Friday, 4 August 2023

नागरिकांच्या सोयीसाठी वाळू धोरणात आवश्यक ते बदल करणार

 नागरिकांच्या सोयीसाठी वाळू धोरणात आवश्यक ते बदल करणार


– महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील


            मुंबई, दि. 3 : राज्य शासनाने वाळू धोरणाची अंमलबजावणी सुरु केली असून त्यात उणिवा असतील, तर त्या निश्चितपणे दूर केल्या जातील. जेथे वाळू उपलब्ध नाही, त्याठिकाणी कृत्रिम वाळूचा वापर अथवा सॅण्ड ॲश वापरण्याचा पर्याय आहे. त्यासाठी धोरणात आवश्यक ते बदल केले जातील तसेच ट्रॅक्टरने वाळू वाहतूक करण्यासंदर्भातील बंदी उठविण्यासंदर्भात तातडीने कार्यवाही केली जाईल, अशी माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज विधानसभेत दिली.


            सदस्य नरेंद्र भोंडेकर यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला मंत्री श्री. विखे पाटील यांनी उत्तर दिले.


            ते म्हणाले की, राज्यातील नागरीकांना स्वस्त दराने वाळू उपलब्ध करून देणे व अनधिकृत उत्खननास आळा घालण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने वाळू/रेतीचे उत्खनन, साठवणूक, व्यवस्थापन व ऑनलाईन प्रणालीव्दारे विक्री व्यवस्थापन याबाबतचे सर्वंकष धोरण जाहीर केले. या धोरणाच्या अनुषंगाने भंडारा जिल्ह्यामध्ये एकूण 09 वाळू डेपो कार्यान्व‍ित करुन, नागरिकांना वाळू उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. मात्र, यासाठी देण्यात आलेल्या परवान्यासंदर्भात तक्रारी असतील आणि स्थानिक अधिकारी संबंधितांना पाठिशी घालत असतील, तर त्याची विभागीय आयुक्त, नागपूर यांच्यामार्फत चौकशी करण्यात येईल. तसेच, अतिउपसा करण्यासंदर्भातील तक्रारीचीही चौकशी करण्यात येईल, असे मंत्री श्री. विखे पाटील यांनी सांगितले.


            यावेळी सदस्य सर्वश्री ॲड. आशिष जयस्वाल, बच्चू कडू, मेघना बोर्डीकर, डॉ. संजय कुटे यांनी विविध प्रश्न विचारले.  

इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेस दिलेल्या जमीन प्रकरणीशर्तभंग झाल्याच्या तक्रारीची जिल्हाधिकाऱ्यांमार्फत चौकशी

 इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेस दिलेल्या जमीन प्रकरणीशर्तभंग झाल्याच्या तक्रारीची जिल्हाधिकाऱ्यांमार्फत चौकशी


- महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील


            मुंबई, दि. 3 : तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेने त्यांना देण्यात आलेल्या जमिनीच्या अनुषंगाने शर्तभंग केला असेल तर त्याची जिल्हाधिकारी यांच्यामार्फत चौकशी करण्यात येईल. तोपर्यंत क्रीडांगणाच्या जागेवर बांधकाम सुरु असेल तर ते थांबवण्याच्या सूचना दिल्या जातील, अशी माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत दिली.


            सदस्य सुनील शेळके यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला मंत्री श्री. विखे पाटील यांनी उत्तर दिले.


            ते म्हणाले की, इंद्रायणी विद्या मंदीर, तळेगाव दाभाडे या संस्थेस 7 एकर क्षेत्र शैक्षणिक प्रयोजनार्थ कब्जेहक्काने आणि 8 एकर क्षेत्र क्रीडांगण या प्रयोजनासाठी भाडेपट्टयाने धारणाधिकार भोगवटादार वर्ग 2 वर प्रदान करण्यात आली आहे. या संस्थेने (वाणिज्य) बांधकामाकरीता ऑनलाईन अर्ज तळेगाव दाभाडे नगर परिषदेकडे सादर केला होता. संस्थेने सादर केलेल्या प्रस्तावातील त्रुटीच्या अनुषंगाने नगर परिषद तळेगाव यांनी अर्ज नामंजूर करून निकाली काढला आहे. अर्जदार संस्थेमार्फत किंवा संस्थेच्या वास्तुविशारदामार्फत नगर परिषद कार्यालयाकडे बांधकाम परवानगीसाठी केलेला अर्ज प्रलंबित असल्याचे आढळून येत नसल्याने संस्थेने सुरु केलेले बांधकाम तत्काळ थांबविण्याचे कळविले असल्याचे मंत्री श्री. विखे पाटील यांनी सांगितले.


000

विकासकासंदर्भातील तक्रारींची चौकशी करणार

 विकासकासंदर्भातील तक्रारींची चौकशी करणार


– गृहनिर्माण मंत्री अतुल सावे


            मुंबई, दि. 3 : हिंद मिल कम्पाऊंड यांची मालकी असणारी मालमत्ता मुंबई इमारत दुरुस्ती पुनर्रचना मंडळाला (म्हाडा) सन 1961 मध्ये हस्तांतरीत करण्यात आली होती. ही जागा लोकमान्य नगर, प्रियदर्शिनी सहकारी गृहनिर्माण संस्थेला सन 1988 पासून 90 वर्षांच्या भाडेपट्ट्यावर देण्यात आली आहे. हा भूखंड विकासकाकडे देण्यात आला होता. यासंदर्भात देण्यात आलेल्या चटई क्षेत्र निर्देशांक, करारनाम्याचे उल्लंघन आणि अटी व शर्तींचा भंग झाला असेल तर त्याची चौकशी करण्यात येईल, अशी माहिती गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी आज विधानसभेत दिली.


            सदस्य कैलास गोरंट्याल यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला मंत्री श्री. सावे यांनी उत्तर दिले.         


            ते म्हणाले की, या संस्थेच्या 10 चाळी अस्तित्वात होत्या व त्यामध्ये एकूण 264 (संस्थेच्या कार्यालयासह) भाडेकरु / रहिवाशी व 08 सफाई कामगार आहेत. मुख्य अधिकारी, मुंबई मंडळ यांनी या संस्थेस ना-हरकत प्रमाणपत्र देण्यास संमती दिली होती. त्यानुसार लोकमान्य नगर, प्रियदर्शिनी संस्थेने विकासकाची नेमणूक केली. म्हाडाने यासंदर्भातील करारातील अटी विकासकाने पूर्ण केल्याचे दिसत असले, तरी यासंदर्भात तक्रारी असतील, तर त्याची चौकशी करण्यात येईल, असे मंत्री श्री. सावे यांनी सां

गितले. 


मुंबईच्या झोपडपट्टी पुनर्विकासासाठी

 मुंबईच्या झोपडपट्टी पुनर्विकासासाठसीआरझेड’च्या निकषांसंदर्भात केंद्राकडे पाठपुरावा करणार


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


          मुंबई, दि. 3 : सीआरझेड 2 मध्ये येणाऱ्या झोपडपट्ट्यांच्या विकासासाठी केंद्र सरकारने मागविलेला पर्यावरणीय खर्च व फायदा विश्लेषण अहवाल मुंबई महानगरपालिका आणि झोपडपट्टी पुर्नवसन प्राधिकरणाकडून तयार करून दोन महिन्यांच्या आत केंद्राकडे पाठवण्यात येईल. हा अहवाल तातडीने सादर करण्याच्या सूचना झोपडपट्टी पुर्नवसन प्राधिकरण व बृहन्मुंबई महानगरपालिका अधिकाऱ्यांना देण्यात आल्या असून मुंबईतील झोपडपट्टी पुनर्विकासाचे रखडलेली सर्व प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कार्यवाही सुरु करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले.


          सदस्य ॲड.आशिष शेलार यांनी या संदर्भातील लक्षेवधी उपस्थित केली होती, त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री श्री.शिंदे बोलत होते.


          मुख्यंत्री श्री.शिंदे म्हणाले की, मुंबईतील समूद्रकिनारी असलेल्या झोपडपट्ट्यांच्या विकासाचे प्रकल्प गेल्या काही वर्षापासून रखडेलेले आहेत ते तातडीने मार्गी लावण्याच्या दृष्टीने केंद्राकडे पाठपुरावा करण्यात येईल. तसेच मुंबईतील झोपडपट्टी पुनर्विकास, धोकादायक इमारती इत्यादी पुनर्विकासाचे जे प्रकल्प वर्षानुवर्षे रखडलेले आहेत ते पूर्ण करण्याचे शासनाचे धोरण आहे. यामध्ये एमएमआरडीए, म्हाडा, सिडको अशा सर्व शासकीय यंत्रणाच्या माध्यमातून हे सर्व पुनर्विकासचे प्रकल्प मार्गी लावण्यास शासनाचे प्राधान्य असून जनतेला मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.


          यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य वर्षा गायकवाड, मंदा म्हात्रे, नाना पटोले, बच्चू कडू यांनी सहभाग घेतला.



००००


सर्पदंशाने मुलीच्या मृत्यूप्रकरणी त्रिसदस्यीय समिती

 सर्पदंशाने मुलीच्या मृत्यूप्रकरणी त्रिसदस्यीय समिती


- सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत


 


            मुंबई, दि. 3 : पेण (जि. रायगड) येथील 12 वर्षीय मुलीचा सर्पदंशाने मृत्यू झाल्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यीय समिती नेमण्यात येईल आणि ही समिती तीन दिवसांत त्यांचा अहवाल सादर करेल, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी आज विधानसभेत एका निवेदनाद्वारे दिली.


            पेण येथील उपजिल्हा रुग्णालयात ही मुलगी दाखल झाली. तेथे तिच्यावर औषधोपचार करुन तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तरीही तब्येतीत सुधारणा होत नसल्याने तिला अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे तिच्यावर उपचार कऱण्यात आले. मात्र, तब्येतीत सुधारणा न झाल्याने 108 या रुग्णवाहिकेद्वारे या मुलीला नवी मुंबईतील इस्पितळात दाखल करण्यात आले. तेथे तिला अत्यवस्थ वाटू लागले. तिथेच तिचा मृत्यू झाला. या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल, असे निवेदन मंत्री प्रा. डॉ. सावंत यांनी केले.

अमेरिका, महाराष्ट्राच्या सुदृढ संबंधातून उज्वल भविष्य घडेल

 अमेरिका, महाराष्ट्राच्या सुदृढ संबंधातून उज्वल भविष्य घडेल


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


अमेरिकन स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रम


 


            मुंबई, दि. 3 :- 'अमेरिका आणि महाराष्ट्राचे सौहार्द, सुदृढ संबंध उज्वल भविष्य घडविण्यात महत्वपूर्ण ठरतील,' असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे व्यक्त केला.


            अमेरिकच्या २४७ व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने अमेरिकन वकिलात व वाणिज्य दूतावास यांच्यावतीने आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते.


            कार्यक्रमास अमेरिकेचे भारतातील राजदूत एरीक गार्सेटी, दूतावास प्रमुख माईक हॅन्की, पद्मश्री श्रीमती रीमा नानावटी, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी तथा अतिरिक्त मुख्य सचिव मनिषा म्हैसकर - पाटणकर मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे आदी मान्यवर उपस्थित होते.


            मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी याप्रसंगी उपस्थित अमेरिकन वकिलात, वाणिज्य दूतावासाशी निगडित वरिष्ठ अधिकारी, प्रतिनिधी, नागरिक तसेच मान्यवरांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, अमेरिकेचा स्वातंत्र्य लढा आणि लोकशाहीच्या बळकटीकरणातील योगदान उल्लेखनीय आहे. भारत आणि अमेरिकेतील मैत्री दिवसेंदिवस वृद्धिंगत होत आहे. त्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतलेला पुढाकार उल्लेखनीय आहे. प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी अलिकडेच अमेरिकेच्या केलेल्या दौऱ्यात या मैत्रीच्या नात्याचे प्रतिबिंब पडले. यामुळे दोन्ही देशांतील द्विपक्षीय संबंध आणखी वृद्धिंगत होतील. या माध्यमातून भारत आणि अमेरिका हे दोन्ही देश जगातील आव्हानांना यशस्वीपणे सामोरे जातील,असेही त्यांनी सांगितले.


            मुख्यमंत्री म्हणाले की, अमेरिकेतील गुंतवणूकदारांना महाराष्ट्र राज्यात गुंतवणुकीच्या उत्तम संधी उपलब्ध आहे. राज्यात कुशल मनुष्यबळ आणि पायाभूत सोयीसुविधांचा विकास गतीने होत आहे. राज्यात महिला सक्षमीकरण, तरुणांमधील कौशल्य विकास, मुलींच्या जन्माचे स्वागतासाठी 'लेक लाडकी' योजनेतून अनुदान देण्यात येत आहे. स्त्री- पुरुष समानतेवर भर देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगित

ले.


00000



 


पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जा प्रकल्पावर राबविण्यास प्राधान्य देणार

 पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जा प्रकल्पावर राबविण्यास प्राधान्य देणार


- पाणीपुरवठा स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील


          मुंबई, दि. 3 : पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जा प्रकल्पावर राबविण्यासाठी शासनाला शक्य आहे, तिथे प्राधान्याने मार्गदर्शक तत्त्वानुसार कार्यवाही करण्यात येईल, असे उत्तर पाणीपुरवठा स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी विधानपरिषदेत दिले.


            सदस्य रणजितसिंह मोहिते - पाटील यांनी जलजीवन मिशनअंतर्गत सोलापूर जिल्ह्याला दिलेले ७५ हजार नळ जोडण्यांचे उद्दिष्ट पूर्ण करण्याबाबत तसेच राज्यात सौर ऊर्जेवर पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना मंत्री श्री. पाटील बोलत होते.


            मंत्री श्री.पाटील म्हणाले की, सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात ५ लाख ७६ हजार ०७८ नळजोडण्या देण्याचे उद्दिष्ट होते. सन २०२३ अखेर प्रगतिपथावरील ८५५ पाणीपुरवठा योजनांमधील नळजोडण्या देऊन उद्दिष्ट पूर्ण करण्याचे नियोजन आहे. जलजीवन मिशन अंतर्गत २४ नळयोजना सौर ऊर्जा प्रकल्पावर कार्यरत आहेत. नव्याने अशी काही मागणी आल्यास त्याबाबत शासनाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल.


            यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य गोपीचंद पडळकर, नरेंद्र दराडे, महादेव जानकर यांनी सहभाग

 घेतला.


Featured post

Lakshvedhi