेकडे सन २०२१ या अहवालाधीन वर्षात ५७६९ नवीन तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी १२५० तक्रारी या केवळ इतर प्राधिकाऱ्यांना उद्देशून लिहिलेल्या अर्जाच्या प्रती असल्यामुळे किंवा स्वाक्षरी विरहित प्रती असल्यामुळे रीतसर तक्रारी नाहीतअसे समजण्यात येऊन नोंदविण्यात आल्या नाहीत. अशा प्रकारे अहवालाधीन वर्षात ४,५१९ नवीन तक्रारी नोंदविण्यात आल्या. वर्षाच्या सुरुवातीला २०९८ प्रकरणे प्रलंबित होती. अशा प्रकारे सन २०२१ मध्ये ६,६१७ प्रकरणे कार्यवाहीकरीता उपलब्ध झाली. नोंदणी केलेली ३२०२ प्रकरणे अहवालाधीन वर्षात निकाली काढण्यात आली आणि सन २०२१ च्या वर्षअखेरीस ३,४१५ प्रकरणे प्रलंबित राहिली असल्याचे न्यायमूर्ती श्री. कानडे यांनी सांगितले.

            महाराष्ट्रातील लोकआयुक्त संस्था गेल्या ५ दशकांमध्ये अनेक तक्रारदारांची गाऱ्हाणी दूर करण्यात यशस्वी ठरली आहे. गेल्या काही वर्षात चौकशीसाठी हाती घेण्यात आलेल्या तक्रारींपैकी जवळजवळ ७५ टक्के पेक्षा जास्त तक्रारींमधील तक्रारदारांच्या गाऱ्हाण्यांचे निवारण झाले असल्याचे न्यायमूर्ती श्री. कानडे यांनी सांगितले.

खुले भूखंड दत्तक धोरण प्रणाली चर्चेसाठी प्रशासन आणि नागरिकांची बैठक

 खुले भूखंड दत्तक धोरण प्रणाली चर्चेसाठी

प्रशासन आणि नागरिकांची बैठक

 

            मुंबईदि. १३  : मुंबई महापालिकेतर्फे ९ सप्टेंबर २०२३ रोजी खुले भूखंड दत्तक धोरण (ओपन स्पेस अडॉप्शन पॉलिसी) चा मसुदा प्रसारित करण्यात आला आहे. या धोरणांतर्गत महानगरपालिकेची मालकी असलेल्या जागादेखभाल करण्यासाठी खासगी तत्वावर दत्तक देण्याचा प्रस्ताव आहे. या प्रस्तावाबाबत नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यातर्फे शुक्रवार १५ सप्टेंबर २०२३ रोजी सायंकाळी ४ वाजता मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. धोरणात्मक चर्चेसाठी नागरिकप्रशासन आणि सरकार यांना एकत्र आणून एकमताने जनहिताचा योग्य निर्णय घेता यावाया उद्देशाने पालकमंत्री श्री. लोढा यांनी या बैठकीचे आयोजन केले आहे.

            "या बैठकीच्या माध्यमातून ओपन स्पेस अडॉप्शन पॉलिसीबाबत खुली चर्चा व्हावीनागरिकांनी आपली मते मांडावीत आणि जनहिताचा निर्णय व्हावा एवढाच सरकारचा उद्देश आहे. आमचे सरकार हे लोकसांठीलोकांमध्ये जाऊन काम करणारे सरकार आहे. समाजातील प्रत्येक घटकाला आपल्या तक्रारी आणि मते मांडायला व्यासपीठ मिळेल याची आम्ही सदैव काळजी घेऊ!" असे पालकमंत्री श्री. लोढा यांनी यावेळी सांगितले आहे.

***

संध्या गरवारे/विसंअ/


 


बीड येथे कृषी भवन उभारण्यास14 कोटी 90 लाख रुपये निधी मंजूर

 बीड येथे कृषी भवन उभारण्यास14 कोटी 90 लाख रुपये निधी मंजूर

- कृषीमंत्री धनंजय मुंडे

 

            मुंबई दि. 13 : कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी बीड जिल्हा कृषी विभागांतर्गत शेतकऱ्यांना कायम सर्वप्रकारची मदत एकाच छताखाली मिळावी या दृष्टीने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. बीड येथील पालवन रोड परिसरातील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय येथे कृषी भवन इमारत उभारणीसाठी 14 कोटी 90 लाख रुपये निधी खर्चास प्रशासकीय मान्यता दिली आहे.

            पालवण रोडवरील कृषी विभागाच्या क्षेत्रात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय व संबंधित आठ विभागांचे अधिनस्त कार्यालय आहेत, तर उर्वरित कार्यालय हे शहरातील अन्य ठिकाणी आहेत. ही सर्व कार्यालये एकाच छताखाली येऊन शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत व योजनांची माहिती व पूरक समस्यांचे समाधान एकाच ठिकाणी मिळावेयासाठी कृषी भवन बांधण्याचा प्रस्ताव मंत्री श्री. मुंडे यांनी जिल्हा प्रशासनाकडून मागवला होता.

            जिल्हा कृषी विभागाने कृषी आयुक्तांमार्फत पाठवलेल्या या प्रस्तावास कृषी मंत्री श्री. मुंडे यांच्या निर्देशानुसार मान्यता देण्यात आली असून आता बीड जिल्हा कृषी भवन बांधण्यासाठी 14 कोटी 90 लाख रुपये इतका निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. याबाबतचे ज्ञापन आज महाराष्ट्र शासनाने निर्गमित केले असूनलवकरच कृषी भवनच्या बांधकामास सुरूवात करण्यात येणार आहे.

प्रधानमंत्री पिक विमा योजना : कृषी खात्याच्याछाननीत होत आहेत अपात्र अर्ज बाद

 प्रधानमंत्री पिक विमा योजना : कृषी खात्याच्याछाननीत होत आहेत अपात्र अर्ज बाद


कृषीमंत्री धनंजय मुंडे यांची समयसूचकता


            मुंबई दि. 13 : प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा केवळ पात्र शेतकऱ्याना लाभ मिळावा, यासाठी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी समयसूचकता दाखवून योग्य वेळी प्राप्त अर्जांची छाननी करण्याचे आदेश कृषी खात्याला दिले होते. त्यानुसार कृषी आयुक्त, पुणे यांनी राज्यातील सर्व विमा कंपन्यांना संबंधित अधिकाऱ्यांमार्फत अर्जाची छाननी करण्याचे आदेश दिले होते. या छाननीमुळे आता अनेक अपात्र अर्ज बाद होत असून पात्र शेतकऱ्यांनाच योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे.


            पुणे कृषी आयुक्तांनी 31 ऑगस्ट 2023 रोजी पिक विमा कंपन्यांना पत्र दिले असून त्यामध्ये सतर्कता बाळगण्याचे सूचित केले होते. एका शेतकऱ्याच्या जमिनीवर परस्पर दुसऱ्या शेतकऱ्यांनीच किंवा व्यक्तीने विमा काढणे, वन विभाग, सिंचन विभाग, विद्युत महामंडळ, औद्योगिक क्षेत्र इत्यादी शासकीय जमिनीवर विमा काढणे, नगरपालिका - महानगरपालिकेतील अकृषक क्षेत्रावर विमा काढणे, मंदिर- मस्जीद इत्यादी धार्मिक स्थळांच्या जमिनीवर विमा काढणे, काही सार्वजनिक संस्थांच्या जमिनीवर विमा काढणे, 7/12 तसेच 8 अ वरील क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्रावर विमा काढणे, अधिसूचित पिकाची लागवड नसतानाही त्या पिकाचा विमा काढणे, बोगस भाडेकरार दर्शवून दुसऱ्या शेतकऱ्याच्या जमिनीवर विमा काढणे, सामायिक क्षेत्रावर इतरांची संमती नसताना परस्पर विमा उतरविणे, एकाच बँक खात्यावर अनेक शेतकऱ्यांचा विमा काढणे असे गैरप्रकार होण्याची शक्यता असल्यामुळे सर्व संबंधित तालुका, जिल्हा कृषी अधिकारी यांच्यामार्फत सर्व अर्जांची सखोल तपासणी करावी आणि चुकीच्या पद्धतीने विमा योजनेत सहभाग घेणाऱ्या व्यक्ती यांचे अर्ज रद्द करून त्याविरुद्ध कडक कारवाई करावी, असे आदेश देण्यात आले होते.


            पीक विमा काढण्यासाठी शासनाने पीक विमा कंपन्या आणि शेतकरी यांना एक ऑनलाइन पोर्टल उपलब्ध करून दिले आहे. त्यामध्ये शेतकरी आपले शेतीचे क्षेत्र स्वतः नोंद करून पीक विमा काढतो व अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्याची पडताळणी केली जाते. या पडताळणीनंतर जे अर्ज बनावट किंवा खोटे आढळतात, त्यांच्या पीक विम्याचा हप्ता शासनाकडून भरला जात नाही. तर ते बाद ठरवले जातात.


            ऑनलाइन पोर्टलवर अर्ज करतानाच शेतकऱ्याच्या पीक क्षेत्राची पडताळणी केली जाऊ शकत नाही. त्यामुळे पीक विम्याचे अर्ज सादर झाल्यानंतर त्याची तपासणी करण्यात येते. त्यामुळे कोणीही कुठुनही कोणत्याही क्षेत्राचा विमा उतरविला, तरी त्या क्षेत्रावर पीक आहे किंवा नाही याची पडताळणी केल्यानंतरच शासन पीक विम्याचा हप्ता कंपन्यांना अदा करते.


            प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून शेतकऱ्यांना पिकांची पेरणी करताना, मध्य हंगाम मधील प्रतिकूल परिस्थितीत आणि पिकाच्या काढणी पश्चात आधी पाच वेगवेगळ्या टप्प्यांवर संरक्षण देण्याची शासनाची भूमिका आहे.


            राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये 1 कोटी 71 लाख शेतकऱ्यांनी अर्ज केले आहे. त्यामधून 113.26 लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित करण्यात आले आहे विमा हप्त्याची रक्कम 8015 कोटी आहे. राज्याचा हिस्सा 4,783 कोटी आहे, तर केंद्राचा हिस्सा 3231 कोटी आहे. शेतकऱ्यांना प्रति अर्ज एक रुपया प्रमाणे केवळ 1.71 कोटी खर्च करावा लागला आहे. ही व्यापक जनहित साधणारी आणि अल्पावधीत लोकप्रिय झालेली योजना आहे. त्यामुळे पात्र शेतकरी वगळता जे कोणी अपात्र व्यक्ती या योजनेचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करतील, त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल, असे कृषी मंत्री श्री. मुंडे यांनी म्हटले आहे.


००००

आरोग्य क्षेत्रात डिजिटल तंत्रज्ञानाच्या उपयोगाने भारत जगात आदर्श ठरेल

 आरोग्य क्षेत्रात डिजिटल तंत्रज्ञानाच्या उपयोगाने भारत जगात आदर्श ठरेल

- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

           

            मुंबईदि. 13 : डिजिटल तंत्रज्ञान उपयोगात आणण्यामध्ये भारत उत्साहाने पुढे येत आहे. भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेची प्रशंसा जगात होत आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर छोटे शहर आणि गावांना डिजिटल अर्थव्यवस्थेशी जोडण्यात भारत जगात उत्तम उदाहरण बनले आहे. सप्टेंबर 2021 मध्ये आयुष्मान भारत डिजिटल मिशनची सुरुवात करण्यात आली. डिजिटल तंत्रज्ञानाच्या आरोग्य क्षेत्रातील उपयोगामुळे भारत या क्षेत्रात जगामध्ये आदर्श ठरेलअसा विश्वास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केला.

             आयुष्मान भव: या 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर दरम्यान राबविण्यात येणाऱ्या मोहिमेचे दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गांधीनगरगुजरात येथील राजभवनात करण्यात आले. या कार्यक्रमाचे वेब लिंकद्वारे थेट प्रसारण सह्याद्री अतिथी गृह येथील मोहिमेच्या राज्यस्तरीय कार्यारंभ दिन कार्यक्रमात  करण्यात आले. सह्याद्री अतिथीगृह येथे कार्यक्रमास राज्यपाल रमेश बैसमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंतअप्पर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकरसचिव नवीन सोना उपस्थित होते.

            राष्ट्रपती पुढे म्हणाल्याकी देशाने कोविड साथ रोगाच्या काळात खूप चांगल्या कामाचे उत्तम उदाहरण जगासमोर ठेवले. देशातील शास्त्रज्ञडॉक्टरनर्सेसअन्य आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी तसेच कुशल प्रशासन व नेतृत्वाच्या जोरावर यामधून देश बाहेर पडला. जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम राबविली. लोकसहभागातून अशक्यप्राय वाटणारे हे काम शक्य करून दाखविले.

            प्रधानमंत्री क्षय रोग मुक्त भारत अभियानात उल्लेखनीय काम करणाऱ्या जिल्ह्यांना पुरस्कृत करण्याचे काम प्रशंसनीय असून क्षयरोग निर्मूलनात निक्षय मित्र म्हणून काम करणाऱ्या मित्रांचा सन्मानही स्पृहणीय आहे. आयुष्मान भव: मोहीम यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी लोकसहभाग देण्याचे आवाहनही राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी यावेळी केले.

              केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीया यांनी मोहिमेची विस्तृत माहिती देत मोहीम यशस्वी करून प्रत्येकाला दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले.

 कार्यक्रमाला आरोग्य विभागातील संबंधित अधिकारी उपस्थित होते.

००००

राज्यातील इंग्रजी माध्यमांच्या नामांकित शाळांमधीलधनगर विद्यार्थ्यांसाठीची प्रवेशसंख्या वाढवण्याचा निर्णय



राज्यातील इंग्रजी माध्यमांच्या नामांकित शाळांमधीलधनगर विद्यार्थ्यांसाठीची प्रवेशसंख्या वाढवण्याचा निर्णय


- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय


 


            मुंबई, दि. 13 :- धनगर समाजातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या नामांकित शाळांमध्ये शिक्षणासाठी असलेली प्रवेश संख्या वाढवण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. नामांकित इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये शिक्षणासाठी असलेली ही योजना इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनाही लागू करण्याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आणण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिले. इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना निवास, भोजन तसेच इतर शैक्षणिक सवलती देणारी आधार योजना लागू करणे, ओबीसी विद्यार्थ्यांच्या राज्यातील 72 वसतिगृहांसाठी साहित्य खरेदी आणि वित्त व विकास महामंडळाच्या थेट कर्ज योजनेच्या अटी व शर्ती शिथिल करण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिल्या.


            उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात, इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या मागण्या आणि प्रलंबित विषयांबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीस अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, इतर मागास व बहुजन कल्याण विभागाच्या सचिव अंशू सिन्हा आदी उपस्थित होते.


            विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची सोय हा अत्यंत महत्वाचा विषय असून यासंदर्भात मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना देखील महानगरे, शहरे आणि जिल्ह्याच्या ठिकाणी शिक्षण घेता आले पाहिजे. त्यासाठी त्यांना आदिवासी विकास विभागाची ‘स्वयंम’ योजना आणि सामाजिक न्याय विभागाची ‘स्वाधार’ योजनेच्या धर्तीवर ‘आधार’ योजना राबविण्यात यावी. या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना भोजन, निवास आणि इतर शैक्षणिक सुविधांसाठी त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात भत्त्याची रक्कम थेट हस्तांतरित करण्यात येईल. या योजनेसाठी विद्यार्थी संख्या निश्चित करून विभागाने सविस्तर प्रस्ताव सादर करावा.


            राज्यातील इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील मॅट्रिकोत्तर व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिल्ह्याच्या ठिकाणी 100 विद्यार्थी क्षमतेच्या मुलांसाठी एक आणि मुलींसाठी एक अशी 72 वसतिगृहे भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहेत. या वसतिगृहांसाठी लागणारे आवश्यक फर्निचर आणि इतर साहित्य खरेदीचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आणण्यास देखील उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी मान्यता दिली.


            इंग्रजी माध्यमांच्या निवासी शाळांमध्ये प्रवेशाबाबतच्या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, सद्य:स्थितीत धनगर समाजातील साडेपाच हजार विद्यार्थ्यांना शहरांमधील इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळांमध्ये प्रवेश देण्यात येतो. मात्र, या योजनेच्या लाभासाठी येणाऱ्या अर्जांची संख्या पाहता त्यात वाढ करण्यात येईल. इंग्रजी माध्यमांच्या निवासी शाळांमध्ये प्रवेशाची योजना इतर मागासप्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना लागू करण्यात येईल. यासंदर्भात नामांकित शाळेची निवड, विद्यार्थी निवड करण्याबाबतचे निकष, धोरण आखण्यात येईल. ज्या विद्यार्थ्यांना शिक्षणाचा अधिकार कायद्यांतर्गत (RTE- Right to Education) प्रवेश मिळणार नाही, अशा विद्यार्थ्यांचा यासाठी प्राधान्याने विचार करावा, असे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी दिले.


            राज्यातील इतर मागास प्रवर्गातील दारिद्र्यरेषेखालील लाभार्थ्यांकरिता स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत थेट कर्ज योजना राबविण्यात येते. या महामंडळामार्फत एक लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येते. मात्र, या योजनेच्या अस्तित्वातील अटी व शर्तींमुळे अत्यंत कमी प्रमाणात कर्जाचे वितरण होते. यास्तव अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या धर्तीवर अटी व शर्ती शिथिल करण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिल्या.


            इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थी, तरुणांना शिक्षण, रोजगाराच्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने इतर मागास बहुजन कल्याण विभागाने तातडीने प्रस्ताव सादर करावेत. येत्या डिसेंबरच्या हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांद्वारे यासाठी लागणारा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.


--------------*****------------------

Featured post

Lakshvedhi