Friday, 23 June 2023

एअर मिसाईल, पॅराग्लाईडर्स, मायक्रोलाईटएअर क्राफ्ट, ड्रोनच्या वापरावर बंदी

 एअर मिसाईल, पॅराग्लाईडर्स, मायक्रोलाईटएअर क्राफ्ट, ड्रोनच्या वापरावर बंदी


            मुंबई, दि. 22 : राष्ट्रीय हिताला बाधा पोहचविणाऱ्या तसेच राष्ट्रद्रोही कारवायांसाठी कारणीभूत ठरतील असे घटक जसे ड्रोन, पॅराग्लाईडर्स, रिमोट कंट्रोल्ड मायक्रोलाईट एअरक्राफ्ट, पॅरा मोटर्स, हँण्ड ग्लायडर्स हॉट एअर बलूनच्या उड्डाण क्रियांना बंदीचे आदेश बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दि. 16 जुलै 2023 पर्यंत लागू करण्यात आले आहे, असे पोलीस उपायुक्त, विशाल ठाकूर यांनी कळविले आहे.


            मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कुठेही कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही, सामान्य जनतेला धोका उत्पन्न होणार नाही, अति महत्त्वाच्या व्यक्तींना धोका निर्माण होणार नाही, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होवू नये याकरीता हे आदेश लागू आहेत. तथापि, ज्यांनी या कालावधीत पूर्व लेखी परवानगी घेतली आहे अशांसाठी हा आदेश शिथिल असेल.


            या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय दंड संहितेच्या कलम 144 अन्वये कारवाई करण्यात येईल, असेही या आदेशामध्ये स्पष्ट केले आहे.


                                         

बृहन्मुंबई हद्दीत 27 जूनपर्यंत जमावबंदी आदेश जारी

 बृहन्मुंबई हद्दीत 27 जूनपर्यंत जमावबंदी आदेश जार


            मुंबई, दि. 22 : बृहन्मुंबई हद्दीत शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 मधील अधिकारानुसार पोलीस उपआयुक्त (अभियान) यांनी बृहन्मुंबई हद्दीत 27 जून 2023 पर्यंत जमावबंदी आदेश जारी केला आहे.


           या आदेशानुसार पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तिंचा जमाव करणे, मिरवणूक काढणे, जमाव करुन ध्वनीवर्धकाचा, वाद्य बँड, फटाके फोडणे यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. विवाह समारंभ आणि विवाह प्रथेशी संबंधित अन्य समारंभ, अंत्यविधी कार्यक्रम, कंपन्या, सहकारी संस्था आणि अन्य संस्था व संघटनांच्या कायदेशीर बैठका, क्लबमध्ये होणारे कार्यक्रम, सामाजिक मेळावे, सहकारी संस्था तसेच अन्य संस्थांच्या नियमित कामकाजाचा भाग म्हणून होणारे कार्यक्रम यांना या बंदी आदेशातून वगळण्यात आले आहे.


            चित्रपटगृहे, नाट्यगृहे तसेच सार्वजनिक मनोरंजनाची अन्य ठिकाणे, न्यायालये, शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये तसेच अन्य शैक्षणिक संस्था, कंपन्या, कारखाने, दुकाने तसेच अन्य आस्थापनांमध्ये नियमित व्यापार, व्यवसाय या कारणांनी होणाऱ्या जमावास यातून वगळण्यात आले आहे. तसेच जमाव करण्यात तसेच शांततापूर्ण मार्गाने मोर्चास पोलीसांनी परवानगी दिलेली असल्यास त्यासही या जमावबंदीतून वगळण्यात आले आहे, असे पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर यांनी आदेशान्वये कळविले आहे.

राज्यातील युवतींना मिळणार स्वसंरक्षणाचे धडेगुरुपौर्णिमेपासून राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण कार्यक्रम सुरू होणार

 राज्यातील युवतींना मिळणार स्वसंरक्षणाचे धडेगुरुपौर्णिमेपासून राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण कार्यक्रम सुरू होणार


- महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा


 


            मुंबई, दि. २२ : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त राज्यात 3 लाख 50 हजार शाळकरी, महाविद्यालयीन युवतींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. महिला व बालविकास विभाग आणि राज्यातील सर्व विद्यापीठे व स्वयंसेवी संस्थेच्या सहाय्याने गुरूपौर्णिमेचे औचित्य साधून 3 ते 15 जुलै दरम्यान तीन दिवसांचा प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती, महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मंत्रालयातील दालनात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी महिला व बालविकास विभागाचे उपायुक्त राहुल मोरे, उपसचिव श्री. ठाकूर, महिला व बालविकास विभागाचे अधिकारी, मुंबई विद्यापीठ, एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठ, भारतीय स्त्री शक्ती संस्‍था आणि विद्यार्थी निधी ट्रस्ट यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.


            मंत्री श्री. लोढा म्हणाले, अलीकडील काळात महिला व मुलींवर होणारे अत्याचार व त्यातून केली जाणारी त्यांची हत्या हे शासनासमोरील व समाजासमोरील आव्हान ठरत आहे. याला आळा बसण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे खुपच आवश्यक आहे. शाळकरी व महाविद्यालयीन युवतींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यासाठी राज्यात राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. आयुक्त, महिला व बाल विकास या कार्यालयामार्फत राज्यातील सर्व विद्यापीठे व स्वयंसेवी संस्थेच्या सहाय्याने महाविद्यालयीन युवतींसाठी तालुकास्तरावर विद्यापिठांच्या मदतीने स्वसंरक्षण शिबीरांचे आयोजन करण्यासाठी नियोजन करण्यात आलेले आहे. स्थानिक महिला बचतगट, अंगणवाडी सेविका, स्थानिक सामाजिक संस्था, महाविद्यालयीन एनएसएस, स्थानिक पोलीस यांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वीपणे पार पाडावा.


            युवतींचे मनोबल उंचविण्यासाठी तीन दिवस समुपदेशन सत्र आयोजित करण्यात येणार आहेत.


पहिला दिवस


            महिला व मुलींवरील हिंसाचार-संकल्पना व सद्यस्थिती या विषयावर भारतीय स्त्री शक्ती संस्था मार्गदर्शन करेल. सकाळी 11 ते दुपारी 12.30 या वेळेत होणाऱ्या प्रशिक्षणात 1 हजार युवती सहभागी होतील.


            तंत्रज्ञान व महिला व मुलींना असलेले धोके या विषयावर सायबर सेल तज्ज्ञ अधिकारी मार्गदर्शन करतील. दुपारी 12.30 ते 1.30 या वेळेत होणाऱ्या प्रशिक्षणात 1 हजार युवती सहभागी


होतील


दुसरा दिवस


स्वसंरक्षणाच्या प्रशिक्षणाचे वेळापत्रक


                        स्वसंरक्षणाचे प्राथमिक प्रशिक्षण सकाळी 9.00 ते 9.45 या वेळेत होणार असून 1 हजार युवतींना प्रशिक्षण देण्यासाठी 20 प्रशिक्षक असतील.


            आधुनिक प्रशिक्षण या विषयावर सकाळी 10.05 ते 10.50 या वेळेत प्रशिक्षण होणार असून 1 हजार युवतींना प्रशिक्षण देण्यासाठी 20 प्रशिक्षक असतील.


तिसरा दिवस                 


            प्रात्यक्षिक आणि सराव सकाळी 9.00 ते 9.45 या वेळेत प्रशिक्षण होणार असून 1 हजार युवतींना प्रशिक्षण देण्यासाठी 20 प्रशिक्षक असतील.


            प्रात्यक्षिक आणि सराव सकाळी 10.05 ते 10.50 या वेळेत होणार असून 1 हजार युवतींना प्रशिक्षण देण्यासाठी 20 प्रशिक्षक असतील.


                 या तीन दिवसाच्या शिबीरानंतर ज्या युवतींना अधिक स्वसंरक्षणाच्या प्रशिक्षणात रुची असेल, अशा युवतींची संख्या लक्षात घेऊन त्यादृष्टीने पुढील दिवसीय स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिराचे आयोजन विभागामार्फत करण्यात येईल.


 


मुंबई विद्यापीठ, एस. एन. डी. टी., भारतीय स्त्री शक्ती संस्‍था आणि विद्यार्थी निधी ट्रस्ट यांच्यात सामंजस्य करार


                 महात्मा गांधी प्रशासन प्रशिक्षण संस्था या स्वायत्त संस्थेच्या माध्यमातून राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयुक्त, महिला व बाल विकास यांच्या स्तरावर अव्यावसायिक तत्वावर आज मुंबई विद्यापीठ, एस. एन.डी. टी., भारतीय स्त्री शक्ती संस्‍था आणि विद्यार्थी निधी ट्रस्ट यांच्याशी सामंजस्य करार करण्यात आला. वेळोवेळी या प्रशिक्षण कार्यक्रमाची व्याप्ती वाढविण्यासाठी सर्व विद्यापीठे, स्वयंसेवी संस्था, विद्यार्थी निधी ट्रस्ट, भारतीय स्त्री शक्ती संस्‍था यांचेसोबत आवश्यकतेनुसार सामजंस्य करार करण्यात येतील. या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व विद्यापीठ, स्वयंसेवी संस्थांना देखील या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आले.राज्यातील सर्व अंगणवाड्यांमध्ये ४० लाख बालक, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी उस्फूर्तपणे योग दिवस साजरा केला असेही मंत्री श्री.लोढा यांनी सांगितले.


**

पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुलातील सुविधांचाअद्ययावत आराखडा बनवावा

 पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुलातील सुविधांचाअद्ययावत आराखडा बनवावा


- क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीष महाजन


         मुबंई, दि. २२ : राज्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार व्हावेत यासाठी बालेवाडी, पुणे येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलामध्ये क्रीडा सुविधांचा अद्ययावत आराखडा मान्यतेसाठी लवकर मंत्रिमंडळासमोर सादर करावा, अशा सूचना क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीष महाजन यांनी दिल्या.


                 राज्य क्रीडा विकास समितीची बैठक मंत्रालयातील परिषद सभागृह येथे झाली. त्यावेळी क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन बोलत होते. बैठकीस वित्त (व्यय) अपर मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, क्रीडा आयुक्त सुहास दिवसे, सचिव (बांधकामे) अरविंद तेलंग यासह क्रीडा विभागाचे इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते.


                मंत्री श्री. महाजन म्हणाले, शिवछत्रपती क्रीडा संकुल पुणे येथे खेळाडूंना उत्कृष्ट दर्जाच्या क्रीडा सुविधा मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी या क्रीडा संकुलाचा अद्ययावत आराखडा बनवावा. क्रीडा सुविधांसाठी आलेल्या सूचनांचा विचार करून हे क्रीडा संकुल आंतरराष्ट्रीय दर्जाचे होण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. येथे सध्या खेळल्या जाणाऱ्या खेळांमध्येही वाढ करून त्याप्रकारे खेळाडूंना सुविधा देण्यात याव्यात.राज्यात नव्याने होत असलेली व सध्या कार्यरत असलेल्या क्रीडा संकुलांचा पूर्णवेळ वापर होण्यासाठी नियोजन करावे. विभाग, जिल्हा, तालुका येथील मंजूर संकुलांची कामे गतीने होण्यासाठी सर्व यंत्रणांनी काम करावे. यावेळी नवीन तालुका क्रीडा संकुलांचे अंदाजपत्रक, सुधारित अंदाजपत्रक तसेच अनुदान मर्यादेबाहेरचे अतिरिक्त अंदाजपत्रक व आराखडे तपासून घ्यावेत, अशा सूचना त्यांनी दिल्या.खेळाडूंना उत्कृष्ट दर्जाच्या सुविधांसाठी क्रीडा विभागाने आग्रही असले पाहिजे. ग्रामीण भागातही क्रीडांग्रणांसाठी नियोजन करावे, फुटबॉल या खेळाची लोकप्रियता पाहता फुटबॉल लीगची तयारी करण्यात यावी, या खेळासाठीही विशेष लक्ष देणे आवश्यक आहे, असेही मंत्री श्री.महाजन म्हणाले.


****

पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुलातील सुविधांचाअद्ययावत आराखडा बनवावा

 पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुलातील सुविधांचाअद्ययावत आराखडा बनवावा


- क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीष महाजन


         मुबंई, दि. २२ : राज्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार व्हावेत यासाठी बालेवाडी, पुणे येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलामध्ये क्रीडा सुविधांचा अद्ययावत आराखडा मान्यतेसाठी लवकर मंत्रिमंडळासमोर सादर करावा, अशा सूचना क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीष महाजन यांनी दिल्या.


                 राज्य क्रीडा विकास समितीची बैठक मंत्रालयातील परिषद सभागृह येथे झाली. त्यावेळी क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन बोलत होते. बैठकीस वित्त (व्यय) अपर मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, क्रीडा आयुक्त सुहास दिवसे, सचिव (बांधकामे) अरविंद तेलंग यासह क्रीडा विभागाचे इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते.


                मंत्री श्री. महाजन म्हणाले, शिवछत्रपती क्रीडा संकुल पुणे येथे खेळाडूंना उत्कृष्ट दर्जाच्या क्रीडा सुविधा मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी या क्रीडा संकुलाचा अद्ययावत आराखडा बनवावा. क्रीडा सुविधांसाठी आलेल्या सूचनांचा विचार करून हे क्रीडा संकुल आंतरराष्ट्रीय दर्जाचे होण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. येथे सध्या खेळल्या जाणाऱ्या खेळांमध्येही वाढ करून त्याप्रकारे खेळाडूंना सुविधा देण्यात याव्यात.राज्यात नव्याने होत असलेली व सध्या कार्यरत असलेल्या क्रीडा संकुलांचा पूर्णवेळ वापर होण्यासाठी नियोजन करावे. विभाग, जिल्हा, तालुका येथील मंजूर संकुलांची कामे गतीने होण्यासाठी सर्व यंत्रणांनी काम करावे. यावेळी नवीन तालुका क्रीडा संकुलांचे अंदाजपत्रक, सुधारित अंदाजपत्रक तसेच अनुदान मर्यादेबाहेरचे अतिरिक्त अंदाजपत्रक व आराखडे तपासून घ्यावेत, अशा सूचना त्यांनी दिल्या.खेळाडूंना उत्कृष्ट दर्जाच्या सुविधांसाठी क्रीडा विभागाने आग्रही असले पाहिजे. ग्रामीण भागातही क्रीडांग्रणांसाठी नियोजन करावे, फुटबॉल या खेळाची लोकप्रियता पाहता फुटबॉल लीगची तयारी करण्यात यावी, या खेळासाठीही विशेष लक्ष देणे आवश्यक आहे, असेही मंत्री श्री.महाजन म्हणाले.


****

रास्त भाव दुकानांमध्ये राष्ट्रीयकृत बॅंका, पोस्ट,खासगी बँकाच्या सेवाही उपलब्ध करणार

 रास्त भाव दुकानांमध्ये राष्ट्रीयकृत बॅंका, पोस्ट,खासगी बँकाच्या सेवाही उपलब्ध करणार


- अन्न व नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण


            मुंबई, दि. २२ : राज्यातील रास्त भाव दुकानांमधून नागरिकांसाठी राष्ट्रीयकृत बँका, इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक, टपाल विभाग, संचार मंत्रालय, भारत सरकार व रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या कायद्यानुसार सूचीबद्ध खासगी बँकांच्या सेवा उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. राज्यामध्ये सुमारे ५३ हजार पेक्षा अधिक रास्त भाव दुकाने असून त्याचा फायदा शहरासह ग्रामीण भागातील जनतेला होणार असल्याचेही श्री. चव्हाण यांनी सांगितले.


            दि. १ सप्टेंबर, २०१८ रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्वात सुलभ, परवडणारी, आणि विश्वासार्ह बॅंक बनविण्याच्या दृष्ट‍िकोनातून इंडिया पोस्ट पेमेंट्स बॅंकची सुरुवात केली. धन हस्तांतरण, थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी), बिल भऱणा, आरटीजीएस आदी सुविधा या बॅंकेतर्फे देण्यात येतात. त्याच पार्श्वभूमीवर रास्त भाव दुकानांमध्ये बँकामार्फत दिल्या जाणाऱ्या सेवा उपलब्ध करण्यात येणार आहेत. तसेच या माध्यमातून रास्त भाव दुकानदारांना उत्पन्नाचा अतिरिक्त स्त्रोत उपलब्ध होणार आहे. या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी रास्त भाव दुकानदारांमध्ये जागरुकता निर्माण करुन जेथे शक्य असेल तेथे बँकेच्या सेवा सुरु करण्यात येणार आहे.


            शिधावाटप /रास्त भाव दुकानदारांना ऐच्छिकरित्या बँकेचे व्यावसायिक प्रतिनिधी म्हणून नियुक्त करता येणार आहे. रास्त भाव दुकानदारांच्या उत्पन्न वाढीसाठी तसेच शहरासोबत ग्रामीण भागातील नागरिकांनाही या उपक्रमातुन लाभ होणार आहे.


            प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या संकल्पनेतून दि. 9 डिसेंबर, 2020 रोजी देशातील नागरिकांसाठी सुरु केलेल्या ‘पीएम-वाणी’ या उपक्रमाची राज्यातील शिधावाटप/रास्त भाव दुकानांमधून अंमलबजावणी करण्यास दि.११ नोव्हेंबर २०२२ रोजी सुरुवात करण्यात आली आहे. पीएम-वाणी उपक्रमाच्या माध्यमातून रास्त भाव दुकानापासून 150 ते २०० मीटरच्या परिघात येणाऱ्या सर्व जनतेला रास्त दरात वाय-फाय सुविधेचा लाभ मिळणार आहे.


            तसेच बॅंकिंगच्या या सुविधा प्रत्यक्ष दुकानांमध्ये सुरु करण्यापूर्वी या सुविधेच्या वापराबाबत रास्त भाव दुकानदारांना संबंधित बॅंकेच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे संबंधित बँकेमार्फत या उपक्रमाची अंमलबजावणी, सुविधा व समन्वयासाठी राज्यस्तरावर तसेच जिल्हास्तरावर नोडल अधिकारी नियुक्त करण्यात येणार आहे, असेही मंत्री श्री. चव्हाण यांनी यावेळी सांगित

ले.


महाराष्ट्राला तीन राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार

 महाराष्ट्राला तीन राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार


राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्रदान


नवी दिल्ली, 22 : आरोग्य क्षेत्रात नि:स्वार्थवृत्तीने सेवा देणाऱ्या आणि शासनाच्या आरोग्य योजनांचा लाभ सर्व स्तरावर पोहोचविणाऱ्या सर्वोत्कृष्ट परिचारिका आणि परिचारक यांचा आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात आला. याप्रसंगी सन 2022 आणि सन 2023 च्या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यात सन 2022 मध्ये महाराष्ट्रातील 1 आणि सन 2023 मध्ये 2 परिचारिकांचा समावेश आहे.


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्यावतीने आज राष्ट्रपती भवन येथे राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री एस.पी.सिंग बघेल, विभागाचे सचिव राजेश भुषण यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, आरोग्य क्षेत्रात काम करणारे मान्यवर उपस्थित होते.


यावेळी वर्ष 2022 मध्ये 15 आणि वर्ष 2023 मध्ये 15 असे एकूण 30 परिचारिका आणि परिचारक यांना त्यांच्या उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले. वर्ष 2022 साठी मिळालेल्या पुरस्कारांमध्ये पालघर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, निर्मल उपकेंद्र, भुईगांव येथील सहायक परिचारिका (दाई) सुजाता पीटर तुस्कानो, वर्ष 2023 साठी मिळालेल्या पुरस्कारांमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील जिल्हा रूग्णालयाच्या सार्वजनिक आरोग्य परिचारिका पुष्पा श्रावण पोडे आणि दक्षिण कमांड (वैद्यकीय ) मुख्यालय पुण्याच्या ब्रिगेडियर एम.एन.एस.अमिता देवरानी यांचा समावेश आहे.


सुजाता पीटर तुस्कानो यांचा सहायक परिचारिका (एएनएम) म्हणून 35 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी निमवैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय काम करीत अनेकांना आरोग्य सेवा प्रदान केलेली आहे. जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील आरोग्यविषयक कार्यशाळेत त्या नेहमीच सहभागी होतात. व्यापक समाजकार्यासाठी यापूर्वी तुस्कानो यांना अनेक पुरस्कार आणि सन्मानपत्रे देऊन त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे.


पुष्पा श्रावण पोडे चंद्रपूर जिल्ह्याच्या जिल्हा रूग्णालयात सार्वजनिक आरोग्य परिचारिका म्हणून मागील 21 वर्षांपासून कार्यरत आहेत. त्या त्यांच्या कामाप्रती अत्यंत वचनबद्ध व मेहनती परिचारिका आहेत. पोडे यांनी लक्ष्यपूर्तीसाठी सर्व राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदविला आहे. त्यांनी दिलेल्या आरोग्य सेवेतील लक्षणीय योगदानाबद्दल त्यांना स्थानिक पातळीवर अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलेले आहे.


ब्रिगेडियर अमिता देवरानी, सध्या पुणे येथे दक्षिण कमांड (वैद्यकीय)च्या मुख्यालयात ब्रिगेडियर एम. एन. एस. म्हणून कार्यरत आहेत. ब्रिगेडियर देवरानी यांनी 37 वर्ष लष्करात परिचारिका म्हणून सेवा बजावली आहे. त्या उत्तम शिक्षक आणि प्रशासक आहेत. लष्कराच्या दक्षिण कमांड अंतर्गत येणाऱ्या भूदल, नौदल आणि हवाई दलाच्या 50 रूग्णालयांचे कामकाज त्या पाहतात. कोविड-19 संकटकाळात त्यांनी केलेले काम प्रशंसनीय आहे. आरोग्य क्षेत्राशी संबधित राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी विपुल लेखन केलेले आहे. काँगो रिपब्लिक या देशात संयुक्त राष्ट्राने राबविलेल्या मोहिमेत संकटग्रस्त परिस्थितीत मृतदेहांचा शोध आणि व्यवस्थापन यासाठी बजावलेल्या कामगिरीबद्दल संयुक्त राष्ट्राने त्यांचे विशेष कौतुक केलेले आहे. ब्रिगेडियर देवरानी यांना लष्करी शुश्रुषेसाठी अनेक पुरस्कार आणि प्रशस्तीपत्र मिळालेली आहेत.


वर्ष 1973 पासून राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कारांची सुरूवात करण्यात आलेली आहे. आतापर्यंत एकूण 614 परिचारिका आणि परिचारकांना त्यांच्या उत्कृष्ट सेवेसाठी पुरस्कार प्रदान करण्यात आलेले आहेत. पदक आणि प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

Featured post

Lakshvedhi