Tuesday, 13 June 2023

औषध घेताना या चुका करणं पडू शकतं महागात, जाणून घ्या काय टाळावं.....!*

 *औषध घेताना या चुका करणं पडू शकतं महागात, जाणून घ्या काय टाळावं.....!*


काही पदार्थांचं कॉम्बिनेशन हे प्रत्येकवेळी बरोबरच ठरेल असं नाही. याचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणामही होऊ शकतो. म्हणून कोणतेही डॉक्टर आपल्या रूग्णांना औषध वेळेवर घेण्यासोबतच आहारावरही लक्ष देण्यास सांगतात. कारण आजारी असताना आपण जे खातो त्याचा आपल्या औषधांवरही प्रभाव पडत असतो. अशात औषध घेताना कोणते पदार्थ किंवा पेय टाळले पाहिजे हेही डॉक्टर सांगतात. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.


*केळी...*

आजारी असताना अनेकदा लोक केळी खातात. केळींमध्ये असणारं पोटॅशिअम आरोग्यासाठी फायदेशीर असतं. पण जर तुम्ही ब्लड प्रेशरची औषधे घेत असाल जसे की, कॅप्टोप्रिल, एंजियोटेनसिन इत्यादी घेत असाल तर केळीसहीत इतरही पोटॅशिअम असलेली फळे किंवा पदार्थ खाऊ नये. याने हृदयाचे ठोके वाढू शकतात.


*आंबट फळं...*

 जेव्हा तुम्ही औषधे घेता, तेव्हा आंबट फळं खाऊ नये. आंबट फळं ५० पेक्षा अधिक औषधांना प्रभावित करू शकतात. याने शरीरात वेगवेगळ्या समस्या निर्माण होऊ शकतात. या समस्या टाळण्यासाठी औषधे घेत असाल तर लिंबू, संत्री, द्राक्ष, लोणचं, चिंच खाऊ नका.


*चहा-कॉफी...*

औषधे ही गरम गोष्टींमुळे खराब होतात. औषधांचं कोटिंग आधीच गरम पाण्यासोबत नष्ट होतं आणि त्याचा योग्य तो फायदा तुम्हाला मिळत नाही. अशात बरं होईल की, तुम्ही चहा-कॉफी किंवा कोणत्याही गरम पदार्थासोबत किंवा पेयासोबत औषध घेऊ नये. औषधे थंड किंवा नॉर्मल पाण्यासोबत घ्यावीत.


*डेअरी प्रॉडक्ट्स...*

 डेअरी उप्तादने जसे की, दूध, पनीर, दही आणि मलाई सारखे पदार्थ तुमच्या शरीरात काही एन्टीबायोटिक औषधांचा प्रभाव निकामी करू शकतात. दुधातील कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअम सारख्या खनिजांनी प्रोटीनसोबत काही रिएक्शन होतात. याने काही औषधांचा प्रभाव कमी होतो.


*अल्कोहोल...* अल्कोहोलसोबत औषधे अजिबात घेऊ नये. औषधांमध्ये असे अनेक केमिकल्स असतात, जे अल्कोहोलसोबत रिएक्शन करू शकतात. अशात औषधांचा फायदा होण्याऐवजी याने जीवाला धोकाही होऊ शकतो.


*कोल्ड ड्रिंक्स...*

 सोडा आणि कोल्ड ड्रिंक्ससोबत औषधे घेण्याची चूक अजिबात करू नका. अशात औषध तुमच्यासाठी नुकसानकारक ठरू शकतं.


*कुमार चोप्रा,*

*डॉ. सुनील इनामदार.*

.

🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺


कंत्राटी ग्रामसेवकांचे मानधन वाढविले

 कंत्राटी ग्रामसेवकांचे मानधन वाढविले


 


            कंत्राटी ग्रामसेवकांच्या मानधनात १० हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. सध्या या ग्रामसेवकास सहा हजार रुपये दरमहिना मिळतात. आता ते १६ हजार मिळतील.


राज्यात सध्या २७ हजार ९२१ ग्रामपंचायती असून १८ हजार ६७५ नियमित ग्रामसेवकांची पदे आहेत. त्यापैकी १७ हजार १०० पदे भरली असून १५७५ पदे रिक्त आहेत. वर्ष २००० पासून ग्रामसेवकांची पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात येतात. कृषी सेवक, ग्राम सेवक, शिक्षण सेवक यांच्या मानधनात वाढ झाल्यामुळे कंत्राटी ग्राम सेवकांच्या मानधनात वाढ करण्याचा प्रस्ताव होता. यापूर्वी वर्ष २०१२ मध्ये वाढ करण्यात आली होती. यासाठी १ कोटी ५७ लाख ५० हजार रुपयांचा आर्थिक भार पडेल.

सततच्या पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी 1500 कोटी रुपयांस मंजुरी

 सततच्या पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी 1500 कोटी रुपयांस मंजुरी


 


            गेल्या वर्षी सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे बाधीत शेतकऱ्यांना 1500 कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.


            सुमारे 15.96 लाख हेक्टर बाधित क्षेत्रातील 27.36 लाख शेतकऱ्यांना मदत देण्यात येईल.


            राज्य शासनामार्फत ‘सततचा पाऊस’ नवीन आपत्ती घोषित करुन मदत देण्याबाबत मंत्रिमंडळाच्या 5 एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला होता. त्याप्रमाणे शेतीपिकांच्या नुकसानीकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या सुधारित दराने व निकषानुसार मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.


            केंद्र शासनाने राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे दर सुधारित केले आहेत. त्यानुसार जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी प्रतिहेक्टर 8500 रुपये, बागायत पिकांच्या नुकसानीसाठी 17 हजार रुपये प्रति हेक्टर आणि बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी 22500 रुपये प्रति हेक्टर अशी दोन हेक्टरच्या मर्यादेत मदत देण्यात येईल. 


-----

वक्फ मालमत्ता ऑनलाईन नोंदणीसाठीच्या वेबपोर्टलचा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते शुभारंभ

 वक्फ मालमत्ता ऑनलाईन नोंदणीसाठीच्या वेबपोर्टलचा

वक्फ मालमत्ता ऑनलाईन नोंदणीसाठीच्या वेबपोर्टलचा

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते शुभारंभ

 

               मुंबईदि. 13 : वक्फ मालमत्तांची ऑनलाईन-नोंदणी करण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या वेब-पोर्टलचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. 

            सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर वेबपोर्टलचा शुभारंभ झाला. यावेळी मंत्रिमंडळातील सदस्यांसह खासदार इम्तियाज जलीलफौजिया खानवक्फ बोर्डाचे अध्यक्ष आमदार डॉ. वजाहद मिर्झासदस्य समीर काजीमुदस्सीर लांबे आदी उपस्थित होते.

            महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ हे कार्यालय औरंगाबादला असून राज्यातील वक्फ मालमत्तांशी संबंधित प्रकरणांच्या अनुषंगाने राज्यभरातील वक्फ संस्थेच्या प्रतिनिधींना औरंगाबाद येथे जावे लागते. ही अडचण दूर व्हावी व वक्फ मालमत्तांशी संबंधित कामकाज ऑनलाईन पध्दतीने करण्याची सुविधा निर्माण व्हावीया हेतूने एक संगणक प्रणाली विकसित करण्याचे काम विभागाने

हाती घेतले. त्यानुसार आता ऑनलाईन-नोंदणी ची सुविधा https://mahawaqf.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध झाली आहे.

0000


0000

 आर्थिक साक्षरता, सायबर संरक्षणबाबतराज्य शासनाचा त्रिपक्षीय करार


 


        मुंबई, दि. 13 : गुंतवणुकदारांची गुंतवणूक सुरक्षित राहण्यासाठी काय खबरदारी घ्यावी, सायबर गुन्ह्यांपासून संरक्षण कसे करावे, याबाबत राज्यात विशेष अभियान राबविण्यात येणार आहे. यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभाग, नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि मनि बी प्रा. लि. यांच्यात आज त्रिपक्षीय सामंजस्य करार करण्यात आला आहे.


            सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, मनि बी प्रा. लि. च्या संचालक शिवानी दानी, नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे मुख्य व्यवस्थापक अमिश पटेल, श्रीराम कृष्णन, संबंधित अधिकारी यांच्या उपस्थितीत हा करार करण्यात आला आहे.


             राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांच्या माध्यमातून महाविद्यालयीन शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी यांच्यासाठी नॅशनल स्टॉक एक्सचेंज, आणि मनि बी प्रा. लि. यांच्यामार्फत राज्यात आर्थिक साक्षरता विशेष अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानातून विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार असून हा आर्थिक साक्षरता कार्यक्रम संपूर्णपणे मोफत असणार आहे.


            यामध्ये शेअर बाजारात गुंतवणूक कशी करावी, आर्थिक गुंतवणुकीची कशी खबरदारी घ्यावी आणि सायबर गुन्ह्यांपासून संरक्षण कसे मिळवावे, याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.


            डिजीटल सिस्टीम सुरक्षितता आणि सायबर हल्ले रोखण्यासाठी आवश्यक कौशल्ये आणि ज्ञान विद्यार्थ्यांना शिक्षीत आणि प्रशिक्षीत करण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे.


0000



मुंबईतील प्रकल्पग्रस्तांना पंतप्रधान आवास योजनेतून घरे

 मुंबईतील प्रकल्पग्रस्तांना पंतप्रधान आवास योजनेतून घरे

 

उपमुख्यमंत्री फडणवीस यांची माहितीआमदार भातखळकर यांनी उपस्थित केला प्रश्न 


 

मुंबई : मुंबईतील प्रकल्पग्रस्तांना पंतप्रधान आवास योजनेतून घरे देण्यात येतीलअसे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. तसे आदेश संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी दिले. भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी त्यांच्या कांदिवली पूर्व विधानसभेतील विविध प्रश्नाबाबत उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीत विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली. घरा ऐवजी २५ ते ४० लाख रुपयांचा पर्यायही प्रकल्पग्रस्तांना उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

 

यावेळी आमदार भातखळकर यांनी मतदारसंघातील विविध प्रकल्पामुळे विस्थापित होणाऱ्या लोकांचा प्रश्न उपस्थित केला. विशेष नियोजन आराखड्यातील मागाठाणे-गोरेगाव या १२० फूट रस्त्याबाबतही चर्चा करण्यात आली. हा रस्ता येणाऱ्या एक ते दिड वर्षात पूर्ण करावाअसे आदेश उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. हा रस्ता पूर्ण होताच वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास मदत होणार आहे.

 

मतदारसंघातील महत्वाच्या समस्यांचा निपटारा केल्याबद्दल आमदार भातखळकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. बैठकीस नगरविकासगृहनिर्माणमहापालिकाम्हाडाझोपडपट्टी पुनर्वसनशिवशाही पुनर्वसन यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.    



बारावीच्या पुरवणी परीक्षेची आवेदनपत्रेविलंब शुल्काने भरावयाच्या तारखांना मुदतवाढ

 बारावीच्या पुरवणी परीक्षेची आवेदनपत्रेविलंब शुल्काने भरावयाच्या तारखांना मुदतवाढ


            मुंबई, दि. 12 :- इयत्ता बारावीच्या पुरवणी परीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाईन पद्धतीने विलंब शुल्काने भरण्यास रविवार दिनांक 18 जून 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ही आवेदनपत्रे विद्यार्थ्यांनी त्यांच्या उच्च माध्यमिक‍ शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांमार्फतच भरावी, असे आवाहन शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी केले आहे.


            महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयामार्फत पुनर्परीक्षार्थी, यापूर्वी नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी, श्रेणी सुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणारे विद्यार्थी तसेच आयटीआय विषय घेऊन प्रविष्ट होणारे विद्यार्थी यांना इयत्ता बारावीच्या परीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाईन पद्धतीने विलंब शुल्काने भरण्यास रविवार दिनांक 18 जून 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.


            उच्च माध्यमिक शाळांनी/ कनिष्ठ महाविद्यालयांनी बँकेत चलनाद्वारे शुल्क भरावयाची तारीख सोमवार दिनांक 19 जून 2023 पर्यंत असून विभागीय मंडळाकडे शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या जमा करावयाची तारीख मंगळवार दिनांक 20 जून 2023 अशी आहे.


            महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे पुरवणी परीक्षा जुलै - ऑगस्ट 2023 मध्ये घेण्यात येणार आहे. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची आवेदनपत्र ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी त्यांच्या उच्च माध्यमिक‍ शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांमार्फतच भरावी, असे आवाहन मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी केले आहे.


००००

Featured post

Lakshvedhi