Thursday, 17 August 2023

गोदावरी खोऱ्याला दुष्काळमुक्त करण्यासाठीपश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी वळविणार

 गोदावरी खोऱ्याला दुष्काळमुक्त करण्यासाठीपश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी वळविणार


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


शिर्डी जवळील काकडी येथे ‘शासन आपल्या दारी’ जिल्हास्तरीय कार्यक्रम संपन्न


 


            अहमदनगर, दि.17 ऑगस्‍ट (जिमाका वृत्तसेवा) : गोदावरी खोऱ्याला कायमचे दुष्काळमुक्त करण्यासाठी राज्यातील पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्राला वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.


            शिर्डी विमानतळाजवळील काकडी येथे ‘शासन आपल्या दारी’ या अभियानाच्या जिल्हास्तरीय कार्यक्रमात शासकीय योजनांच्या लाभांचे लाभार्थ्यांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री श्री शिंदे बोलत होते‌. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसुल, पशुसंवर्धन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, खासदार सदाशिवराव लोखंडे, खासदार डॉ.सुजय विखे पाटील, आमदार सर्वश्री प्रा.राम शिंदे, सत्यजित तांबे, बबनराव पाचपुते, मोनिका राजळे, किरण लहामटे, आशुतोष काळे, अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले, महानंदाचे अध्यक्ष राजेश परजणे, जिल्हा परिषद सदस्य शालीनी विखे पाटील आदी यावेळी उपस्थित होते.


            'शासन आपल्या दारी' अभियानात अहमदनगर जिल्ह्यात २४ लाख नागरिकांना योजनांचा लाभ देण्यात येत आहे‌. यापैकी ३० हजार लाभार्थी आज येथे उपस्थित आहेत, असे नमूद करून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, आजच्या या कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. आजपर्यंत या कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यातील १ कोटी ४० लाख लाभार्थ्यांना लाभ मिळाला आहे. सरकारी काम आणि सहा महिने थांब ही संकल्पना आम्ही थांबविली आहे‌. नागरिकांना चकरा माराव्या लागू नये, यासाठी शासन काम करत आहे. एकाच छताखाली अनेक योजनांचा लाभ मिळत आहे. जिल्ह्यात लाभार्थ्यांना ३ हजार ९८२ कोटींचा लाभ देण्यात आला आहे.


            राज्यातील अनेक योजनांना आर्थिक पाठबळ देण्याचे काम केंद्र शासनाने केले आहे. राज्याच्या विकासासाठी शासन झोकून देऊन काम करत आहे. आजही राज्यातील निम्म्या साखरेचे उत्पादन अहमदनगर जिल्ह्यातून होत आहे. अहमदनगर जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नाव देण्याचा ऐतिहासिक निर्णय शासनाने घेतला आहे. समृध्दी महामार्गामुळे शिर्डी व परिसराच्या विकासाचे नवे पर्व सुरू होत आहे, असे मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी सांगितले.


  मुख्यमंत्री श्री. शिंदे पुढे म्हणाले की, राज्यातील सर्व शासकीय रूग्णालयात आता मोफत उपचार मिळत आहे. महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेत साडेबारा कोटी जनतेला पाच लाखांपर्यंत मोफत उपचार देण्याचा ऐतिहासिक निर्णय शासनाने घेतला आहे. ५३ वर्षांपासून रखडलेला निळवंडे प्रकल्प मार्गी लावण्याचे काम शासनाने केले आहे. शासनाने ३५ सिंचन प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता नव्याने दिली आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा निर्माण होत आहेत. सध्या राज्यात पावसाने ओढ दिली आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे आहे, असा विश्वासही 

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी स्पर्धा5 सप्टेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी स्पर्धा5 सप्टेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

- मुंबई उपनगर जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले


            मुंबई, दि. 17 : गणेशोत्सवात उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्याचा निर्णय पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने घेतला आहे. इच्छुक गणेशमंडळांनी 5 सप्टेंबर 2023 पूर्वी mahotsav.plda@gmail.com या ईमेलवर अर्ज करण्याचे आवाहन मुंबई उपनगर जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी केले आहे.


            गणेशोत्सवात उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार देण्याकरिता स्पर्धा आयोजन करून अभिप्रायासह गुणांकन करून प्रस्तावास शासनास सादर करण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठित करण्यात आली आहे. ही समिती मंडळाच्या उत्सवस्थळी प्रत्यक्ष भेट देणार आहे. समितीकडून प्रत्येक गणेशोत्सव मंडळाबाबत अभिप्रायासह गुणांकन करून तीन गणेशोत्सव मंडळाची शिफारस करून त्यांची नावे सर्व कागदपत्र व्हीडिओसह राज्य समितीकडे देण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत प्रकल्प संचालक, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्याकडे 1 ऑक्टोबर 2023 पर्यंत सादर करावेत.


            निकालासंदर्भात स्वतंत्र सूचना देण्यात येतील. जास्तीत जास्त मंडळांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री.भोसले यांनी केले आहे.


००

महिलांच्या विकासासाठी संयुक्त राष्ट्र संघाच्यामहिला परिषदेसमवेत सामंजस्य करार करणार

 महिलांच्या विकासासाठी संयुक्त राष्ट्र संघाच्यामहिला परिषदेसमवेत सामंजस्य करार करणार


- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे


             मुंबई, दि. 17 : राज्यातील महिलांच्या विकासासाठी संयुक्त राष्ट्र संघाच्या महिला परिषदेसमवेत राबविण्यात येणाऱ्या योजनांबाबत लवकरच एक कृती आराखडा तयार करून सामंजस्य करार करणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.


            मंत्रालयात संयुक्त राष्ट्रसंघाच्या महिला परिषदेच्या प्रतिनिधींसमवेत आयोजित बैठकीत महिला व बालविकास मंत्री कु. तटकरे बोलत होत्या. यावेळी महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुपकुमार यादव, महिला बालविकास आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे, भारताच्या संयुक्त राष्ट्रसंघातील महिला परिषदेच्या समन्वयक सुशान जान फरर्ग्युसन, उपसमन्वयक कांता सिंह, राकेश गांगुली उपस्थित होते.


               मंत्री कु. तटकरे म्हणाल्या की, महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती प्रत्येक महिला वर्गाला व्हावी, महिलांवरील हिंसाचाराला प्रतिबंधासाठी गाव पातळीवर हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी नव्याने गावपातळीवर गावस्तरीय महिला समित्या नेमणे, महिलांना व्यवसायाभिमुख शिक्षण देणे, पर्यटनावर आधारित महिलांसाठी रोजगार निर्मिती करणे, महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, महिलांसाठी विकासाभिमुख योजना राबविण्याबाबत संयुक्त राष्ट्र संघाच्या महिला परिषद समवेत लवकरच राज्य कृती आराखडा तयार करेल. राज्यात तो प्रभावीपणे राबविण्यात येईल, असेही मंत्री कु. तटकरे यांनी सांगितले.


******

स्वनाथ’ सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून लोकहिताचे काम घडत आहे

 स्वनाथ’ सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून लोकहिताचे काम घडत आहे


- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे


 


             मुंबई, दि. 17 : स्वनाथ फाऊंडेशन या संस्थेच्या माध्यमातून राज्यात अनाथांसाठी एक चळवळ उभी राहत आहे या संस्थेने गेल्या चार वर्षात भरीव कामगिरी केली आहे, असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.          


            चेंबूर विवेकानंद एज्युकेशन सोसायटी इन्स्ट‍िट्यूट येथे स्वनाथ फाऊंडेशन तर्फे 'प्रत्येक बालकाला हक्काचा परिवार' या विषयी नाविन्यपूर्ण उपक्रमांबाबत जिल्हा संयोजकांकरिता आयोजित दोन दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी महिला व बालविकास मंत्री कु. तटकरे बोलत होत्या. यावेळी स्वनाथ फाऊंडेशनच्या संस्थापक तथा अध्यक्षा श्रेया भारतीय, मुंबई विद्यापीठाचे उपकुलगुरू रवींद्र कुलकर्णी, विवेकानंद एज्युकेशन सोसायटी इन्स्ट‍िट्यूटचे संचालक सतीश मोध, स्वनाथ फाऊंडेशनचे विश्वस्त गगन मेहता, सारिका मेहता आदी उपस्थित होते.


               मंत्री श्रीमती तटकरे म्हणाल्या की, स्वनाथ फाऊंडेशनने कमी कालावधीत अनाथ बालकांसाठी करत असलेले काम उल्लेखनीय आहे. शासनाकडून या कामासाठी सहकार्य करण्यात येईल. अशा प्रकारे सेवा भावी संस्था समाजात काम करण्यासाठी पुढे येण्याची आवश्यकता आहे. याबाबत स्वयंसेवी संस्थाकडून काही सूचना आल्या, तर शासन त्यावर उपाययोजना व नव्याने राबविण्यात येणाऱ्या योजनांसाठी काम करेल, असेही मंत्री कु. तटकरे यांनी सांगितले.


******

राज्य मध्यवर्ती ग्रंथालयाच्या इमारतीचे कामवेळेत पूर्णत्वाचे नियोजन करावे

 राज्य मध्यवर्ती ग्रंथालयाच्या इमारतीचे कामवेळेत पूर्णत्वाचे नियोजन करावे


- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

            मुंबई, दि. 17 : राज्य मध्यवर्ती ग्रंथालयात सुमारे 12 लाख पुस्तके आहेत. ही ग्रंथसंपदा जतन करण्याबरोबरच भावी पिढीला सहज उपलब्ध होण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन राज्य मध्यवर्ती ग्रंथालय इमारतीच्या कामाला गती देऊन कालबद्ध पद्धतीने कामाचे नियोजन करावे, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.


            मुंबई विद्यापीठ कलिना परिसरातील नवीन राज्य मध्यवर्ती ग्रंथालय इमारतीच्या कामाची पाहणी आज मंत्री श्री. पाटील यांनी केली. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू रवींद्र कुलकर्णी, उपसचिव प्रताप लुबाळ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता श्री. बनगोसावी, ग्रंथालय उपसंचालक शशिकांत काकड, सहायक संचालक डॉ.विजयकुमार जगताप, ग्रंथपाल संजय बनसोड व संबंधित अधिकारी उपस्थित होते.


            उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. पाटील म्हणाले की, या राज्य मध्यवर्ती ग्रंथालय इमारतीचे प्रलंबित बांधकाम पूर्णत्वास आले असून काही किरकोळ कामे राहिलेली आहेत. ती कालबद्ध पद्धतीने नियोजन करून तातडीने पूर्ण करावीत आणि राज्यातील नागरिक व जगभरातील विद्यार्थ्यांसाठी हे ग्रंथालय लवकर उपलब्ध करून द्यावे. त्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल.


0000

भवताल’...

 भवताल’...


सुरुवातीला दिवाळी अंकासाठी हे नाव दिलं गेलं. त्यानंतर मासिकासाठी आणि पुढं एकूणच निसर्ग-पर्यावरणाविषयक मंचासाठी दिलेलं हे नाव. हे नाव ऐकताच अनेकांची प्रतिक्रिया असते की, या विषयासाठी इतकं समर्पक नाव दुसरं असूच शकत नाही! अगदी खरंय ते.


पण हे नाव कुठून आणि कसं आलं? हे कदाचित तुम्हाला माहीत नसेल. त्याचीच ही गोष्ट.


या नावाची सुरुवात होते- ‘लोकसत्ता’ या वर्तमानपत्रापासून. मी १९९६ सालापासून ‘लोकसत्ता’ शी संबंधित होतो. त्या वर्षी अगदी अपघाताने म्हणा किंवा योगायोगाने म्हणा, पत्रकारितेच्या वर्गाला प्रवेश घेतला. लगेचच काही महिन्यांनी, गणपतीच्या काळात विद्यार्थी म्हणून ‘लोकसत्ता’ मध्ये प्रवेश केला. पुढे २०१५ पर्यंत तिथेच होतो. त्या वर्षी दिवाळीत ‘भवताल’ या नावाने नियतकालिक सुरू केले. त्याच्या थोडासा आधी ‘लोकसत्ता’ तून बाहेर पडलो. तब्बल १९ वर्षांचा हा काळ, विद्यार्थी ते वरिष्ठ सहसंपादक अशी प्रगती होत गेली.


या काळात बरंच काही केलं. त्यापैकी सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे हवामान, पर्यावरण या विषयांसाठी दिलेलं योगदान. हवामान, भूविज्ञान, पाणी या विषयांवर केलेले स्तंभलेखन. लहरी हवा, दगडांच्या देशा, पाणी ते पाणी... या स्तंभामधील लेखांची आठवण अजूनही काही वाचक करून देतात. महाराष्ट्रातील नद्यांच्या पात्रात फिरून त्यांची सद्यस्थिती मांडणारी, ‘मरणासन्न नद्या’ ही दीर्घ वृत्तमालिका लिहली. तिचंही तेच. या सर्व गोष्टींचा परिणाम म्हणून मराठी पत्रकारितेत पूर्वी काठावर असलेले हे विषय केंद्रस्थानी येण्यास मदत झालीच. शिवाय व्यक्तिश: मला पत्रकारितेतील प्रतिष्ठेचा ‘रामनाथ गोएंका अवॉर्ड फॉर एक्सलन्स इन जरनॅलिझम’ याच्यासह इतर पुरस्कारही मिळाले. पाच पुस्तके झाली. या सर्वांमध्ये आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे ‘लोकसत्ता’ मध्ये सलग पाच-सहा वर्षे चालवलेले पर्यावरणासाठीचे पान. त्या वेळी म्हणजे २००५ – ०६ च्या सुमारास पर्यावरणासाठी असे साप्ताहिक / पाक्षिक पान चालवणे ही कल्पना नवी होती.


या पानाच्या निमित्ताने ‘भवताल’ चा जन्म झाला. त्या वेळी श्री. कुमार केतकर हे ‘लोकसत्ता’ चे संपादक होते. त्यांनी दिलेली संधी आणि प्रोत्साहन यामुळे हे विषय हाताळू शकलो. या पर्यावरणाच्या पानाची संकल्पना मांडल्यावर, त्याचे नाव काय असावे, यावर बरीच चर्चा झाली. याबाबत मुंबईत त्या वेळच्या संपादकीय विभागातील वरिष्ठांची चर्चा झाली. अनेक शब्द सुचवण्यात आले. तत्कालीन सहसंपादक रेखा देशपांडे यांनी नाव सुचवले, ‘ताल – भवताल.’ त्यावरील चर्चेत ‘ताल’ शब्द मागे पडला आणि ‘भवताल’ या नावाने पान सुरू झाले. या पानाशी माझी ओळख निर्माण झाली. पुढे २०११-१२ च्या सुमारास हे पान बंद झाले, तरी ती अभिजित घोरपडे या नावाशी भवताल ची असलेली ओळख टिकून होती.


पुढच्या काळात म्हणजे २०१५ या वर्षात मी ‘लोकसत्ता’ तून बाहेर पडलो. आपण ज्या विषयांमध्ये मोठ्या प्रमाणात लिहीत आलो आहोत, ज्यावर काम करत आलो आहोत, त्या विषयांसाठी म्हणून स्वतंत्रपणे काहीतरी सुरू करावे, असे कितीतरी वर्षे आधी मनात घोळत होते. त्यातून या विषयांना वाहिलेले मासिक किंवा नियतकालिक सुरू करावे, त्याचा आगळा-वेगळा दिवाळी अंक असावा असा विचार पुढे आला. त्याला स्वाभाविकपणे ‘भवताल’ हे नाव दिले. असा या नावाचा जन्म. पुढे ‘भवताल’ ची व्याप्ती वाढत गेली. त्याच्या अंतर्गत मासिकाच्या पलीकडे अनेक उपक्रम सुरू झाले. पुढेही अनेक गोष्टी येतील. त्याची सुरुवात मात्र दिवाळी अंक आणि नियतकालिकापासून झाली.


- अभिजित घोरपडे


संस्थापक - संपादक, भवताल


 


(‘भवताल’ ची जडणघडण आणि प्रवासाबाबत वाचकांना माहिती देण्यासाठी हा उपक्रम...)


( क्रमश: )


--



भवताल

(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)

९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com


Bhavatal

(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)


9545350862 / bhavatal@gmail.com

मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकरई वॉर्डमध्ये साधणार जनतेशी सुसंवाद

 मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकरई वॉर्डमध्ये साधणार जनतेशी सुसंवाद

            मुंबई दि. १६ - राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर 'शासन आपल्या दारी', जनतेशी सुसंवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून गुरूवार दि. १७ ऑगस्ट रोजी नागरिकांशी सुसंवाद साधणार आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ई वॉर्ड कार्यालयात होणाऱ्या या कार्यक्रमात नागरिकांनी शासकीय योजना, आपल्या प्रभागातील विकासकामांबाबत सूचना व इतर समस्यांबाबतच्या निवेदन अथवा अर्जासह उपस्थित राहावे, असे आवाहन मंत्री श्री. केसरकर यांनी केले आहे. या कार्यक्रमात नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्याच्या अनुषंगाने संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले जातील.

केव्हा आणि कुठे होईल संवाद

            गुरूवार दि १७ ऑगस्ट २०२३ रोजी महानगरपालिकेच्या ई वॉर्डमध्ये ऑफीस बिल्डींग, १०, शेख हाफिझुद्दिन मार्ग, भायखळा, मुंबई- ४००००८ येथे दुपारी ४ ते ७ यादरम्यान पालकमंत्री श्री.केसरकर नागरिकांशी संवाद साधण्यासाठी उपस्थित राहतील. त्याचप्रमाणे सदर जनतेशी सुसंवाद कार्यक्रमास लोकप्रतिनिधी, सर्व विभागांचे शासकीय अधिकारी तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत.


            या कार्यक्रमात नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले आहे.


 

Featured post

Lakshvedhi