Tuesday, 18 July 2023

गृहनिर्माण विभागाचा आढावा

 मंत्री अतुल सावे यांनी घेतला

गृहनिर्माण विभागाचा आढावा


            मुंबई, दि. १७ : गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी आज गृहनिर्माण विभागाचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी त्यांनी गृहनिर्माण विभागाच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले.


            मंत्रालयातील परिषद सभागृहात आज दुपारी आयोजित केलेल्या या बैठकीस यावेळी गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर सिंह, प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे, उपसचिव अजित कवडे यांच्यासह गृहनिर्माण विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


            मंत्री श्री. सावे म्हणाले की, गृहनिर्माण विभागाच्या माध्यमातून विविध योजना राबविण्यात येतात. पात्र, झोपडपट्टीधारकांच्या पुनर्वसनासाठी राज्य शासनाने कायदे व अधिनियम केले आहेत. त्या माध्यमातून झोपडपट्टीधारकांच्या पुनर्वसनासाठी असलेल्या विविध योजनांची गतीने अंमलबजावणी करावी. झोपडीधारकांची पात्रता जलदगतीने निश्चितीसाठी व कामात पारदर्शकता आणण्यासाठी स्वयंचलित परिशिष्ट- २ प्रणालीचे काम त्वरित सुरू करावे. रखडलेल्या योजनांच्या पूर्ततेसाठी अभय योजना, निविदा प्रक्रियेचा अवलंब करून विकसकाची नियुक्ती झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण आणि ‘म्हाडा’च्या संयुक्त उपक्रमात झोपडपट्टी पुनर्वसन योजनांची अंमलबजावणीची कार्यवाही करावी. रद्द केलेल्या योजनांना गती मिळण्यासाठी सुनावणीची प्रक्रिया पूर्ण करावी, असेही मंत्री श्री. सावे यांनी सांगितले.


            यावेळी मंत्री श्री. सावे यांनी गिरणी कामगारांना प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत द्यावयाची घरकुले, बीडीडी चाळींचा पुनर्विकास, ‘म्हाडा’च्या योजना, महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम, विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली, झोपडपट्टी पुनर्वसन योजनांची सद्य:स्थिती, गेल्या वर्षभरात घेण्यात आलेल्या महत्वाच्या निर्णयांची सविस्तर माहिती घेत त्यांनी योजनांमधील अडचणी जाणून घेतल्या. अपर मुख्य सचिव वल्सा नायर सिंह, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. लोखंडे यांनी गृहनिर्माण व झोपडपट्टी पुनर्विकासाच्या योजनांची सविस्तर माहिती दिली.


उत्तर व दक्षिण कोकणासह मध्य महाराष्ट्रामध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

 उत्तर व दक्षिण कोकणासह मध्य महाराष्ट्रामध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा

नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन


            मुंबई, दि. १७ : भारतीय हवामान विभागाने मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, जळगाव, कोल्हापूर, सातारा, जालना, औरंगाबाद या जिल्ह्यांतील काही ठिकाणी मंगळवार १८ जुलै २०२३ रोजी मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसेच २१ जुलै २०२३ पर्यंत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन राज्य शासनाने केले आहे. या काळात वाऱ्याचा वेग ताशी ४० ते ४५, तर काही ठिकाणी तो ताशी ५५ किलोमीटरपर्यंत जावू शकतो, अशीही शक्यता वर्तविली आहे. या कालावधीत समुद्र खवळलेला राहणार असून मासेमारांनी समुद्रात जाणे टाळावे, असेही आवाहन करण्यात आले आहे. पावसाचा इशारा दिल्यानंतर राज्य शासनाने संबंधित जिल्हा प्रशासनांना दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Monday, 17 July 2023

बृहन्मुंबई क्षेत्रात ७ ऑगस्टपर्यंतप्रतिबंधित आदेश लागू

 बृहन्मुंबई क्षेत्रात ७ ऑगस्टपर्यंतप्रतिबंधित आदेश लागू

 

            मुंबईदि. १७ : बृहन्मुंबईतील सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस कायद्यामधील कलम ३७ (१) व (२) सह कलम दोनचे उपकलम ६कलम दहाचे उपकलम दोन अन्वये ७ ऑगस्ट २०२३ पर्यंत प्रतिबंधित आदेश लागू केले आहेतअसे पोलिस उपायुक्त विशाल ठाकूर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.


बार्टी’मार्फत आयोजित यूपीएससी पूर्वतयारीप्रशिक्षणासाठी १४ ऑगस्टपर्यंत अर्ज करावेत

 बार्टी’मार्फत आयोजित यूपीएससी पूर्वतयारीप्रशिक्षणासाठी १४ ऑगस्टपर्यंत अर्ज करावेत


         मुंबई, दि. १७ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे मार्फत दिल्ली येथील नामांकित प्रशिक्षण संस्थांमध्ये राज्यातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी संघ लोकसेवा आयोग-नागरी सेवा परीक्षेसाठी निःशुल्क अनिवासी प्रशिक्षण (कोचिंग) राबविण्यात येणार आहे. त्याकरिता १४ ऑगस्टपर्यंत अर्ज मागविण्यात येत आहे.


            २७ ऑगस्ट २०२३ रोजी सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) आयोजित करण्यात आली असून इच्छुक पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी www.siac.org.in या संकेतस्थळास भेट द्यावी, असे आवाहन ‘बार्टी’चे महासंचालक सुनील वारे यांनी केले आहे.


            राज्यातील अनुसूचित जातीतील ३०० उमेदवारांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे मार्फत दिल्ली येथील प्रशिक्षण संस्थेमध्ये संघ लोकसेवा आयोग-नागरी सेवा परीक्षेच्या


( पूर्व व मुख्य) पूर्वतयारी प्रशिक्षणासाठी पुरस्कृत (Sponsor) करण्यात येणार आहे.


            युपीएससी परीक्षेच्या पूर्व तयारी प्रशिक्षणासाठी दिल्लीतील केंद्रासाठी अनुसूचित जातीच्या ३०० उमेदवारांची निवड करण्यात येईल. त्यामध्ये ३० टक्के जागा महिलांसाठी, ४ टक्के जागा "दिव्यांग व्यक्तीसाठी (Person With Disability), ५ टक्के जागा अनुसूचित जाती अंतर्गत वंचित जातीमधील (वाल्मिकी व तत्सम जाती- होलार, बेरड, मातंग, मांग, मादगी इ.) विद्यार्थ्यांकरिता आरक्षित असतील, एकूण जागांच्या ५% जागा विशेष बाब म्हणून राखीव ठेवण्यात येतील.


            उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा, उमेदवाराकडे महाराष्ट्रातील अनुसूचित जातीचा दाखला व अधिवास असावा, उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा,उमेदवाराचे वय संघ लोकसेवा आयोग-नागरी सेवा परीक्षेच्या अटी व शर्ती नुसार असावे,


            संघ लोकसेवा आयोगामार्फत सन २०२४ मध्ये घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा परीक्षेसाठी पात्र असावा, रुपये ८ लाखापर्यंत कौटुंबिक उत्पन्न मर्यादा असलेले उमेदवार प्रशिक्षणासाठी पात्र असतील.


            बार्टी संस्थेमार्फत दिल्ली येथील प्रशिक्षण संस्थेचे प्रशिक्षण शुल्क देण्यात येते, हे प्रशिक्षण अनिवासी असल्याने उमेदवारांना दिल्ली येथील निवास व भोजनाची व्यवस्थेकरिता प्रती माह कमाल रक्कम १३ हजार रुपये विद्यावेतन देण्यात येते. विद्यावेतन करिता विद्यार्थ्यांची उपस्थिती ग्राह्य धरण्यात येईल, प्रशिक्षणाच्या सुरवातीस दिल्ली येथे जाण्याकरिता पाच हजार रुपये (एकदा) व प्रशिक्षण संपल्यानंतर परतीच्या प्रवासाकरिता पाच हजार रुपये (एकदा) प्रवास खर्च देण्यात येतो, पहिल्या महिन्यातील आर्थिक सहाय्य तीन हजार रुपये (एकरकमी) देण्यात येते, अशी माहिती महासंचालक श्री. वारे यांनी दिली.  

जगायचं कुणासाठी...?*

 *जगायचं कुणासाठी...?*

(अंतर्मुख करणारा लेख, वाचाच) 


माणूस जन्माला येतो, लहानाचा मोठा होतो. पुढे सुख दुःखाची अनेक वादळे झेलत आयुष्य जगतो. पण.. आयुष्य का जगतो? कशासाठी जगतो? आणि कुणासाठी जगतो? याची मात्र काहीच कल्पना नसते. पोटाची खळगी भरण्यासाठी आयुष्यभर काबाडकष्ट करतो. पैसा मिळवण्यासाठी कुठेतरी नोकरी करतो, लहान-सहान कामे करतो, अंगमेहनतिचीही कामे करतो. पूर्वी 80/90 वर्षांचे आयुष्य जगायचा, आता 60/70 वर्षे जगतो आणि मरून जातो. मेल्यानंतर कुटुंबीय, नातेवाईक चार दिवस रडतात आणि विसरून जातात. मेल्यानंतर पृथ्वीतलावरचं आपलं अस्तित्व मात्र कायमचंच संपुष्टात येतं...आपण कितीही चांगले असलो तरी मेल्यानंतर आपली आठवण ही फक्त 10/15 दिवसांपुरतीच असते... कारण आपण जगलेलो असतो ते केवळ आपल्या कुटुंबापुरतंच. मी, माझं कुटुंब एवढंच जग असतं आपलं.. 


 *सुंदर असा लेख आहे.सर्वांनी आवश्य* *वाचावा धन्यवाद* . मग...जगावं तरी कुणासाठी? ..


तर...जगावं तर ते समाजासाठी... तुम्ही जगाच्या कोणत्या समस्या सोडवता? तुम्ही काय उभारता ? तुम्ही कुणाच्या तरी कामी येता का? यालाच तुमच करियर म्हणतात. तर तुम्ही स्वतःच्या पलीकडे जाऊन जेव्हा विचार करता त्याला शिक्षण असं म्हणतात... करियर म्हणजे केवळ नोकरी मिळवणं किंवा व्यवसायात प्रगती करणं एवढाच संकुचित विचार नसावा... समाजाचा विचार करून जगणं म्हणजेच आयुष्य होय... 


*खूप पैसा, गाडी, बंगला, दागदागिने आहेत म्हणून एखादा माणूस श्रीमंत असतो असं मुळीच नाही. चांगल्या स्वभावाचा, चांगल्या विचारांचा माणूस हाच खरा सर्वात श्रीमंत असतो. पैसा, गाडी, बंगला ही तर केवळ क्षणिक व भौतिक सुखाची साधने आहेत... यातील एकही वस्तू तुम्ही मेल्यानंतर तुमच्या सोबत घेऊन जाऊ शकत नाहीत. सोबत नेता ते तुमचं कर्म, तुमच्याप्रति असलेली समाजाची आपुलकी, आणि वर्षानुवर्षे काढली जाणारी तुमची आठवण हिच आयुष्यभराची कमाई असते.*. 


आजवर पैशाने खूप श्रीमंत असणाऱ्या एखाद्या व्यक्तीची आपण आठवण काढतो असं मला तरी वाटत नाही तुम्ही पैसा कमवा आजच्या स्थितीत ती एक गरज आहे परंतु लोकांना फसवून मिळालेला पैसा कधीच चांगल्या कामासाठी उपयोगी पडत नाही ... पण समाजासाठी झटणारे दुसऱ्याच विचार करणारे साधु संत आणि अनेक थोर समाजसेवक आजही आपल्या स्मरणात आहेत. कारण ते जगले होते समाजासाठी लोकांसाठी . त्यांनी समाजाला काहीतरी दिलं म्हणूनच आजवर त्यांच्या आठवणी जिवंत आहेत. उदाहरण घ्यायचच झाल तर संत गाडगेबाबा... काय होतं त्यांच्याकडे... *फक्त हातात एक खराटा, डोक्यावर फुटलेल्या मडक्याच खापर आणि अंगावर फाटका सदरा...पैश्याचा तर विषयच नव्हता...चलनाचं एक नाणंसुद्धा खिशात नसायचं*. गाव झाडत फिरायचं आणि एखाद्याने दिलेला भाकर तुकडा खाऊन आयुष्य जगायचं. *पण त्यांनी जगाला अनमोल शिकवण दिली ती स्वच्छतेची आणि अंधश्रद्धा निर्मूलनाची. याच विचारांमुळे आज ते अजरामर झाले.*


आपणही समाजात असं काही करतो का? समाजाला आपण काही देणं लागतो का 

 का समाजाकडून काही घेणं लागतो? (आपल्याला कसं मिळेल ही प्रवृत्ती आज समाजात बघायला मिळते) समाजाच भलं करायचं की वाईट हे जर आपल्याला समजलं नाही तर माणूस म्हणून का जगतो आपण ? भले नसेल आपली महती साधुसंतांएवढी कि लोक आपल्याला वर्षानुवर्षे लक्षात ठेवतील. पण निदान एक पिढी तरी लक्षात ठेवेल एवढं कर्तुत्ववान व्हावं प्रत्येकाने.

ना की मढ्याच्या टाळू वरील लोणी खाणारे व्हावे 


*एकमेकांचा राग, द्वेष करत आयुष्य घालवण्यापेक्षा चांगलं रहायला शिका.* 

ज्या कुटुंबासाठी आज जगतोय आपण, ज्या मुलांना लहानाचं मोठं करतोय...तीच मुलं तुम्हाला म्हातारपणात सांभाळतीलच याची कुठलीही शाश्वती नाही... म्हातारे झाल्यावर आई-बाप काहीच काम करत नाहीत म्हणून त्यांना एखाद्या वृद्धाश्रमात नेवून ठेवलं जातं...


बालपणासारखंच तुमचं म्हातारपणही जाईल असंही नाही. बालपणी लाड होतात तर म्हातारपणी हाल-अपेष्टाही सहन कराव्या लागतात. ज्या मुलांसाठी जगलो तीच मुले एका क्षणात परके करून जातील... या सगळ्यानंतर जीवनाच्या शेवटच्या क्षणी प्रश्न पडतो कि आपण आयुष्यभर जगलो ते कुणासाठी?....इथे प्रत्येकाला चुकीच्या कर्मlचं फळ इथेच भोगाव लागत हे शाश्वत सत्य आहे 


*समाजासाठी जगा...*

*दान-धर्म करा, योग प्राणायम करा,ध्यान धारणा करा,भुकेल्या माणसांना अन्न द्या. आनंदात जगून घ्या... फिरावंस वाटलं तर भरपूर फिरून घ्या. म्हातारपणी फिरावंस वाटल तरी तुमच शरीर मात्र साथ देणार नाही म्हणून जोपर्यंत शरीर धडधाकट आहे तोपर्यंतच सर्व फिरून पाहून घ्या. येताना एकटे असलो तरी जाताना मात्र सर्वांचे होऊन जाण्यातच खरी मजा आहे...*🙏

घरमालकांनी भाडेकरूंची माहितीसिटीझन पोर्टलवर कळविणे आवश्यक

 घरमालकांनी भाडेकरूंची माहितीसिटीझन पोर्टलवर कळविणे आवश्यक मुंबई, दि. 17 : मुंबई पोलिस आयुक्तांच्या अखत्यारीत येणाऱ्या कोणत्याही घराचा, मालमत्तेचा व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक घरमालक, जागा मालकांनी कोणत्याही व्यक्तीला राहण्यासाठी जागा भाड्याने दिली आहे किंवा सवलत दिली असेल, तर त्या भाडेकरूचा सर्व तपशील www.mumbaipolice.gov.in या सिटीझन पोर्टलवर ऑनलाइन कळवावा, असे पोलिस उपायुक्त (अभियान) विशाल ठाकूर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

            भाडेकरूंच्या वेशात दहशतवादी, समाजविरोधी घटकांकडून विध्वंसक कृत्ये, दंगल, भांडण घडू नये म्हणून घरमालक, भाडेकरूंची तपासणी आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर हे निर्देश देण्यात आले आहेत. भाडेकरू परदेशी व्यक्ती असेल, तर घरमालक व परदेशी व्यक्ती यांनी नाव, राष्ट्रीयत्व, पासपोर्टचा तपशील, व्हीसा क्रमांक, श्रेणी, ठिकाण, जारी करण्याची तारीख, वैधता नोंदणीचे ठिकाण आणि शहरात राहण्याचे कारण नमूद करणे आवश्यक आहे. हा आदेश ५ सप्टेंबर २०२३ रोजीच्या रात्री १२ वाजेपर्यंत लागू राहील. या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय दंड संहितेनुसार दंडनीय असेल, असेही पोलिस उपायुक्त श्री. ठाकूर यांनी म्हटले आहे.



अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचामंत्री छगन भुजबळ यांनी घेतला आढावा

 अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचामंत्री छगन भुजबळ यांनी घेतला आढावा


            मुंबई, दि. 17 : अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या योजनांची अंमलबजावणी व कामकाजाचा सविस्तर आढावा विभागाचे मंत्री छगन भुजबळ यांनी आज घेतला.


            मंत्रालयात झालेल्या या आढावा बैठकीस विभागाचे सचिव विजय वाघमारे यांच्यासह अन्य अधिकारी, संबंधित उपस्थित होते.


            यावेळी मंत्री श्री.भुजबळ यांनी राज्यातील शिवभोजन केंद्राच्या सद्य:स्थितीबाबतचा आढावा घेऊन या केंद्रांच्या निधी वितरणाची माहिती घेतली. तसेच मराठवाडा व विदर्भातील 14 जिल्ह्यातील सर्व शेतक-यांना अन्नधान्य ऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण योजनेंतर्गत करण्यात येत असलेल्या कार्यवाहीची सविस्तर माहिती घेतली. ‘आनंदाचा शिधा’ उपक्रमामध्ये राज्यभरात करण्यात आलेल्या शिधा वितरणाचाही आढावा घेतला. शासकीय धान्य गोदामातील अन्न धान्याच्या हाताळणुकीसाठी हमाल कंत्राट निश्चितीबाबत अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राबवण्यात येत असलेल्या प्रक्रियेची माहिती घेतली. विभागाच्या अधिपत्याखालील (पुरवठा शाखा) गट ‘अ’ व ‘ब’ संवर्गातील पदांचे सेवाप्रवेश नियम सुधारित करणेबाबत केलेल्या कार्यवाहीची सविस्तर माहिती घेतली.


            किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत खरीप पणन हंगाम 2022-23 मधील धानाकरिता प्रोत्साहनपर राशी अंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या निधीची माहिती घेतली. त्याचप्रमाणे तृतीयपंथी नागरिकांना शिधापत्रिका वितरण, लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत पोषणतत्व गुणसंवर्धित तांदूळ (फोर्टीफाईड तांदूळ) वितरणाचा आढावाही मंत्री श्री. भुजबळ यांनी यावेळी घेतला.


            ई ऑफिसच्या माध्यमातून विभागाचे पूर्ण कामकाज केले जात असल्याचे सांगून जनतेला वितरण व्यवस्थेतील सर्व सोयीसुविधा सहजतेने उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने विभागामार्फत महा रेशन तसेच महा निरीक्षक हे दोन नवीन ॲप सुरु करण्यात येणार आहेत, त्याबाबतची सविस्तर माहिती सचिव श्री.वाघमारे यांनी यावेळी दिली.


००००

Featured post

Lakshvedhi