Friday, 16 June 2023

आकाशवाणी पुणे केंद्रावरुनच बातमीपत्रे प्रसारित होणार

 आकाशवाणी पुणे केंद्रावरुनच बातमीपत्रे प्रसारित होणार


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती व प्रसारणमंत्र्यांचे मानले आभार


            मुंबई, दि. 15 : आकाशवाणी पुणे केंद्रातील वृत्त विभाग बंद करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्तक्षेपानंतर प्रसारभारतीने मागे घेतला असून या केंद्रावरुनच यापुढे बातमीपत्रे प्रसारित होणार असल्याचे आदेश प्रसारभारतीने आज जारी केले आहे, या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांचे आभार मानले आहेत.


            पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग १९ जूनपासून बंद करण्याचे आदेश प्रसारभारतीने काढले होते. या आदेशाविरुद्ध सर्वत्र तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती. याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळताच त्यांनी त्यांच्या अपर मुख्य सचिवांना सूचना देऊन केंद्रातील अधिकाऱ्यांकडे आकाशवाणीचा वृत्त विभाग सुरू ठेवावा, अशी विनंती करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यामागणीवर सकारात्मक निर्णय घेत प्रसारभारतीने यापुढे पुणे प्रादेशिक वृत्त विभागातूनच बातमीपत्र प्रसारित होतील, असे आदेश आज काढले आहेत.


            सकाळी ७.१०, ८, ८.३०, १०.५८, ११.५८ वाजताचे आणि सायंकाळी ६ वाजेचे बातमीपत्र यापुढेही पुणे केंद्रावरुनच प्रसारित होणार आहेत.



००००



 


अधिकाधिक गिरणी कामगारांना घरे मिळवून देण्यासाठी शासन प्रयत्नशील

 अधिकाधिक गिरणी कामगारांना घरे मिळवून देण्यासाठी शासन प्रयत्नशील.


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते गिरणी कामगारांना सदनिकांच्या चाव्यांचे वाटप


            मुंबई, दि. १५ : गिरणी कामगारांचे मुंबईच्या जडणघडणीत मोठे योगदान आहे. अधिकाधिक गिरणी कामगारांना घरे मिळवून देण्यासाठी जागेचा शोध घेतला जात असून त्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. गिरणी कामगारांना शासन वाऱ्यावर सोडणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.


            म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे सन २०२० मध्ये गिरणी कामगारांसाठी जाहीर करण्यात आलेल्या सदनिका सोडतीतील बॉम्बे डाईंग व श्रीनिवास मिलमधील पात्र व सदनिकेच्या विक्री किंमतीचा व मुद्रांक शुल्काचा भरणा केलेल्या पात्र १६२ यशस्वी गिरणी कामगार/ वारसांना आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सदनिकांच्या चाव्या व वितरणपत्र वाटप करण्यात आले. यावेळी श्री. शिंदे बोलत होते.


            सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या कार्यक्रमाला कामगार मंत्री सुरेश खाडे, कृषिमंत्री अब्दुल सत्तार, आमदार प्रवीण दरेकर, कालिदास कोळंबकर, गिरणी कामगार समितीचे अध्यक्ष व आमदार सुनील राणे, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल, मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी (अतिरिक्त कार्यभार) अरुण डोंगरे आदी उपस्थित होते.


            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, आजचा दिवस आमच्या आयुष्यातला महत्त्वाचा दिवस असून गेली अनेक वर्षे गिरणी कामगारांना घरे मिळणार अशी फक्त चर्चा होत होती. आज प्रत्यक्षात गिरणी कामगारांना चाव्या आणि पत्र दिले जात आहेत. सन २०२० मधील गिरणी कामगार सोडतीतील उर्वरित सुमारे ३५०० यशस्वी गिरणी कामगार/वारसांना येत्या तीन महिन्यांत सदनिकांचा ताबा देण्यासाठी युद्ध पातळीवर काम करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिले. सदनिकेच्या चाव्या मिळत असलेल्या गिरणी कामगारांना सदनिका विक्री किंमतीचा भरणा उशिरा केल्याबद्दल लावलेला दंड माफ करून दि. ०१ जुलै २०२३ पासून सदनिकेसाठीचा देखभाल- दुरुस्ती खर्च आकारण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिले. कायदे हे सर्वसामान्यांसाठी असावेत, ही शासनाची भूमिका असून योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना शासनाकडे येण्याची वेळ येवू नये, यासाठी 'शासन आपल्या दारी' हा कार्यक्रम राबवित आहोत. आतापर्यंत राज्य शासनाने सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेतले. गिरणी कामगारांना सदनिका खरेदी करण्यासाठी मुंबई बँकेने कर्ज दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी बँकेचेही आभार मानले.


            उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गिरणी कामगारांची सन २०२० मध्ये सोडत काढण्यात आली. मात्र, आतापर्यंत केवळ २६ यशस्वी गिरणी कामगार/ वारसांची पात्रता निश्चित होऊन विक्री किंमतीचा भरणा केलेला होता. सोडतीतील यशस्वी गिरणी कामगार/ वारसांच्या पात्रतेविषयक कामाला गती मिळून त्यांना सदनिकेचा लवकरात लवकर ताबा मिळावा, यासाठी आमदार सुनील राणे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती तयार केली. समितीने केलेल्या पाठपुराव्यामुळे कमी कालावधीत जवळपास १६२ यशस्वी गिरणी कामगार/ वारसांची पात्रता निश्चित झाली. येत्या तीन महिन्यात उर्वरित सुमारे ३५०० गिरणी कामगार/ वारसांची पात्रता पूर्ण करुन त्यांना सदनिकेचा ताबा देण्याचे आश्वासन श्री.फडणवीस यांनी दिले. गिरणी कामगारांसाठी मुंबई महानगर क्षेत्रात घरे देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. गिरणी कामगार/ वारसांची पात्रता निश्चितीचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येऊन इतरही गिरणी कामगारांना न्याय देण्याचा प्रयत्न असल्याचे श्री. फडणवीस यांनी सांगितले. शेवटच्या पात्र कामगाराला सदनिकेचा ताबा मिळत नाही, तोपर्यंत हे काम सुरु राहील. सदनिका मिळण्यासाठी अर्ज केलेल्या सर्व १ लाख ५० हजार गिरणी कामगारांना घर उपलब्ध करून देण्यासाठी शासनातर्फे लवकरच एक मोहीम सुरू करण्यात येणार असून विशेष कक्ष स्थापन केला जाणार असल्याचे श्री. फडणवीस यांनी सांगितले.


            श्री. राणे म्हणाले की, मार्च-२०२० मध्ये मुंबईतील बॉम्बे डाईंग मिल, बॉम्बे डाईंग टेक्सटाइल मिल आणि श्रीनिवास मिलमधील ३८९४ सदनिकांसाठी म्हाडातर्फे सोडत काढण्यात आली. या सोडतीमधील यशस्वी गिरणी कामगार/ वारसांपैकी एकूण १४१२ यशस्वी गिरणी कामगार वारसांना सदनिकेच्या विक्री किंमतीचा भरणा करण्यासाठीचे तात्पुरते देकार पत्र (Provisional Offer Letter) देण्यात आले असून उर्वरित २४८२ गिरणी कामगार/ वारसांची पात्रता निश्चित करून व सदनिकीच्या विक्री किंमतीचा भरणा केल्यानंतर त्यांना चाव्यांचे वाटप तत्काळ केले जाणार आहे.

Thursday, 15 June 2023

ई- ऑफिस प्रणालीची प्रभावी अंमलबजावणी करा

 ई- ऑफिस प्रणालीची प्रभावी अंमलबजावणी करा


- सचिव सुमंत भांगे


           


            मुंबई दि. 15 : शासकीय कामकाज ई-ऑफिस प्रणालीद्वारे करण्याचे शासनाचे धोरण असून या प्रणालीच्या वापरामुळे कामकाज अधिक सुलभ व कागद विरहित होणार आहे. शासकीय कामकाजामध्ये ई- ऑफिस प्रणालीची प्रभावी अंमलबजावणी करा, असे सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी सांगितले.


            आज मंत्रालयात सामाजिक न्याय विभागाने ई-ऑफिस प्रणालीच्या वापराबाबत अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण आयोजित केले होते. त्यावेळी सचिव श्री.भांगे बोलत होते.


            यावेळी सामाजिक न्याय विभागाचे सहसचिव दिनेश डिंगळे, उपसचिव रवींद्र गोरवे, सहाय्यक संचालक कल्याण अवताडे उपस्थित होते.


            श्री.भांगे म्हणाले, मंत्रालयातील सर्व प्रशासकीय विभागात पत्रव्यवहार करताना प्रत्येक टपाल ई- ऑफिसच्या माध्यमातून पाठविण्यासाठी ई-ऑफिस प्रणालीचा वापर प्रभावीपणे करण्यासाठी कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही प्रणाली कशा पद्धतीने राबविण्यात येते. तसेच ई- ऑफिस प्रणालीच्या तांत्रिक बाजू समजून घ्याव्यात व या प्रणालीचा वापर तात्काळ सुरू करावा, अशा सूचना त्यांनी यावेळी अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या.

पोट साफ करण्याचे प्रभावि उपाय...*

 *पोट साफ करण्याचे प्रभावि उपाय...*


  १) रोज जेवणानंतर दालचिनीची पावडर मधात मिसळून घ्या.

    २) १०० मि.लि पाण्यात एक चमचा मेथि दाणे उकळून हे पाणी जेवणाआधी एक तास प्यावे. व जेवणानंतर हे मेथिचे दाणे घालून खावे. याने सकाळी पोट साफ होते.

   ३) भाजलेले जिरे पूड जेवणानंतर घ्या. पाण्यासोबत.,

  ४) मनुका दुधात उकळून रात्री झोपण्यापूर्वी चावून खावे., रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास पाण्यात इसबगोल मिसळून घ्यावे..

  ५) रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा भरून गुलकंद खाऊन त्यावर एक कप भरून दूध घ्यावे.

   ६), दूधात दोन तीन अंजिर उकळून मग अंजिर खावे . आणि वरून दूध घ्यावे..

   ७) एक ग्लास पाण्यात २ चमचे कोरफड गर मिसळून घ्यावे..,. त्रिफळा चूर्ण मातिच्या भांड्यात भिजवून मग सकाळी हे गाळून घ्यावे. याने पोट साफ होते.

    ८) रात्री झोपण्यापूर्वी एक कप पाण्यात एक ते दोन चमचे साजूक तुप व किंचित सैंधव मीठ घालून घ्यावे. याने सकाळी पोट साफ होते.

     ९) रोज सकाळी दोन खजुर साजुक तुपासोबत खाल्ल्यास पोट साफ होते..

     १०) ताजी कोरफड मंद गॅसवर भाजून, नंतर साल काढून, यातिल गर मलमलच्या कपड्यात गाळून, त्यात मध मिसळून घ्यावे.. याने सकाळी पोट साफ होते..

    ११,) रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा भरून ओवा खावा, याने पोट साफ होते..

    १२) रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा भरून एरंडेल तेल घ्यावे, याने सकाळी पोट साफ होते..


 वरील उपाय करावेत आणि, आहारात नेहमी पालेभाज्या फळे खावीत.


*संकलन-* 

*निसर्ग उपचार तज्ञ* 

डॉ. प्रमोद ढेरे,



ऑयली त्वचा (Oily Skin) साठी उपाय कसा करावा :*

 *👉ऑयली त्वचा (Oily Skin) साठी उपाय कसा करावा :*


1) बेसन, तांदळाचे पीठ, दही आणि हळद मिक्स करून लेप बनवून लावल्यामुळे स्कीन चे ऑईली पण समाप्त होते आणि चेहऱ्यावर चमक येते. हा उपाय face वरून काळे दाग आणि पिंपल्स दूर करण्यासाठी देखील फायदेशीर होतो.


2) मध, पुदिना रस आणि लिंबू रस यांचा देखील oily skin पासून सुटका मिळवण्यासाठी वापर केला जाऊ शकतो.


3) हळद, मुलतानी माती आणि चंदन यांचा लेप चेहऱ्यातील मॉश्चराइज ओढून घेतो आणि स्कीन ऑईल फ्री होते. या घरगुती उपाया मुळे स्कीन टाईट होते. यामुळे तुम्ही नेहमी फ्रेश दिसाल. हा लेप लावल्यावर 30 मिनिटांनी चेहरा धुवावा.


4) चेहऱ्यावर कच्चा बटाटा किंवा काकडी चोळल्यामुळे देखील फायदा होतो.


👉चेहरा गोरा आणि सुंदर कसे बनवायचे :


1) एलो वीरा ज्यूस, एप्पल साइडर विनिगर आणि हळद, या तीन वस्तू मिक्स करून चेहऱ्यावर लावल्याने त्वचेचा सावळे पण दूर होतो.


2) गोरा रंग मिळवण्यासाठी हळद आणि लिंबूरस वापरणे उत्तम आहे. हा उपाय तेलकट त्वचेच्या लोकांसाठी उत्तम आहे.


3) दुधा ची मलाई, बेसन आणि हळद मिक्स करून एक लेप बनवा. हा लेप चेहऱ्यावर व्यवस्थित लावा. ऑईल स्कीन वाल्यांनी हा उपाय करू नये. ड्राय स्कीन वाले करू शकतात.


4) मध, गुलाबाच्या पाकळ्या आणि दुध यांचा लेप रंग उजळण्या साठी आणि चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी वापरा.


5)बाहेरून आल्यावर त्वरित चेहरा स्वच्छ धुवावा कारण त्वचेच्या रोम छिद्रात मळ जमा होऊ शकतो.


6) पपई चेहऱ्याचा रंग उजळण्यासाठी फायदेशीर आहे. कच्ची पपई dead skin cells दूर करण्यासाठी उपयोगी आहे.


 👉तुळशीची पाने बारीक वाटून याचा लेप चेहऱ्यावर लावल्यामुळे चेहरा टवटवीत होतो.


👉अननस आणि पिकलेले टोमाटो चेहऱ्यावर face pack बनवून लावल्याने हळूहळू गोरे पण येईल.


👉वाफ घेतल्याने छिद्रात साठलेले तेल, माती आणि डेड स्कीन सेल्स सहज निघून जातात. हा skin care चा सर्वात उत्तम आणि सोप्पा उपाय आहे.


👉दही, आवळा पावडर, हळद आणि बेसन मिक्स करून एलोवीरा ज्यूस आणि थोडा लिंबूरस मिक्स करून फेशियल पैक तयार करा. यास चेहऱ्यावर लावा. या उपायाने काळे दाग दूर होतील आणि skin moisturize होईल.


☝️शरीराची बाहेरील सुंदरता वाढवण्यासाठी आवश्यक आहे कि तुम्ही शरीराच्या आतून देखील निरोगी असले पाहिजे. वर सांगितलेले ब्युटी चे घरगुती उपाय करण्या सोबतच आवश्यक आहे तुम्ही हे उपाय देखील केले पाहिजेत.


👉पौष्टिक भोजन खावे ज्यामुळे शरीराला आवश्यक पोषक तत्व मिळतील आणि त्वचा निरोगी राहील. यासाठी तळलेले, मसालेदार, फास्ट फूड खाण्याच्या एवजी विटामिन आणि मिनरल्स असलेले पदार्थ आहारात घ्यावेत.


👉पोटाच्या आजारा पासून स्वताला वाचवा. सकाळी पोट सोफ्ट करण्यासाठी गरम पाण्यात थोडासा लिंबूरस, मध आणि अद्रक रस मिक्स करून प्यावे.


👉रोज 3 ते 4 लीटर पाणी प्यावे ज्यामुळे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर निघून जातील.


👉वेळेवर भोजन करावे.


👉रोज व्यायाम करावा.

तणाव मुक्त राहावे आणि चांगली झोप घ्यावी.


👉खाण्यापिण्याच्या वाईट सवयी पासून वाचावे.


👉जर तुम्ही पिंपल्स ने हैराण आहे तर कांदा आणि लसून यांची पेस्ट बनवून यामध्ये कडूलिंबाची पाने मिक्स करून पेस्ट बनवा. आता हे मिश्रण थोडी हळद मिक्स करून फेस वर लावा. याच्या व्यतिरिक्त तुम्ही वाफ घेऊ शकता ज्यामुळे pimples दूर होतील.




भांडूप पोलिस स्टेशन येथेमहिला समुपदेशन केंद्रासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 भांडूप पोलिस स्टेशन येथेमहिला समुपदेशन केंद्रासाठी अर्ज करण्याचे आवाहन.

            मुंबई, दि. 15 : महिला व बालकांवर होणाऱ्या अत्याचारास प्रतिबंध करण्यासाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात भांडूप पोलिस स्टेशन येथे महिला समुपदेशन केंद्र सुरू करण्यासाठी स्वयंसेवी संस्थाकडून अर्ज मागविण्यात येत आहे. येत्या पंधरा दिवसात कार्यालयीन कामकाजाच्या दिवसात अर्ज करावे, असे आवाहन मुंबई उपनगरचे जिल्हा महिला बालविकास अधिकारी यांनी केले आहे.


            त्यासाठी अटी व शर्ती पुढीलप्रमाणे आहेत :- अर्जदार संस्था मुंबई उपनगर जिल्हयातील (स्थानिक) तसेच महिला पदाधिकारी असल्यास प्रथम प्राधान्य असेल., संस्था नोंदणी अधिनियम १८६० व मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० अंतर्गत नोंदणी असणे आवश्यक आहे., संस्थेस किमान ३ वर्षांचा महिला समुपदेश क्षेत्रातील अनुभव आवश्यक जास्त अनुभव असल्यास प्राधान्य., समुपदेशनासाठी एमएसडब्ल्यू (MSW) उत्तीर्ण दोन समुपदेशक कर्मचारी यांची यादी व कागदपत्र जोडणे आवश्यक आहे., संस्थेची घटना व नियमावली आवश्यक ज्यामध्ये महिलांसाठी समुपदेशन केंद्र चालवणे हा उददेश असावा, सनदी लेखापालांची स्वाक्षरी असलेला मागील तीन वर्षांचा अहवाल (ऑडीट रिपोर्ट ), संस्थेचे मागील तीन महिन्यांचे माहिना निहाय बँक स्टेटमेंट जोडावे., संस्थेचे कार्यरत पदाधिकारी यांचे नाव, पत्ता, दूरध्वनी क्रमांक यादी जोडावी, संस्थेच्या कार्यकारी मंडळातील सदस्य एकमेकांचे नातेवाईक नाहीत तसेच कोणीही सदस्य शांसकीय सेवेत नाहीत याबाबतचे हमीपत्र सोबत जोडावे., संस्थेने सार्वजनिक संपत्तीचा अपहार केलेला नाही याबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र. आवश्यक, संस्थेच्या पदाधिकारी (अध्यक्ष व सचिव) यांचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे स्वाक्षरीचे विना दुराचार प्रमाणपत्र जोडावे., ज्या स्वयंसेवी संस्थांनी समुपदेशन केंद्रासाठी यापूर्वी प्रस्ताव सादर केले होते त्यांनीही पुन्हा नव्याने प्रस्ताव आवश्यक आहे. (सोबत आवश्यक ती कागदपत्रे पुरावा म्हणून जोडावेत.) असे मुंबई उपनगरचे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी बी. एच. नागरगोजे यांनी पत्रकाद्वारे प्रसिद्धीस दिले आहे.


००००

तूर, उडीद डाळींच्या किमतीवर सातत्याने लक्ष ठेवण्याचे,

 तूर, उडीद डाळींच्या किमतीवर सातत्याने लक्ष ठेवण्याचे, साठामर्यादा आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे केंद्राचे राज्यांना निर्देश


 


            नवी दिल्ली, 15 : तूर आणि उडीद डाळींच्या किमतीवर सातत्याने लक्ष ठेवण्याचे, साठ्याच्या स्थितीची पडताळणी करण्याचे आणि साठामर्यादा आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याचे निर्देश, ग्राहक व्यवहार विभागाच्या अतिरिक्त सचिव निधी खरे यांनी राज्यांना दिले.


            तूर आणि उडीद डाळींचा साठा जाहीर करण्यासंदर्भात आणि राज्य सरकारांकडून साठा मर्यादेच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी राज्यांचे अन्न आणि नागरी पुरवठा विभाग, केंद्रीय गोदाम महामंडळ (सीडब्लूसी) आणि राज्य गोदाम महामंडळ एसडब्लूसी) यांची श्रीमती खरे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली.


            ग्राहक व्यवहार विभागाने 2 जून 2023 रोजी साठेबाजी आणि काळा बाजार रोखण्यासाठी तसेच तूर आणि उडीद डाळीचे दर ग्राहकांना परवडतील असे ठेवण्यासाठी अत्यावश्यक वस्तू कायदा 1955 लागू करत तूर आणि उडीद यांच्या साठ्यांवर मर्यादा घातली होती.


            या आढावा बैठकीत, दोन्ही डाळींचे किरकोळ दर, डाळी साठवणूक करणाऱ्या विविध उद्योगांनी जाहीर केलेला साठा, केंद्रीय गोदाम महामंडळ आणि राज्य गोदाम महामंडळांकडील साठा तसेच तत्सम विषयांवर चर्चा करण्यात आली. बाजारातील साठवणूकदार उद्योगांनी बँकेकडे तारणाच्या स्वरुपात दाखवलेला साठा आणि पोर्टलवर जाहीर केलेला साठा यामधील तफावतीची पडताळणी करण्यासाठी राज्यांनी उचललेली पावले आणि साठा मर्यादेची अंमलबजावणी या मुद्यांवर देखील या बैठकीत चर्चा करण्यात आली. तसेच सीडब्लूसी आणि एसडब्लूसी यांना त्यांच्या गोदामांमध्ये असलेल्या तूर आणि उडीद डाळींच्या साठ्याचे तपशील सादर करण्यास सांगण्यात आले.


            या डाळींच्या किमतीवर सातत्याने लक्ष ठेवण्याचे आणि साठवणूकदार उद्योगांच्या साठ्यांच्या स्थितीची पडताळणी करण्याचे आणि ज्यांनी साठा मर्यादा आदेशाचे उल्लंघन केले आहे त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश राज्य सरकारांना बैठकीत देण्यात आले.


            मार्च 2023 रोजी विभागाने आयातदार, मिलर्स, साठवणूकदार, व्यापारी यांच्याकडे असलेल्या साठ्यावर राज्य सरकारांच्या समन्वयाने देखरेख ठेवण्यासाठी अतिरिक्त सचिव निधी खरे यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना केली होती. यासाठी, विभागाने महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांमधील विविध ठिकाणांना भेट देण्यासाठी 12 वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती केली गेली आहे.


००००



 


Featured post

Lakshvedhi