Thursday, 24 August 2023

ग्रामविकास विभागाच्या भरतीप्रक्रियेतील उमेदवारांनीकोणत्याही प्रलोभनास बळी पडू नये

 ग्रामविकास विभागाच्या भरतीप्रक्रियेतील उमेदवारांनीकोणत्याही प्रलोभनास बळी पडू नये


- मंत्री गिरीश महाजन


 


            मुंबई, दि. २३ :- ग्रामविकास विभागाच्या परिक्षेची संपूर्ण भरतीप्रक्रिया शासनाने मान्यता दिलेल्या आय.बी.पी.एस. या कंपनीमार्फत राबविण्यात येत आहे. त्यामुळे सदर परीक्षा अत्यंत पारदर्शक व काटेकोर पद्धतीने होणार आहे. तथापि, काही समाजविघातक प्रवृत्तीच्या व्यक्तींकडून प्रलोभने दाखवून आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा फसवणूकीपासून उमेदवारांनी दक्षता घ्यावी, तसेच अशाप्रकारच्या कोणत्याही प्रलोभनास बळी पडू नये, असे आवाहन ग्रामविकास व पंचायत राज मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे.


            मंत्री श्री. महाजन म्हणाले की, ग्रामविकास व पंचायत राज विभागांतर्गत राज्यातील 34 जिल्हा परिषदांतर्गत गट - क मधील 30 संवर्गातील एकूण 19 हजार 460 इतकी रिक्त पदे सरळसेवेने भरण्याबाबतची जाहिरात दि. 05 ऑगस्ट, 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. जाहिरातीनुसार दि. 05 ते 25 ऑगस्ट, 2023 पर्यत ऑनलाईन पद्धतीने उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत.


              ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी सांगितले आहे की, फसवणूक झाल्यास शासन अथवा जिल्हा परिषद जबाबदार राहणार नाही. कोणतीही व्यक्ती परिक्षेसंदर्भात आर्थिक मागणी करीत असल्याबाबत निदर्शनास आल्यास त्यांच्याविरुद्ध जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात यावी, असे सर्व उमेदवारांना आवाहन करण्यात येत आहे.



वांद्रे-वर्सोवा सागरी मार्ग कामाचीमंत्री दादाजी भुसे यांनी केली पाहणी

 



वांद्रे-वर्सोवा सागरी मार्ग कामाचीमंत्री दादाजी भुसे यांनी केली पाहणी


 


            मुंबई, दि. २३ :- सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादाजी भुसे यांनी आज वांद्रे- वर्सोवा सागरी मार्गाच्या कामाची पाहणी वांद्रे येथे केली. यावेळी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड, मुख्य अभियंता सुनील भुतडा, कार्यकारी अभियंता नितीन बोरोले व कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.


              याप्रसंगी मंत्री श्री. भुसे यांनी वांद्रे - वर्सोवा सागरी महामार्ग, जुहू जोडणी रस्ता, वर्सोवा जोडणी रस्ता, वांद्रे येथील जेट्टी बांधकामाची माहिती घेत सद्य:स्थिती जाणून घेतली. तसेच अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. कामाचे टप्पे करून प्राधान्यक्रम ठरविण्यात यावा, त्यानुसार कामाचे नियोजन करावे, अशा सूचनाही मंत्री श्री. भुसे यांनी यावेळी दिल्या.


००००

वरिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

 वरिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक


- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील


             मुंबई दि. 23 : उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या विविध प्रश्नांसंदर्भात शासन सकारात्मक असून वित्त विभागाशी चर्चा करून प्रश्न सोडवले जातील, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.


               मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विधान परिषद, विधान सभेच्या सदस्यांकडून उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत वरिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांच्या विविध प्रश्न संदर्भात निवेदनाच्या अनुषंगाने मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार कपिल पाटील, आमदार विक्रम काळे, आमदार जयंत आसगावकर, आमदार डॉ. मनीषा कायंदे, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, उच्च व तंत्रशिक्षण संचालक डॉ.शैलेंद्र देवळाणकर, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे उपसचिव अजित बाविस्कर व संबंधित अधिकारी उपस्थित होते


                मंत्री श्री.पाटील म्हणाले की, सहयोगी प्राध्यापक व प्राध्यापकांना देय दिनांकापासून कॅसचे लाभ लागू करण्यात यावेत. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये प्राधान्याने प्राध्यापक भरती आणि महाविद्यालयांना अनुदान देण्याबाबत शासन कार्यवाही करत आहे. आदिवासी भागातील महाविद्यालय, नक्षलग्रस्त भागातील महाविद्यालय, अल्पसंख्याक महाविद्यालय, डोंगरी भागातील विद्यालय अशा सात ते आठ वर्गवारीतून आपण हा विषय अनुदानाचा, प्राध्यापक भरतीचा पूर्ण करत आहोत. या सर्व कामासाठी लागणाऱ्या निधीसाठी वित्त विभागाशी चर्चा करण्यात येईल, असेही मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.


                  केंद्र सरकार व विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार 100 टक्के प्राध्यापक भरती करण्यात येईल. तसेच सुरू असलेली प्राध्यापक भरतीची प्रक्रिया गतिमान करून वेळेत पूर्ण करण्यात येईल. यासाठी लागणाऱ्या आर्थिक तरतुदी संदर्भात वित्त विभागाशी चर्चा करण्यात येईल, असेही मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.


0000

धर्मादाय रुग्णालयांची माहिती आता ‘आरोग्य आधार’ ॲपवर

 धर्मादाय रुग्णालयांची माहिती आता ‘आरोग्य आधार’ ॲपवर


- मंत्री डॉ. तानाजी सावंत


            मुंबई, दि. २३ :- आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांना धर्मादाय रुग्णालयात सवलतीच्या दराने वैद्यकीय सेवा दिल्या जातात. या रुग्णालयांची अद्ययावत माहिती रुग्णांना ‘आरोग्य आधार’ या ॲपद्वारे तत्काळ मिळणार असल्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी सांगितले.


            धर्मादाय रुग्णालयांतर्गत सुविधा रुग्णांपर्यंत पोहोचविणे, हॉस्प‍िटल रजिस्ट्रेशन पोर्टलचे सादरीकरण, एनएचएम पीआयपी २०२३-२४ सद्यस्थितीतील प्रगतीचा आढावा, आरोग्य संस्थांच्या बृहत आराखड्याचे सादरीकरण संदर्भात बैठकीचे मंत्रालयात आयोजन करण्यात आले होते, यावेळी मंत्री डॉ. सावंत बोलत होते.


            मंत्री डॉ. सावंत म्हणाले की, धर्मादाय रुग्णालयाच्या कार्याबाबत आदर्श कार्यप्रणाली तयार करताना पारदर्शी काम व्हावे, यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. धर्मादाय रुग्णालयाची माहिती तत्काळ उपलब्ध व्हावी यासाठी, ‘आरोग्य आधार’ ॲप रुग्णांच्या सेवेत येणार आहे. या ॲपद्वारे रुग्णांना जवळचे धर्मादाय रुग्णालय, तिथे उपलब्ध असलेल्या सुविधा, उपलब्ध खाटांची संख्यांची माहिती तसेच तत्काळ खाट राखीव करता येणार आहे. वॉर रुम, आरोग्यदूत, धर्मादाय रुग्णालय आणि व्यवस्थापनाला यासंदर्भात माहिती एकाच वेळी मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले.


            राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत तालुकास्तरावर आरोग्य सुविधेसाठी तालुका किंवा जिल्ह्यातील लोकसंख्येनुसार जिल्हा रुग्णालय, कर्करोग रुग्णालय, केमोथेरपी डे-केअर सेंटर, रेडिओ थेरपी ट्रिटमेंट युनिटसाठी प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी दिले.


            तसेच नर्सिंग होम ॲपमध्ये रुग्णालय आणि डॉक्टरांच्या प्रमाणपत्रांची त्रयस्थ पडताळणी करण्यात यावी. पदवीच्या सत्यतेची तपासणी करण्यात यावी, असे निर्देशही मंत्री डॉ. सावंत यांनी दिले.


            भौगोलिक माहिती प्रणालीद्वारे प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, सामान्य रुग्णालय, महिला व बाल आरोग्य केंद्र यांची मोजणी करण्यात आली आहे. केवळ अंतर आणि जिल्हा यानुसार केंद्रांची मागणी न करता जिल्ह्यातील लोकसंख्येनुसार आरोग्य केंद्र आणि उपकेंद्राची मागणी करण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही मंत्री डॉ. सावंत यांनी दिले.


            बैठकीस आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, आयुक्त धीरजकुमार, धर्मादाय आयुक्त श्री. महाजन यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.


०००

धर्मादाय रुग्णालयांची माहिती आता ‘आरोग्य आधार’ ॲपवर

 धर्मादाय रुग्णालयांची माहिती आता ‘आरोग्य आधार’ ॲपवर

- मंत्री डॉ. तानाजी सावंत


            मुंबई, दि. २३ :- आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांना धर्मादाय रुग्णालयात सवलतीच्या दराने वैद्यकीय सेवा दिल्या जातात. या रुग्णालयांची अद्ययावत माहिती रुग्णांना ‘आरोग्य आधार’ या ॲपद्वारे तत्काळ मिळणार असल्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी सांगितले.


            धर्मादाय रुग्णालयांतर्गत सुविधा रुग्णांपर्यंत पोहोचविणे, हॉस्प‍िटल रजिस्ट्रेशन पोर्टलचे सादरीकरण, एनएचएम पीआयपी २०२३-२४ सद्यस्थितीतील प्रगतीचा आढावा, आरोग्य संस्थांच्या बृहत आराखड्याचे सादरीकरण संदर्भात बैठकीचे मंत्रालयात आयोजन करण्यात आले होते, यावेळी मंत्री डॉ. सावंत बोलत होते.

व्याज परतावा कर्ज योजनेच्या ऑनलाईन पोर्टलचे मंत्री अतुल सावे यांचे हस्ते उद्घाटन इतर मागास प्रवर्गातील तरुण उद्योजकांनी योजनेचा लाभ घ्यावा

 व्याज परतावा कर्ज योजनेच्या ऑनलाईन पोर्टलचे मंत्री अतुल सावे यांचे हस्ते उद्घाटन

इतर मागास प्रवर्गातील तरुण उद्योजकांनी योजनेचा लाभ घ्यावा


- मंत्री अतुल सावे


 


            मुंबई, दि. २४ : राज्यातील इतर मागास प्रवर्गातील उद्योजकांकरिता महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या ‘गट कर्ज व्याज परतावा योजने’च्या ऑनलाईन पोर्टलचे उद्घाटन इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या.अध्यक्ष अतुल सावे यांच्या हस्ते आज मंत्रालयात करण्यात आले. राज्यातील इतर मागास प्रवर्गातील तरुण उद्योजकांनी स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, स्वतःच्या उद्योग उभारणीतून समाजातील अन्य गरजू व्यक्तींनादेखील रोजगाराची संधी उपलब्ध करुन द्यावी आणि राज्याच्या विकासात आपले योगदान द्यावे, असे आवाहन मंत्री श्री.सावे यांनी केले.


            यावेळी इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सचिव अंशु सिन्हा, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या.चे व्यवस्थापकीय संचालक प्रफुल्ल ठाकूर, एसडीएफसी बँकेच्या वरिष्ठ उपाध्यक्ष प्रिती शर्मा, महामंडळाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.  


            मंत्री श्री सावे म्हणाले की, राज्यातील इतर मागास प्रवर्गातील व्यक्तींचा समावेश असलेल्या शासन प्रमाणिकरण प्राप्त गटांना स्वयंरोजगार उद्योग उभारणीकरिता बँकेतर्फे देण्यात येणाऱ्या कर्ज रकमेवरील व्याजाचा परतावा महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या गट कर्ज व्याज परतावा योजनेंतर्गत देण्यात येणार आहे.या योजनेमुळे मोठया प्रमाणत रोजगार उपलब्ध होणार आहे.


            गट कर्ज व्याज परतावा योजनेंतर्गत प्रती गटास बँकेकडून जास्तीत जास्त १० लाख रुपये आणि उद्योग उभारणीकरिता बँकेमार्फत ५० लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. कृषीसंलग्न व पारंपरिक उपक्रम तसेच लघु उत्पादन व व्यापार / विक्री संदर्भातील लघु व मध्यम उद्योग त्याचप्रमाणे सेवाक्षेत्रातील गट या योजनेचा लाभ घेऊ शकतील.


            कर्ज मंजूर केलेल्या गटाने वेळेत कर्जाचे हफ्ते भरल्यास जास्तीत जास्त १२ टक्के व्याज दराच्या आणि १५ लाख रुपये इतक्या रक्कमेच्या मर्यादेत व्याजाची रक्कम गटाच्या आधार लिंक बँक खात्यात दरमहा महामंडळाद्वारे जमा करण्यात असल्याचे ही त्यांनी सांगीतले.


            महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाद्वारे इतर मागास प्रवर्गातील उद्योजकांकरीता वैयक्तिक व्याज परतावा योजना (रु.१०.०० लक्ष पर्यंत) देखील ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून राबविण्यात येत असून, बँकेमार्फत राबविण्यात येणाच्या या योजनेंतर्गत आतापर्यंत ४ हजार २७३ लाभार्थींना महामंडळामार्फत Letter of Intent (Lol) लाभ देण्यात आला आहे.


            गट कर्ज व्याज परतावा योजनेच्या अधिक माहिती व सहभागाकरिता इच्छुकांनी महामंडळाच्या www.msobcfdc.org या संकेतस्थळावर ऑनलाईन योजनांचे पोर्टल या Menu वरील गट कर्ज व्याज परतावा या योजनेवर Click करुन माहिती घ्यावी, असे महामंडळातर्फे आवाहन करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सांस्कृतिक कार्य मंत्र्यांकडूनज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांना श्रद्धांजली



            मुंबई, दि. 24 - ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांच्या निधनाबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शोक व्यक्त केला आहे.

चतुरस्त्र अभिनेत्री हरपली


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


            “चित्रपट सृष्टीत अभिनयाच्या जोरावर आणि प्रेमळ स्वभावाने आदराचे स्थान पटकावणाऱ्या चतुरस्त्र अभिनेत्री सीमा देव यांचे निधन चटका लावून जाणारे आहे,” अशा दुःखद भावना व्यक्त करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.


            “भारतीय चित्रपट सृष्टीत रमेश देव आणि सीमा देव यांनी आगळी ओळख निर्माण केली होती. पडद्यावर आणि प्रत्यक्षातही आदर्श दाम्पत्य, प्रेमळ व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांचे अनेकांशी स्नेहाचे संबंध राहिले आहेत. देव कुटुंबीय गेली कित्येक दशके कला क्षेत्राची सेवा करत आहे. सीमा देव यांनी अनेक चित्रपटांतून वैविध्यपूर्ण व्यक्तीरेखा साकारून आपल्या चतुरस्त्र अभिनयाचा परिचय दिला आहे. त्यांच्या जाण्याने देव कुटुंबीय आणि चाहत्यांवर आघात झाला आहे. त्यांना यातून सावरण्याची ताकद मिळावी, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांना भावपूर्ण श्रद्धांजली,” असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.


कृष्णधवल चित्रपटांमध्ये अभिनयाचे रंग भरणारी अभिनेत्री हरपली


- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


            “मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा अमीट ठसा उमटविणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांच्या निधनाने कृष्णधवल चित्रपटांमध्ये अभिनयाचे रंग भरणारी अभिनेत्री आपण गमावली आहे,” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.


            “सीमाताई देव यांनी अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटात भूमिका केल्या. रमेश देव आणि सीमाताई देव हे केवळ त्यांच्या जीवनातील नाही तर पडद्यावरचेसुद्धा समीकरण होते. एक मोठा कालखंड या दोघांनी गाजविला. 'आनंद' चित्रपटातील त्यांची संस्मरणीय भूमिका असो किंवा अनेक मराठी चित्रपटांमधील सोज्वळ नायिका असा एक मोठा कालखंड त्यांनी गाजवला. सीमाताईंचे आपल्यातून निघून जाणे ही सिनेमा जगतातील एका अध्यायाची अखेर आहे. मी सीमाताईंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. हे दुःख सहन करण्याची ताकद कुटुंबियांना देवो, ही ईश्वरचरणी प्रार्थना,’’ असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.


चित्रपटसृष्टीतील सुवर्णयुगाचा अंत


-उपमुख्यमंत्री अजित पवार


      “ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांच्या निधनानं मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीतील सुवर्णयुगाचा अंत झाला आहे. आपल्या सहज, सोज्वळ, सात्विक अभिनयानं चित्रपटरसिकांच्या हृदयावर तब्बल सहा दशके अधिराज्य गाजवणाऱ्या गुणी अभिनेत्रीला आज आपण मुकलो आहोत. गेल्यावर्षी, 2022 च्या फेब्रुवारी महिन्यात रमेश देव यांचं निधन झालं. त्यानंतर दीड वर्षांनी आज, सीमा देव यांचं झालेलं निधन, ही देशभरातील चित्रपट रसिकांच्या, मराठी माणसाच्या मनाला धक्का देणारी घटना आहे. सीमा आणि रमेश देव ही जोडी रुपेरी पडद्यावरची आणि वास्तव जीवनातीलही पती-पत्नींची आदर्श जोडी होती. सीमा देव यांचं निधन ही मराठी चित्रपटसृष्टीची, भारतातील कला क्षेत्राची मोठी हानी आहे. मी सीमा देव यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो, अशी प्रार्थना करतो,” असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.


सिनेसृष्टीतले बहुगुणी सालस व्यक्तिमत्व हरपले


- सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार


            “भारतीय सिनेसृष्टीतले एक सालस व्यक्तिमत्व हरपले आहे. पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभावाच्या काळात चित्रपट सृष्टीसारख्या क्षेत्रात अतिशय उच्च स्थान निर्माण करतांना आणि आयुष्यभर ते स्थान कायम राखतानाही स्वतःवरील आणि आपल्या कुटुंबावरील भारतीय संस्कार जतन करणाऱ्या सीमाताई भारतीयांच्या कायम लक्षात राहतील,” अशा शब्दात राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अभिनेत्री सीमा देव यांना श्रद्धांजली वाहिली आहे.


            “सीमाताईंच्या व्यक्तिमत्वात साधेपणा आणि सुसंस्कृत, सालसपणा ठासून भरला होता. मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीत रमेश देव, सीमा देव या दोघांनीही आपआपले स्वतंत्र स्थान निर्माण केले होते, त्यांच्या जवळपास सर्वच भूमिका अजरामर म्हणाव्यात अशा आहेत. ईश्वर सीमाताईंना सद्गती देवो. या दुःखाच्या काळात मी देव परिवाराच्या सोबत आहे. या दुःखातून लवकर सावरण्याचे बळ ईश्वर देव परिवारास देवो ही प्रार्थना करतो,” असे श्री.मुनगंटीवार यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.


००००



 

Featured post

Lakshvedhi