Wednesday, 28 June 2023

आचार्य श्री महाश्रमणजी यांचे नशामुक्ती कार्यात मोलाचे योगदान

 आचार्य श्री महाश्रमणजी यांचे नशामुक्ती कार्यात मोलाचे योगदान

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

            ठाणे, दि. 28 : “आचार्य श्री महाश्रमणजी यांचे सद्भावना, नैतिकता व नशामुक्ती कार्यात मोलाचे योगदान आहे. ‘मनुष्य सेवा ही ईश्वर सेवा’ असे मानून कोट्यवधी लोकांना व्यसनातून मुक्त करण्याचे काम त्यांनी केले आहे. स्वयंसेवा, राष्ट्रसेवा, जीवनदान क्षेत्रात त्यांचे कार्य महत्त्वाचे आहे”, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.


            ठाणे येथे आयोजित आचार्य श्री महाश्रमण चातुर्मास प्रवेश स्वागत व अभिनंदन कार्यक्रमप्रसंगी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी खासदार राहुल शेवाळे, आमदार प्रताप सरनाईक, आमदार गीता जैन, यांच्यासह जैन समाजातील मुनी, प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. आचार्य श्री महाश्रमण जी यांच्या चातुर्मासासाठी ठाणे येथे आगमनानिमित्त यावेळी मिरवणूक काढण्यात आली.


            “राज्य शासन गेल्या वर्षभरात दिवसरात्र काम करून राज्याच्या विकासासाठी कार्यरत आहे. तुमच्या नशामुक्ती कामाप्रमाणेच राज्य शासनाने ‘ड्रग मुक्त मुंबई’ मिशन हाती घेतले आहे. याकामी आपला सहयोग द्यावा”, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे म्ह

णाले.


शासकीय ई-बाजारात महाराष्ट्राची उल्लेखनीय कामगिरी


शासकीय ई-बाजारात महाराष्ट्राची उल्लेखनीय कामगिरी


विविध श्रेणीत राज्याला 5 ‘क्रेता-विक्रेता गौरव पुरस्कार’ प्रदान


            नवी दिल्ली, 28 : महाराष्ट्राने शासकीय ई-बाजार मध्ये लक्षणीय कामगिरी केल्याबद्दल राज्याला विविध श्रेणीत एकूण 5 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


            केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्यावतीने येथील वाणिज्य भवनमध्ये शासकीय-ई-बाजारपेठ (Government e Marketplace (GeM)) ला प्रोत्साहन देण्यासाठी ‘क्रेता-विक्रेता गौरव पुरस्कार 2023’ प्रदान सोहळयाचे आयोजन सोमवारी सायंकाळी करण्यात आले. या कार्यक्रमात केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री अनुप्रिया पटेल तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


            केंद्र शासनाने शासकीय-ई-बाजारपेठ प्रणाली 2016 पासून विकसित केली असून या अंतर्गत शासनाला लागत असलेल्या सेवा सामुग्रीचा पुरवठा जेमच्या माध्यमातून केला जातो. राज्य शासन, विविध विभाग, महिला उद्योजक, अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती प्रवर्गातील उद्योजकांना यामाध्यमातून मोठया प्रमाणात प्रोत्साहन मिळत आहे. यामध्ये महाराष्ट्राने उल्लेखनीय अशी कामगिरी केलेली आहे. यासाठी विविध श्रेणीत महाराष्ट्राला 5 ‘क्रेता-विक्रता गौरव पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले.


विविध पाच श्रेणीत राज्याने मारली बाजी


            राज्याने सन 2022-23 मध्ये जेम प्रणालीवरून 4130 कोटींची खरेदी करून देशात तिसरे स्थान पटकावून सिल्वर पुरस्काराचा मान मिळविला. स्टार्टअप - उद्योजकांच्या खरेदीमध्ये राज्याने दुसरे स्थान मिळविले असून गोल्ड पुरस्कार प्रदान करण्यात आला. अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती उद्योजकांच्या खरेदीमध्ये राज्याने चांगली कामगिरी केलेली असून या श्रेणीत राज्याचा दुसरा क्रमांक आलेला असून गोल्ड पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सुक्ष्म व लघु उपक्रमांमार्फतच्या खरेदीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर असून सिल्वर पुरस्कार प्रदान करण्यात आला. महिला उद्योजकांमार्फतच्या खरेदी या श्रेणीमध्ये राज्याने तिसरा क्रमांक मिळवून सिल्वर पुरस्काराचा मानकरी ठरला. या सर्व श्रेणीतील पुरस्कार उद्योग संचालनालयाचे विकास आयुक्त दीपेंद्र सिंह कुशवाह यांनी केंद्रीय वाणिज्य राज्य मंत्री अनुप्रिया पटेल यांच्या हस्ते स्वीकारले. उद्योग सह संचालक (खरेदी धोरण) विजू सिरसाठ या यावेळी उपस्थित होत्या.


             राज्याच्या उद्योग संचालनालयाने शासकीय ई- बाजार प्रणालीला असे दिले प्रोत्साहन


            आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये राज्याने राष्ट्रीय सार्वजनिक खरेदी बाजारात व्यवसाय करण्यासाठी सातत्याने जेम पोर्टलवर अवलंबून राहून सार्वजनिक खरेदी प्रक्रियेची विश्वासार्हता वाढविण्याच्या दिशेने अनुकरणीय वचनबद्धता दर्शविली आहे. यांतर्गत उद्योग संचालनायाच्यावतीने राज्यात मोठ्या प्रमाणात खरेदी करणाऱ्या विभागांकरिता कालबद्ध बाह्यपोच कार्यक्रम (Outreach Program) राबविला. यांतर्गत जेम पोर्टलचा वापर वाढविण्यासाठी पोर्टलचे नवनवीन फिचर्स आणि कार्यप्रणालीबाबत जागरूकता कार्यक्रमांचे आयोजन केले.


            खरेदी प्रक्रियेत उद्भवणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी जलद उपाय योजले. सुक्ष्म व लघु उद्योजकांची जेम पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी शासनाने विविध विभागांमार्फत जागरूकता कार्यक्रम आणि प्रशिक्षण सत्रे आयोजित केली. आतापर्यंत शासनाने पोर्टलवर 7508 खरेदीदार प्रशिक्षणार्थीसाठी 105 प्रशिक्षण कार्यक्रम आणि 5004 पुरवठादारांसाठी 95 प्रशिक्षण कार्यक्रम आखले आहेत.


            राज्य शासनाने केलेल्या विविध उपाययोजनांमुळे जेम पोटर्लवर आतापर्यंत एकूण नोंदणीकृत 1073377 पुरवठादार आहेत तर एकूण नोंदणीकृत 12398 खरेदीदार झाले आहेत. यासह पोर्टलवर राज्यातील एकूण नोंदणीकृत 10,619 सुक्ष्म व लघु पुरवठादार देखील आहेत.

आम्लपित्त,पित्त,करपट ढेकर,पोटसाफ.*

 *आम्लपित्त,पित्त,करपट ढेकर,पोटसाफ.*



एक पिकलेले केळे,एक चमचा वेलची पावडर, अर्धा चमचा सुंठपावडर,एक चमचा इसबगोल एकत्र मिक्स करून खा.एक तासात पित्त गायब करून पहा.

छोटी टिप फायदा लाखमोलाचा.


वैद्य. गजानन


वंदे भारत एक्सप्रेसमुळे कोकणातील पर्यटनाला मिळेल चालना

 वंदे भारत एक्सप्रेसमुळे कोकणातील पर्यटनाला मिळेल चालना


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे मडगाव - मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचे स्वागत


            मुंबई, दि. २७ : मडगाव (गोवा) - मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसमुळे विस्तीर्ण समुद्र किनारा, आंबा, नारळी, पोफळीच्या बागा आणि डोंगर – दऱ्यांनी नटलेल्या कोकणातील पर्यटनाला चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे व्यक्त केला.


            प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी मडगाव ते मुंबईदरम्यान धावणाऱ्या वंदेभारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखविला. त्यानंतर आज सायंकाळी वंदेभारत एक्स्प्रेसचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आगमन झाले. त्यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी वंदे भारत एक्स्प्रेसचे लोको पायलट व प्रवाशांशी संवाद साधत त्यांचे मिठाई आणि गुलाबपुष्प देवून स्वागत केले. यावेळी शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा, खासदार राहुल शेवाळे, खासदार कृपाल तुमाने, आमदार यामिनी जाधव, मध्य रेल्वेचे महाप्रबंधक नरेश लालवाणी, मुंबई विभागाचे महाप्रबंधक रजनीश गोयल आदी उपस्थित होते.


            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई आणि पर्यटनात अग्रेसर असलेल्या गोवा दरम्यान सुरू झालेल्या रेल्वेमुळे पर्यटनाचा शाश्वत विकास होण्यास आणखी मदत होईल. या गाडीत विविध आधुनिक सोयीसुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे कोकणवासीयांचा प्रवास सुलभ होईल. वंदे भारत एक्स्प्रेस देशात निर्मित असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकारण्यास मदत करणारी आहे. राज्यात रेल्वेच्या पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी केंद्र सरकारने १३ हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससह १२३ रेल्वे स्थानकांचा विकास करण्यात येणार आहे. राज्यातील बुलेट ट्रेनसह अन्य रेल्वे प्रकल्पांच्या पूर्णत्वासाठी केंद्र सरकारच्या सहाय्याने प्रयत्न सुरू आहेत. बुलेट ट्रेनकरिता भूसंपादनाचे काम सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.


            मंत्री श्री. केसरकर म्हणाले की, कोकणातून येणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसचे आगमन होत आहे ही आनंदाची बाब आहे. या रेल्वेत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध आहेत. या माध्यमातून भारत आंतरराष्ट्रीयस्तरावर पोहोचला आहे. कोकण रेल्वेसाठी कोकणवासीयांनी जमीन उपलब्ध करून दिली आहे, असेही त्यांनी सांगितले. खासदार श्री. शेवाळे म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राज्यासाठी पाचवी वंदे भारत एक्स्प्रेस सुरू केली. गोवा आणि कोकणातील पर्यटनाला यामुळे चालना मिळेल, असेही त्यांनी सांगितले.


            महाप्रबंधक श्री. लालवाणी यांनी सांगितले की, मध्य रेल्वेसाठी आज आनंदाचा क्षण आहे. यापूर्वी छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून शिर्डी व सोलापूरकरीता वंदे भारत एक्स्प्रेस सुरू झाली आहे. या रेल्वेगाडीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच त्यांनी मडगाव - मुंबई दरम्यान धावणाऱ्या वंदेभारत एक्स्प्रेसची सविस्तर माहिती दिली. या रेल्वेचा मुंबई आणि कोकणवासीयांना लाभ होईल, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी लोकप्रतिनिधी, रेल्वेचे वरीष्ठ अधिकारी, नागरिक उपस्थित होते. यावेळी मंडळ सांस्कृतिक अकादमीच्या कलावंतांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर

 केले.


०००००


कसणी गावाच्या पुनर्वसनाबाबत प्रस्ताव तयार करावा

 कसणी गावाच्या पुनर्वसनाबाबत प्रस्ताव तयार करावा


- मंत्री शंभूराज देसाई


              मुंबई, दि. २७ : सातारा जिल्ह्यातील कसणी गाव सह्याद्री व्याघ्र प्रकल्प क्षेत्रातील गाव आहे. या गावाच्या पुनर्वसनाबाबत प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या.


            आज मंत्रालयात मंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री व्याघ्र प्रकल्प क्षेत्रातील कसणी गावाच्या पुनर्वसनाबाबत बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.


            या बैठकीस सह्याद्री व्याघ्र प्रकल्प संचालक श्री. रामानुजन, सातारा जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी जीवन गलांडे, सहायक वनसंरक्षक गणेश पाटोळे उपस्थित होते.


            मंत्री श्री. देसाई म्हणाले की, कसणी गावाच्या पुनर्वसनाबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल. वन्य प्राण्यांमुळे या गावातील शेती, पशुधन, मनुष्यहानीबाबत होणाऱ्या नुकसानीसाठी शासनाकडून अर्थसहाय्य देण्यात येते. शेतीचे होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांना शेतीला सौर ऊर्जा कुंपण द्यावे. या गावाच्या पुनर्वसनाबाबत वन मंत्र्यासमवेत लवकरच बैठक घेण्यात येईल, असेही मंत्री श्री. देसाई यांनी यावेळी सांगितले.


****

महाराष्ट्रातील 4 स्टार्ट-अप्स युथ को:लॅब नॅशनल इनोव्हेशन डायलॉग 2022 मध्ये ठरले विजयी 9 राज्यांमधील एकूण बारा स्टार्ट-अप विजेते.

 महाराष्ट्रातील 4 स्टार्ट-अप्स युथ को:लॅब नॅशनल इनोव्हेशन डायलॉग 2022 मध्ये ठरले विजयी 9 राज्यांमधील एकूण बारा स्टार्ट-अप विजेते.


            नवी दिल्‍ली, 27 : युथ को:लॅब नॅशनल इनोव्हेशन डायलॉग 2022 मध्ये महाराष्ट्रातील चार स्टार्ट अप्स विजयी झाले असून, देशातल्या नऊ राज्यांमधील एकूण 12 स्टार्ट अप्स विजेते ठरले आहेत.


            युथ को:लॅब नॅशनल इनोव्हेशन डायलॉग इंडियाच्या 5व्या आवृत्तीत सहा थीम्स- कृषी, शिक्षण-तंत्रज्ञान, महिलांसाठी उपजीविका, चक्राकार अर्थव्यवस्था आणि जैवविविधता या क्षेत्रात काम करणाऱ्या भारतातील 9 राज्यांमधील बारा अव्वल स्टार्ट-अप्सना विजेते म्हणून घोषित करण्यात आले. अटल इनोव्हेशन मिशन (एआयएम), चे अभियान संचालक डॉ.चिंतन वैष्णव; यूएनडीपी इंडियाच्या निवासी प्रतिनिधी शोको नोडा आणि अभिनेत्री आणि यूएनडीपी चॅम्पियन संजना संघी यांनी विजेत्यांना सन्मानित केले. विजेत्या 12 स्टार्ट-अप्स संस्थांना त्यांच्या नवकल्पना वाढवण्यासाठी $5,000 पर्यंत सीड फंडिंग प्राप्त होणार.


युथ को:लॅब


            संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (यूएनडीपी) आणि सिटी फाउंडेशन द्वारा 2017 मध्ये संयुक्तपणे निर्मित यूथ को: लॅबचा उद्देश युवकांना सशक्त बनवणे आणि त्यांच्यात गुंतवणूक करण्याच्या उद्दिष्टाने, आशिया-प्रशांत क्षेत्रातील देशांसाठी एक सामायिक अजेंडा तयार केले असून, ज्यामुळे नेतृत्व, सामाजिक नवोन्मेष आणि उद्योजकता याद्वारे शाश्वत विकास उद्दिष्टांच्या अंमलबजावणीला गती येऊ शकेल.


            भारतात 2019 मध्ये अटल इनोव्हेशन मिशन (एआयएम), नीति आयोग यांच्या भागीदारीतून युथ को:लॅबचा प्रारंभ झाला. 2022-23 आवृत्तीसाठी देशभरातील 28 राज्यांमधून एकूण 378 अर्ज प्राप्त झाले होते.


            बारा स्टार्ट-अप्स विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील 4 स्टार्ट-अप्सचा समावेश आहे. यामध्ये दिव्यांगांसाठी संधी निर्माण करणारे पुणे स्थित संस्थापक आकाशदीप बन्सल यांचे सरल एक्स (SaralX), महिलांमध्ये मासिक पाळीदरम्यान स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करणारा मुंबईतील संस्थापक सौम्या डबरीवाल यांचा प्रोजेक्ट बाला (Project Baala), महाराष्ट्रात महिला शेतकऱ्यांसाठी यांत्रिकीकरण संबंधी उपाय सुचवणारा संस्थापक अक्षय दीपक कावळे यांचा ऍग्रोशुअर (Agrosure) आणि कमी कार्बनच्या शाश्वत पर्यायांवर खर्च करण्यास प्रोत्साहन देणारा संस्थापक रजत सोहन विश्वकर्मा यांचा मुंबईतील मायप्लॅन 8 (Myplan 8) यांचा समावेश आहे.


००००

महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी इच्छुक उद्योजकांकडेपाठपुरावा करणार

 महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी इच्छुक उद्योजकांकडेपाठपुरावा करणार


- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्ह


            मुंबई, दि. २७ : महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासाठी परकीय उद्योजक इच्छुक आहेत. त्यांच्याबरोबर राज्य शासनाने विविध करार केले आहेत. त्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, असे विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले. आज विधान भवनात उद्योजकांसोबत बैठक घेण्यात आली. या बैठकीत या उद्योजकांसोबत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.


            जपानच्या भेटी दरम्यान अनेक उद्योजकांनी महाराष्ट्रात येण्याची इच्छा व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर आज विविध उद्योजक आणि त्यांच्या संस्थांसोबत ही बैठक झाली. महाराष्ट्र शासनासोबत, उद्योग विभागामध्ये अनेक प्रकारचे करार उद्योजकांनी केलेले आहेत. महाराष्ट्रात उद्योग, अर्थ विकास आणि शेती विषयांत आणखी सुधारणा होण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली.


            राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध उद्योजकांना योग्य स्वरुपाची बाजारपेठ मिळावी यासाठी प्रयत्न करणे अत्यावश्यक असल्याचे यावेळी उद्योजक म्हणाले. उद्योगांना पायाभूत सुविधा मिळण्यासाठी राज्यात पोषक वातावरण तयार होत आहे. मात्र, ग्रामीण भागात मोबाईल कनेक्टीव्हिटी, दळण-वळणाच्या सुविधा, या सोबतच उद्योगांना पूरक सुविधा असाव्यात अशा स्वरूपाची मागणी करण्यात आली.


            या सर्व विषयांचा राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. या बैठकीला उद्योजक इंडियन मर्चंट चेम्बर्सचे अनंत सिंघानिया, समीर सोमैय्या, महाराष्ट्र आर्थिक सामाजिक विकास परिषदेच्या शीतल पांचाळ, अमेरिका स्थित उद्योजक किशोर गोरे, सौरभ शहा आदी उपस्थित होते.


            येत्या सप्टेंबर महिन्यात विदेशातील महिला धोरण याबाबत एक परिसंवाद घेण्यात येणार असल्याचे त्या म्हणाल्या. या परिसंवादाला काही देशांच्या प्रतिनिधींचा पाठिंबा असून यामध्ये सहभागी होण्याची तयारी त्यांनी दाखवली आहे.


0000


 

Featured post

Lakshvedhi