Tuesday, 6 June 2023

समूह पुनर्विकास योजनेतून घरांची चावी मिळेलतो दिवस माझ्यासाठी परमोच्च आनंदाचा

 आशिया खंडातील सर्वात मोठ्या समूह विकास (क्लस्टर) योजनेच्या कामाचा

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारभ

समूह पुनर्विकास योजनेतून घरांची चावी मिळेलतो दिवस माझ्यासाठी परमोच्च आनंदाचा


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


• क्लस्टर योजनेतून पहिल्या टप्प्यात 10 हजार घरे मिळणार


• 1500 हेक्टर जागेवर टप्प्याटप्प्यात राबविणार योजना


            ठाणे, दि. 5 (जिमाका) : ठाण्यातील समूह पुनर्विकास योजनेचे काम सुरू करणे हे माझे स्वप्न आहे. सुमारे 1500 हेक्टर जमिनीवर वेगवेगळ्या टप्प्यात हा प्रकल्प उभारण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात सुमारे 10 हजार घरांची निर्मिती होणार आहे. हा एक ऐतिहासिक प्रकल्प होणार आहे. ज्या दिवशी या योजनेतील घराची चावी नागरिकांना मिळेल तो दिवस माझ्यासाठी परमोच्च आनंदाचा दिवस असेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.


            अनधिकृत व अधिकृत धोकादायक इमारतींचा पुनर्विकास करण्यासाठी आखलेल्या ठाण्यातील समूह विकास योजनेच्या (क्लस्टर) कामाचा शुभारंभ आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला. यावेळी मुख्यमंत्री यांच्या पत्नी श्रीमती लता शिंदे, राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा ठाण्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) व अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री रविंद्र चव्हाण, कृषीमंत्री अब्दुल सत्तार, खासदार कुमार केतकर, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार प्रताप सरनाईक, आमदार संजय केळकर, माजी आमदार रविंद्र फाटक, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर आदी उपस्थित होते. किसन नगर येथील समूह विकास योजनेच्या कामांची सुरुवात 1997मध्ये पडलेल्या साईराज इमारतींतील रहिवासी दाम्पत्यांच्या हस्ते पूजा करून करण्यात आली. यावेळी क्लस्टर योजनेच्या लोगोचे अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले.


            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, 1997 मध्ये ठाण्यातील साईराज इमारत पडल्यानंतर अनधिकृत धोकादायक इमारतीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू केले. अनधिकृत इमारती या गरजेपोटी बांधल्या होत्या. या घरांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तेव्हापासून अनेक आंदोलने, संघर्ष केले. आज कित्येक वर्षानंतर या योजनेचे काम सुरू होत आहे. ही योजना मार्गी लागण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री तथा सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेकांचे सहकार्य लाभले. ठाण्यातील या क्लस्टर योजनेचे काम आता सुरू झाले असून इमारती पूर्ण होईपर्यंत ते काम सुरू राहिल. या योजनेत नुसतेच इमारती उभ्या राहणार नाहीत, तर येथे मोकळी मैदाने, उद्याने, आरोग्याच्या सुविधाही असतील. एक सुनियोजित शहर उभारण्याचे आमचे स्वप्न आहे. सिडकोद्वारे बांधण्यात येणाऱ्या घरांच्या दर्जा पेक्षाही चांगल्या गुणवत्तेची घरे येथे उभारण्यात येतील. अधिकृत इमारती व सध्या सुरु असलेल्या पुनर्विकास योजनेतील इमारतींना या क्लस्टर योजनेत समावेश हा ऐच्छिक ठेवला असून यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ, असेही त्यांनी यावेळी सांगितले.


            ठाण्याप्रमाणेच मुंबईसह मुंबई महानगर प्रदेशातील मीरा भाईंदर, कल्याण, भिवंडी आदी क्षेत्रातील अनधिकृत धोकादायक इमारतींच्या क्लस्टर योजनेचा मार्ग मोकळा केला आहे. मीरा भाईंदरमधील क्लस्टर योजना दिवाळीनंतर सुरू होईल, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.


            मुंबईतील रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पासाठी आवश्यक तेथे नियमात बदल करून आता असे प्रकल्प शासनामार्फत राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सिडको, म्हाडा, एमएमआरडीए, महाप्रित, एसआरए आणि अन्य सर्व गृहनिर्माण संस्थांची मदत घेऊन हे प्रकल्प पूर्ण करण्यात येतील, असेही श्री. शिंदे यांनी सांगितले.


            यावेळी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांना जमिनीचे ताबा पत्रे देण्यात आली तर महाप्रितचे बिपीन श्रीमाळी यांना करारनामा पत्र देऊन गौरविण्यात आले. याशिवाय या योजनेसाठी सहकार्य करणाऱ्या महापालिका आयुक्त श्री. बांगर, वास्तुविशारद हाफिज कॉन्ट्रँक्टर, संजय देशमुख, विशेष सल्लागार मंगेश देसाई यांच्यासह जमिन मालकांचा मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


             अनधिकृत व अधिकृत धोकादायक इमारतीचा सामूहिक पुनर्विकास करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या संकल्पनेतून नियमावली तयार करण्यात आली आहे. या योजनेच्या कामाची सुरूवात अंतिम भूखंड क्र. 186/187 या वरील 7753 चौ.मी क्षेत्रफळावरील भूखंडावर त्याचप्रमाणे रस्ता क्रमांक 22 लगतचा भूखंड क्रमांक एफ - 3 या ठिकाणी 19275 चौ.मी. एवढ्या जागेवर करण्यात येणार आहे. नागरी पुनरुत्थान 1 व 2 ची अंमलबजावणी सिडकोमार्फत होणार आहे. त्याचप्रमाणे समूह विकास योजनेचे कामकाज सांभाळण्यासाठी कशिश पार्क येथे क्लस्टर पुनर्विकासचे कार्यालय निर्माण करण्यात आले आहे. या प्रशस्त कार्यालयाचे उद्घाटनही मुख्यमंत्री श्री. शिंदे हस्ते झाले.



0000


पक्षाघात आजार माहिती (Paralysis)*

 *पक्षाघात आजार माहिती (Paralysis)* 


मेंदूचे कार्य सुरळीतणे चालण्यासाठी मेंदूला रक्तपुरवठा व्यवस्थित होणे गरजेचे असते. मेंदूला योग्यप्रकारे रक्तपुरवठा न झाल्यास पक्षाघात (पॅरालिसीस) होतो त्यामुळे रुग्णाच्या हाता-पायातील ताकद कमी होते. याठिकाणी पक्षाघात म्हणजे काय, पक्षाघाताची कारणे, पक्षाघात का व कशामुळे होतो, पक्षाघात लक्षणे आणि उपचार याविषयी माहिती ह्या लेखामध्ये दिली आहे.


पक्षाघात हा मेंदूसंबंधी एक गंभीर असा न्यूरोमस्क्युलर आजार आहे. यावर वेळीच उपचार न केल्यास रुग्णांमध्ये कायमचं अपंगत्वही येऊ शकते. उजव्या बाजूच्या मेंदूमध्ये जेंव्हा बिघाड होतो तेंव्हा डाव्या बाजूच्या हात-पाय आणि चेहऱ्यावर परिणाम होतो आणि डाव्या बाजूच्या मेंदूमध्ये जेंव्हा बिघाड होतो तेंव्हा उजव्या बाजूच्या हात-पाय आणि चेहऱ्यावर परिणाम होतो व शरीर लुळे पडते.


*पक्षाघाताचे प्रकार :* 

पक्षाघाताचे दोन प्रमुख प्रकार असतात.


*1) Ischemic पक्षाघात –* 

या प्रकारात मेंदुतील रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताची गाठ तयार होते त्यामुळे मेंदूच्या विशिष्ट भागास रक्ताचा पुरवठा बंद झाल्यामुळे पक्षाघात होतो.


*2) ‎Hemorrhagic पक्षाघात –* 

या प्रकारात मेंदुमधील रक्तवाहिन्या फुटून मेंदूत रक्तस्त्राव होऊन पक्षाघात होतो. पक्षाघाताचा झटका आल्यावर सीटी स्कॅन किंवा एमआरआय स्कॅनद्वारे कोणता प्रकार आहे ते उपचार करण्यापूर्वी तपासले जाते.


 *3) Transient Ischemic Attack-* म्हणजे TIA नावाचा एक तिसरा प्रकारही असतो. यामध्ये पक्षाघाताची लक्षणे 24 तासाच्या आत निघून जातात आणि रुग्ण पूर्ववत बरा होतो. मात्र TIA ही Warning असते. एकदा TIA येऊन गेल्यास योग्य उपचार न केल्यास आपणास पुढे पक्षाघाताचा झटका येण्याची शक्यता अधिक असते. तेंव्हा TIA येऊन गेल्याससुध्दा डॉक्टरांकडून निदान आणि उपचार करून घ्यावेत. त्यामुळे पक्षाघाताचा धोका टळण्यास मदत होईल.


*पक्षाघाताची लक्षणे :* 

मेंदूचा रक्त पुरवठा बंद झाल्यामुळे किंवा मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाल्यामुळे मेंदूला योग्यरित्या रक्तपुरवठा होत नाही. त्यामुळे मेंदूच्या कार्यावर विपरीत परिणाम होऊन खालील पक्षाघाताची लक्षणे दिसून येतात.

◼️ एका बाजूच्या हाता-पायाची ताकद कमी होते.

◼️ हातापायात लुळेपणा जाणवतो, मुंग्या येतात.

◼️ ‎तोंड वाकडं होते, बोलण्यास त्रास होतो.

◼️ अन्न गिळण्यास आणि श्वास घेण्यास त्रास होतो.

◼️ ‎एका डोळ्याने अंधुक दिसू लागणे.

◼️ ‎चक्कर येणे, तोल जाणे,

◼️ चेतना कमी होणे

◼️ तीव्र डोकेदूखी

ही लक्षणे पक्षाघातात असतात. अशी लक्षणे जाणवल्यास त्वरीत वैद्यकीय उपचार होणे आवश्यक असते.


*लक्षात ठेवा ‘FAST’* 


पक्षाघाताची लक्षणे ओळखण्यासाठी ‘FAST’ लक्षात ठेवा..

*F – Face (Facial Weakness) :* रुग्णास हसण्यास सांगा. हसताना एका बाजूचा चेहरा, ओठ आणि डोळे लटकलेले दिसल्यास ते पक्षाघाताचे लक्षण असते.


*A – Arms (Arm Weakness) :* रुग्णाला त्याचे दोन्ही हात पुढे व वर उचलण्यास सांगा. जर रुग्णाचा एक हात वर व समोर उचलता येत नसल्यास ते पक्षाघाताचे लक्षण असते.

*S – Speech Difficulty) :* रुग्णास प्रश्न विचारून तो व्यवस्थित बोलतो का ते पहा. जर त्याला बोलताना त्रास होत असल्यास ते पक्षाघाताचे लक्षण असते.


*T – Time (Time to Act) :*

कोणतीही कृती करताना किंवा प्रतिक्रिया देताना सामान्य प्रतिक्रिया न आढळता त्यामध्ये विसंगती आढळते


वरील लक्षणे रुग्णामध्ये जास्त प्रमाणात दिसून आल्यास वेळ न दवडता रुग्णाला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जावे. जवळ वाहतुकीचे साधन नसल्यास 108 या नंबरवर फोन करून रुग्णवाहिका बोलावून घ्या. पक्षाघाताचा झटका आल्यानंतरची पहिले 3 तास हे Golden Period असतात ह्या काळामध्ये रुग्णावर उपचार केल्यास रुग्ण लवकरात लवकर बरा होतो तसेच पक्षाघाताच्या झटक्यामुळे मेंदूमध्ये होणारा बिघाड थांबवता येऊ शकतो. रुग्णास वेळीच उपचार मिळाल्यास पुढील मोठा धोका टळू शकतो.


वरील लक्षणे जर कमी प्रमाणात जाणवत असतील तर मेंदूचे रक्ताभिसरण सुरळीत होण्यासाठी नॅचरल ट्रीटमेंट घेणे उत्तम ज्यायोगे मेंदूचे रक्ताभिसरण (Brain Circulation) सुरळीत होऊ शकेल व संभाव्य धोका टळू शकेल.

तसेच पक्षाघात हेऊच नये म्हणून नियमितपणे हायड्रोजनयुक्त पाणी पित राहणे उत्तम.


*संकलन-* 

*निसर्ग उपचार तज्ञ* 

*डॉ. प्रमोद ढेरे,



बिपरजॉय चक्रीवादळ

 बिपरजॉय चक्रीवादळ

08-10 जून: महाराष्ट्र, पुणे, मुंबई येथे मुसळधार पाऊस पडेल.

11-12 जून: मुंबई आणि कोकणात जोरदार पाऊस होईल. कोकणात महापूर येण्याची शक्यता.✍🏻🦁🙏🏻


औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश सत्र 2023 साठी1,54,392 जागांवर प्रवेश दिले जाणार

 औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश सत्र 2023 साठी1,54,392 जागांवर प्रवेश दिले जाणार


               मुंबई, दि. 5 : शालांत प्रमाणपत्र परिक्षेचा निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर झालेला असून राज्यातील शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेतंर्गत (Craftsman Training Scheme) ऑगस्ट 2023 सत्रातील प्रवेश हे केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रीया (Centralized Online Admission Process) पध्दतीने करण्यांत येत आहे. दहावी उत्तीर्ण झालेला विद्यार्थ्यांचा एक मोठा वर्ग औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेशाची आतुरतेने वाट पाहत असतो. यावर्षी एकूण 418 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व 574 अशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मधुन अनुक्रमे 95,380 व 59,012 अशा एकूण 1,54,392 जागांवर प्रवेश दिले जाणार आहेत.


            यावर्षी प्रवेशासाठी उपलब्ध व्यवसायांची संख्या 83 असून त्यामध्ये पारंपरिक इलेक्ट्रिशियन, फिटर, मेकॅनिक मोटर व्हेईकल, डिझेल मेकॅनिक, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग टेक्निशियन, कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट, वेल्डर यासारख्या लोकप्रिय व्यवसायांबरोबरच नव्याने सुरू होणाऱ्या एरोनॉटिकल स्ट्रक्चर अँड इक्विपमेंट फिटर तसेच ड्रोन टेक्निशियन यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असलेल्या व्यवसायांचा समावेश करण्यात आलेला आहे.


            उपलब्ध जागांपैकी 53600 जागा मुलींसाठी राखीव असून इतर प्रवर्गनिहाय आरक्षणानुसार अनुसूचित जातींसाठी 20072, अनुसूचित जमातीसाठी 10808, इतर मागासवर्ग 29335, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक 15439, विमुक्त जाती 4631, भटक्या जमाती (ब) (क) व (ड) यासाठी अनुक्रमे 3859, 5404 व 3088 एवढ्या जागा उपलब्ध आहेत. याचबरोबर अल्पसंख्यांक उमेदवारांसाठी 2548, दिव्यांग उमेदवारांसाठी 7719 व खुल्या गटातील उमेदवारांसाठी 61756 जागा उपलब्ध आहेत.


            2023 या वर्षापासून नव्याने 257 तुकड्यांना डीजीटी, नवी दिल्ली यांचेकडून संलग्नता प्राप्त झालेली असून या व्यवसायांमध्ये प्रवेश देण्यात येणार आहेत. यामुळे महाराष्ट्र राज्याच्या प्रवेश क्षमतेमध्ये 5140 एवढ्या भरघोस जागांची वाढ झालेली आहे. या वर्षभरात ड्युअल सिस्टीम ऑफ ट्रेनिंग अंतर्गत नव्याने 30 तुकड्यांना मान्यता प्राप्त झालेली असून या माध्यमातून प्रशिक्षणार्थ्यांना थेट औद्योगिक आस्थापनांमध्ये जाऊन सुमारे सहा महिने एवढ्या कालावधीपर्यंतच्या प्रशिक्षणाचा लाभ मिळणार आहे. यामुळे या प्रशिक्षणार्थ्यांच्या गुणवत्तेमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा होईल.


            वर्ष 2023 मध्ये शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नाशिक व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पुणे येथे एरोनॉटिकल स्ट्रक्चर अँड इक्विपमेंट फिटर या व्यवसायाच्या प्रत्येकी दोन तुकड्यांना डीजीटी, नवी दिल्ली यांचेकडून संलग्नता प्राप्त होणे अपेक्षित असून यातील प्रत्येकी एका तुकडी मध्ये प्रवेश दिले जाणार आहेत. याचबरोबर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अकोला (मुलींची), धुळे, पुणे (मुलींची), सांगली, नाशिक, जालना, अमरावती, नागपूर, मुलुंड, अंबरनाथ, गडचिरोली, घनसावंगी अशा एकूण 12 संस्थांमधून ड्रोन टेक्निशियन या व्यवसायामध्ये नव्याने प्रवेशाला सुरुवात होणार आहे या व्यवसायाच्या माध्यमातून भारत ड्रोन टेक्नॉलॉजी या तंत्रज्ञानात आत्मनिर्भर होण्यास मदत होणार आहे अशी माहिती व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ.दिगांबर दळवी यांनी दिली आहे.


****

आरोग्यदायी चिंचेच्या पानांचा चहा !!*

 *आरोग्यदायी चिंचेच्या पानांचा चहा !!* 

चिंचेचं साधं नाव जरी काढलं तरी तोंडाल पाणी सुटल्याशिवाय राहत नाही. चिंच चवीला खूप आंबट असली तरी ती आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. चिंचेची पाने देखील आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असतात.


चिंचेचा पानांचा चहा खूप आरोग्यदायी असतो. चिंचेचा चहा प्यायल्याने रोग प्रतिकारशक्ती मजबूत होते आणि या चहाच्या साह्याने तुम्ही वजन देखील कमी करू शकता. आज आम्ही तुम्हाला चिंचेचा चहा कसा तयार करायचा आणि त्यांचे काय फायदे आहेत याची सविस्तर माहिती सांगणार आहोत.


*साहित्य :* 


1) पाणी दोन कप


2) एक मूठभर चिंचेची पाने


3) आले


4) अर्धा चमचा हळद


5) दोन चमचे मध


6) चार ते पाच पुदिन्याची पाने


*कृती :* 


सर्व प्रथम चिंचेची पाने नीट स्वच्छ धुवून घ्यावी. यानंतर एका पातेल्यात पाणी घेऊन त्यात किसलेले आले, चिंचेची पाने, हळद, पुदिन्याची पाने घालून 7 ते 8 मिनिटे उकळू द्यावे. यानंतर ते गाळून एका कपमध्ये काढा आणि थोडे थंड झाल्यावर त्यात मध मिसळून प्या.


आता बघू या चिंचेचा चहा पिण्याचे फायदे :


1) चिंचेच्या पानांचा चहा प्यायल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. तसेच हृदयविकाराचा धोकाही कमी होतो.


2) शरीरात गुड कोलेस्टेरॉल आणि बॅड कोलेस्ट्रॉल असे दोन प्रकारचे कोलेस्ट्रॉल असतात. यातील बॅड कोलेस्ट्रॉलची शरीरातील पातळी वाढली तर हृदयाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे अशावेळी चिंचेच्या पानांचा चहा तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतो.


3) शुगरचा त्रास असलेल्या लोकांसाठी चिंचेचा चहा अतिशय उपयुक्त ठरू शकतो. चिंचेच्या पानांमध्ये पॉलिफेनॉल आणि फ्लेव्होनॉइड्स हे घटक आढळतात. यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते. तसेच चिंचेच्या अर्कामध्ये मधुमेहविरोधी गुणधर्म आढळतात.


4) लठ्ठपणाचा सामना करत असलेल्या लोकांसाठी चिंचेचा चहा वरदान ठरू शकतो. बहुतांश लोक वजन कमी करण्यासाठी व्यायाम आणि धावण्यासारखे मेहनतीचे पर्याय अवलंबतात. परंतु त्यासोबत तुम्ही तुमच्या आहारात काही बदल केले तर वजन वेगाने कमी करण्यासाठी तुम्हाला मदत होऊ शकते. अशा स्थितीत तुमच्यासाठी चिंचेचा चहा खूप फायदेशीर ठरू शकतो. त्यामुळे वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असलेल्या लोकांनी चिंचेचा चहा नियमित प्यावा.


5) अपचनाच्या समस्येचा सामना करत असलेल्या लोकांसाठी देखील चिंचेचा चहा खूप उपयुक्त ठरू शकतो. चिंचेच्या पानांमध्ये अनेक पोषक तत्त्व असतात जे शरीरातील पाचक रसाला उत्तेजित करण्याचे काम करतात. त्यामुळे पचन प्रक्रिया सुधारते. चिंचेच्या चहाचे सेवन केल्याने पचनाच्या समस्यांपासून आराम मिळतो.


*संकलन-* 


जगतिक पर्यावरण दिं न



 आज दिनांक 5 जून 2023 जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सामाजिक वनीकरण, रायगड-अलिबाग, वनक्षेत्रपाल सामाजिक वनीकरण परिक्षेत्र, अलिबाग व प्रिझम सामाजिक विकास संस्था, अलिबाग, अलिबाग नगरपरिषद, लायन्स क्लब श्रीबाग, माणुसकी प्रतिष्ठान, स्वयंसिद्धा संस्था, आधार फाऊंडेशन, स्पर्धा विश्व अकॅडमी, अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने व विविध सामाजिक संस्थांच्या सहकार्याने अलिबाग समुद्रकिनारा येथे सकाळी 7.00 ते 9.00 या वेळेत श्रमदानातून समुद्रकिनारा स्वच्छता मोहिम राबवण्यात आली तसेच यावेळी प्रिझम संस्थेच्या वतीने पथनाट्यातून जनजागृती देखील करण्यात आली. यावेळी प्रसाद गायकवाड वनक्षेत्रपाल सामाजिक वनीकरण परिक्षेत्र, अलिबाग, अलिबाग नगर परिषदेचे माजी नगरसेवक अनिल चोपडा, *लायन्स क्लब श्रीबागच्या अध्यक्षा ऍड. कला ताई पाटील* स्त्रीरोग तज्ञ डॉ. मेघा घाटे, *लायन रावळे सर, लायन चौगुले सर,लायन वनगे सर* प्रिझम संस्थेचे अध्यक्ष तथा राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी भारत सरकार *तपस्वी नंदकुमार गोंधळी* आधार फाउंडेशनचे धनंजय कवठेकर, स्वयंसिद्धा संस्थेच्या अध्यक्षा तथा स्पर्धा विश्व अकॅडमीच्या संचालिका सुचिता साळवी, वनपाल सोनावणे, वनरक्षक उदय हटवार, निलेश शिंदे आदि मान्यवर उपस्थित होते. तसेच प्रिझम संस्थेचे कार्यकर्ते व स्पर्धा विश्व अकॅडमीचे विद्यार्थी उपस्थित होते.तसेच हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न होण्याकरिता सामाजिक वनीकरण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.



सूक्ष्म, लघु आणि मध्यम उपक्रमांच्या विविध विषयांचा आढावा

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत


सूक्ष्म, लघु आणि मध्यम उपक्रमांच्या विविध विषयांचा आढावा


सिंधुदुर्ग येथे तंत्रज्ञान केंद्रासाठी, तर राज्यात १५ ठिकाणी विस्तारित केंद्रांसाठी जागा


खादी ग्रामोद्योगच्या वस्तू विक्रीसाठी पालिका जागा देणार – मुख्यमंत्री


            मुंबई, दि. ५ : महाराष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक विकासात सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांचे महत्त्वाचे योगदान असून यासंदर्भात विविध योजनांची राज्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. राज्यात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना चालना देण्यासाठी सिंधुदुर्ग येथे तंत्रज्ञान केंद्राला जागा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. विस्तारित केंद्रांसाठी १५ विविध ठिकाणी जागा निश्चित केल्या असून काथ्या (कॉयर) उद्योग केंद्रासाठी कुडाळ येथे इमारत आणि खादी ग्रामोद्योगच्या वस्तू विक्रीसाठी मोठ्या शहरांमध्ये पालिकेच्या जागा देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले.


            महाराष्ट्रातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उपक्रमांच्या विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, केंद्रीय अतिरिक्त सचिव तथा विकास आयुक्त डॉ. रजनीश, सहसचिव अतिश सिंह, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


            सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांची क्षमता मोठी असून ते प्रत्येक क्षेत्रासाठी फायदेशीर आहे. उद्यम नोंदणीत महाराष्ट्र देशात आघाडीवर असून २९ लाखांहून अधिक उद्योगांनी एमएसएमई पोर्टलवर नोंदणी केली आहे असे सांगून एमएसएमई क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी राज्यात करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.


            महाराष्ट्र हे पायाभूत सुविधांमध्ये देशात प्रथम क्रमांकाचे राज्य असून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या दोन्ही बाजूला १८ नोड उभारण्यात येत आहेत, त्यात एमएसएमई उद्योग सुरू करुन मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार असल्याचे सांगून एमटीएचएल, मुंबई-पुणे महामार्ग विकासाचे राजमार्ग ठरणार आहेत. यामुळे उद्योग त्यातून उत्पादने आणि त्यांची निर्यात वाढण्यास मदत होणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ५ ट्रिलियन अर्थव्यवस्थेच्या उद्दिष्टपूर्तीमध्ये महाराष्ट्र राज्याने एक ट्रिलियनचा सहभाग देण्याचा निश्चय केला असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.


            महिला बचत गटांच्या उत्पादनांच्या मार्केटिंगसह या उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उपक्रम विभागाचे मोठे सहकार्य लाभणार असून त्यासाठी राज्य शासनाकडून सर्व आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी दिली. खादी ग्रामोद्योग आणि काथ्या (कॉयर) उत्पादनांच्या विक्रीसाठी बृहन्मुंबई, ठाण्यासह मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रात जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना महापालिका आयुक्तांना देतानाच मरोळ येथे सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगाच्या प्रदर्शन केंद्राला मान्यता देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.


            राज्यात जास्तीत-जास्त तरुणांना प्रशिक्षणाचा लाभ व्हावा म्हणून तंत्रज्ञान केंद्र (टेक्नॉलॉजी सेंटर्स) उभारण्यात येणार आहेत. मुंबई आणि औरंगाबादमध्ये तंत्रज्ञान केंद्रे यापूर्वीच कार्यरत झाली असून नागपूर, पुणे येथे या केंद्रांसाठी एमआयडीसीची जागा उपलब्ध होणार आहे. सिंधुदुर्ग येथील केंद्रासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केले. त्याशिवाय अमरावती आणि नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे अतिरिक्त तंत्रज्ञान केंद्रांसाठी जागा उपलब्ध करून देण्याची तयारीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दाखवली. विस्तारित केंद्रांसाठी दिंडोरी, सुपा, केसुर्डी, बिडकिन, बुटीबोरी, यवतमाळ, कृष्नूर, नरडाणा, ताडाळी आदी १५ ठिकाणी जागा उपलब्ध असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. विस्तारित केंद्र सुरू करण्यासाठी तसेच ग्रामोद्योग विकास योजनेमध्ये ॲग्रो टुरिझमचा समावेश करण्यासाठी केंद्राकडे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिल्या.


महाराष्ट्रात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना सर्वतोपरी सहकार्य – केंद्रीय मंत्री नारायण राणे


            उद्योगांना आकर्षित करण्यासाठी सवलती दिल्यास उद्योग महाराष्ट्रात येतील त्यातून राज्याचा विकास दर, दरडोई उत्पन्न आणि सकल उत्पन्नात वाढ होईल, असा विश्वास व्यक्त करून महाराष्ट्रात सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही केंद्रीय मंत्री श्री. राणे यांनी दिली.


            सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग विभागासाठी सुमारे २३ हजार कोटी रुपयांची तरतूद केली असून विविध प्रकारच्या योजना विभागाने तयार केल्या आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पनेला बळकटी देण्यासाठी सूक्ष्म, लघू आणि मध्यम उपक्रम विभाग कार्यरत असून या विभागाच्या योजना ग्रामीण भागात पोहोचल्या पाहिजेत, तिथे उद्योग सुरू झाले पाहिजेत, मूल्यवर्धित उत्पादनांची माहिती उद्योग विभागाने तरुणांना देऊन प्रगत तंत्रज्ञानावर आधारित उद्योग महाराष्ट्रात येतील यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही केंद्रीय मंत्री श्री. राणे यांनी केले. खासगी जमिनीवर उद्योगाची परवानगी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे असे सांगून बंद पडलेल्या उद्योगांचे सर्वेक्षण करा आणि ते सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचनाही श्री. राणे यांनी उद्योग विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.


            यावेळी उद्योग विभागाच्या वतीने राज्यात सुरू असलेल्या उपक्रमांचे आणि केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उपक्रम विभागाच्या योजनांची माहिती देणारे सादरी

करण करण्यात आले.


00000


Featured post

Lakshvedhi