Saturday, 19 August 2023

बाल शक्ती पुरस्कार व बाल कल्याण पुरस्कारासाठीअर्ज करण्याचे आवाहन

 बाल शक्ती पुरस्कार व बाल कल्याण पुरस्कारासाठीअर्ज करण्याचे आवाहन

             मुंबई, दि. 18 : बाल शक्ती पुरस्कार व बाल कल्याण पुरस्कार २०२४ करिता ३१ ऑगस्ट २०२३ पर्यंत www.awards.gov.in या संकेत स्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन मुंबई शहर व उपनगर जिल्हाधिकारी यांनी केले आहे.


             केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत हे पुरस्कार प्रदान करण्यात येतात. मुंबई शहर व उपनगरातील इच्छुक व्यक्ती व संस्थांनी या पुरस्कारासाठी अर्ज करावेत. वयवर्ष ५ पेक्षा अधिक व १८ वर्षापर्यंतच्या ज्या मुलांनी शिक्षण, कला, सांस्कृतिक कार्य, खेळ नाविण्यपूर्ण शोध, सामाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात विशेष नैपुण्यपूर्ण कामगिरी केलेली आहे, त्यांना हा पुरस्कार दिला जातो.


         बाल कल्याण पुरस्कार हा वैयक्तिक व संस्थास्तरावर दिला जातो. वैयक्तिक पुरस्कारांमध्ये मुलांच्या विकास, संरक्षण व कल्याण या क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे वेतन अथवा मानधन न घेता मानसेवी उदात्त भावनेतून किमान ७ वर्ष काम करणाऱ्या व्यक्तिस हा पुरस्कार दिला जातो. संस्था स्तरावर बाल कल्याण क्षेत्रात अपवादात्मक कार्य करणाऱ्या संस्थेला हा पुरस्कार दिला जातो, संस्था पूर्णतः निधीवर अवलंबून नसावी. बाल कल्याण क्षेत्रात किमान १० वर्षे सातत्यपूर्ण उत्कृष्ट कार्य करणारी असावी. पात्र उमेदवार आणि संस्थांनी विहित वेळेत अर्ज करण्याचे आवाहन प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.


००००


संध्या गरवारे/विसंअ/

पहिल्या महाराष्ट्र उद्योग पुरस्कारांचा २० ऑगस्टला प्रदान सोहळा

 पहिल्या महाराष्ट्र उद्योग पुरस्कारांचा २० ऑगस्टला प्रदान सोहळ


        मुंबई, दि १८ :- महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या नामवंत उद्योजकांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या धर्तीवर यावर्षीपासून राज्य शासनाने 'महाराष्ट्र उद्योग पुरस्कार' देऊन त्यांना सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर्षीचे उद्योग पुरस्कार जाहीर झाले असून पहिला उद्योगरत्न पुरस्कार पद्मविभूषण रतन टाटा यांना तर उद्योगमित्र पुरस्कार आदर पुनावाला यांना तसेच उद्योगिनी पुरस्कार गौरी किर्लोस्कर यांना, तर उत्कृष्ट मराठी उद्योजक पुरस्कार विलास शिंदे यांना जाहीर झाला आहे. पुरस्कार प्रदान सोहळा २० ऑगस्टला दुपारी २ वाजता वांद्रे -कुर्ला संकुलमधील जियो वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमधील जास्मिन हॉलमध्ये आयोजित करण्यात आला आहे.


            या सोहळ्याला राज्यपाल रमेश बैस हे प्रमुख अतिथी असतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अध्यक्षस्थानी असणाऱ्या या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, उद्योगमंत्री उदय सामंत यांची प्रमुख उपस्थिती असेल. मुख्य सचिव मनोज सौनिक, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन शर्मा उपस्थित राहणार आहेत. पुरस्काराचे स्वरुप :


        'उद्योगरत्न' पुरस्काराचे स्वरूप २५ लक्ष रुपये, सन्मानचिन्ह व मानपत्र असे आहे. 'उद्योगमित्र' पुरस्काराचे स्वरुप १५ लक्ष रुपये, सन्मानचिन्ह व मानपत्र, 'उद्योगिनी' पुरस्काराचे स्वरुप ५ लक्ष रुपये, सन्मानचिन्ह व मानपत्र तर 'उत्कृष्ट मराठी उद्योजक' पुरस्काराचे स्वरुप ५ लक्ष रुपये, सन्मान चिन्ह व मानपत्र असे आहे.


सत्कारमूर्तींची माहिती :


            रतन टाटा : टाटा उद्योग समूहाचे अध्यक्षपद भूषविलेल्या रतन टाटा यांचे भारतीय उद्योगांना जागतिक स्तरावर प्रस्थापित करण्यात महत्त्वाचे योगदान आहे. जग्वार, लॅण्ड रोव्हर, कोरस ग्रुप ऑफ स्टील कंपनी यासारख्या बड्या परकीय कंपन्यांची खरेदी करून टाटा उद्योग समूहाचे अधिराज्य निर्माण करण्यात रतन टाटा यांचा सिंहाचा वाटा आहे. स्टील, ऑटोमोबाईल्स, टी कंपनी, लक्झरी हॉटेल्स, एरोनॉटिकल अशा विविध उद्योग क्षेत्रात टाटा उद्योग समूहाचे नाव आहे. 'टेटली' ही टी बॅग्ज बनवणारी जगातील सर्वात मोठी कंपनी म्हणून नावारुपास आली आहे. दानशूर उद्योगपती म्हणूनही रतन टाटा यांचा लौकिक आहे.


            आदर पुनावाला :- सातत्यपूर्ण संशोधन आणि नाविन्याचा शोध घेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सिरम इन्स्टिट्यूटला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देण्यात आदर पुनावाला यशस्वी झाले आहेत. सिरम इन्स्टिट्यूट ही सर्वाधिक रोगप्रतिबंधक लसीचे उत्पादन करणारी जगातील सर्वात मोठी कंपनी आहे. या कंपनीची उत्पादने ३५ देशांत निर्यात होतात. 'ओरल पोलिओ लस' ही जागतिक बाजारपेठेत बेस्ट सेलर ठरली आहे. डेंग्यू, फ्ल्यू, गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगावरील प्रतिबंधक लसीचे उत्पादन, त्याचबरोबर कोविशिल्ड लसीचे उत्पादन करून त्यांनी आत्मनिर्भर भारताची प्रचिती दिली आहे.


            गौरी किर्लोस्कर :- आंतरराष्ट्रीय स्तरावर कीर्ती संपादन केलेल्या किर्लोस्कर घराण्याचा संपन्न वारसा वृद्धिंगत करण्यात गौरी किर्लोस्कर यांचा महत्त्वाचा वाटा आहे. किर्लोस्कर ऑइल इंजिन्स, गज्जर मशीनरीज आणि पंप उत्पादक, अर्का फिनकॉर्प तसेच पुण्यातील रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये किर्लोस्कर उद्योग समूहाचे दिमाखदार पदार्पण करण्यात गौरी किर्लोस्कर यांचे महत्त्वाचे योगदान राहिले आहे.


            विलास शिंदे:- कृषी अभियांत्रिकी क्षेत्रात एमटेक केल्यानंतर शेती हा मुख्य व्यवसाय विलास शिंदे यांनी निवडला. शेतीतज्ञ, कृषीमाल बाजारपेठ तज्ञ, व्यवस्थापन तज्ञ म्हणून त्यांची ओळख आहे. 'सह्याद्री फार्म्स' या कंपनीचे संचालक म्हणून त्यांनी सर्वाधिक द्राक्ष निर्यात करणारी तसेच टोमॅटो प्रक्रिया करणारी कंपनी म्हणून नावारूपास आणली. प्रक्रियायुक्त शेती उत्पादनाची 42 देशांमध्ये निर्यात, सह्याद्री फॉर्म्स पोस्ट हार्वेस्ट केअर लिमिटेड या कंपनीत 310 कोटी रुपयांची थेट परकीय गुंतवणूक आणण्यात यश.


00000


मनीषा सावळे/विसंअ/

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवायचा आहे

 विकसित भारत घडविण्यासाठीमहाराष्ट्राची भूमिका महत्वाची


- राज्यपाल रमेश बैस


छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवायचा आहे


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


 


            मुंबई, दि. 18 : भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात महाराष्ट्राची भूमिका महत्वाची होती. या राज्याने स्वातंत्र्यलढ्याला नेतृत्व दिले. आता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील विकसित भारत घडविण्यासाठी महाराष्ट्राची भूमिका महत्वाची राहील, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी येथे केले.


स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे समारोप पर्व, ‘मेरी माटी, मेरा देश’ अर्थात ‘माझी माती, माझा देश’ या अभियानानिमित्त राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे आज सायंकाळी राजभवनातील दरबार हॉल येथे ‘साद सह्याद्रीची, भूमी महाराष्ट्राची’ आणि 350 व्या शिवराज्याभिषेक वर्ष सोहळ्यानिमित्त शहाजीराजे भोसले यांच्या प्रतिमेवर आधारित पोस्ट तिकिटाचा अनावरण समारंभ आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी राज्यपाल श्री. बैस बोलत होते.


            यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, शालेय शिक्षण, मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव मनोज सौनिक, सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, टपाल विभागाचे पोस्टमास्तर जनरल अमिताभ सिंह, राज्यपालांचे प्रधान सचिव संतोषकुमार आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते दर्शनिका विभागातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या मराठी भाषेतील महाराष्ट्र ‘समाज सुधारक व विचारवंत आणि हिंदी भाषेतील ‘स्वतंत्रता संग्राम मे महाराष्ट्र का योगदान’ या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. तसेच कलावंतांनी देशभक्तीपर कार्यक्रम सादर केला.


            राज्यपाल श्री. बैस म्हणाले की, भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या समारोपानिमित्त ‘माझी माती, माझा देश’ अभियान राबविण्यात आले. तसेच यंदाचे वर्ष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे ३५० वे वर्ष साजरे केले जात आहेत. यानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले जात आहेत.


            सन २०४७ पर्यंत देशाला विकसित देश बनवण्याची प्रतिज्ञा आपण घेतली आहे. विकसित भारतासाठी महाराष्ट्राची भूमिका महत्वाची राहणार आहे. देशातील गरिबी, भूकबळी संपविण्यासाठी तरुण आणि महिलांचे सक्षमीकरण केले पाहिजे. कौशल्याला वाव दिला पाहिजे. त्यासाठी राज्यात कौशल्य विद्यापीठाचे बळकटीकरण केले पाहिजे. त्यातून महाराष्ट्र ही स्टार्टअपची राजधानी होईल. त्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञानाची मदत घ्यावी. विकसित भारतासाठी प्रत्येक विभागाने आपले उद्दिष्ट निश्चित केले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.


            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करण्यात आले. स्वातंत्र्याचे अमृत मिळविण्यासाठी अनेकांनी बलिदान दिले. त्यांना अभिवादन करण्यासाठी माझी माती, माझा देश हा उपक्रम राबविण्यात आला.


            महाराष्ट्रातूनच स्वातंत्र्याचा हुंकार उठला. याच महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी आदर्श राज्य निर्माण केले. त्यांनी सर्वसामान्यांच्या कल्याणाचा वस्तूपाठ घालून दिला आहे. त्याच मार्गावरून राज्य शासनाची वाटचाल सुरू आहे. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत विकासाची गंगा पोहोचवायची आहे. त्यातूनच छ्त्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र साकार होईल. शहाजीराजे यांच्यावरील टपाल तिकिटाच्या अनावरणाचा क्षण राज्यासाठी आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे.


            प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या काळात भारताची विकासाकडे वाटचाल सुरू असून जागतिक पातळीवर भारताची प्रतिमा उंचावली आहे. हा देशवासियांचा सन्मान आहे, असेही त्यांनी सांगितले.


            सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले की, भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘माझी माती माझा देश’ हा उपक्रम राबविण्यात आला. भारत देश सुजलाम् आणि सुफलाम् होता. या देशाचे आकर्षण जगाला होते. त्यातूनच भारतावर आक्रमणे झाली. आता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताला सुजलाम् सुफलाम् करायचे आहे. त्यासाठी प्रत्येकाने आपले योगदान द्यावे, असेही आवाहन त्यांनी केले.


            सांस्कृतिक विभागाचे प्रधान सचिव श्री. खारगे यांनी प्रास्ताविकात ‘मेरी माटी, मेरा देश’ उपक्रमांतर्गत राबविण्यात आलेल्या उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. पोस्ट मास्तर जनरल. श्री. सिंह यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.


००००


गोपाळ 



 


राज्यातील सर्वच रुग्णालयातील सीसीटीव्हीद्वारे ऑनलाइन देखरेख करावी;

 राज्यातील सर्वच रुग्णालयातील सीसीटीव्हीद्वारे ऑनलाइन देखरेख करावी;


- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

            ठाणे दि.18 : वाहतूक पोलीस ज्याप्रमाणे सिग्नलवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून देखरेख करत असतात. त्याप्रमाणे राज्यातील सर्वच रुग्णालयाच्या आतमधील परिस्थितीचे सीसीटीव्हीच्या माध्यमातून देखरेख करण्यात यावी. यातून रुग्णांची परिस्थिती समजण्यास मदत होईल. तसेच कोणतीही आपत्ती येण्यापूर्वी त्या ठिकाणी रुग्ण कोणत्या अवस्थेत होता. त्याची काय परिस्थिती होती. हे समजण्यास मदत होईल. तसेच त्याला तत्काळ मदत पोहोचवता येईल, असे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.


            काही दिवसांपूर्वी ठाणे येथील रुग्णालयात रुग्ण दगावल्याची घटना घडली होती. त्यासंदर्भातील उपाययोजनेचा आढावा घेण्यासाठी उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली.


            यावेळी डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, कळवा रुग्णालयात घडलेली घटना दुःखद आणि धक्कादायक आहे. परंतु कोविड काळात आणि कोविडनंतर बऱ्याचशा अत्यवस्थ असलेल्या रुग्णांना जीव गमावण्याची वेळ येते. यासंदर्भात राज्य शासनाने चौकशी समिती नेमली आहे.


                        ज्या दिवशी घटना घडली त्यासंदर्भात नागरिकांना काही माहिती काळवायची असेल तर त्यांनी पुढे यावे. यासाठी स्थानिक प्रशासनाने त्यांना त्याबाबत संपर्क क्रमांक, ई-मेल आयडी उपलब्ध करून द्यावा. जेणेकरून नागरिक प्रशासनासोबत थेट संपर्क साधतील. संपर्क करणाऱ्या नागरिकांची नावे गोपनीय ठेवली जावीत, असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने रुग्णालयात आग प्रतिबंधक वस्तूंचा वापर होणे आवश्यक आहे. रुग्णालयात असणाऱ्या इलेक्ट्रिकल्स वस्तूंची वेळोवेळी तपासणी व्हावी असे. डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. राज्य सरकारने सर्व रुग्णालयांना जास्तीत जास्त सुविधा द्याव्यात, हीच सरकारकडून अपेक्षा असल्याचे उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.


            या बैठकीला जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, ठाणे डॉ. रुपाली सातपुते आदी उपस्थित होते.


            यादरम्यान, उपस्थित अधिकाऱ्यांनी ठाणे जिल्ह्यातील रुग्णालयांच्या परिस्थितीचा सविस्तर आढावा सादर केला.


०००

दिलखुलास’ कार्यक्रमात मंत्रिमंडळ निर्णयांची माहिती

 दिलखुलास’ कार्यक्रमात मंत्रिमंडळ निर्णयांची माहिती


            मुंबई, दि. 18: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या महत्त्वाच्या निर्णयांची माहिती देण्यात आली आहे. राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर' या ॲपवर सोमवार दि. 21 ऑगस्ट, 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत हा 'दिलखुलास' कार्यक्रम प्रसारित होईल.


००००

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे राजकीय पक्षांची बैठक

 मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे राजकीय पक्षांची बैठक

            मुंबईदि. १८ :- विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देण्यासाठी महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे नोंदणीकृत राजकीय पक्षांची बैठक आयोजित करण्यात आली होती. अपर मुख्य सचिव आणि मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी या बैठकीला संबोधित केले. त्यांनी १७ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत राबविल्या जाणाऱ्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाची माहिती दिली. तसेच नवमतदार नोंदणीनाव वगळणीनाव-पत्ता-लिंग इ. तपशिलांतील दुरुस्त्या यांची सद्यःस्थिती सांगण्यात आली. महाविद्यालयीन विद्यार्थीतृतीयपंथी समुदायदिव्यांग व्यक्ती यांच्यासाठी राबवण्यात येणाऱ्या  विशेष शिबिरे आणि ग्रामसभा यांची माहिती देण्यात आली.

            राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना मतदान केंद्रस्तरीय सहाय्यक (बूथ लेवल असिस्टंट – बीएलए) नेमण्यास सांगण्यास आले. तसेच या साहाय्यकांनी मतदारसंघ पातळीवर मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना (बूथ लेवल ऑफिसर यांना) सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. इलेक्ट्रॉनिक मतदानयंत्राच्या प्रथमस्तरीय तपासणी सत्रांविषयी उपस्थित पक्षांच्या प्रतिनिधींना अवगत करण्यात आले. श्री.देशपांडे यांनी उपस्थितांच्या सर्व शंकांच निरसन केले. त्यांनी राजकीय पक्षांच्या नेत्यांनीपदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष तसेच समाजमाध्यमांवरून नवमतदारांना नाव नोंदणी करण्यास सांगावेअसे आवाहन केले.

            सदर बैठकीला सहमुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर उपस्थित होते. तसेच आम आदमी पार्टीबहुजन समाज पार्टीभारतीय जनता पार्टीशिवसेनाशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)महाराष्ट्र नवनिर्माण सेनाराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीभारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Friday, 18 August 2023

गोवंशीय पशुधनाचे लसीकरण ऑगस्टअखेर पूर्ण करावे

 गोवंशीय पशुधनाचे लसीकरण ऑगस्टअखेर पूर्ण करावे


- मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील


            मुंबई दि. 18 : राज्यातील पशुधनाचे मोफत लसीकरण करण्यात येत आहे. येत्या महिन्याच्या अखेरपर्यंत संपूर्ण राज्यातील गोवंशीय पशुधनाचे लसीकरण पूर्ण करण्यात यावे अशा सूचना पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिल्या.


            राज्यामध्ये लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव पुन्हा दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर आज मंत्री श्री. विखे -पाटील यांनी राज्यातील सर्व जिल्ह्यातील उपायुक्त (पशुसंवर्धन), सहआयुक्त (पशुसंवर्धन) व कृती दलाचे सदस्य यांचे समवेत आढावा बैठक घेतली. या बैठकीमध्ये राज्यातील लम्पी चर्मरोगाच्या प्रादुर्भावाबाबत आढावा घेण्यात आला.


            श्री. विखे- पाटील म्हणाले की, मागील वर्षी दीड कोटी पशुधनाचे मोफत लसीकरण शासनामार्फत करण्यात आले. यावर्षी देखील 1जुलै 2023 पासून दुसऱ्या टप्प्यातील मोफत लसीकरणाची मोहीम शासनाने हाती घेतली आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार गाभण जनावरे व वासरे यांचेही लसीकरण करण्यात येत आहे. आतापर्यंत १,३९,९२,३०४ पशुधनापैकी ८३,०५,८८९ (५९.४ टक्के) पशुधनाचे लसीकरण करण्यात आले आहे.


            राज्यामध्ये प्रामुख्याने मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूरमार्फत विद्यापीठाअंतर्गत असलेल्या तज्ञ अधिकाऱ्यांच्या पथकांना राज्यातील बाधितक्षेत्रात भेट देऊन, पशुसंवर्धन विभागाचे क्षेत्रीय अधिकारी व पशुपालकांना बाधित पशुधनाच्या उपचारासंदर्भात मार्गदर्शन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच उपचारासंदर्भात मागदर्शक सूचना प्रसिद्ध करण्याचे निर्देश संबंधितांना दिले आहेत. लम्पी चर्मरोगाने बाधित पशुधनाची लगतच्या राज्यातून वाहतूक टाळण्यासाठी तपासणी नाक्यांवर आवश्यक ती दक्षता घेण्याबाबत सुचित करण्यात यावे अशा सूचनाही श्री. विखे-पाटील यांनी दिल्या.


            लम्पी चर्मरोग बाधित पशुधनावरील उपचार, लसीकरण व इतर पशुवैद्यकीय सेवेसाठी सेवाशुल्क माफ करण्यात येवून पशुपालकांच्या दारापर्यंत सेवा उपलब्ध करण्यात येत आहे. तसेच राज्यातील पशुधन पर्यवेक्षक व पशुधन विकास अधिकारी या रिक्त पदावर मनुष्यबळाच्या सेवा बाह्य स्त्रोताद्वारे उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. लम्पी चर्मरोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी लसीकरण, बाधित जनावरांवर तात्काळ उपचार, बाधित जनावरांचे विलगीकरण करणे, ग्रामविकास विभागाच्या मदतीने पशुधनावरील व गोठ्यातील गोचिड व बाह्यकिटकांचे निर्मुलन व पशुपालकांचे प्रबोधन करण्याचे निर्देश दिले आहेत. प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंधक व नियंत्रण अधिनियम, २००९ अन्वये जिल्हाधिकाऱ्यांना बाधित जिल्ह्यांमधील स्थानिक स्थिती विचारात घेवून, जनावरांची वाहतूक करण्यासाठी आवश्यक असलेली २८ दिवसापूर्वीचे लसीकरणाबाबतचे प्रमाणपत्र बंधनकारक करणे, तसेच जनावरांचे बाजार यावर तात्पूरते निर्बंध घालण्याबाबत निर्णय घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Featured post

Lakshvedhi