Wednesday, 13 September 2023

नंदुरबार जिल्ह्याच्या याहा मोगी माता बियाणे संवर्धन समितीला राष्ट्रीय वनस्पती जनुक संवर्धक समुदाय पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान

 नंदुरबार जिल्ह्याच्या याहा मोगी माता बियाणे संवर्धन समितीला

राष्ट्रीय वनस्पती जनुक संवर्धक समुदाय पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान

 

            नवी दिल्ली12 : हरणखुरी, ता. धडगाव, जि. नंदुरबार येथील याहामोगी माता बियाणे संवर्धन समितीला राष्ट्रीय वनस्पती जनुक संवर्धक समुदाय पुरस्कारानेराष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज गौरविण्यात आले.

            नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन परिषदेमध्ये जागतिक अन्न व कृषी संस्था आणि भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयामार्फत आयोजित कृषी जैवविविधता आणि शेतकरी हक्क’ Global Symposium on Farmers' Rights' (GSFR) या पहिल्या जागतिक परिषदेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते याहामोगी माता बियाणे संवर्धन समितीस हा पुरस्कार वर्ष 2020-21 साठी प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार सविता नाना पावरा आणि मोचडा भामटा पावरा यांनी स्वीकारला. दहा लाख रुपये आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. ही समिती बाएफ डेव्हलपमेंट रिसर्च फाउंडेशन अंतर्गत कार्यरत आहे.

            12 ते 15 सप्टेंबर 2023 या कालावधीदरम्यान या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी या जागतिक परिषदेचे उद्घाटन केले. या परिषदेत जगभरातील 59 देशांमधून शास्त्रज्ञ आणि संसाधन व्यक्ती सहभागी होतील. या सत्रादरम्यान स्थानिक आणि स्थानिक समुदाय आणि जगातील सर्व प्रदेशातील शेतकऱ्यांनी दिलेले योगदान आणि त्यांना पुरस्कृत कसे करावे या विषयावर चर्चासत्र आयोजित केले जातील.

            केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्रसिंग तोमर, कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री कैलास चौधरी कृषी विभागाचे सचिव मनोज आहुजा वनस्पती वाणांचे संरक्षण आणि शेतकरी हक्क प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. त्रिलोचन मोहापात्राकृषी संशोधन आणि शिक्षण विभागाचे सचिव डॉ. हिमांशू पाठक (DARE)  आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

            यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते नव्याने बांधण्यात आलेले, ‘प्लांट अथॉरिटी भवन’ पीपीव्हीएफआर प्राधिकरणाचे कार्यालयआणि ऑनलाइन वनस्पती विविधता नोंदणी पोर्टलचे राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

याहामोगी माता बियाणे संवर्धन समितीची माहिती

              धडगाव तालुक्यात ‘बाएफ’ संस्थेमार्फत २०१० पासून  सुरु असलेल्या स्थानिक जैवविविधता  संवर्धन वृद्धी व प्रसार उपक्रमांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या याहामोगी माता बियाणे संवर्धन समितीमार्फत येथील जैवविविधता अबाधित राखून तिचे संवर्धन करण्यावर भर दिला जात आहे. लोक सहभागातून पिकांच्या स्थानिक वाणांचे संवर्धनउत्पादन आणि प्रसाराचे काम सुरू झाले. या माध्यमातून मकाज्वारीभरड धान्य पिकेकडधान्यांच्या शंभराहून अधिक वाणांचे संवर्धनअभ्यास आणि लागवड केली जाते. धडगावअक्कलकुवा तालुक्यातील 15 गावांमध्ये मकाज्वारीकडधान्येतेलबिया आणि भाजीपाला पिकांच्या १०८ स्थानिक पीक वाणांचे संवर्धन आणि बियाणे उत्पादन केले जाते. हरणखुरीचोंदवडे गावात दोन सामूहिक बियाणे बॅंकामार्फत मकाज्वारी आदी पिकांचे २५ टन बियाणे उत्पादन आणि १७० टन धान्य उत्पादन आणि विक्री करण्यात आली आहे. तसेच ज्वारीच्या जवळ - जवळ 19 जाती  शोधून काढल्या आहेत. त्यांचे शुध्दीकरणाचे काम केले असून यापैकी पाच जाती पीक वाण संवर्धन आणि शेतकरी हक्क प्राधिकरणशेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार यांच्याकडे नोंदणीकृत करुन घेण्यात आल्या आहेत. 

0000

अमरज्योत कौर अरोरा /वृ.क्र 170दि.12.09.2023

श्रावण आला ग, चला उद्योजिनी


 

एैस पैस गप्पा नीलमताईंशी" या पुस्तकाचे

 एैस पैस गप्पा नीलमताईंशी" या पुस्तकाचे

बुधवारी राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते प्रकाशन

            मुंबई, दि. 12 : विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे या राजकारण व महिलांचे प्रश्न या क्षेत्रांबरोबर एक लेखिका म्हणून महाराष्ट्राला सुपरिचित आहेत. बुधवार १३ सप्टेंबर, २०२३ रोजी सायंकाळी ५ वाजता राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते "एैस पैस गप्पा नीलमताईंशी" या पुस्तकाचे राजहंस प्रकाशन,पुणे या संस्थेद्वारे प्रकाशन करण्यात येणार आहे.


                   या प्रकाशन सोहळ्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, लेखक सदानंद मोरे, डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यासह या पुस्तकाचे शब्दांकन करणाऱ्या श्रीमती करुणा गोखले, सहभागी होणार आहेत.


            कार्यक्रमाचे संयोजन शीतल म्हात्रे, अंजली कुलकर्णी, जेहलम जोशी, सुनीता मोरे यांनी केले आहे.



००००


 


मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवानिमित्तआठही जिल्ह्यांत विविध कार्यक्रम

 मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवानिमित्तआठही जिल्ह्यांत विविध कार्यक्रम


सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला आढावा 

            मुंबई, दि. 12 : मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे या संदर्भातील तयारीचा आढावा घेतला.


            मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा अमृत महोत्सवानिमित्त स्वातंत्र्याचा तो इतिहास पुन्हा नव्या पिढीला कळावा, त्याकाळी निजामाविरुद्ध दिलेल्या लढ्यातून मिळवलेल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सर्वांनी मोठ्या उत्साहाने साजरा करावा, विविध कार्यक्रमांचे नियोजन करुन आठही जिल्ह्यांत ते आयोजित करावेत याबाबत मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी आढावा घेतला. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, उपसचिव विलास थोरात, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे आदी उपस्थित होते. दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे विभागीय आयुक्त, आठही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, पोलीस आयुक्त, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक उपस्थित होते.


             यावेळी मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी आठही जिल्ह्यात आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांची माहिती संबंधित अधिकारी यांच्याकडून घेतली. मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवानिमित्त मंत्रिमंडळ बैठकीचे आयोजनही औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) येथे करण्यात येणार आहे. याशिवाय, मुक्तीसंग्रामाचा इतिहास, तेथील हुतात्म्यांचे स्मरण, स्वातंत्र्य सैनिकांचा गौरव, आझादी दौड, प्रदर्शन, व्याख्यानमाला, असे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आठही जिल्ह्यातील प्रत्येक नागरिक या अमृतमहोत्सवी कार्यक्रमात सहभागी व्हावा, मुक्तीसंग्रामातून मिळवलेल्या या स्वातंत्र्याचे मोल त्याला कळावे, यासाठी कार्यक्रमांचे नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.


            आठही जिल्ह्यात चित्ररथाच्या माध्यमातून मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा लढा पोहोचावा, यासाठी त्यांनी सूचना दिल्या. प्रधान सचिव श्री. खारगे यांनीही संबंधित जिल्हाधिकारी आणि इतर अधिकारी यांच्याशी संवाद साधून तेथे आयोजित करण्यात येत असलेल्या कार्यक्रमांची माहिती घेतली आणि त्यांना सूचना केल्या. दिनांक 14 ते 17 सप्टेंबर या कालावधीत आठही जिल्ह्यात विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. काही जिल्ह्यात यानिमित्त सप्ताहाभर कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे.                                                  


0000





 

Tuesday, 12 September 2023

जाणता राजा

 


गणेशोत्सव मंडळांनी उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळ स्पर्धेत सहभागी व्हावे

 गणेशोत्सव मंडळांनी उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळ स्पर्धेत सहभागी व्हावे


- सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन


 


            मुंबई, दि. ११ : राज्य शासनाने १९ सप्टेंबर २०२३ पासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवात राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. या स्पर्धेत मुंबई शहर जिल्ह्यातील जास्तीत जास्त मंडळांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे, अशी माहिती मुंबई शहर जिल्ह्याचे जिल्हा नियोजन अधिकारी जी. बी. सुपकेर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये दिली आहे.  


            पर्यावरणपूरक सण साजरे व्हावेत, उत्सव साजरे करताना सामाजिक बांधिलकी जपावी, आपल्या संस्कृतीचे जतन व संवर्धन व्हावे याकरीता राज्य शासनाने उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या स्पर्धेसाठी मुंबई, मुंबई उपनगर, पुणे, ठाणे या जिल्ह्यातून प्रत्येकी ३ व अन्य जिल्ह्यातून प्रत्येकी एक या प्रमाणे उत्कृष्ट ४४ गणेशोत्सव मंडळांची निवड करण्यात येईल. या ४४ गणेशोत्सव मंडळांमधून राज्यातील पहिल्या क्रमांकाच्या उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळास पाच लाख रुपयांचे, द्वितीय क्रमांकास अडीच लाख रुपये, तर तृतीय क्रमांकास एक लाख रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल. उर्वरित ४१ गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनाकडून प्रत्येकी २५ हजार रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात येईल. या स्पर्धेत धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी केलेल्या किंवा स्थानिक पोलिसांकडे किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेची परवानगी घेतलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सहभागी होता येईल. या स्पर्धेसाठी १० ते २८ सप्टेंबर २०२३ पर्यंतचा कालावधी विचारात घेतला जाणार आहे. राज्य शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या ४ जुलै व ३० ऑगस्ट २०२३ रोजीच्या शासन निर्णयात स्पर्धेचा तपशील, स्पर्धा निवडीचे निकष नमूद केले आहेत. तसेच अर्जही उपलब्ध करून देण्यात आला आहे.


            अर्जाच्या या नमुन्यानुसार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या mahotsav.plda@gmail.com या ई- मेलवर १५ सप्टेंबर २०२३ पर्यंत अर्ज करावा. या स्पर्धेत जास्तीत जास्त मंडळांनी सहभाग नोंदवावा, असेही आवाहन मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी केले आहे. 


०००००


गोपाळ

 साळुंखे/ससं/


उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा :लोकजागृती आणि विकासाभिमुख प्रबोधनाला प्रोत्साहन

 उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा :लोकजागृती आणि विकासाभिमुख प्रबोधनाला प्रोत्साहन

            गणेशोत्सव हा सुरुवातीच्या काळात मुख्यत: धार्मिक स्वरुपाचा उत्सव म्हणून साजरा होत होता. त्याकाळी या उत्सवात प्रामुख्याने कथा कीर्तनादी कार्यक्रमही सादर केले जायचे. या गणेशोत्सवाला सामाजिक आणि सार्वजनिक स्वरूप 1893 सालापासून प्राप्त झाले. लोकजागृतीचे एक साधन म्हणून या उत्सवाचा उपयोग होईल हे ध्यानी घेत लोकमान्य टिळक आणि त्यावेळच्या नेत्यांनी या उत्सवाला व्यापक, सार्वजनिक व ज्ञानसत्रात्मक स्वरूप दिले.


उत्सवातून प्रबोधन


            समाजातील ऐक्य भावना वाढावी, या हेतूने पूजाअर्चादी धार्मिक विधींबरोबर कीर्तने, प्रवचने, व्याख्याने आदी सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम तसेच मेळे, पोवाडे, भावगीते, नकला, जादूचे प्रयोग असे मनोरंजनाचे कार्यक्रम सुरू झाले. गणेशोत्सव हे प्रचाराचे एक प्रभावी साधन करून पारतंत्र्यातील आपल्या बांधवांना संघटित करावे आणि राष्ट्रीय अस्मिता जागृत करावी, हाही त्यात उद्देश होता. नकळत धार्मिक प्रवृत्तीबरोबर राष्ट्रीय एकात्मतेची भावना वाढीस लागावी, या उद्देशाने मेळ्यातील पदे व पोवाडे रचण्यात आले. भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनात सार्वजनिक गणेशोत्सवाने केलेले लोकजागृतीचे कार्य उल्लेखनीय ठरते.


            सार्वजनिक गणेशोत्सवामुळे नवे नवे कलाकार उदयास आले. सर्वसामान्य नागरिकांनीही या उत्सवाशी स्वत:ला जोडून घेतले. स्वातंत्र्यपूर्व काळात सार्वजनिक गणेशोत्सवात व्याख्याने व प्रवचने देण्यासाठी बहुश्रुत पंडित, निष्णात वक्ते व थोर पुढारी येत. धार्मिक सलोखा राखण्यात सार्वजनिक गणेशोत्सव हे प्रभावी साधन ठरले होते.


स्वातंत्र्योत्तर काळातील बदलते स्वरुप


            गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप आल्यापासून आजतागायत त्यात अनेक स्थित्यंतरे झाली. स्वातंत्र्यपूर्व काळात या उत्सवाचे स्वरूप धार्मिक, सामाजिक व राष्ट्रीय होते. त्यात राष्ट्रीय एकात्मता, स्वदेशी यांवर भर असे. स्वातंत्र्योत्तर काळात सार्वजनिक गणेशोत्सवाचे स्वरूप बदलले. सामाजिक प्रबोधनाचे देखावे, विकासात्मक कामाचे देखावे, विविध क्षेत्रात होत असलेल्या प्रगतीचा आढावा घेणारे देखावे, त्या अनुषंगिक कार्यक्रम आयोजित करण्यात ही मंडळे आता पुढाकार घेताना दिसतात. गेल्या साठसत्तर वर्षांच्या अनुभवावरून लोकजागृती आणि सामाजिक प्रबोधनाचा वारसा अनेक सार्वजनिक मंडळांनी जपला आणि अव्याहतपणे तो अजूनही सुरुच आहे असे दिसून येते. अशा सामाजिक भावना, लोकजागृती, प्रबोधनात्मक काम करणाऱ्या नोंदणीकृत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना प्रोत्साहन देण्याची भूमिका राज्य शासनाने घेतली आहे.


राज्य शासनाचा पुढाकार


            सन 2022 पासून नोंदणीकृत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा राज्य शासन पारितोषिके देऊन गौरव करते. यावर्षीही गणेशोत्सवात राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार देण्यात येणार आहेत. राज्यस्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकांना अनुक्रमे पाच, अडीच आणि एक लाख रुपयांचे पारितोषिके देण्यात येणार आहेत. राज्य समितीकडे जिल्हास्तरीय समितीने निवड केलेल्या 44 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांपैकी वरीलप्रमाणे तीन विजेत्या गणेशोत्सव मंडळांना वगळून उर्वरित 41 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास राज्य शासनाकडून प्रत्येकी 25 हजार रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.



 


15 सप्टेंबरपर्यंत नावनोंदणी


            या स्पर्धेत अधिकाधिक नोंदणीकृत गणेशोत्सव मंडळांनी सहभाग नोंदवावा. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या mahotsav.plda@gmail.com या ई- मेल आयडीवर अथवा संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयात 15 सप्टेंबर 2023 पर्यंत नोंदणी करणे आवश्यक आहे. स्पर्धेची अधिक माहिती आणि अर्ज htttp://pldeshpandekalaacademy.org या संकेतस्थळावरही उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. विविध माध्यमातून या स्पर्धेबाबतची माहिती राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांपर्यंत पोहोचवली जात आहे. अधिक माहितीसाठी नोंदणीकृत गणेश मंडळांनी संपर्क क्रमांक 8169882898, 022-243122956 / 022-24365990 या क्रमांकावर कार्यालयीन वेळेत (सकाळी 10 ते सायंकाळी 6) अथवा स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयात संपर्क साधावा.


स्पर्धेचे निकष


             या पुरस्कारांसाठी निवड होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी विविध निकष असतील. धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी केलेल्या किंवा स्थानिक पोलिसांकडे परवानगी घेतलेल्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेची परवानगी घेतलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सहभागी होता येईल.


.... असे होणार गुणांकन


            या स्पर्धेसाठी पर्यावरणपूरक मूर्ती, पर्यावरणपूरक सजावट (थर्मोकोल, प्लास्टिक विरहित), ध्वनिप्रदूषण रहित वातावरण, पाणी वाचवा, मुलगी वाचवा, अंधश्रद्धा निर्मूलन आदी समाजप्रबोधन, सामाजिक सलोख्यासंदर्भातील सजावट, देखावा, स्वातंत्र्याच्या चळवळीसंदर्भात, छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक वर्षानिमित्ताने सजावट, देखावा, गणेशोत्सव मंडळाने रक्तदान शिबिर, वर्षभर गडकिल्ले संवर्धन, पर्यावरण रक्षण, सेंद्रीय शेती, सौर ऊर्जेबद्दल जागरुकता निर्माण करणे, रुग्णवाहिका (ॲम्ब्युलन्स) चालविणे, वैद्यकीय केंद्र चालविणे आदी सामाजिक कार्य, शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, आरोग्य आदीबाबत केलेले कार्य, महिला, ग्रामीण भागातील वंचित घटकांच्या शैक्षणिक, आरोग्य, सामाजिक आदीबाबत केलेले कार्य, पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा, पारंपरिक, देशी खेळांच्या स्पर्धा, गणेश भक्तांसाठी देत असलेल्या प्राथमिक सुविधा उदा. पाणी, प्रसाधनगृह, वैद्यकीय प्रथमोपचार, वाहतुकीस अडथळा येणार नाही, असे आयोजन, आयोजनातील शिस्त, परिसरातील स्वच्छता अशा विविध निकषांसाठी गुणांकन दिले जाणार आहे.


निवड समिती


            विजेत्यांच्या निवडीसाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी या समितीचा अध्यक्ष असेल. याशिवाय या समितीत शासकीय कला महाविद्यालयातील कला प्राध्यापक, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, आरोग्य अधिकारी, पोलिस अधिकारी सदस्य असतील, तर जिल्हा नियोजन अधिकारी सदस्य सचिव असतील. निवड समिती प्रत्यक्ष उत्सवस्थळी भेट देतील तसेच मंडळाकडून व्हीडीओग्राफी व कागदपत्र जमा करुन घेतील. जिल्हास्तरीय समितीकडून प्रत्येक गणेशोत्सव मंडळाबाबत अभिप्रायासह गुणांकन करण्यात येईल. सदर समिती मुंबई, मुंबई उपनगर, पुणे, ठाणे या 4 जिल्ह्यातून प्रत्येकी 3 व अन्य जिल्हयातून प्रत्येकी 1 उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळाची शिफारस करुन त्यांची नावे सर्व कागदपत्र व्हीडीओसह राज्य समितीकडे सादर करेल.


            गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणाऱ्या मंडळांना प्रोत्साहन देण्याचे काम राज्य शासन करीत आहे. गणेश मंडळांकडून त्याला अधिकाधिक प्रतिसाद मिळतोय. तो वाढताच राहील, यात शंका नाही. गणपती बाप्पा मोरया!!!


000


                                                                    

   --- दीपक चव्हाण, विभागीय संपर्क अधिकारी

Featured post

Lakshvedhi