Thursday, 10 August 2023

शैक्षणिक संस्थांनी रसायन तंत्रज्ञान संस्थेचा आदर्श घ्यावा

 शैक्षणिक संस्थांनी रसायन तंत्रज्ञान संस्थेचा आदर्श घ्यावा


- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील


 


            मुंबई, दि. १० : मुंबई विद्यापीठाचा एक विभाग म्हणून स्थापन झालेल्या रसायन तंत्रज्ञान संस्थेचे उत्तम शैक्षणिक व संशोधन संस्थेत रुपांतर झाले. अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळाल्यानंतर दमदार प्रवास या संस्थेने केला आहे. अन्य शैक्षणिक संस्थांनी रसायन तंत्रज्ञान संस्थेचा आदर्श घ्यावा, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील केले.


            माटुंगा येथील रसायन तंत्रज्ञान संस्था परिसरात १३ व्या दीक्षांत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रसायन तंत्रज्ञान संस्थेचे कुलपती पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर, कुलगुरु अनिरुध्द पंडित, संचालक उदय अन्नपुरे प्राध्यापक प्रदीप वाविया, कुलसचिव राजेंद्र देशमुख, अधिष्ठाते, विविध विभागांचे विभाग प्रमुख, आजी माजी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, संस्थेचे आजी - माजी विद्यार्थी, संस्थेत शिकून पुढे विविध कंपन्यांचे प्रमुख झालेले माजी विद्यार्थी व इतर मान्यवर उपस्थित होते.


            मंत्री श्री. पाटील म्हणाले की, या संस्थेने आतापर्यंत १९ पद्म पुरस्कारप्राप्त व्यक्ती, कोणत्याही व्यवसायाची पार्श्वभूमी नसलेले ६०० पेक्षा अधिक उद्योजक देशाला दिले आहेत. अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संस्थांमध्ये नॅकमध्ये ४ पैकी ३.७७ असे सर्वोत्तम गुण मिळवून A++ ग्रेड, टाईम्स हायर एज्युकेशन २०२३ क्रमवारीत आशिया युनिव्हर्सिटी रैंकिंगमध्ये २५१ ते ३०० च्या दरम्यान तर केंद्र सरकारच्या एनआयआरएफ क्रमवारीत विद्यापीठांमध्ये २३ वा क्रमांक तसेच एमएचआरडीने जाहिर केलेल्या अटल (ARIIA) क्रमवारीत सहावा क्रमांक मिळविल्याबद्दल मंत्री श्री. पाटील यांनी सर्वांचे अभिनंदन केले.


            प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देशाला बलशाली आणि वैभवशाली बनविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. यामध्ये तरुणांचा सहभाग महत्त्वाचा असणार आहे. त्यासाठी तरुणांनी नवीन संशोधन, पेटंट आणि नाविन्यता यावर अधिक भर द्यावा, असेही मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.


            संशोधनाच्या क्षेत्रातही रसायन तंत्रज्ञान संस्था उत्तम कामगिरी करीत आहे. गेल्या १० वर्षांत ४०० पेक्षा अधिक पेटेंट्स घेतलेले आहेत. अनेक संशोधन प्रकल्पांवर काम सुरू आहे. औद्योगिक क्षेत्राची गरज लक्षात घेऊन संस्थेने जालना व भुवनेश्वर येथे सेंटर सुरू केले आहे. या दोन्ही ठिकाणी नविन्यपूर्ण प्रयोग करीत आहेत यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल अशी ग्वाही दिली.


००००

महिला बचत गटांना माविमने व्यवसायाभिमुख मार्गदर्शन करावे

 महिला बचत गटांना माविमने व्यवसायाभिमुख

 मार्गदर्शन करावे


- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे


            मुंबई, दि. 10 : राज्यात मोठ्या प्रमाणात ग्रामीण व शहरी महिला बचत गट आहेत. या महिला बचत गटांतील सदस्यांना व्यवसायाभिमुख मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे. बचतगटातील सदस्यांना महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत अधिकाधिक मार्गदर्शन देऊन बचत गटांचे सक्षमीकरण करण्यास प्राधान्य द्यावे, अशा सूचना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केल्या.


             महिला आर्थिक विकास महामंडळाच्या आढावा बैठकीत मंत्री कु. तटकरे बोलत होत्या. यावेळी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक इंदू जाखड, महाव्यवस्थापक कुसुमताई बाळसराफ, रविंद्र सावंत माविमचे इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते.


                    मंत्री कु. तटकरे म्हणाल्या की, ग्रामीण भागातील ९९ हजार ६९९ बचतगटांना शहरी भागातील ६५ हजार ३३० बचतगटांना सातत्याने मार्गदर्शन करण्यात यावे. ग्रामीण व शहरी भागातील बचतगटांच्या योजना प्रभावीपणे राबवाव्यात. ई-बिझनेस प्लॅटफॉर्ममध्ये महिलांचा सहभाग वाढवावा. शाश्वत विकासासाठी माविमने बचत गटांसाठी योजना सादर कराव्यात, अशा सूचनाही मंत्री कु. तटकरे यांनी केल्या.


                  तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला सक्षमीकरण कार्यक्रम, अल्पसंख्याक महिला सक्षमीकरण कार्यक्रम, केंद्रपुरस्कृत योजना, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती कार्यक्रम, स्वयंसहाय्यता बचत गट, माविमचे ध्येय व उद्दीष्टे, नाविन्यपूर्ण उपक्रम याची सविस्तर माहिती यावेळी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक इंदू जाखड यांनी दिली.


***

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाच्या उन्नतीसाठी दीडशे कोटी रुपये

 आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाच्या उन्नतीसाठी दीडशे कोटी रुपये


- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

            मुंबई, दि. 10 :- खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत)ची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेमार्फत या घटकांच्या उन्नतीसाठी शैक्षणिक योजना, स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण व नोकरीइच्छुक युवकांसाठी यूपीएससी व एमपीएससीचे अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी संस्थेला यावर्षी दीडशे कोटी रुपये देणार, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.


            अमृत संस्थेच्या अडीअडचणी आणि भविष्यातील योजना याबाबत आढावा बैठक उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात झाली. यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.


            अमृत संस्थेचे कामकाज प्रभावीपणे व्हावे, यासाठी व्यवस्थापकीय संचालक या पदासह इतर पदांची निर्मिती करण्यात आली आहे. व्यवस्थापकीय संचालक पदाव्यतिरिक्त उर्वरित मनुष्यबळ बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यात यावे. संस्थेच्या माध्यमातून खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील तरुणांसाठी उद्योग, व्यवसाय,नोकरी, उच्च शिक्षण, परदेशात उच्च शिक्षण, व्यक्तिमत्व विकासासह सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाच्या योजना राबविण्यात याव्यात. यामध्ये महाराष्ट्र राज्यसेवा आयोग, केंद्रिय लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेसाठी निवड झालेल्या उमेदवारांना विद्यावेतन, कौशल्य विकासाद्वारे रोजगार उपलब्ध करुन देणे, आर्थिक विकासाकरिता स्वयंरोजगार प्रोत्साहन आणि प्रशिक्षण कार्यक्रम राबवून युवकांना स्वावलंबी बनविणे तसेच कृषिपूरक उद्योग सुरु करण्यासाठी प्रशिक्षण व इतर विभागाच्य योजनांशी रुपांतरण करुन योजना राबविण्यात याव्यात असेही उपमुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले. 


            अमृत संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी संस्थेच्या भविष्यातील योजनांची माहिती सादरीकरणाद्वारे दिली. इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सचिव अंशु सिन्हा, उपमुख्यमंत्री यांचे सचिव श्रीकर परदेशी, अमृत संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी, नियोजन विभागाचे उपसचिव प्रसाद महाजन, कामगार विभागाचे उपसचिव दीपक पोकळे, कामगार विभागाचे श्रीराम गवई, उदय लोकापाली यावेळी उपस्थित होते.


००००

राज्यातील विकासप्रकल्प मार्गी लावण्यासाठीकेंद्र सरकारकडे पाठवायचे प्रस्ताव अधिकाऱ्यांनी तातडीने

 राज्यातील विकासप्रकल्प मार्गी लावण्यासाठीकेंद्र सरकारकडे पाठवायचे प्रस्ताव अधिकाऱ्यांनी तातडीने


मुख्यमंत्र्यांकडे सादर करावेत


- उपमुख्यमंत्री अजित पवार


 


            मुंबई, दि. 10 :- "पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पातल्या मार्गिका 1, 2 आणि 3 ची उर्वरित कामे तातडीने पूर्ण केली जातील. पुणे-नाशिक रेल्वेमार्गाच्या कामाला गती दिली जाईल. पुणे रिंगरोडचे काम वेगाने पूर्ण करण्यात येईल. पुणे येथील कृषीभवन, शिक्षण आयुक्तालय, कामगार कल्याण भवन, सहकार भवन, नोंदणी भवन, साखर संग्रहालय, इंद्रायणी मेडिसिटी, शिरुर-खेड-कर्जत मार्गाचं चौपदरीकरण, 'सारथी'चं प्रशिक्षण केंद्र, वढू-तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक, सातारा, अलिबाग येथील वैद्यकीय महाविद्यालय, मुंबईतील जीएसटी भवनासह राज्यातील विकासकामे वेगाने पूर्ण करण्यात येतील. दर आठवड्याला वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पायाभूत प्रकल्पांच्या प्रगतीचा आढवा घेतला जाईल. प्रकल्पांच्या मार्गातील अडथळे दूर केले जातील. ज्या विकासप्रकल्पांना केंद्र सरकारची मंजूरी, सहकार्य लागेल ते तात्काळ देण्याची ग्वाही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली आहे. आवश्यकतेनुसार त्यांची भेट घेऊन राज्यातील प्रश्न मार्गी लावण्यात येतील. यापुढच्या काळात राज्यातील विकास प्रकल्प वेगाने पूर्ण करणे, हीच शासनाची सर्वोच्च प्राथमिकता असणार आहे. त्याअनुषंगाने संबंधित अधिकाऱ्यांनी कार्यवाही करावी," असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात आयोजित वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले.


            राज्यातील पायाभूत प्रकल्पांना गती देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मॉनिटरिंग कक्ष कार्यान्वित केला असून त्याची बैठक अलीकडेच मंत्रालयात झाली. बैठकीला मुख्य सचिव मनोज सौनिक, अपर मुख्य सचिव नितिन करीर, अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, अपर मुख्य सचिव मनिषा म्हैसकर, अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, अपर मुख्य सचिव दीपक कपूर, प्रधान सचिव असीम गुप्ता, प्रधान सचिव सौरभ विजय, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आशिष शर्मा, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे उपसचिव गजानन पाटील, पुणे विभागीय आयुक्त, पुणे जिल्हाधिकारी, पुणे तसेच पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त, पुणे मेट्रो, पीएमआरडीए, तसेच संबंधित जिल्ह्यांचे आणि विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


            उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत राज्यातील महत्वाच्या पायाभूत प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेतला. प्रगतीत अडथळे ठरणारी कारणे दूर करण्याबाबत त्यांनी संबंधितांना निर्देश दिलेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे राज्यातील विकासप्रकल्पांना गती देण्याबाबत सकारात्मक असून केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन अमित शाह यांनी दिले असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यानी बैठकीत सांगितले. ज्या प्रकल्पांना केंद्राची परवानगी, मदत, सहकार्य अपेक्षित असेल त्याबाबतचे प्रस्ताव तातडीने मुख्यमंत्री महोदयांना सादर करा. त्याची प्रत दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे द्या, अशा सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.


            अशाप्रकारची बैठक दर पंधरा दिवसांनी आयोजित करुन विकासकामातील अडथळे दूर करण्यात येतील तसेच सर्व प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण केले जातील, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी व्यक्त 

केला.


०००००००


अल्पसंख्याक विकास आयुक्तालयाबाबतचा प्रस्ताव तयार करावा

 अल्पसंख्याक विकास आयुक्तालयाबाबतचा प्रस्ताव तयार करावा

- मंत्री अब्दुल सत्तार


            मुंबई, दि. ९ : अल्पसंख्याक विकास विभागाच्या माध्यमातून विविध योजना राबविण्यात येतात. या योजना अल्पसंख्याक समाजापर्यंत पोहचविण्यासाठी अल्पसंख्याक विकास आयुक्तालय उभारण्याचे शासनाच्या विचाराधीन असून याबाबतचा प्रस्ताव तत्काळ तयार करावा, असे निर्देश अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले.


            आज मंत्रालयात मंत्री श्री. सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली अल्पसंख्याक विकास विभागाची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस अल्पसंख्याक विकास विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन, उपसचिव मो.बा. ताशिलदार उपस्थित होते.


                मंत्री श्री. सत्तार म्हणाले, अल्पसंख्याक समाज विकास योजनांसाठी असणारा निधी अखर्चित राहणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी. मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ व विभागातील रिक्त जागा भरण्यासंदर्भात आढावा घेवून पदे तत्काळ भरण्याबाबत कार्यवाही करावी, असे निर्देश संबंधितांना मंत्री श्री. सत्तार यांनी दिले.

शेंडा पार्क येथील ११०० खाटा रुग्णालयाऐवजी ६०० खाटांचे सामान्य रुग्णालय तर २५० खाटांचे कॅन्सर रुग्णालय

 शेंडा पार्क येथील ११०० खाटा रुग्णालयाऐवजी

६०० खाटांचे सामान्य रुग्णालय तर २५० खाटांचे कॅन्सर रुग्णालय


- मंत्री हसन मुश्रीफ


            मुंबई, दि. ९ : कोल्हापूरच्या शेंडा पार्क येथील ११०० खाटा रुग्णालयाऐवजी ६०० खाटांचे सामान्य रुग्णालय तर २५० खाटांचे कॅन्सर रुग्णालयाचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या.


            छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय कोल्हापूर या संस्थेतील विविध सुविधांच्या उपाययोजना करण्याबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते.


            यावेळी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्या सचिव डॉ. अश्विनी जोशी, शिक्षण व औषध द्रव्य विभागाचे आयुक्त राजीव निवतकर, वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. अजय चंदनवाले यांची प्रमुख उपस्थिती होती.


            छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय कोल्हापूर रुग्णालयातील इमारतींना रंगकाम, रस्ते दुरुस्ती, खिडक्या दुरुस्ती, दरवाजे दुरुस्ती, ड्रेनेज दुरुस्ती इत्यादी कामे करण्यासाठी 48.45 कोटी इतक्या रकमेस प्रशासकीय मान्यता देऊन ती कामे त्वरित सुरू करण्याच्या सूचना मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या


            वैद्यकीय महाविद्यालयाच्या शेंडा पार्क येथील ऑडिटोरियम हॉलमधील नूतनीकरण करण्यासाठी ११ कोटी ५० लाख रुपयांची अतिरिक्त मागणी करण्यात आली असून ऑडिटोरियम हॉलमध्ये आवश्यक कामे करण्यासाठी सुधारित प्रस्ताव सादर करण्याच्याही सूचना मंत्री श्री. मुश्रीफ यांनी दिल्या.


0000


  राजू धोत्रे

मंत्रालयीन सार्वजनिक उद्घोषणा प्रणालीवर आता दररोज शिवविचारांचा जागर

 मंत्रालयीन सार्वजनिक उद्घोषणा प्रणालीवर

आता दररोज शिवविचारांचा जागर


            मुंबई, दि. ९ : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक वर्ष सोहळ्याच्या ३५० व्या वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या सहकार्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याचे स्मरण करणारी २ ते ३ मिनिटांची उद्घोषणा वर्षभरासाठी मंत्रालयात कामकाजाच्या दिवशी सकाळी १०.४५ वाजता प्रसारित करण्यात येणार आहे. सांस्कृतिक कार्य विभागाचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून आज या उद्घोषणा प्रणालीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली.


            मंत्रालय हा प्रशासनाचा केंद्रबिंदू आहे. मंत्रालयातील अधिकारी- कर्मचारी यांच्यासाठी नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी विविध उद्घोषणा सतत होत असतात. मात्र, याच सार्वजनिक उद्घोषणा प्रणालीवरुन आता दररोज सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर होणार आहे.


            छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य, विचार, पराक्रमाची माहिती व्हावी, दररोज मंत्रालयात येणाऱ्या अधिकारी –कर्मचारी यांना या शिवरायांच्या विचारातून उर्जा, चैतन्य, स्फूर्ती मिळावी, दिवसाची सुरुवात चैतन्याने व्हावी, अशी सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. मुनगंटीवार यांची संकल्पना होती. त्यांच्या या संकल्पनेस मुख्यमंत्री श्री. शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. आज ‘मेरी मिट्टी मेरा देश’ अर्थात ‘माझी माती माझा देश’ अभियानाच्या शुभारंभ कार्यक्रमात मंत्रालयाच्या सार्वजनिक उद्घोषणा प्रणालीवरुन या शिवविचारांच्या जागरास सुरुवात झाली.


            गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, मुख्य सचिव मनोज सौनिक, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, ग्रामविकास विभागाचे सचिव एकनाथ डवले आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.


००००

Featured post

Lakshvedhi