Thursday, 22 June 2023

पालेभाज्याचे शरीरासाठी महत्व.

 पालेभाज्याचे शरीरासाठी महत्व.

आयुर्वेदात जिवंती ही सर्वश्रेष्ठ पालेभाजी मानली आहे. मोहरीची पालेभाजी सर्वात कनिष्ठ मानली आहे. पथ्यकर पालेभाज्या-

अळू: अळू ही पालेभाजी शरीरास अत्यावश्यक असणारे 'रक्त' वाढवणारी, ताकद वाढवणारी व मलप्रवृत्तीस आळा घालणारी आहे. बाळंतिणीस दूध कमी येत असल्यास अळूची भाजी भरपूर खावी. भाजीकरिता पाने व देठ दोन्हींचा उपयोग करावा. अळूच्या पानांचा रस व जिरेपूड असे मिश्रण पित्तावर उत्तम गुण देते. फुरसे किंवा अन्य विषारी प्राणी चावले असताना वेदना कमी करण्याकरिता अळूची पाने वाटून त्यांचा चोथा थापावा व पोटात रस घ्यावा. वेदना कमी होतात. गळवे किंवा फोड फुटण्याकरिता अळूची देठे वाटून त्याजागी बांधावी. गळू फुटतात.

अंबाडी: अंबाडी ही पालेभाजी रुचकर आहे. पण डोळ्याचे विकार, त्वचारोग, रक्ताचे विकार असणाऱ्यांनी वापरू नये. अंबाडी खूप उष्ण आहे, तशीच ती फाजील कफही वाढवते.

करडई : करडई पालेभाजी खूप उष्ण आहे. चरबी वाढू नये म्हणून याच्या तेलाचा उपयोग होतो. तसेच याची पालेभाजी वजन वाढू देत नाही. कफ प्रकृतीच्या लठ्ठ व्यक्तींना करडईची भाजी फार उपयुक्त आहे. या पालेभाज्यांच्या रसाने एकवेळ लघवी साफ होते. मात्र डोळ्यांचे व त्वचेच्या विकारात करडई वापरू नये. करडईच्या बियांच्या तेलाची प्रसिद्धी 'सफोला' या ब्रँडनावामुळे झाली आहे. त्यांत तुलनेने उष्मांक कमी असतात.

कुरडू: कुरडूच्या बिया मूतखडा विकारात उपयुक्त आहेत. तशीच त्याची पालेभाजीसुद्धा लघवी साफ करायला उपयोगी आहे. कुरडूच्या पालेभाजीमुळे कफ कमी होतो. जुनाट विकारात कुरडूच्या पालेभाजीचा रस प्यावा. कोवळ्या पानांचा रस किंवा जून पाने शिजवून त्याची भाजी खावी. दमेकरी जुनाट खोकला, वृद्ध माणसांचा कफविकार यात उपयुक्त आहे.


https://chat.whatsapp.com/IGqdOIrrEqOIxJvdxCZ5DM

कोथिंबीर: कोथिंबीर भाजी का तोंडी लावणे हा वादाचा मुद्दा बाजूला ठेवू या. कोथिंबिरीचा वापर हा प्रामुख्याने खाद्य पदार्थाची चव वाढवायला म्हणून प्रामुख्याने केला जातो. चटणी, कोशिंबीर, खिचडी, पुलाव, भात, विविध भाज्या, आमटी, सूप या सर्वाकरिता कोथिंबीर हवीच. बहुधा सर्व घरी, सदा सर्वदा, सकाळ-सायंकाळी पोळी, भाकरी, भात सोडून सगळ्या पदार्थात कोथिंबीर वापरली जातेच. कोथिंबीर ताजीच हवी. तरच त्याचा स्वाद पदार्थाची खुमारी वाढवतो. कोथिंबीर शीत गुणाची असूनही पाचक व रूची टिकवणारी आहे. जेवणात अधिक तिखट जळजळीत पदार्थ खाणाऱ्यांना उष्णता, पित्त याचा त्रास होऊ नये, याची काळजी कोथिंबीर घेते. जेव्हा विविध स्ट्राँग औषधांची रिअ‍ॅक्शन येते, अंगावर पित्त, खाज किंवा गळवांचा त्रास होतो, त्यावेळेस कोथिंबीर स्वच्छ धुवून वाटावी, त्याचा रस पोटात घ्यावा, चोथा त्वचेला बाहेरून लावावा. बिब्बा, गंधकमुक्त औषधे, स्ट्राँग गुग्गुळ कल्प यांच्या वापरामुळे काही उपद्रव उद्भवल्यास कोथिंबीरीचा सहारा घ्यावा. रक्तशुद्धी, रक्तातील उष्णता कमी करणे, तापातील शोष हा उपद्रव कमी करायला ताज्या कोथिंबिरीच्या रसाचा वापर करावा. कोथिंबिरीची भाजी ही पथ्यकर भाज्यांत अग्रस्थानी आहे.

घोळ: घोळाची भाजी बुळबुळीत असली तरी औषधी गुणाची आहे. त्यात एक क्षार आहे. चवीने ओशट असलेली घोळाची भाजी थंड गुणाची असून अन्नपचनास मदत करते. यकृताचे कार्य सुधारते. रक्ती मूळव्याध, दातातून रक्त येणे, सूज, अंगाचा दाह, मूत्रपिंड व बस्तीचे विकारांत उपयुक्त आहे. विसर्प किंवा धावरे, नागीण विकारांत पाने वाटून त्याचा लेप लावावा.

चाकवत: चाकवत ही पालेभाजी देशभर सर्वत्र सदासर्वदा मिळते. पालेभाज्यात आयुर्वेद संहिताकार जिवंती श्रेष्ठ मानतात. पण ही वनस्पती संदिग्ध व वादग्रस्त आहे. व्यवहार पाहता चाकवताला श्रेष्ठत्व द्यावे. ज्वर, अग्निमांद्य किंवा दीर्घकाळच्या तापामुळे तोंडाला चव नसणे, कावीळ, छातीत जळजळ अशा नाना तक्रारीत ही भाजी वापरावी. शक्यतो किमान मसालेदार पदार्थाबरोबर ही पातळ पालेभाजी तयार करावी. व्यक्तिनुरूप व प्रकृतीप्रमाणे लसूण, आले, जिरे, धने, हिंग, ताक, सैंधव, मिरी, तूप, खडीसाखर, गूळ हे पदार्थ अनुपान म्हणून वापरावे. आंबट नसलेल्या ताकातील चाकवताची पालेभाजी हा उत्तम पदार्थ होय. शक्यतो पालेभाज्यांचे ज्यूस घेऊ नयेत.

चुका : बाराही महिने मिळणारी चुक्याची भाजी जास्त करून श्राद्धाकरिता आळूच्या भाजीबरोबरच वापरली जाते. चुक्याची चव आंबट आहे. पाने छोटी व त्याचे देठ पातळ भाजीकरिता वापरतात. चुका उष्ण, पाचक व वातानुलोमन करणारा आहे. त्याचबरोबर त्याच्या संग्राहक गुणामुळे चुक्रसिद्ध तेलाची पट्टी योनीभ्रंश, अंग बाहेर येणे याकरिता वापरली जाते. पचायला कठीण असणाऱ्या पदार्थाबरोबर चुक्याची पाने वापरावी.


प्रमोद पाठक.



किल्ले, गड माहिती




परदेश शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्यास 5 जुलै पर्यंत मुदतवाढ

 परदेश शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्यास 5 जुलै पर्यंत मुदतवाढ.

            मुंबई, दि. 21 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागा मार्फत प्रती वर्षी अनुसूचित जाती, नवबौध्द प्रवर्गातील 75 विद्यार्थ्यांना परदेशामध्ये विशेष अध्ययन करण्यासाठी ‘राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजने’अंतर्गत शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. या योजनेसाठी सन २०२३-२४ या वर्षाकरिता अर्ज करण्यास विद्यार्थ्यांना मुदतवाढ देण्यात आली असून दि. ५ जुलै २०२३ पर्यंत विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत, असे आवाहन समाज कल्याण, आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले आहे.


            अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील मुला-मुलींना परदेशात पदव्युत्तर पदवी आणि संशोधनात्मक अभ्यासक्रमाचे (पी.एच.डी.) विशेष अध्ययन करण्यासाठी आर्थिक मदत देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकडून परदेश शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागविण्यात येत असून अर्ज सदर करण्याची अंतिम मुदत ही दिनांक २० जून २०२३ पर्यंत होती, परंतू विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार मुदतवाढ देण्यात आली असून दि. ५ जुलैपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहेत.


            या योजनेंतर्गत महाराष्ट्रातील अनूसूचित जाती प्रवर्गातील पदव्युत्तर पदवी आणि पी.एच.डी.साठी अद्ययावत (Qx World University Ranking) 300 च्या आतील परदेशातील शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेणाऱ्या 75 विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येते. विद्यार्थ्यांने विहीत नमुन्यातील अर्ज शासनाच्या www.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरील रोजगार या लिंकवरुन डाऊनलोड करुन घ्यावा. परिपूर्ण आवश्यक त्या कागदपत्रांसह, समाज कल्याण आयुक्तालय 3, चर्च पथ, महाराष्ट्र राज्य, पुणे- 411001 या पत्यावर अर्ज करावेत.


            या योजनेसाठी पात्र असण्याऱ्या विद्यार्थ्यांना विमान प्रवास भाडे, परदेशातील शैक्षणिक संस्थेची शिक्षण फी, निर्वाह भत्ता, आकस्मिक खर्च याचा लाभ मिळणार आहेत. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी 35 वर्ष व पीएचडीसाठी 40 वर्ष ही कमाल वयोमर्यादा असेल. भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या संकेतस्थळावरील MD व MS अभ्यासक्रमच प्रवेशासाठी पात्र असतील. अधिक माहितीसाठी संकेतस्थळास भेट द्यावी.

पंढरपूर दिंडीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांसाठीविठ्ठल रखुमाई वारकरी विमा छत्र योजना"

 पंढरपूर दिंडीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांसाठीविठ्ठल रखुमाई वारकरी विमा छत्र योजना"


शासन निर्णय जारी


            मुंबई, दि. 21 :- महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठलाच्या पंढरपूर येथील वारीमध्ये दरवर्षी सुमारे १५ ते २० लक्ष वारकरी सहभागी होतात. पंढरपूर दिंडीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांचे आजारपण, अपघात किंवा मृत्यू झाल्यास या संदर्भात संबंधितांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी "विठ्ठल रखुमाई वारकरी विमा छत्र योजना" सुरु करण्याचा निर्णय घेतला. या योजनेच्या माध्यमातून विमा छत्र उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.


            या निर्णयानुसार “विठ्ठल रखुमाई वारकरी विमा छत्र योजना" या योजनेची अंमलबजावणी, संनियंत्रण तसेच विमाहप्ता भरण्याची कार्यवाही शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाकडून करण्यात येणार आहे. या संदर्भात आज वित्त विभागाने शासन निर्णय जारी केला आहे.


 विमा योजनेचे स्वरुप


            विठ्ठल रखुमाई वारकरी विमा छत्र योजनेंतर्गत दिंडीच्या दरम्यान झालेल्या दुर्घटनेत / अपघातात वारकऱ्याचा मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसास प्रत्येकी पाच लाख रुपये शासनाकडून सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे.


            याव्यतिरिक्त, खाजगी क्षेत्रातील विमा कंपनीच्या सहाय्याने विमा योजना राबविण्यात येणार आहे. दिंडीच्या दरम्यान अपघातात कायमचे अपंगत्व आल्यास विमा कंपनीकडून प्रतिव्यक्ती विमा रक्कम प्रदान करण्यात येईल. दोन्ही हात, दोन्ही पाय, दोन्ही डोळे, एक हात/पाय व एक डोळा निकामी झाल्यास एक लाख रुपये तर एक हात, एक पाय किंवा एक डोळा निकामी झाल्यास ५० हजार रुपये देण्यात येणार आहे.


            वैद्यकीय उपचारासाठी प्रत्येकी ३५ हजार रुपये किंवा प्रत्यक्ष वैद्यकीय खर्च यापैकी जी कमी असेल तेवढी रक्कम विमा कंपनीकडून प्रदान करण्यात येईल, असे या योजनेचे स्वरुप असणार आहे.


            या विमा योजनेसंबंधीच्या अटी, शर्ती व अन्य तरतुदी शासन निर्णयात नमूद करण्यात आल्या आहेत.


            या विमा योजनेबाबत आवश्यकतेनुसार विमा संचालनालयाचा सल्ला घेण्यात येईल, असे वित्त विभागाने निर्गमित केलेल्या शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.


००००

प्रतिबंधात्मक उपचारासाठी नियमित योग अनेक व्‍याधींवर परिणामकारक

 प्रतिबंधात्मक उपचारासाठी नियमित योग अनेक व्‍याधींवर परिणामकारक        


– धीरज कुमार


आरोग्‍य सेवा आयुक्‍तालयात जागतिक योग दिन साजरा


               मुंबई, दि. 22 : “मानवी जीवनात असंसर्गजन्‍य आजारांचे वाढत असलेले प्रमाण चिंताजनक आहे. या आजारांवर नियंत्रणासाठी योगासारख्‍या अखर्चिक व किमान संसाधनांची आवश्‍यकता असलेल्‍या प्रतिबंधात्‍मक उपचारांचा वापर होणे आवश्‍यक आहे. मेडिटेशन, योग यासारख्‍या थेरपींमध्‍ये सातत्‍य व नियमीतपणा ठेवला, तर अनेक आजारांपासून दूर राहणे शक्‍य आहे. परदेशामध्‍ये ज्‍या प्रमाणात योगोपचाराचा वापर केला जात आहे, त्‍या प्रमाणात आपल्‍या देशात प्रसार होणे गरजेचे आहे. शारीरिक आजारांव्‍यतिरिक्‍त क्रोध, मानसिक व्‍याधींवर नियंत्रण मिळवण्‍याचे सामर्थ्‍य योगामध्‍ये असल्‍यामुळे सर्वांनी आपल्‍या दिनचर्येतील काही वेळ योगासाठी व्‍यतीत करावा”, असे मनोगत आरोग्य सेवा आयुक्त धीरज कुमार यांनी व्यक्त केले. 


             आरोग्‍य विभागाच्‍यावतीने आरोग्‍य सेवा आयुक्‍तालयात जागतिक योग दिनाच्‍यानिमित्‍ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन आरोग्‍य सेवा आयुक्‍त धीरज कुमार यांच्या हस्‍ते झाले. वित्‍त संचालक जयगोपाल मेनन, सहसंचालक डॉ. विजय कंदेवाड आदींसह आयुक्‍तालयातील अधिकारी - कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्ज्वलनाने झाली. मान्‍यवरांच्‍या हस्‍ते ‘सचित्र योगक्रम’ पुस्तिकेचे प्रकाशन करण्‍यात आले.


              सहायक संचालक डॉ. सुभाष घोलप यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जागतिक योग दिवसाची पार्श्‍वभूमी व महत्त्व विषद केले. उद्घाटन समारंभानंतर ‘ताण तणावापासून मुक्‍तीसाठी योग’ या विषयावर लोणवळयाच्‍या कैवल्‍यधामचे सहायक प्राध्‍यापक डॉ.सतीश पाठक, ‘असांसर्गिक रोगांमधील योगाचे महत्त्व’या विषयावर कैवल्‍यधामचे प्राध्‍यापक डॉ. शरदचंद्र भालेकर आणि ‘अष्‍टांग योग-समज/ गैरसमज’ या विषयावर सायन येथील आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राध्‍यापक डॉ. गोरक्षनाथ आव्‍हाड यांची व्‍याख्‍याने झाली. तसेच डॉ. साक्षी हडप व डॉ. निकेश अंधारे यांनी उपस्थितांकडून योगाची प्रात्‍यक्षिक करवून घेतली.    


            कार्यक्रमाचे संचालन डॉ. प्रसाद भंडारी यांनी, तर आभारप्रदर्शन डॉ. सुभाष घोलप यांनी केले.


 

नामांकित इंग्रजी निवासी शाळेत प्रवेशासाठी३० जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 नामांकित इंग्रजी निवासी शाळेत प्रवेशासाठी३० जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन.


            मुंबई, दि. 22 : सन 2023-24 या शैक्षणिक वर्षासाठी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी माध्यमांच्या शाळेत इयत्ता पहिली आणि दुसरीमध्ये प्रवेशासाठी 30 जून 2023 पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी मुंबई यांनी केले आहे.


            अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील नामांकित इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेत प्रवेश देण्यात येतो. या योजनेसाठी इयत्ता 1 ली व इयत्ता 2 री मध्ये प्रवेश घेण्यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, मुंबई यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या गावे व पाडे येथील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह 30 जून 2023 पर्यंत अर्ज करणे आवश्यक आहे.

बालकांच्या हक्कांचा लढा अधिक मजबूत करणार

 बालकांच्या हक्कांचा लढा अधिक मजबूत करणार


- ॲड. श्रीमती सुशीबेन शाह, अध्यक्ष, बाल हक्क आयोग


 


            मुंबई, दि. 22 : पोक्सो व बाल न्याय अधिनियम या कायद्यांची अंमलबजावणी करताना येणाऱ्या सर्व समस्या तातडीने सोडवल्या जातील. येत्या काळात सर्वांना प्रशिक्षण देवून बालकांच्या हक्कांचा लढा अधिक मजबूत केला जाईल, असे बाल हक्क आयोगाच्या अध्यक्ष ॲड. सुशीबेन शाह यांनी सांगितले.


            महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने पोक्सो व बाल न्याय अधिनियम कायद्यांतर्गत कोकण विभागातील सहा जिल्ह्यांत दाखल प्रकरणांचा आढावा घेण्यासाठी मुंबईत बैठकीचे आयोजन केले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. या बैठकीस बाल हक्क संरक्षण आयोगाचे सदस्य, विशेष पोलीस महानिरीक्षक (महिला व बाल अत्याचार प्रतिबंध विभाग) दीपक पांडे, बाल कल्याण समिती सदस्य, बाल न्याय मंडळाचे सदस्य, बालगृहांचे अधीक्षक, जिल्हा महिला व बाल संरक्षण विभागाचे, खासगी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.


            यावेळी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे, मुंबई शहर व उपनगर या जिल्ह्यातील बाल कल्याण समितीचे सदस्य, जेजेबी चे सदस्यांनी पोक्सो व बाल न्याय अधिनियम कायदा राबवताना येणाऱ्या समस्यांबाबत चर्चा केली व कायद्यांच्या प्रभावी अमंलबजावणीसाठी सूचना केल्या.


            अध्यक्ष ॲड. शाह यांनी सर्वांचे म्हणणे ऐकून घेत पोक्सो व बाल न्याय अधिनियम कायदा अंमलबजावणी करताना येणाऱ्या सर्व समस्या तातडीने सोडवल्या जातील. येत्या काळात सर्वांना प्रशिक्षण देवून बालकांच्या हक्कांचा लढा अधिक मजबूत केला जाईल, असे सांगितले. तसेच सपोर्ट पर्सन, सदस्यांकडून शिफारशी मागवून तीन महिन्यात अहवाल सादर केला जाईल. सर्व कर्मचारी व सदस्यांनी आपसात संवाद साधल्यास अजून जोमाने व गंभीरपणे कार्य करता येईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.


            बैठकीस उपस्थित लोकायुक्त (निवृत्त) न्या. वि. एम. कानडे यांनी अध्यक्षीय भाषण केले. पोलीस दल आणि बाल कल्याण समिती यांच्याकडून पोक्सो व बाल न्याय अधिनियमासंदर्भात प्राप्त माहितीचे विश्लेषण बाल हक्क आयोगाच्या सदस्य ॲड. नीलिमा चव्हाण व मजलिस संस्थेच्या संचालक ऑड्री डिमेलो यांनी केले. यावेळेस सखी सावित्री कायद्याची जनजागृती करण्यासंबंधी चर्चा करण्यात आली.


*****

Featured post

Lakshvedhi