Saturday, 1 July 2023

श्रीविठ्ठलाची शासकीय पूजा* पुढारी यांची

 *श्रीविठ्ठलाची शासकीय पूजा*


१९७३ पासून पुन्हा चालू झाली, ती आजतागायत चालू आहे. त्यासंबंधीच्या या काही मनोरंजक आठवणी आणि किस्से..


श्रीक्षेत्र पंढरपूर हे विजापूरच्या आदिलशाहीत होते. थोरले बाजीराव पेशवे पंढरपुरी दर्शनास येऊन गेल्याचे पुरावे आहेत. पुढे पंढरपूर पेशवाईत आले, तेव्हा पेशव्यांनी या मंदिराच्या देखभालीसाठी देवस्थान समिती नेमली. दुसरे बाजीराव तर महिनाभर पंढरपुरी वास्तव्यास असत. देवस्थान समितीचे सदस्य आषाढीवारीला पांडुरंगाची पूजा करत. १८३९ मध्ये ही पूजा करण्याचा मान सातारच्या गादीकडे होता. इंग्रजांच्या काळात, हिंदू कलेक्टर, प्रांत, मामलेदार, सेवाज्येष्ठतेनुसार शासकीय पूजा करीत. इंग्रज सरकार पूजाअर्चेसाठी या देवस्थानाला वर्षांला दोन हजार रुपयांचे अनुदान देत असे. स्वातंत्र्योत्तर काळातही पहिली काही वर्षे हे शासकीय अधिकारीच पांडुरंगाची पूजा करीत. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर राजारामबापू पाटील, महसूल मंत्री असताना पूजेसाठी पंढरपुरी आले होते. त्यांनी या देवस्थानचे वार्षिक अनुदान दोन हजार रुपयांवरून २० हजार रुपये केले. त्यानंतर महाराष्ट्रातील मंत्र्यांच्या हस्ते शासकीय पूजा करण्याची प्रथा चालू झाली.

१९७० मध्ये, समाजवादी लोकांनी ‘निधर्मी राज्यांत सरकारने पूजाअर्चा करणे योग्य नाही’ म्हणून जनआंदोलन छेडले. त्याचा परिणाम म्हणून १९७१ साली शासकीय पूजा झाली नाही. १९७२ मध्ये महाराष्ट्रात प्रचंड दुष्काळ पडला. शेतकरी हवालदिल झाले. लोक आपली शेतीवाडी, गुरेढोरे सोडून कामधंद्यासाठी शहरांकडे जाऊ लागले. वारकरी म्हणू लागले, सरकारने पूजा बंद केली, म्हणून विठ्ठल कोपला आणि महाराष्ट्रात दुष्काळ पडला. वारकरी संप्रदायाच्या शिष्टमंडळाने तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना साकडे घातले. त्यांनीच ही बंद पडलेली शासकीय पूजा १९७३ पासून पुन्हा चालू केली, ती आजतागायत चालू आहे.


मुख्यमंत्री वसंतदादा पाटील आषाढी यात्रेच्या पूजेला पंढरपुरी आले होते. तेव्हा पांडुरंगासमोर दक्षिणेच्या रूपांत त्यांना मागणं मागितलं. ‘गरीब भाविक यात्रेकरूंना द्यावा लागणारा, जिझिया कर (यात्रा कर) रद्द करा.’ त्याप्रमाणे दादांनी नुसता पंढरपूरचाच नाही तर देहू-आळंदी येथीलही कर रद्द केला. ञही पांडुरंगाच्या महापूजेची किमया!

महाराष्ट्राचे एक माजी गृहमंत्री आषाढी एकादशीच्या महापूजेस पहाटे अडीच वाजता आले. खाली सोवळे वर खादीचा सदरा! रात्रीची बहुधा उतरली नव्हती, जीभ अडखळत होती. दक्षिणेसाठी खिशांत हात घातला तर खिसा रिकामा! त्यांनी जिल्हाधिकाऱ्याला दम देऊन दक्षिणा देण्यास लावली. रुक्मिणी मातेच्या पूजेस आल्यावर पुन्हा दक्षिणेचा प्रश्न आला. आता जिल्हाधिकाऱ्याकडेही पैसे नव्हते. त्यांनी ‘उत्पात’ समितीच्या कार्यालयातून पैसे घेऊन देवीसमोर ठेवले.

शरद पवार मूळचे समाजवादी असल्याने नास्तिक होते. पंढरपूरच्या साखर कारखान्याच्या गळीत हंगामाला येत, पण देवळात येत नसत. पत्नीने फारच आग्रह केल्यावर केवळ तिच्या आग्रहासाठी ते एकदा विठ्ठल मंदिरात आले. पत्नी मनोभावे पूजा करत होती. बाहेरच्या हत्ती दरवाजातील कट्टय़ावर बसून शरदराव कार्यकर्त्यांशी गप्पा मारत होते. पत्रकारांनी खवचटपणे विचारले, तुम्ही देव मानीत नाहीत, तर मग पांडुरंगाच्या पूजेला कसे काय आलात? राजकारणात मुरलेल्या पवारांनी लगेच, हजरजबाबी उत्तर दिले, ‘माझ्या महाराष्ट्राची कोटय़वधी जनता पांडुरंगास देव मानते, त्यांच्या धार्मिक भावनेचा आदर करण्यासाठी आज मी इथे आलो आहे.’


 इंदिरा गांधी सत्तेतून पायउतार झाल्यावर साधारण १९७९-८० च्या दरम्यान पहाटे चार वाजता पंढरपूरला आल्या. अंबाबाईच्या पटांगणातील पहाटेची भव्य सभा उरकली आणि पहाटे स्नान करून विठ्ठल मंदिरात पूजेला बसल्या. दर्शन, पूजाअर्चा करून डाक बंगल्यावर आल्या. णटेबलावरती नाश्त्याची जय्यत तयारी होती. त्यात नेहमीचे पदार्थ आणि उकडलेली अंडी होती. पांडुरंगराव डिंगरे, पंढरपूरचे माजी आमदार आणि इंदिराजींचे भक्त, त्यांनी विनंती केली, मॅडम, आज एकादशी आहे आणि हे पांडुरंगाचे पवित्र तीर्थक्षेत्र आहे. तेव्हा आजच्या दिवशी तरी हे अन्न तुम्ही घेऊ नका. त्या लगेच होय म्हणाल्या आणि फक्त दूध घेऊन तडक पुढच्या दौऱ्याला निघाल्या.


मनोहर जोशी मुख्यमंत्री म्हणून पूजेस आले, तेव्हा महाराष्ट्रात दुष्काळसदृश परिस्थिती होती. जुलै महिना अर्धा झाला तरी पाऊस पडला नव्हता. त्यांनी पांडुरंगासमोर हात जोडून विनवणी केली. ‘बा पाडुरंगा, महाराष्ट्रात भरपूर पाऊस पडू दे.’ देवस्थान समितीला विनंती केली, ‘शासकीय महापूजेचा कालावधी कमी करा, वारक ऱ्यांना रां तिष्ठत उभे रहावे लागते याची जाणीव ठेवा.’ आषाढी एकादशीची पूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आणि कार्तिकी एकादशीची पूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते, ही प्रथा मनोहर जोशी यांच्या काळातच चालू झाली.


शालिनीताई पाटील एकदा पंढरपुरी पूजेला आल्या होत्या, तेव्हा, मनोभावे त्यांनी रुक्मिणी मातेला नवस केला. ‘आमच्या भोळ्या दादांना पक्षातील लोकांनीच दगाफटका केला, पण दादा पुन्हा मुख्यमंत्री होऊ देत, मी तुला पाच तोळ्यांचे मंगळसूत्र वाहीन!’ चमत्कार म्हणा, श्रद्धा म्हणा, दादा खरंच परत मुख्यमंत्री झाले आणि शालिनीताईंनी तो नवस फेडला. पण त्यानंतर नवस करूनही त्या स्वत: मात्र कधी मुख्यमंत्री झाल्या नाहीत.


१९५३ मध्ये पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू पंढरपुरला आले होते. दर्शनाला जाताना, विठ्ठलाच्या गाभाऱ्याच्या दगडी उंबरठय़ावर ते जोरात ठेचकाळले. एक अशुभ घटना म्हणून पुढील काळांत तो दगडी उंबरठाच काढून टाकण्यात आला. रुक्मिणी मातेच्या मंदिरात मात्र तो दगडी उंबरठा अजूनही आहे.


राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद सवरेदय संमेलनासाठी १९५५ च्या दरम्यान पंढरपूरला आले होते. गावात प्रवेश केल्यावर, डाक बंगल्यावर न जाता, सरळ स्नानासाठी ते चंद्रभागा नदीच्या तीरावर गेले. सुरक्षा रक्षकांची धावपळ झाली. ते चंद्रभागेच्या पात्रातून अनवाणी चालत, वाळवंट, महाद्वार घाट, नामदेव पायरी ओलांडून विठ्ठल मंदिराच्या मंडपात आले. एका दमात चालत आल्यामुळे त्यांना किंचित धाप लागली म्हणून एखाद्या वारकऱ्यासारखे तिथल्या दगडी कट्टय़ावर बसले. काहीक्षण विश्रांती घेऊन, तिथून पूजेकरता देवाच्या गाभाऱ्यात गेले. पूजा चालू असताना तेथील ब्राह्मणांच्या बरोबरीने ते स्वत: मंत्र म्हणू लागले. पूजा झाल्यावर ते इतके संतुष्ट झाले की तेथील बडव्यांना त्यांनी विनंती केली, की माझी पत्नी पंढरपूरला येईल तेव्हा तिच्या हातूनही अशीच पूजा करा. त्याप्रमाणे महिनाभरांत त्यांच्या पत्नी पूजा करून गेल्या.


राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग हे संत नामदेव जन्मसप्तशताब्दीनिमित्त पंढरपूरला आले. ते प्रथम चंद्रभागेच्या काठावरील नामदेव मंदिरात गेले. तेथील नामदास महाराज हे संत नामदेवांचे वंशज आहेत हे सांगितल्यावर ते नामदास महाराजांच्या पाया पडले. नंतर महाद्वारातून संत नामदेव पायरीशी आल्यावर त्यांनी देवळाच्या दरवाजात, नामदेव पायरीला साष्टांग दंडवत घातला. पंजाबी आणि शीख बांधवांना संत नामदेव यांच्याविषयी किती आदर आहे, याचे त्याक्षणी प्रत्यंतर आले. त्यांनी श्रीविठ्ठल रुक्मिणीची महापूजा केली. तेव्हा विठ्ठलासमोर दक्षिणा म्हणून तात्यासाहेब डिंगरे यांनी त्यांच्याकडे एकच मागणे मागितले, ‘बार्शीलाईट रेल्वे ब्रॉडगेज करा व अमृतसर-पंढरपूर अशी नानक-नामदेव एक्सप्रेस चालू करा.’ त्यावर ते प्रसन्नपणे हसले.


राष्ट्रपती शंकर दयाळजी शर्मा हे उपराष्ट्रपती व राष्ट्रपती असताना किमान तीनचार वेळा पंढरपुरी येऊन महापूजा करून गेले. त्यांच्यामुळे पंढरपूरची रेल्वे ब्रॉडगेज झाली.


 यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री व संरक्षण मंत्री असताना पंढरपुरी येऊन महापूजा करून गेले होते.

१९८५ साली, शिवसेनेचे महाडचे अधिवेशन झाल्यावर, सोलापूर जिल्हा, शिवसेना संपर्कप्रमुख राम भंकाळ यांना घेऊन शिवसेना प्रमुखांना पंढरपूर भेटीचे निमंत्रण देण्यास गेलो होतो. तेव्हा देशात घातपाताचे प्रकार चालू होते. शिवसेना प्रमुख उद्वेगाने म्हणाले, ‘तुझ्या त्या पांडुरंगाला माझा निरोप दे’ डोळे मिटून कमरेवर हात ठेवून काय उभा आहेस? हाती जोडा घे आणि धर्माध शक्तींना पार चिरडून टाक!’ नंतर तेही पंढरपुरी येऊन पांडुरंगाचे दर्शन घेऊन आले.


चंद्रशेखर सरस्वती आणि कांची कामकोटी पीठाचे परम आचार्य आणि श्री सत्य साईबाबाही विठ्ठलाच्या दर्शनाला पंढरपुरी आले होते. आचार्य विनोबा भावे सर्वधर्मीयांना घेऊन झविठ्ठलाच्या दर्शनाला पंढरपूरला आले होते. मंदिराच्या गाभाऱ्यात विठ्ठलाच्या पायावर डोके ठेवून ते ओक्साबोक्शी रडू लागले. क्षणभर तिथे स्तब्धता पसरली. लोकांनी विचारले, आचार्य, तुम्ही असे का रडता? रडवेल्या आवाजातच ते म्हणाले, ‘ज्या पायांवर संत ज्ञानेश्वर महाराजांनी, संत नामदेव, एकनाथ, तुकारामांनी डोके टेकविले, त्या पायांवर मी आज डोके टेकवित आहे. हे माझे किती जन्मांचे भाग्य आहे याची तुम्हाला कल्पना नाही! हे माझे आनंदाश्रू आहेत.’

पूर्वी बाळासाहेब भारदे, शशिकांत पागे यासारखी वारकरी संप्रदायाची, आध्यात्मिक क्षेत्राची जाण असलेली मंडळी मंदिर समितीवर होती. आजकाल राजकीय नेमणुका केल्या जातात. आषाढी कार्तिकीला पूजेला येणे भावनेपेक्षा प्रतिष्ठेचे लक्षण बनत चालले आहे. नैतिक मूल्ये जोपासणाऱ्या राजकीय नेत्यांची ही अतिशय बोलकी दोन उदाहरणे-


शंकरराव चव्हाण केंद्रात संरक्षणमंत्री असताना, आषाढीवारीच्या पौर्णिमेनंतर विठ्ठलाच्या दर्शनास आले. त्यांना पूजा करायची होती, पण प्रशाळ पूजा झाल्याशिवाय मंदिरात महापूजा करता येत नाही ही येथील परंपरा आहे. हे त्यांना सांगितल्यावर ‘माझ्यासाठी तुम्ही नियम मोडू नका, मी फक्त दर्शन घेऊन परत जातो’ म्हणाले व त्याप्रमाणे ते नुसते दर्शन घेऊन परत गेले.


पं. लालबहादूर शास्त्री हे रेल्वेमंत्री असताना बार्शीलाईट रेल्वेने पंढरपुरी आले. त्यांना पांडुरंगाचे दर्शन घेण्याची इच्छा होती, पण वारी असल्याने रेल्वे स्टेशनवर कॉलऱ्याची लस टोचून घेतल्याशिवाय गावात प्रवेश करता येत नव्हता. नगरपालिकेच्या अधिकाऱ्यास ते म्हणाले, माझ्या आयुष्यात मी कोणतीही लस टोचून घेतलेली नाही. तेव्ही मी हे इंजेक्शन घेणार नाही. तेव्हा अधिकारी म्हणाले, ‘तुम्ही केंद्रीय मंत्री! तुम्हाला इथे कोण अडविणार?’ तेव्हा शास्त्री म्हणाले, ‘मी इंजेक्शन घेणार नाही आणि मंत्री असलो तरी इथला नियम मोडणार नाही.’ ते पांडुरंगाचे दर्शन न घेता चक्क पंढरपूर रेल्वे स्टेशनवरून परत गेले.

आषाढीवारीच्या निमित्ताने, पांडुरंगाच्या साक्षीने, आपण सर्वानीच यातून नैतिकतेचा बोध घेण्याची गरज आहे, असे मला प्रकर्षांने वाटते!


साभार - दै.लोकसत्ता सोमवार, ११ जुलै २०११ - अरुण पुराणिक 


#अक्षयवारी - ८४५१८२२७७२

कोबीच्या रसाचे फायदे !!*

 *कोबीच्या रसाचे फायदे !!* 


अनेकदा प्रत्येकजण जेवणात हिरव्या भाज्यांचे सेवन करण्यास सांगतात. याचे मुख्य कारण म्हणजे त्यात भरपूर प्रमाणात असलेले पोषक घटक. कोबी यापैकी एक आहे, विशेषतः आजकाल सॅलड्स आणि भाज्यांमध्ये आणि चायनीज फूडमध्ये त्याचा वापर झपाट्याने वाढला आहे. कोबी खाण्यात जितका फायदेशीर आहे तितकाच त्याचा रस देखील फायदेशीर आहे.

कोबीमध्ये व्हिटॅमिन सी, ई, के, बी6, फोलेट, पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह, कॅल्शियम, फॉस्फरस, जस्त, मॅंगनीज, कोलीन, रिबोफ्लेविन आणि थायामिनसह अनेक पोषक घटक असतात. वजन कमी करण्यासोबतच हा रस बीपी नियंत्रित करण्यासाठी आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी खूप उपयुक्त ठरतो. 


*चला तर मग कोबीच्या रसाचे फायदे जाणून घेऊयात -


*1. वजन कमी करण्यासाठी हे उपयुक्त आहे :-* 


जर तुम्हीही तुमच्या वाढत्या वजनामुळे त्रस्त असाल आणि वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर कोबीचा रस तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. जर तुम्ही रिकाम्या पोटी या रसाचे सेवन केले तर त्याचा परिणाम तुम्हाला लवकर दिसून येतो.


*2. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी ते प्रभावी आहे :-* 


कोबीचा रस रोगप्रतिकारशक्ती वाढवतो. व्हिटॅमिन सी पासून ते कोबीमध्ये आढळणारे इतर पोषक घटक देखील खूप फायदेशीर आहेत. जर तुम्ही याचे रोज नियमित सेवन केले तर तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.


*3. रक्तदाब नियंत्रित ठेवला जातो :-* 


कोबीमध्ये आढळणारे पोटॅशियम आपल्या शरीरातील वाढलेले सोडियम कमी करण्यास मदत करते. याच्या नियमित सेवनाने तुमचा रक्तदाब नियंत्रित राहतो.


*4. हार्मोन्स संतुलित करते :-* 


कोबीचा रस शरीरातील हार्मोन्सचे संतुलन राखण्याचे काम करतो. हे थायरॉईड ग्रंथीसह हार्मोन्सचे उत्पादन वाढवते. हा रस शरीरातील आयोडीनची कमतरता देखील पूर्ण करतो आणि हायपोथायरॉईडीझमच्या शक्यतेवर देखील काम करतो.


*संकलन-* 

*निसर्ग उपचार तज्ञ* 

*डॉ. प्रमोद ढेरे,




रत्नागिरीत सागरी विद्यापीठासाठी जागा निश्चित करावी

 रत्नागिरीत सागरी विद्यापीठासाठी जागा निश्चित करावी


-उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील


 


मुंबई, दि. 30 : रत्नागिरी जिल्ह्यात सागरी विद्यापीठ स्थापन करण्यासाठी जागा निश्चित करण्याचे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.


सिंहगड या शासकीय निवासस्थानी मंत्री श्री.पाटील यांनी रत्नागिरीतील उच्च व तंत्र शिक्षण विभागाशी संबंधित कामांविषयी आज आढावा घेतला. या बैठकीला रत्नागिरीचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंग, तंत्रशिक्षण संचालक डॉ विनोद मोहितकर आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.  


कोकणाला मोठी सागरी किनारपट्टी लाभलेली आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात सागरी विद्यापीठ व्हावे अशी मागणी पालकमंत्री उदय सामंत यांनी केली होती. त्याअनुषंगाने आज मंत्री श्री. पाटील यांनी आढावा घेत रत्नागिरीत सागरी विद्यापीठासाठी जिल्हाधिकारी यांनी जागा निश्चित करून शासनाला प्रस्ताव सादर करावा. यासंदर्भात येत्या हिवाळी अधिवेशनात सागरी विद्यापीठ कायदा विधिमंडळात आणला जाईल, असे मंत्री श्री. पाटील यांनी स्पष्ट केले.


जिल्ह्यातील इतर विषयांबाबत आढावा घेताना मंत्री श्री. पाटील म्हणाले, रत्नागिरी जिल्ह्यात शासकीय विधी महाविद्यालय स्थापन करण्याबाबतचा प्रस्ताव पुन्हा विधी व न्याय विभागाला सादर करण्यात येईल. यासंदर्भात विधी व न्याय मंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून विधी महाविद्यालयाचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल. जिल्ह्यातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाची मुख्य इमारत व हायड्रोलिक वर्कशॉप इमारतीचे बळकटीकरण, मुला-मुलींच्या वसतिगृहाचे बळकटीकरण आणि शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या विस्तारित इमारतीच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देण्याच्या तसेच रत्नागिरी येथे स्कूल ऑफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्चर स्थापन करण्याबाबत केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना देखील मंत्री श्री. पाटील यांनी प्रशासनाला दिल्या.


0000

वन विभागाच्या पदभरती प्रक्रियेत गैरप्रकारआढळून आल्यास उमेदवारांनी तक्रार नोंदवावी

 वन विभागाच्या पदभरती प्रक्रियेत गैरप्रकारआढळून आल्यास उमेदवारांनी तक्रार नोंदवावी  


 


            मुंबई, दि. ३० : वन विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयातील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) नामनिर्देशनाच्या कोट्यातील गट- ब (अराजपत्रित), गट- क व गट- ड संवर्गातील पदभरती प्रक्रियेदरम्यान काही बाह्य हस्तक्षेप, उमेदवारांना नोकरी देण्याची आमिषे देणे, अफवा पसरविणे, अपप्रचार करणे अशाप्रकारच्या घटना निदर्शनास आल्यास त्याविरुद्ध तत्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या टोल फ्री क्रमांक १०६४ किंवा पोलिसांकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन महसूल व वन विभागाने केले आहे.


            वनविभागाच्या क्षेत्रीय कार्यालयातील पदे भरण्यासाठी जाहीरात देवून निवड प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. उमेदवारांनी कोणत्याही अफवा, अपप्रचारावर विश्वास ठेवू नये. तसेच कोणत्याही आमिषाला बळी पडू नये. अशाप्रकारच्या अपप्रवृत्ती, अपप्रचार निदर्शनास आल्यास त्याविरुद्ध तत्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) टोल फ्री क्रमांक १०६४ किंवा पोलिस यंत्रणेकडे तक्रार नोंदवावी. तसेच जे उमेदवार भरती प्रक्रियेवर अनैतिक मार्गाने प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करतील, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच त्यांची उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल, असेही महसूल व वन विभागाने म्हटले आहे.


०००००

समृद्धी महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात

 समृद्धी महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात


मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त


मृतांच्या कुटुंबियांना मदत जाहीर


 


        मुंबई, दि. 1 - बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ समृद्धी महामार्गावर खाजगी बसच्या झालेल्या भीषण अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या अपघातातील मृत आणि त्यांच्या कुटुंबिंयांप्रति सहवेदना प्रकट करुन या दुर्दैवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे.


             या भीषण अपघाताने आपण व्यथित झाल्याची भावना व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेशही दिले आहेत.


            अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी बुलढाण्याचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांशी दूरध्वनीवर संपर्क साधून या घटनेची माहिती घेतली. अपघातग्रस्तांना तातडीने मदत करण्याच्या सूचना देतानाच जखमींना शासकीय खर्चाने तत्काळ वैद्यकीय उपचार पुरविण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.


            ही दुर्घटना कळताच तातडीने महामार्गासाठी तैनात आपत्कालीन वैद्यकीय सेवा पथक तसेच अग्निशमन दल त्याठिकाणी पोहचले आणि त्यांनी बचाव कार्य सुरु केले. जखमी प्रवाशांना काढून त्यांना रुग्णालयात भरती करण्या

त आले.


000


ऍग्रो+डॉक्टर्स डे

 


Friday, 30 June 2023

ऊसाची सर्वाधिक एफआरपी व युरियावरील सबसिडीसाठीप्रधानमंत्र्यांचे आभार

 ऊसाची सर्वाधिक एफआरपी व युरियावरील सबसिडीसाठीप्रधानमंत्र्यांचे आभार


- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


· उसाला 315 रुपये प्रती क्विंटल हा आतापर्यंतचा सर्वाधिक रास्त आणि किफायतशीर भाव


· 3.68 लाख कोटींची युरिया सबसिडी 3 वर्षांसाठी जाहीर


· युरिया अनुदान योजना सुरूच राहणार, भारत लवकरच युरियाबाबत स्वयंपूर्ण होणार


            मुंबई, दि. 30 : केंद्र सरकारने युरियावर 3 वर्षांसाठी सबसिडी देण्याचा तसेच ऊसाची एफआरपी वाढविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना फार मोठा लाभ होणार आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आभार मानले.


            प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या फायद्याच्या घेतलेल्या या निर्णयांबाबत माहिती देताना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, केंद्र सरकारने 3.68 लाख कोटींची युरिया सबसिडी 3 वर्षांसाठी जाहीर केल्यामुळे त्याचा लाभ शेतकऱ्यांना होणार आहे. कर आणि निमलेपनाचे शुल्क वगळून 45 किलोच्या पिशवीला 242 रुपये हाच दर कायम राहणार आहे. हे अनुदान खरीप हंगाम 2023-24 साठी नुकत्याच मंजूर झालेल्या 38,000 कोटी रुपयांच्या पोषण आधारित अनुदानाव्यतिरिक्त आहे. शेतकऱ्यांना युरिया खरेदीसाठी जास्तीचा खर्च करण्याची गरज नाही. यामुळे त्यांचा उत्पादन खर्च कमी होण्यास मदत होईल. सध्या प्रति 45 किलो युरियाच्या पिशवीसाठी 242 रुपये आहे (निमलेपनाचे शुल्क आणि लागू असलेले कर वगळून), तर पिशवीची वास्तविक किंमत सुमारे 2200 रुपये आहे. या योजनेसाठी पूर्णपणे केंद्र सरकार वित्तपुरवठा करते. युरिया अनुदान योजना सुरू ठेवल्याने आपण स्वयंपूर्णतेच्या दिशेने जात असून युरियाचे स्वदेशी उत्पादनही वाढणार आहे.


            ऊसाला मिळालेल्या एफआरपीबाबात माहिती देताना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले की, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने साखर हंगाम 2023-24 (ऑक्टोबर-सप्टेंबर) साठी ऊसाला 10.25%च्या मूलभूत वसूली दरासह 315 रुपये प्रती क्विंटल रास्त आणि किफायतशीर भाव (FRP) देण्यास मंजुरी दिली आहे. वसुलीमध्ये 10.25% पुढील प्रत्येक 0.1% वाढीला 3.07 रुपये प्रती क्विंटलचा प्रीमियम देण्यास तर वसुलीमधील घसरणीसाठी प्रत्येक 0.1% घसरणीला रास्त आणि किफायतशीर भावात 3.07 रुपये प्रती क्विंटलची कपात करण्याला देखील मंजुरी दिली आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्याच्या दृष्टीकोनातून सरकारने ज्या साखर कारखान्यांची वसुली 9.5% हून कमी असेल तेथे कोणतीही कपात करण्यात येणार नाही, असा देखील निर्णय घेतला आहे.


            युरियावर देण्यात आलेल्या सबसीडीबाबात माहिती देताना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस पुढे म्हणाले, बदलती भू-राजकीय परिस्थिती आणि कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमतींमुळे खतांच्या किमती गेल्या काही वर्षांपासून जागतिक स्तरावर अनेक पटींनी वाढत आहेत. परंतु केंद्र सरकारने खतांच्या अनुदानात वाढ करून शेतकऱ्यांना खतांच्या वाढत्या किमतीपासून वाचवले आहे. केंद्र सरकारने, शेतकऱ्यांचे हितरक्षण करत, खत अनुदान 2014-15 मधील 73,067 कोटी रुपयांवरुन 2022-23 मध्ये 2,54,799 कोटी रुपये इतके वाढवले आहे.


            सन 2025-26 पर्यंत, पारंपरिक युरियाच्या 195 LMT च्या 44 कोटी बाटल्यांची उत्पादन क्षमता असलेले आठ नॅनो युरिया संयंत्र कार्यान्वित केले जाणार आहेत. नॅनो कण असलेली खते नियंत्रित रीतीने पोषक तत्वे बाहेर सोडणे, ज्यामुळे पोषक तत्वांचा वापर अधिक कार्यक्षमतेत होतो आणि शेतकऱ्यांच्या खर्चात बचत होते. नॅनो युरिया वापरल्याने पीक उत्पादनातही वाढ झाल्याचे दिसून आले आहे.


            कोटा (राजस्थान), येथे चंबल फर्टीलायझर लिमिटेड, मॅटिक्स लि. पानगढ (पश्चिम बंगाल), रामागुंडम (तेलंगणा), गोरखपूर (उत्तरप्रदेश), सिंद्री (झारखंड) आणि बरौनी (बिहार) येथे झालेल्या 6 युरिया उत्पादन युनिट्सची स्थापना आणि पुनरुज्जीवन यामुळे 2018 पासून युरिया उत्पादन आणि उपलब्धतेच्या बाबतीत देशाला आत्मनिर्भर बनविण्यात मदत होत आहे. 2014-15 मध्ये युरियाचे स्वदेशी उत्पादन 225 LMT वरून 2021-22 मध्ये 250 LMT पर्यंत वाढले आहे. 2022-23 मध्ये उत्पादन क्षमता 284 LMT इतकी वाढली आहे. हे नॅनो युरिया प्लांट्ससह युरियावरील आपले सध्याचे आयातीवरील अवलंबित्व कमी करतील आणि अखेर 2025-26 पर्यंत आपण नक्कीच स्वयंपूर्ण होऊ, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.


***

Featured post

Lakshvedhi