Saturday, 10 June 2023

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्याभरती प्रक्रियेस तात्पुरती स्थगिती

 राज्य उत्पादन शुल्क विभागाच्याभरती प्रक्रियेस तात्पुरती स्थगिती


 


            मुंबई, दि. ९ : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिपत्याखालील लघुलेखक (निम्नश्रेणी), लघुटंकलेखक, जवान व जवान नि वाहन चालक (गट क) आणि चपराशी (गट ड) संवर्गातील सरळसेवेची रिक्त पदे भरण्याकरीता राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या https://stateexcise.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर ३० मे २०२३ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या भरती प्रक्रियेतील जवान संवर्ग हा राज्यस्तरीय संवर्ग घोषित करून ही भरती प्रक्रिया व वाढीव पदे व त्या अनुषंगाने संभाव्य रिक्त पदे विचारात घेवून एकत्रितपणे भरती प्रक्रिया राबविणे आवश्यक आहे. त्यानुसार कार्यवाही करण्यात येत आहे. त्यामुळे या भरती प्रक्रियेस तात्पुरत्या स्वरूपात शासन निर्देशान्वये स्थगिती देण्यात येत आहे, असे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सहआयुक्त सुनील चव्हाण यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.


            या भरती प्रक्रियेसाठी ज्या उमेदवारांनी अर्ज भरले आहेत ते अर्ज ग्राह्य धरले जातील. मात्र, अर्जामध्ये तांत्रिक दुरुस्ती करणे गरजेचे असल्यास तशा सूचना यथावकाश कळविण्यात येतील. तसेच भरती प्रक्रियेची सुधारित जाहिरात सुद्धा यथावकाश प्रसिद्ध करण्यात येईल, असेही सहआयुक्त श्री. चव्हाण यांनी म्हटले आहे.


००००

अनुदानित आश्रमशाळांच्या मागण्यांसंदर्भात सकारात्मक

 अनुदानित आश्रमशाळांच्या मागण्यांसंदर्भात सकारात्मक


-- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


 


            मुंबई दि ९ :- राज्यातील स्वयंसेवी संस्थांद्वारा संचलित अनुदानित आश्रमशाळांच्या विविध मागण्यांसंदर्भात सकारात्मक विचार करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.


            मेघदूत निवासस्थान येथे स्वयंसेवी संस्थांद्वारा संचलित अनुदानित आश्रमशाळांबाबत बैठक झाली. यावेळी आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, आदिवासी विकास विभागाचे अपर मुख्य सचिव प्रदीपकुमार व्यास, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ.श्रीकर परदेशी उपस्थित होते.


            उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, विद्यार्थ्यांचे परिपोषण अनुदान वाढवणे तसेच आकस्मिक व सानुग्रह अनुदान यासंदर्भातील स्वयंसेवी संस्थांद्वारा संचलित अनुदानित आश्रमशाळांच्या विविध मागण्यांसंदर्भात सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करण्यात येत असून या मागण्यांबाबत सर्व संबंधित विभागांची एकत्रित बैठक घेण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.


            विद्यार्थ्यांचे परिपोषण अनुदान, आकस्मिक अनुदान, सानुग्रह अनुदान व वेतनश्रेणी यासंदर्भातील विविध मागण्या संघटनेच्या वतीने यावेळी मांडण्यात आल्या.



----000----


अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांनीराजावाडी हॉस्पिटल सुसज्ज करणार

 अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांनीराजावाडी हॉस्पिटल सुसज्ज करणार


- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


            मुंबई, दि. ९ :- राजावाडी हॉस्पिटल सर्व अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांनी युक्त व कॅशलेस रुग्णालय करण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलण्यात येतील असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.


            मेघदूत निवासस्थान येथे घाटकोपर पश्चिम येथील रायफल रेंज व राजावाडी हॉस्पिटल संदर्भात बैठक झाली. यावेळी आमदार राम कदम, गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर, उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ.श्रीकर परदेशी व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.


            उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, घाटकोपर येथील रायफल रेंज परिसरात स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स सुरू करण्यासंदर्भात मागणी असून यासंदर्भात लवकरच कार्यवाही करण्यात येईल. दरम्यान, रायफल रेंजसाठी पर्यायी जागेची पाहणी पोलिस विभागाने करावी, असे निर्देशही उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी यावेळी दिले.


            घाटकोपर पश्चिम येथील रायफल रेंज परिसरात स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, थीम फॉरेस्ट, कृत्रिम तलाव तसेच हा परिसर रमणीय करण्याच्या दृष्टिकोनातून प्रकल्प तयार करता येईल. यासाठी रायफल रेंज पर्यायी जागेत स्थलांतरित करण्याची आवश्यकता आहे. राजावाडी हॉस्पिटल नव्याने बांधण्याची आवश्यकता असल्याची सूचनाही आमदार श्री. कदम यांनी मांडली.


----000----

पQ कुर्ला येथे १० जून रोजी आयोजन

 पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे

कुर्ला येथे १० जून रोजी आयोजन

 

            मुंबईदि. ९ : जिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रमुंबई उपनगर यांच्यातर्फे शनिवार १० जून २०२३ रोजी सकाळी १० ते दुपारी ४ या कालावधीत पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहेअशी माहिती कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रमुंबई उपनगरचे सहाय्यक आयुक्त र. प्र. सुरवसे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

            सेंट ज्यूड हायस्कूलइंदिरानगरकाजूपाडाकुर्ला (प.)मुंबई- ४०००७२ येथे हा मेळावा होईल. या मेळाव्यात विविध नामांकित कंपन्या व नियोक्त्यांकडून रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. या मेळाव्यात रिक्त पदांसाठी पात्रतेप्रमाणे उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात येणार आहेत. दहावीबारावी उत्तीर्णआयटीआयपदवीधर उमेदवारांनी उपस्थित राहावेअसे आवाहन करण्यात आले आहे.

Friday, 9 June 2023

संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाकडीलविविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन.

 संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाकडीलविविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन.


            मुंबई, दि. ९ : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत कार्यरत असलेल्या संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत चर्मकार समाजातील (चांभार, मोची, ढोर व होलार) व्यक्तींच्या आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी विविध कर्ज योजना राबविल्या जातात. सन २०२३-२४ मध्ये महामंडळामार्फत केंद्र व राज्य शासनाच्या (एन. एस. एफ. डी. सी.) कर्ज योजना राबविण्यात येत असून अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यालयाला भेट द्यावी, असे आवाहन संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक धम्मज्योती गजभिये यांनी केले आहे.


                 महामंडळामार्फत सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाकरिता राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या (एन.एस.एफ.डी.सी.) योजनेसाठी ४८०० लाभार्थ्यांना कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. या योजनेतील मुदत कर्ज योजनेअंतर्गत प्रकल्प मर्यादा रुपये 2.50 लाखावरून रुपये 5 लाख झालेली असून लघु ऋण वित्त योजना व महिला समृद्धी योजनेची प्रकल्प मर्यादा रुपये 50 हजारावरून रुपये 1 लाख 40 हजार इतकी झालेली आहे. तसेच एन. एस एफ. डी. सी. यांची महिलांकरीता रुपये 5 लाखांची नव्याने महिला अधिकारिता योजना सुरू करण्यात आली आहे अशी माहिती श्री.गजभिये यांनी

 दिली.


नवी मुंबई डाक विभागात ग्रामीण डाक सेवकांच्या रिक्त पदांची भरती

 नवी मुंबई डाक विभागात ग्रामीण डाक सेवकांच्या रिक्त पदांची भरती


            मुंबई,दि.९: भारतीय डाक विभागाने ग्रामीण डाक सेवक पदासाठी जाहिरात प्रसिद्ध केली असून त्याअंतर्गत नवी मुंबईच्या अधीक्षक डाकघर यांच्या कार्यक्षेत्रातील ४ रिक्त पदे भरली जाणार आहेत. पात्र व इच्छुक उमेदवारांनी ११ जूनपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


            इच्छुक उमेदवारांनी भारतीय डाक विभागाच्या https://indiapostgdsonline.gov.in/ संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरावेत. अर्ज भरण्याची शेवटची तारीख ११ जून २०२३ असून इतर कोणत्याही माध्यमाद्वारे आलेले अर्ज व व्यक्तिशः आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. या भरतीबाबतच्या अधिसूचनेतील सूचनांनुसार शुल्क भरावे लागणार आहे.


            पोस्ट विभाग उमेदवारांना कोणताही फोन कॉल करत नाही. संबंधित प्राधिकरणाद्वारेच उमेदवारांशी पत्रव्यवहार केला जातो. उमेदवारांनी त्यांची वैयक्तिक माहिती,नोंदणी क्रमांक, मोबाईल क्रमांक, ईमेल पत्ता इतरांसमोर उघड करू नयेत आणि कोणत्याही बनावट फोन कॉल्सपासून सावध राहावे. अधिक माहितीसाठी https://indiapostgdsonline.gov.in/ संकेतस्थळास भेट द्यावी, असे आवाहन वाशी डाक कार्यालयाचे वरिष्ठ अधीक्षक डाकघर यांनी केले आहे.


००००

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये १२ जूनपासून प्रवेश प्रक्रियेस सुरवात

 औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये १२ जूनपासून प्रवेश प्रक्रियेस सुरवात


       मुंबई, दि. ९ : औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश प्रक्रिया सोमवार १२ जून २०२३ पासून सुरू करण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावेत, असे आवाहन व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दि. अं. दळवी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.


            औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश प्रक्रियेसंबंधीची व प्रमाणित कार्यपद्धतीची माहिती पुस्तिका ऑनलाइन स्वरूपात https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अर्ज स्वीकृती, विकल्प सादर करणे व प्रवेश प्रक्रियेचे विविध टप्पे आदी प्रक्रियेबाबत समुपदेशन सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये रोज आयोजित करण्यात येणार आहेत.


            माहिती पुस्तिकेत नमूद असलेल्या टप्प्याप्रमाणेच प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार असून त्यासंदर्भातील वेळापत्रक तसेच राज्यातील शासकीय व अशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये उपलब्ध असलेल्या व्यवसाय अभ्यासक्रमांची माहिती व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संकेतस्थळ www.dvet.gov.in व https://admission.dvet.gov.in यासह प्रादेशिक कार्यालय, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यांचे कार्यालय, सर्व शासकीय, खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.



0000


Featured post

Lakshvedhi