Wednesday, 30 August 2023

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हत्तींचा उपद्रव थांबविण्यासाठीगणेशोत्सवापूर्वी उपाययोजना कराव्यात

 सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हत्तींचा उपद्रव थांबविण्यासाठीगणेशोत्सवापूर्वी उपाययोजना कराव्यात


- वन मंत्री सुधीर मुनगंटीवार


            मुंबई, दि. 29 : सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जंगली हत्तींपासून नागरिकांचे आणि शेतीचे नुकसान होत आहे. हत्तींचा हा उपद्रव थांबविणे गरजेचे आहे. यासाठी पाळीव हत्तींच्या माध्यमातून त्यांना परतवून लावणे, हत्तींना मर्यादित जागेत बंदिस्त ठेवणे, यासाठी पश्चिम बंगालमधून प्रशिक्षित मनुष्यबळ मागविणे, कर्नाटकमधून हत्ती सिंधुदुर्ग जिल्ह्यात येऊ नयेत यासाठी बंदोबस्त करणे, घरे आणि शेतीची नुकसान भरपाई वाढवून मिळण्यासाठी प्रस्ताव सादर करणे आदी उपाययोजना करण्यात याव्यात, असे निर्देश वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वन विभागाला दिले. या उपाययोजनांबाबत येत्या गणेशोत्सवापूर्वी निर्णय घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.


            शालेय शिक्षण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या विनंतीनुसार वन मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मंत्री श्री. केसरकर यांच्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, स्थानिक लोकप्रतिनिधी, वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाळ रेड्डी, प्रधान मुख्य वन संरक्षक (वनबल प्रमुख) वाय. एल. पी. राव, अपर प्रधान मुख्य वन संरक्षक लेमेंट बेन, कोल्हापूरचे मुख्य वन संरक्षक रामानुजन, सावंतवाडी क्षेत्राचे उप वनसंरक्षक नवकिशोर रेड्डी यांच्यासह दोडामार्ग परिसरातील रहिवासी यावेळी उपस्थित होते.


            मंत्री श्री. केसरकर यांनी हत्तींना मर्यादित जागेत ठेवण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली असल्याची माहिती दिली. याबाबत बोलताना मंत्री श्री.मुनगंटीवार म्हणाले की, याबाबतचा प्रस्ताव तातडीने केंद्र सरकारकडे पाठवून परवानगी घ्यावी. त्याचबरोबर कर्नाटकमधून नवीन हत्ती येऊ नयेत याचा बंदोबस्त करावा. येथील हत्ती इतरत्र घेऊन जाण्यास कोणी तयार असतील, तर ती शक्यता पडताळून पाहावी. पश्चिम बंगालमध्ये हत्तींना परत पाठविणारे प्रशिक्षित मनुष्यबळ आहे, त्यांना सिंधुदुर्गसाठी आणण्यात यावे. हत्तींमुळे होणाऱ्या नुकसानाची भरपाई वाढवून मिळण्यासाठी घर आणि इतर साहित्य तसेच शेतीमालाची वर्गवारी करून सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कोल्हापूर, गडचिरोली, गोंदिया आदी जिल्ह्यांसाठी सुधारित प्रस्ताव तातडीने सादर करावा. यासाठी नुकसान भरपाईबाबत इतर राज्यांच्या नियमांचा अभ्यास करावा. दोडामार्ग जिल्ह्यात पडलेल्या झाडांच्या वाहतुकीस परवानगी मिळण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देशही त्यांनी दिले.


            पालकमंत्री श्री.चव्हाण म्हणाले की, हत्तींची समस्या अनेक वर्षांपासून आहे. त्यामुळे ज्या उपाययोजनांमुळे लाभ होईल, अशा उपाययोजना करण्यावर भर द्यावा. पश्चिम बंगाल येथील प्रशिक्षित मनुष्यबळ आणून त्यांना दोन वर्षांसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठेवावे.


            मंत्री श्री.केसरकर म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांचे जीवन मुख्यत: फळबागायतीवर आधारित आहे. नारळ, सुपारी, काजू ही येथील मुख्य उत्पादने आहेत. या उत्पादनांची फळे हाती येण्यात अनेक वर्षे लागतात. हत्तींमुळे या झाडांचे नुकसान झाल्यास अनेक वर्षांचे परिश्रम वाया जातात. त्यामुळे हत्ती नागरी तसेच शेती क्षेत्रात येऊ नयेत ही रहिवाशांची प्रमुख मागणी आहे. हत्ती नागरी क्षेत्रात येऊ नयेत यासाठी हत्ती संरक्षण क्षेत्र निश्चित करून दिले आहे. ते सलग करून हत्ती त्या परिघाबाहेर येणार नाहीत, यासाठी उपाय योजावेत.


            यावेळी वन विभागामार्फत हत्तींपासून होणारा उपद्रव थांबविण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत सादरीकरणाद्वारे माहिती देण्यात आली. तिलारी खोऱ्यातील हत्तींना धरण क्षेत्रातील निर्मनुष्य भागात पाठविणे, हत्ती हाकारा गटामार्फत गस्त घालणे, सौरऊर्जा कुंपण, स्टील रोप फेन्सिंग, हँगिंग फेन्सिंग आदी उपाययोजनांबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.


0000

गणेशमंडळांनी उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेत सहभाग घ्यावा

 गणेशमंडळांनी उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेत सहभाग घ्यावा


- सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार


15 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन


 


            मुंबई, दि. 29 : गणेश मंडळांना प्रोत्साहन देण्यासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या अधिनस्थ पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीतर्फे सन २०२२ पासून उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा सुरु करण्यात आली. यावर्षी आयोजित उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेत जास्तीत जास्त गणेशमंडळांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.


            या स्पर्धेची माहिती सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या संकेतस्थळावर देण्यात यावी. तसेच राज्यातील नागरिकांना घरबसल्या राज्यातील विविध गणेश मंडळाच्या गणपतींचे दर्शन व त्यांच्या सजावटीचा आनंद घेता यावा यासाठी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अर्ज करणाऱ्या गणेश मंडळाची छायाचित्रे संकेतस्थळावर प्रसिद्ध करावीत, अशा सूचना सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी दिल्यात. 


            मंत्रालयातील समिती सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत मंत्री श्री. मुनगंटीवार बोलत होते. यावेळी सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, उपसचिव विद्या वाघमारे, पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीचे संचालक संतोष रोकडे, उपसंचालक विद्यारत्न काकडे, माहिती व जनसंपर्कचे उपसंचालक (वृत्त) दयानंद कांबळे, अवर सचिव सु.वि.पासी उपस्थित होते.


            मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, यावर्षी सहभागी होणाऱ्या गणेशोत्सव मंडळांची सविस्तर माहिती, गणेशोत्सव सुरू झाला त्या संदर्भातील माहिती, गणेशाची पूजा-अर्चना यासंदर्भात माहिती देण्यासाठी आकाशवाणीवर 30 मिनिटांचा विशेष कार्यक्रम करण्यात यावा.


            स्पर्धेत पुरस्कार प्राप्त गणेश मंडळांना मुंबईतील सिद्धिविनायकाच्या दर्शनाचे पासेस देण्यात यावेत. गिरगावमध्ये पहिला गणेशोत्सव आयोजित करणाऱ्या व्यक्तीचा, त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा सत्कार करण्यात यावा. गणेश मंडळांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, नगर परिषद मुख्याधिकारी यांना सूचना देण्यात याव्यात. तसेच स्पर्धेची सर्व माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी करावी, असेही मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.


उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेचे वेळापत्रक असे


            उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेत सहभागी होण्यासाठी गणेश मंडळांना 15 सप्टेंबर 2023 पर्यंत स्पर्धेत अर्ज करता येईल. mahotsav.plda.@gmail.com या ई - मेलवर गणेशमंडळांनी अर्ज करावा. पु. ल. देशपांडे कला अकादमी तर्फे ई-मेलवर प्राप्त अर्ज संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाला १८ सप्टेंबर पर्यंत परीक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात येईल. १९ ते २८ सप्टेंबर दरम्यान जिल्हास्तरीय समितीचे सदस्य स्पर्धेत सहभागी गणेशोत्सव मंडळाचे प्रत्यक्ष भेटी देऊन परीक्षण करतील. व्हिडिओग्राफी आणि कागदपत्रे तपासून अभिप्रायासह गुणांकन करतील. जिल्हास्तरीय समिती जिल्ह्यातून एका उत्कृष्ट गणेश मंडळाची शिफारस १ ऑक्टोबरपर्यंत पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीला करतील. राज्यस्तरीय समिती राज्यातील उत्कृष्ट ३ गणेश मंडळाची शिफारस पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीला करतील. त्यानुसार कला अकादमी विजेत्या मंडळाची घोषणा करुन १२ ऑक्टोबरला विजेत्या गणेश मंडळाला पुरस्कार प्रदान करण्यात येईल. 


गणेशमंडळांना देण्यात येणाऱ्या पुरस्काराचे स्वरुप


            राज्यातील पहिल्या तीन विजेत्या गणेशमंडळांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे, त्या पुरस्काराचे स्वरूप असे आहे. यामध्ये प्रथम पुरस्कार ५ लक्ष रुपये व प्रमाणपत्र, द्वितीय पुरस्कार २ लक्ष ५० हजार रुपये व प्रमाणपत्र , तृतीय पुरस्कार १ लक्ष रुपये व प्रमाणपत्र तसेच जिल्ह्यातील एका उत्कृष्ट गणेश मंडळाला २५ हजार रुपये व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल.


००००



मनीषा सावळे/विसंअ/



 


अप्पर वर्धा प्रकल्प बाधितांच्या मागण्यांबाबत १५ दिवसांत बैठक

 अप्पर वर्धा प्रकल्प बाधितांच्या मागण्यांबाबत १५ दिवसांत बैठक


मुख्यमंत्र्यांचे आश्वासन


 


          मुंबई, दि. २९ : अप्पर वर्धा प्रकल्प बाधितांच्या पुनर्वसन व अनुषंगिक मागण्यांबाबत येत्या १५ दिवसांत बैठक घेऊन सकारात्मक तोडगा काढण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. त्यासाठी या बाधित गावातील जमीन, पुनर्वसनाचे पर्याय यांबाबत सर्वंकष आढावा घेऊन माहिती तयार करण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.


          प्रकल्प बाधितांच्या प्रतिनिधींसमवेत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आढावा बैठकीत संवाद साधला. या प्रकल्पामुळे अमरावती, नागपूर व वर्धा जिल्ह्यातील 42 गावे बाधित झाली आहेत. यातील बाधितांना जमिनीच्या बदल्यात जमीन, धरणग्रस्तांसाठी प्रतीक्षा यादी, ज्यांना नोकरी शक्य नाही, त्यांना नुकसान भरपाई अशा विविध पर्यायांबाबत चर्चा झाली. या प्रश्नावर ठोस तोडगा काढण्यासाठी शासन सकारात्मक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. प्रकल्प बाधितांच्या मागण्यांबाबत सर्वंकष आढावा घेण्यात यावा. त्यासाठी डेटाबेस तयार करण्यात यावा, त्यानंतर येत्या १५ दिवसांत याबाबत बैठक आयोजित करण्यात यावी, असे निर्देशही त्यांनी दिले.


          मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी माहिती एकत्र करण्याबाबत लगेचच वर्धाच्या जिल्हाधिकाऱ्यांना दूरध्वनीद्वारेही निर्देश दिले. याबाबत प्रकल्पग्रस्तांशी जलसंपदा विभाग आणि मदत व पुनर्वसन विभागाने समन्वय साधून विविध उपाययोजना, तोडग्यांचे पर्याय तयार ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या. बैठकीस प्रकल्प बाधितांचे प्रतिनिधी साहेबराव गिधडे, आनंदराव गावंडे, विनायक कुरवाडे, हरिभाऊ साठवले, दीपक पाटील, प्रवीण सातपुते, विनोद विरुळकर आदी उपस्थित होते.

मुंबईकरांच्या सेवेत रुजू होणार रुग्णमित्र हेल्प डेस्क

 मुंबईकरांच्या सेवेत रुजू होणार रुग्णमित्र हेल्प डेस्क


- पालकमंत्री मंगल प्रभात लोढा


 


          मुंबई, दि. २९ : मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी नागरिकांच्या मदतीसाठी मुंबई महानरपालिकेची प्रमुख रुग्णालये आणि उपनगरीय रुग्णालयांमध्ये एक हेल्प डेस्क असावा असे सूचित केले होते. त्या अनुषंगाने मुंबई महानगरपालिकेद्वारे हेल्प डेस्क सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. या हेल्प डेस्कचे नाव रुग्णमित्र असे ठेवण्यात आले असून रुग्णालयांच्या प्रमुख द्वारापाशी अथवा नोंदणी कक्षाच्या ठिकाणी हेल्प डेस्क कक्ष स्थापन करण्यात येईल.


          प्रमुख रुग्णालयात पहाटे ३, दुपारी २ आणि रात्री १ याप्रमाणे, तर उपनगरीय रुग्णालयांमध्ये पहाटे २ आणि दुपारी २ या प्रमाणे हेल्प डेस्कसाठी आवश्यक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येईल. रुग्ण व त्यांच्या कुटुंबाला मदतीसाठी, वेळेप्रसंगी आधार देण्यासाठी नम्र, उत्तम संवाद कौशल्य असलेले आणि संवाद कौशल्य आत्मसात केलेले कर्मचारी नियुक्त करण्यात येतील. या कर्मचाऱ्यांचे मराठी, हिंदी, इंग्रजी या तिन्ही भाषांवर प्रभुत्व असेल. त्याचबरोबर संगणक हाताळण्याचे सुद्धा त्यांना संपूर्ण ज्ञान असेल.


          या हेल्प डेस्क वर संगणक, दूरध्वनी, नोंदणी पुस्तिका आणि सूचना पेटीची व्यवस्था सुद्धा असे

ल.


0000


Tuesday, 29 August 2023

राज्यात जपानच्या धर्तीवर ऑलिम्पिक भवन उभारणार

 राज्यात जपानच्या धर्तीवर ऑलिम्पिक भवन उभारणार

- क्रीडा मंत्री संजय बनसोडे


            मुंबई, दि. २९ : खेळाडूंना जागतिकस्तरावर उत्तम कामगिरी करता यावी, यासाठी क्रीडा धोरणात बदल करणार असून, जपानच्या धर्तीवर राज्यात लवकरच ऑलिम्पिक भवन उभारणार असल्याची माहिती क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी दिली.


       हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात येतो. यानिमित्त जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी (मुंबई शहर) यांच्यावतीने जिल्हा क्रीडा पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन धारावीतील भारतरत्न राजीव गांधी जिल्हा क्रीडा संकुल येथे करण्यात आले होते. खेळाडू आणि प्रशिक्षकांना जिल्हा क्रीडा पुरस्कार प्रदान करून त्यांच्या सन्मानार्थ आयोजित कार्यक्रमात मंत्री श्री. बनसोडे बोलत होते. रोख 10 हजार रुपये सन्मानपत्र आणि चषक असे या पुरस्काराचे स्वरूप होते.


            मंत्री श्री. बनसोडे यांनी जीवन गौरव पुरस्कार प्राप्त उदय देशपांडे, अर्जुन पुरस्कार प्राप्त हिमानी परब, शिव छत्रपती पुरस्कार विजेते रणजित तांबे यांचाही सन्मान केला.


            मंत्री श्री. बनसोडे म्हणाले की, राज्यातील खेळाडूंनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावर उत्तम कामगिरी करावी यासाठी विविध क्रीडा संघटनांशी चर्चा करून क्रीडा धोरणात बदल करण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा विद्यापीठ पुणे येथे स्थापन करण्यात आले असून क्रीडा तज्ज्ञाची कुलगुरू म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. क्रीडा विज्ञान (स्पोर्टस् सायन्स) सारखे नवीन विषय सुरू करून, लक्षवेध योजना अमलात आणणार आहे. महिला खेळाडूही मोठ्या संख्येने यश प्राप्त करीत असून, आंतरराष्ट्रीयस्तरावरही ते यश संपादन करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचा 15 जानेवारी हा जन्मदिन ‘राज्य क्रीडा दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.  


            सन 2022-23 करिताचे जिल्हा क्रीडा पुरस्कार गुणवंत खेळाडू पुरुष (जिमनॅस्टिक) चैतन्य देशमुख, गुणवंत खेळाडू महिला (पावरलिफ्टिंग) समृध्दी देवळेकर, थेट पुरस्कार (तायक्वांदो) श्रेया जाधव, तर गुणवंत क्रीडा मार्गदर्शक (बास्केटबॉल) सय्यद रहिमतुल्ला यांना प्रदान करून त्यांचा सन्मान करण्यात आला.


            सन 2021-22 साठीचे जिल्हा क्रीडा पुरस्कार गुणवंत खेळाडू पुरुष (पॉवर लिफ्टिंग) अजिंक्य पडवणकर, गुणवंत खेळाडू महिला (जिमॅस्टिक- रिदमिक) परिना मदनपोत्रा, थेट पुरस्कार साहील उत्तेकर (पॉवर लिफ्टिंग), (जिमॅस्टिक) अंजलिका फर्नांडिस, सृष्टी पटेल, मिहिका बांदिवडेकर, अनन्या सोमण, सानिया कुंभार, वैभवी बापट, सौम्या परुळेकर, निश्का काळे, गुणवंत क्रीडा मार्गदर्शक (बास्केटबॉल)मो. नसीर अहमद अन्सारी यांना तसेच मेजर ध्यानचंद क्रीडा स्पर्धेच्या विजेत्यांनाही पुरस्कार प्रदान करून त्यांचा सन्मान करण्यात आला. 


            जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, जिल्हा क्रीडा अधिकारी अभय चव्हाण, उपजिल्हाधिकारी राजेंद्र काटकर, शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त वर्षा उपाध्याय यांच्यासह खेळाडू उपस्थित होते. विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन व जिमॅस्टिक, रस्सीखेच या खेळांचे सादरीकरण यावेळी करण्यात आले होते.


000

अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती कल्याण समितीनेराज्याच्या योजनांचा घेतला आढावा

 अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती कल्याण समितीनेराज्याच्या योजनांचा घेतला आढावा

       मुंबई, दि. २९ : अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती कल्याण विषयक संसदीय समितीने आज राज्याच्या अनुसूचित जाती, जमातीबाबत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचा आढावा घेतला. ही बैठक खासदार किरीट सोळंकी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.


          अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती कल्याण संसदीय समितीची हॉटेल ताज येथे आज बैठक झाली. या बैठकीस समितीचे सदस्य उपस्थित होते.


          या बैठकीत आदिवासी विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती आदिवासी विकास विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली. तर सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची माहिती विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी सादरीकरणाच्या माध्यमातून समितीस दिली. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) यांनी इंदू मिल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या होणाऱ्या स्मारकाबाबत माहिती देणारी चित्रफित सादर केली.


       या बैठकीस मुख्य सचिव मनोज सौनिक, गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर- सिंह, कौशल्य विकास विभागाचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिव अश्विनी जोशी, अपर पोलिस महासंचालक (नाहसं) श्री. सुखविंदर सिंग तसेच मंत्रालयीन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


0000


शैलजा देशमुख/विसंअ/

प्रकल्पग्रस्तांना नागरी सुविधा देण्याचाप्रस्ताव आराखड्यासह सादर करावा

 प्रकल्पग्रस्तांना नागरी सुविधा देण्याचाप्रस्ताव आराखड्यासह सादर करावा


- मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील


            मुंबई, दि. 29 : पुणे जिल्ह्यात नीरा नदीवर बांधण्यात आलेल्या वीर धरणामुळे बाधित झालेल्या खंडाळा तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांना नागरी सुविधा देण्याबाबतचा परिपूर्ण प्रस्ताव संबंधित यंत्रणेने आराखड्यासह सादर करावा, तसेच राज्यातील याविषयीचे अन्य प्रस्ताव सादर करावेत, असे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी आज येथे दिले.


            खंडाळा तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांना नागरी सुविधा देण्याबाबत आयोजित बैठकीत मंत्री श्री. पाटील बोलत होते. यावेळी आमदार मकरंद पाटील, आमदार शशिकांत शिंदे, साताऱ्याचे अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, सोलापूरचे अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, सातारा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता अ.श. नाईक, उरमोडीचे कार्यकारी अभियंता अमर काशीद, जिहे कठापूर उपसा सिंचन योजनेचे कार्यकारी अभियंता अ.प.निकम आणि संबंधित पुनर्वसनचे उपजिल्हाधिकारी उपस्थित होते.


            मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले की, वीर धरणामुळे खंडाळा तालुक्यातील तोडल, भोळी, लोणी ही गावे पूर्णत: बाधित, तर विंग, भादे, शिरवळ, वाठार ही गावे अंशत: बाधित झाली आहेत. हा प्रकल्प सन 1976 पूर्वीचा असल्याने प्रकल्पाला पुनर्वसन कायदा लागू होत नाही. यामुळे या गावातील नागरिकांना नागरी सुविधा देण्याबाबतचा प्रस्ताव एक महिन्यात पाठवावा.


            आमदार श्री. पाटील यांनी मार्च, एप्रिल 2023 ला झालेल्या गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्यापही मदत मिळाली नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. यावर मंत्री श्री. पाटील यांनी गारपीटग्रस्त शेतकऱ्यांचा प्रस्ताव तातडीने मंजूर करण्याचे निर्देश दिले. तसेच संरक्षक भिंतीबाबत जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम, वन, वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची जिल्हास्तरीय संयुक्त बैठक घेऊन केंद्राच्या निकषानुसार आराखड्यासह प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.


            ज्याठिकाणी अतिवृष्टी होऊन गावे बाधित होतात, घरे पडतात तिथे जिओग्राफिकल सर्व्हे ऑफ इंडियाला (जीआयएस) सर्वे करण्यास सांगितले जाईल. बाधितांचे कायमचे पुनर्वसन करण्यासाठी नेमकी किती जागा लागते, याची माहिती घ्या. पुनर्वसनासाठी जागा अपुरी पडत असल्यास त्याबाबत मंत्रिस्तरावर निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाहीही मंत्री श्री. पाटील यांनी दिली.


            गावठाण जमिनी नावावर होण्यासाठी नगरविकास, महसूल, ग्रामविकास या विभागांची सचिवस्तरावर बैठक घेवून निर्णय घेतला जाईल. सातारा जिल्ह्यातील विविध प्रकल्पबाधितांना मंगळवेढा (जि. सोलापूर) येथे जमिनी मिळाल्या आहेत. मात्र, त्यांना अद्यापही ताबा मिळाला नसल्याने संबंधित जिल्हाधिकारी, पोलीस यंत्रणा यांनी जमिनींचा ताबा प्रकल्पबाधितांना मिळण्यासाठी सहकार्य करण्याचे निर्देशही मंत्री श्री. पाटील यांनी दिले.


००००

Featured post

Lakshvedhi