Thursday, 24 August 2023

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयांतर्गतपदभरतीची कार्यवाही पारदर्शक पद्धतीने

 व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयांतर्गतपदभरतीची कार्यवाही पारदर्शक पद्धतीने


- संचालक दिगांबर दळवी


               मुंबई, दि.२३ : व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयांतर्गत गट – ‘क’ संवर्गातील विविध 772 पदे भरण्याकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. ही पदभरती अत्यंत पारदर्शक पद्धतीने करण्यात येत असल्याचे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगांबर दळवी यांनी कळविले आहे.


           व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयांतर्गत राज्यातील विविध शासकीय संस्था, कार्यालयातील गट-क संवर्गातील विविध 772 पदे भरण्याकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याबाबत 16 फेब्रुवारी 2023 रोजी www.dvet.gov.in या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक अर्हता व अनुभवानुसार जास्तीत जास्त पदांकरिता अर्ज करण्याची संधी उपलब्ध व्हावी, केवळ परीक्षा शुल्कामुळे उमेदवारांची संधी वाया जाऊ नये, याकरिता पदाच्या शैक्षणिक अर्हतेनुसार जाहिरातीमधील पदांची ग्रुप ए, बी आणि सी मध्ये विभागणी करण्यात आली असून प्रत्येक पदाकरिता स्वतंत्र परीक्षा शुल्क न आकारता ग्रुपनिहाय परीक्षा शुल्क आकारण्यात आले आहे. शैक्षणिक अर्हता व अनुभवानुसार किती पदांकरिता अर्ज करावयाचे यांचे संपूर्ण स्वातंत्र्य उमेदवारास होते. विहित परीक्षा शुल्कासह विहित कालावधीत ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या सर्व उमेदवारांना प्रमाणपत्र पडताळणीच्या अधिन राहून दि. 16 एप्रिल 2023 रोजी घेण्यात आलेल्या सामायिक परीक्षेकरिता (CBT) परवानगी देण्यात आली होती.


              जाहिरातीमधील निदेशक (पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम) पदांकरिता व्यावसायिक चाचणी (CBT-2) असल्याने ही पदे वगळता उर्वरित सर्व पदांची (Group-B व Group-C) तात्पुरती गुणवत्ता यादी (Provisional Merit List) दिनांक 01/08/2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. ज्या उमेदवारांनी एकापेक्षा जास्त पदांकरिता अर्ज केलेले आहेत, अशा उमेदवारांनी त्या-त्या गटा (Group) करिता असलेली सामायिक परीक्षा (CBT) स्वतंत्रपणे दिलेली असल्याने अशा उमेदवारांचा त्यांच्या गुणवत्तेनुसार संगणकीकृत पद्धतीने तयार करण्यात आलेल्या तात्पुरत्या गुणवत्ता यादीत समावेश आहे. उमेदवारांची निवड सूची प्रसिद्ध करुन निवड सूचीतील उमेदवारांच्या प्रमाणपत्र/कागदपत्र पडताळणी (Documents Verification) ची कार्यवाही करण्यात येणार आहे. तात्पुरत्या गुणवत्ता यादीतील प्राधान्यक्रम हा उमेदवाराने ऑनलाईन अर्ज सादर करताना भरलेल्या माहितीच्या आधारे निश्चित करण्यात आला आहे. तथापि, प्रमाणपत्र तसेच कागदपत्र पडताळणी दरम्यान उमेदवाराने ऑनलाईन अर्जात चुकीची माहिती सादर केल्याचे आढळून आल्यास चुकीची कागदपत्रे खोटे अथवा बनावट आढळून आल्यास त्यास पुढील भरती प्रक्रियेकरिता अपात्र ठरविण्यात येणार आहे. याबाबत उमेदवाराची कोणतीही तक्रार विचारात घेतली जाणार नाही.


             पडताळणीअंती वैध ठरतील, अशा उमेदवारांनाच नियुक्ती आदेश निर्गमित करण्यात येतील. एखादा उमेदवार एकापेक्षा जास्त पदांकरिता पात्र ठरला, तरी उमेदवार ज्या पदांकरिता पात्र ठरला आहे, त्यापैकी ज्या पदावर रुजू होण्यास तो इच्छुक असेल, त्या पदाचेच नियुक्ती आदेश निर्गमित करण्यात येतील.


              प्रमाणपत्र तसेच कागदपत्रे पडताळणी दरम्यान उमेदवाराने सादर केलेली प्रमाणपत्र, कागदपत्र खोटी अथवा बनावट आढळल्यास त्यास पुढील भरती प्रक्रियेतून बाद ठरविण्यात येते. या पदभरतीच्या अनुषंगाने अद्याप उमेदवारांच्या प्रमाणपत्र, कागदपत्र पडताळणीची (Documents Verification) कार्यवाही झालेली नसल्याने प्रमाणपत्र, कागदपत्र पडताळणी दरम्यान उमेदवाराने सादर केलेली प्रमाणपत्र,कागदपत्र खोटी अथवा बनावट आढळल्यास त्यास पुढील भरती प्रक्रियेतून बाद ठरविण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. पदभरतीमधील प्रमाणपत्र अथवा कागदपत्र पडताळणीची प्रक्रिया अद्याप झालेली नसताना तत्पूर्वीच काही उमेदवाराची नांवे गुणवत्ता यादीतून कमी करण्याबाबतची माहिती चुकीची आहे. तरी पदभरतीसंदर्भात चुकीची व दिशाभूल करणारी माहिती प्रसिद्ध न करण्याचे तसेच अशा अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाकडून करण्यात येत आहे.


*****

प्रख्यात क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरभारत निवडणूक आयोगाचे ‘नॅशनल आयकॉन’

 प्रख्यात क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरभारत निवडणूक आयोगाचे नॅशनल आयकॉन

 

            नवी दिल्ली23 : मतदारांना जागृत करणेनिवडणुकीत मतांचे महत्व पटवून देणे यासाठी  भारतरत्न’ तसेच दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांना भारत निवडणूक आयोगाने (ईसीआय) नॅशनल आयकॉन’ म्हणून नियुक्त केले आहे.

            येथील आकाशवाणी रंगभवनमध्ये भारतीय निवडणूक आयोगाच्यावतीने  आयोजित कार्यक्रमात पुढील 3 वर्षांसाठी सचिन तेंडुलकर यांच्यासोबत सामंजस्य करार करण्यात आला. याप्रसंगी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमारनिवडणूक आयुक्त अनुपचंद्र पांडे आणि अरुण गोयल यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

            देशभरात होणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये विशेषत: 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मोठया प्रमाणात मतदारांचा सहभाग वाढविण्यासाठी श्री. तेंडुलकर यांच्या प्रभावाचा सकारात्मक लाभ होण्याच्या दिशेने त्यांचे ईसीआयचे नॅशनल आयकॉन’ होणे अधिक महत्वाचे ठरेल.

            श्री. तेंडुलकर म्हणाले कीभारतासारख्या उत्साहपूर्ण लोकशाहीसाठी तरुणांची राष्ट्र उभारणीत महत्वाची भूमिका आहे. क्रीडा सामन्यादरम्यान देशाला प्रोत्साहन देतानाइंडिया..इंडिया असा जयघोष करणारी टिम इंडिया’ समृद्ध लोकशाहीला पुढे नेण्यासाठी नक्कीच समोर येईल. त्यासाठी सर्वात सोपा पण सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे मतदानाचा हक्क बजावणे. ज्याप्रमाणे एखादा सामना बघण्यासाठी स्टेडियमवर  गर्दी जमते. त्याप्रमाणेच प्रत्येक निवडणुकीत मतदान केंद्रावरही मतदानाचे कर्तव्य बजावण्यासाठी गर्दी आणि उत्साह कायम ठेवू या, असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला. देशाच्या कानाकोपऱ्यातील तरुण मतदार निवडणुकीत सहभागी होणारतेव्हाच आपला देश अधिक समृद्धतेच्या दिशेने वाटचाल करेल.

            मुख्य निवडणुक आयुक्त राजीव कुमार याप्रसंगी म्हणाले कीसचिन तेंडुलकर भारताचेच नव्हे, तर जागतिक स्तरावरील आदणीय खेळाडू व्यक्त‍िमत्व आहे. त्यांची क्रिकेटची संपूर्ण कारकीर्द प्रशंसनीय आणि उल्लेखनीय राहिलेली आहे. यामुळेच ईसीआयने मतदारांची संख्या वाढविण्यासाठी ते एक आदर्श पर्याय ठरतील. या तीन वर्षांमध्ये विविध दूरचित्रवाणी वरील टॉक शोकार्यक्रम आणि डिजिटल मोहिमांद्वारे श्री. तेंडुलकर मतदारांमध्ये मतदानाविषयी प्रचार-प्रसार करतील. यामाध्यमातून मतदानाचे महत्व आणि देशाच्या भवितव्यासाठी ते किती महत्वाचे आहे हे मतदारांना पटवून सांगतील. 

            कार्यक्रमामध्ये नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या विद्यार्थ्यांनी लोकशाही बळकट करण्यामध्ये मतदानाचे महत्व या विषयावर नाटक सादर केले. 

            यापूर्वी भारतीय निवडणुक आयोगाने विविध क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तींना नॅशनल आयकॉन’ म्हणून नियुक्त केले आहे. यापूर्वी सुप्रसिद्ध अभिनेते आमीर खानपंकज त्रिपाठीखेळाडू मेरी कोम, एम.एस. धोनी यांना नॅशनल आयकॉन’ म्हणून नियुक्त केले गेले आहेत.

आदिवासी विकास विभागाला लोकसंख्येच्या प्रमाणात निधी देणार

 आदिवासी विकास विभागाला लोकसंख्येच्या प्रमाणात निधी देणार

उपमुख्यमंत्री अजित पवार

 

            मुंबईदि. 23 : आदिवासी बांधवांना विकासाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेण्यासाठी राज्य शासन विविध योजना राबवित आहे. त्यांच्या विकासासाठी लोकसंख्येच्या प्रमाणात निधी देण्याचे धोरण आहे. या अनुषंगाने आदिवासींच्या विकासासाठीच्या योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी आदिवासी विकास विभागाला लोकसंख्येच्या प्रमाणात प्रलंबित निधी उपलब्ध करून दिला जाईलअसे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

            आदिवासी विकास विभागाच्या विविध विषयांबाबत उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीस विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळआदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावितआमदार सर्वश्री नितीन पवारशांताराम मोरेडॉ.किरण लहामटेसहसराम कोरोटेवित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीरआदिवासी विकास विभागाचे अपर मुख्य सचिव प्रदीप व्यासउपमुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव आशिष शर्मानियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय आदी उपस्थित होते.

            आदिवासी विकास विभागाला अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी या बैठकीत करण्यात आली. याबाबत बोलताना उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले कीआदिवासी विकास विभागाला अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात येतो. तथापिमागील काही वर्षात विविध कारणांनी लोकसंख्येच्या प्रमाणापेक्षा कमी निधी दिला गेला आहे. हा प्रलंबित निधी टप्प्या-टप्प्याने एक ते दोन वर्षात उपलब्ध करून देण्यासह आदिवासी विकास विभागाच्या विविध योजनांसाठी मंजूर असलेला निधी देखील कालमर्यादेत उपलब्ध करून देण्यात येईल.

            आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या आहाराचा दर्जा चांगला राखण्याबाबत दक्षता घेऊन आहार पुरविणाऱ्या संस्थांना याबाबत योग्य सूचना द्याव्यातअसे सांगून उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले कीआदिवासींच्या जीवनमानाचा दर्जा उंचावण्यासाठी रस्ते विकास हा महत्त्वाचा घटक आहे. त्यासाठी देखील अस्तित्वातील योजनांबरोबरच सर्वसाधारण तरतुदीमधून निधी उपलब्ध करून दिला जाईल.

०००

राज्याचे 2028 पर्यंत एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्टगाठण्यासाठी सर्वच विभागांनी

 राज्याचे 2028 पर्यंत एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्टगाठण्यासाठी सर्वच विभागांनी आवश्यक पावले उचलावीत


- उपमुख्यमंत्री अजित पवार


महाराष्ट्र आर्थिक सल्लागार परिषदेसंदर्भातील बैठकीत


जिल्हा केंद्र मानून विकासयोजना राबवण्याच्या सूचना


- उपमुख्यमंत्री अजित पवार


            मुंबई, दि. 23 :- राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर करण्याचे उद्द‍िष्ट 2028 पर्यंत पूर्ण करायचे असेल, तर मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, पालघर या जिल्ह्यांच्या बरोबरीने सर्वच विभागातील जिल्ह्यांचा सर्वसमावेशक विकास करावा लागेल. कृषी, कृषीपूरक उद्योग, ऊर्जा, पायाभूत सुविधा, दळण-वळण, गृहनिर्माण, मध्यम व लघुउद्योग, कौशल्य विकास, उत्पादन, सेवा आदी महत्वाच्या क्षेत्रांमध्ये कार्यविस्तार करुन विकासाच्या नवीन संधी निर्माण कराव्या लागतील. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे लक्ष्य गाठण्यासाठी महाराष्ट्र आपले संपूर्ण योगदान देईल, त्यासाठी राज्य शासनाच्या सर्व विभागांनी आवश्यक पावले उचलावीत, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज महाराष्ट्र आर्थिक सल्लागार परिषदेसंदर्भात आयोजित बैठकीत दिल्या.


            राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन करण्यासाठी राज्यात रस्ते, बंदरे, विमानतळ, ऊर्जा निर्मिती, उद्योग निर्मिती, शिक्षण, आरोग्य, पर्यटन आदी क्षेत्रात पायाभूत सुविधा निर्माण करण्याची गरज आहे. शेती, शेतीपूरक उद्योग, उत्पादन व सेवा क्षेत्राला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. यासाठी अर्थ व वित्त नियोजन विभागाच्या अंतर्गत जे निर्णय तातडीने घेणे शक्य आहे, ते निर्णय तातडीने घेण्यात यावेत. ज्या निर्णयांसाठी मुख्यमंत्री किंवा अन्य मंत्रालयांचे सहकार्य, मंजुरी आवश्यक आहे, ते प्राप्त करण्याची कार्यवाही तातडीने सुरु करावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी बैठकीत दिल्या. 


            उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी आज मंत्रालयात महाराष्ट्र आर्थिक सल्लागार परिषदेसंदर्भात बैठक घेऊन परिषदेने तयार केलेल्या विकास आराखड्याचा आढावा घेतला. या बैठकीस मुख्य सचिव मनोज सौनिक, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, अपर मुख्य सचिव (व्यय) ओ. पी. गुप्ता, 'मित्रा'चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी (दूरदृश्य प्रणालीद्वारे), कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता विभागाचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंग, कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव अनुपकुमार, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आशिष शर्मा, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, कौशल्य विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह आदी उपस्थित होते. यावेळी टाटा स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश साठे यांनी सादरीकरण केले.


            उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, राज्याची अर्थव्यवस्था 1 ट्रिलियन डॉलर पर्यंत नेण्याच्या प्रक्रियेत महाराष्ट्र आर्थिक सल्लागार परिषदेची भूमिका महत्त्वाची आहे. अर्थव्यवस्थेत वाढ करण्यासाठी कृषी, उद्योग, पायाभूत सुविधा, ऊर्जा, माहिती-तंत्रज्ञान, पर्यटन, सेवा, कौशल्य विकास आदी विभागांनी योजनांची वेगवान अंमलबजावणी करण्यासह नवीन योजना राबविणे आवश्यक आहे. तसेच परिषदेने सुचविलेल्या उपाययोजनांवर कालमर्यादेत कार्यवाही करावी. जिल्हा केंद्रीभूत मानून विकास योजना राबवाव्यात. यामुळे शेतकरी, महिला, कामगार, तरुणांचे जीवनमान उंचावण्यास निश्चित मदत होईल.     


            पुढील पाच वर्षात राज्याच्या विकास दरात मोठ्या प्रमाणात वाढ करणे गरजेचे आहे. त्यासाठी राज्यातील पायाभूत सुविधांचे महत्वाकांक्षी प्रकल्प विक्रमी वेळेत पूर्ण करावेत. तातडीचे आणि प्राधान्याचे विषय तत्काळ मार्गी लागण्यासाठी निश्चित आराखडा तयार करावा. यासाठी संबंधित विभागांच्या सचिवांची बैठक घेऊन मुख्य सचिवांनी आठवडाभरात उपाययोजना सुचविण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

Wednesday, 23 August 2023

एकाच टूरमध्ये आठ ऐतिहासिक जलव्यवस्था !

 एकाच टूरमध्ये आठ ऐतिहासिक जलव्यवस्था !

- पाण्याच्या परंपरागत व्यवस्थांचा अनुभव


आपल्या पूर्वजांना जलव्यवस्थांनी विकसित केले. पाण्याच्या असंख्य व्यवस्था आपल्या अवतीभवती आहेत. त्या पाहण्याची, समजून घेण्याची संधी “भवताल” तर्फे मिळत आहे. दोन दिवसांची सफर आणि वेगवेगळ्या आठ प्रकारच्या जलव्यवस्था. हा धांडोळा घेण्यासाठी शनिवार-रविवार, १६ व १७ सप्टेंबर हे दोन दिवस राखून ठेवा.


माहिती व नावनोंदणीसाठी लिंक:


https://bhavatal.com/Ecotour/Watersystems


संपर्कासाठी:

9545350862 / 9922063621 

bhavatal@gmail.com

विशेष आकर्षण:

• राजमाता जिजाऊंनी बांधलेले धरण (कुसगाव)

• प्राचीन मंदिरातील पुष्करणी (लोणी-भापकर)

• ऐतिहासिक पोयीचे मंदिर (सुपे)

• पेशवेकालीन शेतीचा तलाव (जेजुरी) 

• मोटेची व्यवस्था असलेली बारव (मोगराळे)

• बारामोटेची प्रसिद्ध विहीर (लिंब, सातारा)

• एकमेकांना जोडलेल्या ३ हौदांची साखळी

• भुयारी मार्ग असलेली ऐतिहासिक विहीर

मार्गदर्शक:

श्री. अभिजित घोरपडे


- ऐतिहासिक जलव्यवस्था, भूविज्ञान, पर्यावरण अभ्यासक

कालावधी:

शनिवार-रविवार, १६-१७ सप्टेंबर २०२३


(एक मुक्काम, दोन दिवस)

शुल्क:


रु. ४२०० (पुणे ते पुणे; सर्वसमावेशक)


Poster 1A.jpg


भवताल

(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)

९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com


Bhavatal

(A platform dedicated to issue

s in water, environment and sustainability)

9545350862 / bhavatal@gmail.com

ग्रामविकास विभागाच्या भरतीप्रक्रियेतील उमेदवारांनीकोणत्याही प्रलोभनास बळी पडू नये

 ग्रामविकास विभागाच्या भरतीप्रक्रियेतील उमेदवारांनीकोणत्याही प्रलोभनास बळी पडू नये


- मंत्री गिरीश महाजन


            मुंबई, दि. २३ :- ग्रामविकास विभागाच्या परिक्षेची संपूर्ण भरतीप्रक्रिया शासनाने मान्यता दिलेल्या आय.बी.पी.एस. या कंपनीमार्फत राबविण्यात येत आहे. त्यामुळे सदर परीक्षा अत्यंत पारदर्शक व काटेकोर पद्धतीने होणार आहे. तथापि, काही समाजविघातक प्रवृत्तीच्या व्यक्तींकडून प्रलोभने दाखवून आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा फसवणूकीपासून उमेदवारांनी दक्षता घ्यावी, तसेच अशाप्रकारच्या कोणत्याही प्रलोभनास बळी पडू नये, असे आवाहन ग्रामविकास व पंचायत राज मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे.


            मंत्री श्री. महाजन म्हणाले की, ग्रामविकास व पंचायत राज विभागांतर्गत राज्यातील 34 जिल्हा परिषदांतर्गत गट - क मधील 30 संवर्गातील एकूण 19 हजार 460 इतकी रिक्त पदे सरळसेवेने भरण्याबाबतची जाहिरात दि. 05 ऑगस्ट, 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. जाहिरातीनुसार दि. 05 ते 25 ऑगस्ट, 2023 पर्यत ऑनलाईन पद्धतीने उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत.


              ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी सांगितले आहे की, फसवणूक झाल्यास शासन अथवा जिल्हा परिषद जबाबदार राहणार नाही. कोणतीही व्यक्ती परिक्षेसंदर्भात आर्थिक मागणी करीत असल्याबाबत निदर्शनास आल्यास त्यांच्याविरुद्ध जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात यावी, असे सर्व उमेदवारांना आवाहन करण्यात येत आहे.

चंद्रयान तीनच्या यशस्वी लँडिंगसाठी अंबा-एकविरा देविला साकडं

 चंद्रयान तीनच्या यशस्वी लँडिंगसाठी अंबा-एकविरा देविला साकडं


भाजपा तर्फे महाआरती : खासदार डॉ. अनिल बोंडे यांची सपत्नीक आराधना


अमरावती : चंद्रयान तीनच्या यशस्वी लँडिंगची संपूर्ण देशाला प्रतीक्षा आहे. अशातच भारतीय जनता पार्टी तर्फे अमरावतीचं आराध्य दैवत माता अंबा एकविरेला साकडे घालत आज सकाळी महाआरती करण्यात आली. राज्यसभेचे खासदार डॉ.अनिल बोंडे, सहचारिणी डॉ.वसुधा बोंडे यांनी या महाआरतीला उपस्थित होऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व संपूर्ण शास्त्रज्ञांच्या नेतृत्वात चंद्रयान-३ चं यशस्वी लँडिंग होऊ देण्याची प्रार्थना केली.


आज सायंकाळी इस्त्रोने निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार चंद्रयान तीनच चंद्रावर लँडिंग होणार आहे. देशासाठी ऐतिहासिक आणि महत्त्वाचा क्षण असलेला हा प्रसंग यशस्वी व्हावा यासाठी भारतीय जनता पार्टीचे अमरावती ग्रामीण जिल्हाध्यक्ष खा.डॉ.अनिल बोंडे यांच्या विशेष उपस्थितीमध्ये संस्थांच्या कोषाध्यक्ष मीनाताई पाठक, भारतीय जनता पक्षाचे नितीन गुडधे, विवेक गुल्हाने, प्रदेश प्रवक्त शिवराय कुलकर्णी, राजेश वानखडे, बाळासाहेब वानखडे, रवींद्र खांडेकर, मोहन जाजोदिया, श्रीराम नेह, मनीष कोरपे, सत्यजित राठोड, प्रणित सोनी, राहुल जाधव, चंद्रकांत बोंबरे, यांच्यासह बहुसंख्य पदाधिकाऱ्यांनी आज सकाळी 11 वाजता अंबा-एकवीरा देवीच्या मंदिरात महाआरती केली. चंद्रयान तीनच्या यशस्वी लँडिंगसाठी भारतीय जनता पक्षाच्या संपूर्ण पदाधिकाऱ्यांनी यावेळी आराधना करत माता अंबाएकविरा आईला साकडं घातलं.


_


प्रधानमंत्री यांच्या नेतृत्वात भारत चंद्राला गवसणी घालणार : डॉ.बोंडे


संपूर्ण जगाचे लक्ष लागलेलं चंद्रयान तीन सायंकाळी चंद्राच्या भूमीवर उतरणार आहे. आपले शास्त्रज्ञ, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व हे निश्चित यशस्वी होणार आहे. त्याकरिता शुभकामना देण्यासाठी, प्रार्थना करण्यासाठी अमरावतीचं आराध्य दैवत माता अंबा-एकवीरा यांच्या चरणी प्रार्थना करण्यासाठी आम्ही आलेलो आहे. अंबादेवीला साकडे घातले आहे. की आमच्या शास्त्रज्ञांच्या प्रयत्नाला यश येऊ दे. आज सायंकाळी चंद्रयान तीन चंद्रावर सुखरूपपणे उतरू दे. भारताचे नाव, भारत माता जगात सर्वश्रेष्ठ होत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे स्वप्न पूर्ण होऊ दे. या चंद्रालाही गवसणी भारताला घालता आली पाहिजे. शास्त्रज्ञांचा प्रयत्न यशस्वी होण्याची मनोकामना आम्ही अंबादेवीच्या चरणी केल्याची माहिती यावेळी खासदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. अनिल बोंडे यांनी माध्यमांना दिली.


००

Featured post

Lakshvedhi