Tuesday, 15 August 2023

दिलखुलास’ कार्यक्रमात नेत्ररोग तज्ज्ञ डॉ.वर्षा रोकडे यांची मुलाखत

 ‘दिलखुलास’ कार्यक्रमात नेत्ररोग तज्ज्ञ डॉ.वर्षा रोकडे यांची मुलाखत

            मुंबई, दि. 14: राज्यात सध्या डोळे येणे या आजाराची साथ सुरू आहे. डोळे येऊ नये म्हणून तसेच डोळे आल्यावर नागरिकांनी काय खबरदारी घ्यावी या विषयावर नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. वर्षा रोकडे यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालाय निर्मित 'दिलखुलास' कार्यक्रमातून माहिती दिली आहे.


            माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत बुधवार दि.16, गुरूवार दि. 17 आणि शुक्रवार दि. 18 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व 'न्यूज ऑन एआयआर' या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. निवेदक सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.

राष्ट्रपती पोलीस पदक, शौर्यपदक विजेत्या पोलिसांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन

 राष्ट्रपती पोलीस पदक, शौर्यपदक विजेत्या पोलिसांचे

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन


जगातील सर्वोत्कृष्ट पोलिसांपैकी असलेल्या

महाराष्ट्राच्या पोलिसांचा राज्याला अभिमान


-उपमुख्यमंत्री अजित पवार

            मुंबई, दि. 14 :- राष्ट्रपती पोलीस पदक, पोलीस शौर्यपदक, गुणवत्तापूर्ण सेवापदक जाहीर झालेल्या महाराष्ट्र पोलीस दलातील 76 अधिकारी व कर्मचाऱ्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे. कायदा-सुव्यवस्था, गुप्तवार्ता, गुन्ह्यांचा तपास, आपत्कालीन परिस्थितीतील मदतकार्य, नागरिकांशी संवाद-सौहार्द अशा अनेक आघाड्यांवर जगातील सर्वोत्कृष्ट पोलिस दलांपैकी असलेल्या महाराष्ट्र पोलिसांनी त्यांची क्षमता, गुणवत्ता, दर्जा पुन्हा एकदा सिद्ध केला आहे. पदक विजेत्या पोलिसांचा राज्याला अभिमान आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी सर्वांचं कौतुक केलं असून यशस्वी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. उल्लेखनीय सेवेबद्दल ‘राष्ट्रपती पदक’ विजेत्या प्रवीण साळुंखे, विनयकुमार चौबे आणि जयंत नाईकनवरे या पोलीस अधिकाऱ्यांचेही उपमुख्यमंत्र्यांनी विशेष अभिनंदन केले आहे.


            भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृहमंत्रालयाने देशातील 954 पोलिस पदकांची घोषणा केली. राज्यातील 76 पोलिसांना ही पदके जाहीर झाली आहेत. उपमुख्यमंत्री श्री. पवार आपल्या अभिनंदनपर संदेशात म्हणतात की, महाराष्ट्र पोलिसांना शौर्याची, त्यागाची, देशसेवेची, बलिदानाची प्रदीर्घ, गौरवशाली परंपरा आहे. महाराष्ट्र पोलिसांची देशसेवेची ही गौरवशाली परंपरा पुढे नेणाऱ्या राज्यातील तीन पोलीस अधिकाऱ्यांना उत्कृष्ट सेवेचे ‘राष्ट्रपती पोलीस पदक’, 33 अधिकारी-कर्मचाऱ्यांना 'पोलीस शौर्यपदक', तसेच गुणवत्तापूर्ण सेवेसाठी 40 अधिकारी-कर्मचाऱ्यांना ‘पोलीस पदक’ जाहीर झाले आहे. पदक विजेत्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्राला अभिमान असून यापुढील काळातही त्यांच्याकडून अशीच देशसेवा घडत राहील, असा विश्वासही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी व्यक्त केला आहे.


0000

महाराष्ट्रातील 17 तुरुंग कर्मचाऱ्यांनासुधारात्मक सेवा पदक जाहीर

 महाराष्ट्रातील 17 तुरुंग कर्मचाऱ्यांनासुधारात्मक सेवा पदक जाहीर


            नवी दिल्ली, 14 : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृह मंत्रालयांतर्गत येणाऱ्या विभागातील कर्मचाऱ्यांनी केलेल्या उल्लेखनीय सेवांसाठी विविध पदके आज जाहीर करण्यात आली आहेत. तुरुंग कर्मचाऱ्यांनी केलेल्या सुधारात्मक सेवांसाठी देखील पदके जाहीर झाली आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील एकूण 17 तुरुंग कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.


महाराष्ट्रातील तुरुंग कर्मचाऱ्यांची यादी :-

विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती सुधारात्मक सेवा पदक


1. श्री. सुनील निवृत्ती धमाल, अतिरिक्त अधीक्षक वर्ग 1


2. श्री. प्रकाश बाबुराव उकरंडे, जेलर ग्रुप 1


3. श्री. तात्यासाहेब सदाशिव निंबाळकर, जेलर ग्रुप 1


4. श्री. आनंद शंकर हिरवे, सुभेदार


5. श्री. गणेश पांडुरंग घोडके, हवालदार


 


गुणवत्तापूर्ण सेवेसाठी सुधारात्मक सेवा पदक


1. श्री. अनिल हणमंत खामकर, अधीक्षक वर्ग 1


2. श्री. वामन तुकाराम निमजे, जेलर गट 1


3. श्री. विजय ज्ञानेश्वर कांबळे, जेलर ग्रुप 1


4. श्री. तानाजी कृष्ण धोत्रे, जेलर ग्रुप 2


5. श्री. किशोरीलाल सुकराम रहांगडाले, सुभेदार


6. श्री. विजय लाडकू पाटील, सुभेदार


7. श्री. प्रकाश महादेव सातपुते, सुभेदार


8. श्री. चंद्रकांत नारायण बोसोडे, सुभेदार


9. श्री.बाबासाहेब हनुमंत चोरगे, हवालदार


10. श्री. दत्तात्रय किसन भोसले, हवालदार


11. श्री. अशोक कुंडलिक आडाळे, शिपाई


12. श्री. सुधाकर रामकृष्ण माळवे, शिपाई


००००




 


पाच कर्मचाऱ्यांना ‘गृहरक्षक’ आणि ‘नागरी संरक्षण पदक’ जाहीर

 महाराष्ट्रातील आठ अग्निशमन जवानांना ‘अग्निशमन सेवा पदक’


पाच कर्मचाऱ्यांना ‘गृहरक्षक’ आणि ‘नागरी संरक्षण पदक’ जाहीर.

            नवी दिल्ली, 14 : स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने केंद्रीय गृह मंत्रालयाने अग्निशमन क्षेत्रात अतुलनीय कार्य करणाऱ्यांना आणि गृहरक्षक (होम गार्ड ) तसेच नागरी संरक्षण सेवेत उल्लेखनीय कार्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी राष्ट्रपती पदक आज जाहीर केले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील एकूण 13 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.


            ‘राष्ट्रपती शौर्य पदक’ उल्लेखनीय सेवांसाठी ‘राष्ट्रपती पदक’ तसेच ‘शौर्य पदक’ आणि ‘उत्कृष्ट सेवा पदक’ दरवर्षी अग्निशमन सेवा, नागरी संरक्षण आणि गृहरक्षक दलाच्या जवानांना जाहीर केली जातात. वर्ष 2023 साठी 53 जवानांना ‘अग्निशमन सेवा पदक’ जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील आठ अग्निशमन जवानांचा समावेश आहे.


            शौर्य आणि पराक्रम गाजवल्याबद्दल 03 जवानांना ‘राष्ट्रपती अग्निशमन सेवा शौर्य पदक’ आणि एका जवानाला ‘अग्निशमन सेवा शौर्यपदक’ जाहीर झाले आहे.


            उत्कृष्ट सेवेसाठी ‘राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक’, 8 कर्मचाऱ्यांना, उल्लेखनीय सेवेसाठी ‘अग्निशमन सेवा पदक’ आणि 41 कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट व उल्लेखनीय सेवा कामगिरीसाठी पदक जाहीर करण्यात आले आहे. यापैकी महाराष्ट्रातील आठ अग्निशमन जवानांचा समावेश आहे.


            देशातील 48 कर्मचाऱ्यांना, स्वयंसेवकांना गृहरक्षक आणि नागरी संरक्षण पदकांची घोषणा करण्यात आली आहे. उत्कृष्ट सेवेसाठी ‘राष्ट्रपती गृहरक्षक’ आणि ‘नागरी संरक्षण पदक’ तसेच उल्लेखनीय सेवेसाठी ‘गृहरक्षक’ आणि ‘नागरी संरक्षण पदक’ अनुक्रमे 05 कर्मचारी / स्वयंसेवक आणि 43 कर्मचारी/ स्वयंसेवकांना जाहीर झाले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील पाच कर्मचाऱ्यांना उल्लेखनीय सेवेसाठी ‘गृहरक्षक’ आणि ‘नागरी संरक्षण पदक’ जाहीर करण्यात आली आहेत.


राज्यातील ‘अग्निशमन सेवा पदके’ आणि ‘गृहरक्षक’ आणि ‘नागरी संरक्षण पदक’ जाहीर झालेल्यांची यादी सोबत जोडली आहे.


  गुणवत्तापूर्ण सेवेसाठी अग्निसेवा पदक


1. श्री. करीमखान फजलखान पठाण, फायर इंजिन चालक


2. श्री. कसाप्पा लक्ष्मण माने, फायरमन


3. श्री. नरसिंह बसप्पा पटेल, रुग्णवाहिका परिचर (आग)


4. श्री. रवींद्र नारायणराव अंबुलगेकर, उपमुख्य अग्निशमन अधिकारी


5. श्री. दीपक कालीपाद घोष,उपमुख्य अग्निशमन अधिकारी


6. श्री. सुनील आनंदराव गायकवाड, उपअधिकारी


7. श्री. पराग शिवराम दळवी, लीडिंग फायरमन


8. श्री. तातू पांडुरंग परब, फायरमन


 


 गुणवत्तापूर्ण सेवेसाठी होम गार्ड आणि नागरी संरक्षण पदक


1. श्री. तुषार चंद्रकांत वरंडे, सेंटर कमांडर (एचजी)


2. श्री. अय्युबखान अहमदखान पठाण,ऑफिसर कमांडिंग (HG)


3. श्री. राजेंद्र पांडुरंग शहाकर,होमगार्ड


4. श्री. सुधाकर पांडुरंग सूर्यवंशी, नागरी संरक्षणाचे वरिष्ठ सहायक उपनियंत्रक (सीडी)


5. श्री. विजय जनार्दन झावरे, फायर रेस्क्यू लीडर (नागरी संरक्षण)


००००

Sunday, 13 August 2023

स्वातंत्र्य दिन समारंभाची मंत्रालयात रंगीत तालीम

 स्वातंत्र्य दिन समारंभाची मंत्रालयात रंगीत तालीम



 

 

            मुंबईदि १३: भारतीय स्वातंत्र्याचा ७६ वा वर्धापन दिन १५ ऑगस्ट २०२३ रोजी साजरा करण्यात येणार आहे. राज्याचा मुख्य शासकीय कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंबईत मंत्रालय येथे सकाळी ९.०५ वाजता ध्वजारोहण करून साजरा करण्यात येणार आहे.

            सामान्य प्रशासन (राजशिष्टाचार) विभागामार्फत भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालय येथे ध्वजारोहण समारंभाची रंगीत तालीम आज घेण्यात आली. यावेळी राजशिष्टाचार विभागाचे सहसचिव रामचंद्र धनावडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

     याप्रसंगी अपर पोलीस महासंचालक निखिल गुप्ता, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता अशोक गायकवाड यांच्यासह मंत्रालयीन विभागाचे अधिकारीसार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्यासह पोलीस दलाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

0000

समान नागरी कायदा आणणे म्हणजे हिंदू कोड बिल लादणे नव्हे !

 समान नागरी कायदा आणणे म्हणजे हिंदू कोड बिल लादणे नव्हे !


आमदार अतुल भातखळकर यांचे प्रतिपादन



[फोटो आहे]



मुंबई : समान नागरी कायदा हा भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने राजकारणाचा मुद्दा नसून तो राष्ट्रीय एकात्मता आणि प्रबोधनाचा आहे. समान नागरी कायदा करणे म्हणजे हिंदू कोड बिल लादणे, असा त्याचा अर्थ होत नसून स्त्री-पुरुष समानतेच्या पायावर सर्व भारतीयांसाठीचा हा नागरी कायदा करणे असा त्याचा अर्थ आहे. आम्ही लोकांच्यात जाऊ, लोकांना याचे महत्व पटवून सांगू आणि प्रबोधन करू. संविधानकर्त्यांनी जे सांगितले त्याची अंबलबजावणी करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. स्त्री-पुरुष समानतेची आमची कल्पना आहे. हेच सामान नागरी कायद्यातून साध्य होणार असल्याचे प्रतिपादन भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी केले. मालाड पूर्वमध्ये अधिवक्ता परिषद-कोकण प्रांत यांच्या वतीने 'समान नागरी संहिता' या विषयावर आयोजित व्याख्यानात आमदार भातखळकर बोलत होते. यावेळी ज्येष्ठ अधिवक्ता पुनीत चतुर्वेदी, अनिल मेहता उपस्थित होते.


आमदार भातखळकर म्हणाले, समान नागरी कायदा हा विषय संविधानाच्या मार्गदर्शक तत्वामध्ये सांगितला आहे. आतापर्यंत सर्वोच्च न्यायालयाने चारवेळा समान नागरी कायदा करावा असे सांगितले आहे. संविधानाला पूरक अशीच ही बाब आहे. यातून महिलांवर होणारे अत्याचार दूर होणार आहेत. महिलांच्या सन्मानाचा आणि त्यांच्या अधिकाराचा हा मुद्दा आहे. जेवढा अधिकार पुरुषांना तेवढाच स्त्रियांना अधिकार हाच समान नागरी कायदा आहे. भाजपची हीच भूमिका असून आम्ही लोकांच्यात जाऊन हि भूमिका सांगून जागृती करू. भाजपसाठी हा राजकीय मुद्दा नाही समान नागरी कायदा आणणे म्हणजे हिंदू कोड बिल आणणे असे अजिबात नाही. याचा पाया केवळ स्त्री-पुरुष समानता, आधुनिकता हाच असल्याचे ते म्हणाले.


आ. भातखळकर म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन तलाक कायदा आणला तेव्हा जो विरोध झाला तसाच प्रकार समान नागरी कायद्याच्या बाबतीत होत आहे. भाजपने समान नागरी कायदा हा विषय नेहमी आपल्या जाहीरनाम्यात समोर ठेवला आहे. मात्र दुर्दैव हे की, धर्मनिरपेक्षतेच्या नावावर देशात प्रचंड विभाजनवाद, महिलांवरील अत्याचाराचे समर्थन करण्यात आले. अशा ढोंगी धर्मनिरपेक्षवाद्यांनी समान नागरी कायद्याबद्दल भ्रम निर्माण केला आहे. समान नागरी कायदा आणणे म्हणजे मुस्लिम समाजाच्या वैयक्तिक नियमांमध्ये सत्ताधाऱ्यांनी हस्तक्षेप करणे असे स्वरूप देण्यात आले. हे असत्य आणि भ्रम निर्माण करणारे असल्याने आम्ही लोकांच्यात जाऊन याबाबत प्रबोधन करू, असेही आ. भातखळकर म्हणाले.

Featured post

Lakshvedhi