Saturday, 27 May 2023

.पी. शासकीय विश्रामगृहाच्या इमारतीचेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन

 .आय.पी. शासकीय विश्रामगृहाच्या इमारतीचेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन.


          अहमदनगर, दि.26: (जिमाका वृत्तसेवा) - व्ही.आय.पी. शासकीय विश्रामगृहाच्या इमारतीचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.


            यावेळी महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सुजय विखे-पाटील, आमदार बबनराव पाचपुते, आमदार प्रा.राम शिंदे, आमदार मोनिकाताई राजळे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डीले, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता भरतकुमार बविस्कर आदी उपस्थित होते.


            10 कोटी 88 लक्ष रुपये खर्चून उभारण्यात येत असलेल्या निधीतून दोन मजली सुसज्ज इमारत उभी होत आहे. पहिल्या मजल्यावर 2 व्ही.व्ही.आय.पी. तर एक व्ही.आय.पी.सूट, मिटिंग हॉल, डायनिंग हॉल स्वागत कक्ष आदी तर दुसऱ्या मजल्यावर 2 व्ही.व्ही.आय.पी. तर 3 व्ही.आय.पी.सूट उभारण्यात येणार आहे. 75 व्यक्तींची क्षमता असलेल्या सभागृहाचाही यामध्ये समावेश आहे.



0000


पालकमंत्री वॉररूमचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 पालकमंत्री वॉररूमचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


यांच्‍या हस्‍ते उद्घाटन


 


        अहमदनगर, दि.26 : केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, विकास प्रकल्पांच्या अंमलबजावणी आणि निगराणीसाठी अहमदनगर जिल्हास्तरावर निर्माण करण्यात आलेल्या पालकमंत्री वॉररुमचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.


            यावेळी महसूल, पशुसंवर्धन, दुग्धविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार प्रा. राम शिंदे, आमदार मोनिका राजळे, आमदार बबनराव पाचपुते, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी आदी उपस्थित होते.


            जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाचव्या मजल्यावर या नियंत्रण कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि सुविधा यांनी हा कक्ष सुसज्‍ज करण्यात आला आहे. अपर जिल्हाधिकारी श्री.मापारी यांनी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांना पालकमंत्री नियंत्रण कक्षाच्या कामकाजाविषयी सविस्तर माहिती दिली. 

यंत्रसामुग्रीच्या वापराचा सल्ला देत उत्पन्नवृद्धीसाठी शेतकऱ्यांना

 यंत्रसामुग्रीच्या वापराचा सल्ला देत उत्पन्नवृद्धीसाठी शेतकऱ्यांना


मुख्यमंत्र्यांकडून शुभेच्छा


            औरंगाबाद दि.२६ (जिमाका) :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राज्यातील शेती आणि शेतकरी हा जिव्हाळ्याचा विषय आहे, याचा प्रत्यय आज कन्नड येथील कार्यक्रमात उपस्थितांना आला. लाभार्थ्यांसाठी ट्रॅक्टर आणि कम्बाईंड हार्वेस्टर वाटपाच्या वेळी शेतकऱ्यांना चाव्या सुपुर्द करताना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी ट्रॅक्टर आणि कम्बाईड हार्वेस्टर स्वतः चालवून पाहिले… शेती आणि संबंधित उद्योगांमध्ये या यंत्रसामुग्रीचा वापर करून उत्पन्नवृद्धीसाठी संबंधित शेतकऱ्यांना त्यांनी शुभेच्छाही दिल्या.


            आज कन्नड येथील ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात पीक काढणीसाठी वापरण्यात आलेल्या हार्वेस्टरची माहिती घेत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी जवळपास 500 मीटरपर्यंत ट्रॅक्टर आणि हार्वेस्टर चालवले. हा क्षण लाभार्थ्यांसाठी खऱ्या अर्थाने सुखद ठरला. त्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना ट्रॅक्टरच्या चाव्या सुर्पुद केल्या. यावेळी ट्रॅक्टर 250, हार्वेस्टर 10, शेती अवजारे, नांगर, रोटावेटर, पेरणी यंत्र 35 तसेच यावेळी मालवाहतुकीसाठी 10 वाहने वाटप करण्यात आली. 


            राज्यात विविध शेतकरी हिताचे निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतले आहेत. कधी शेतीच्या बांधावर जात पिकाची पाहणी किंवा गारपीट व अवकाळीमुळे हतबल झालेल्या शेतकरी बांधवांना दिलेला मदतीचा हात आणि आधार असो यातून नेहमीच शेतकरी बांधवांप्रती कर्तव्य दक्षतेने व तळमळीने काम करतात.


            आपुलकीची भावना, शेतकरी, कष्टकरी यांच्या प्रती असलेला जिव्हाळा आणि त्यांच्या हितासाठी मुख्यमंत्री म्हणून जे काही करता येईल ते करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्याच्या निर्णयातून दिसून येत आहे.


0000

अंध, दिव्यांग तसेच बचतगटाच्या महिलांना योजनांचा आधार

 अंध, दिव्यांग तसेच बचतगटाच्या महिलांना योजनांचा आधार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा लाभार्थ्यांशी थेट संवाद

            औरंगाबाद, दि. 26 (जिमाका) : अंध, दिव्यांग यांना मदतीच्या साधनांच्या वाटपासाठी स्वतः व्यासपिठावरून खाली येत दिव्यांग बांधवांची मोठया आस्थेने मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी केलेली विचारपूस, दिव्यांगांना विविध उपयोगी साहित्याचे केलेले वाटप, बचतगटाच्या महिलांच्या कौटुंबिक अर्थव्यवस्थेला विविध योजनांच्या लाभामुळे हातभार मिळाला आहे. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिलेला मदतीचा हात आम्हाला दिलासा देणारा असल्याच्या भावना लाभार्थी बोलताना व्यक्त करत होते.


            ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत आज औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड येथे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत या उपक्रमाचा शुभारंभ झाला. या अभियानामुळे शासनाच्या विविध योजनांचा लाभ लाभार्थ्यांना मिळाला. महसूल, कृषी, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, वन विभाग त्याचबरोबर इतर विभागांच्या विविध योजनांचा थेट लाभ लाभार्थ्यांना देण्यात आला. एकूण दीड लाख लाभार्थ्यांना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते विविध योजनांचा लाभ देण्यात आला. विशेष म्हणजे मोठ्या संख्येने ग्रामीण भागातील लाभार्थी या अभियानात सहभागी झाले होते.


            मुख्यमंत्री श्री. शिंदे हे अंध, दिव्यांग यांच्या मदतीच्या साधनांच्या वाटपासाठी स्वतः व्यासपिठावरून खाली आले. दिव्यांग बांधवांची मोठया आस्थेने विचारपूस केली. दिव्यांगांना विविध उपयोगी साहित्याचे वाटप केले. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिलेला मदतीचा हात आम्हाला दिलासा देणारा होता, अशा भावना दिव्यांग बांधवांनी बोलताना व्यक्त केल्या.


             'शासन आपल्या दारी" या उपक्रमाने आमच्या आर्थिक प्रगतीला आणि विविध योजनांच्या लाभ घेण्यात सुलभता आली आहे. कृषी बरोबरच महिलांच्या संदर्भात असलेल्या योजनामुळे आमच्या कौटुंबिक अर्थव्यवस्थेला हातभार लागला आहे. आम्हाला जोडव्यवसाय आणि बचतगटाच्या माध्यमातून आमची आर्थिक प्रगती तसेच शेतीविषयक कामकाज करण्यास सुलभता निर्माण झाल्याच्या प्रतिक्रिया अनेक लाभार्थ्यांनी बोलताना व्यक्त केल्या. 


            सैनिक कल्याण विभागाच्या अंतर्गत लाभ घेतलेले लाभार्थी भाऊसाहेब भाऊराव नवल म्हणाले, ‘मी राष्ट्रपती पदक विजेता असून माझ्या कुटुंबाला जो काही लाभ मिळाला आहे, यामुळे माझ्या कुटुंबातील मुलांचे शिक्षण आणि इतर काम करताना सुविधा निर्माण होत आहे’. 


            नेवपूर तालुका कन्नड येथील अर्चना शेळके म्हणाल्या, ‘कोरोनाच्या कालावधीत पतीचे निधन झाल्यामुळे मला मुलांच्या संगोपनासाठी आर्थिक मदत महिला व बालकल्याण विभागाकडून देण्यात आली होती. जी काही मदत मिळाली त्याच्यातून मला कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे शक्य झाले आहे’. 


रुक्मिणी एकनाथ रावते यांना दिव्यांग कल्याण विभागाअंतर्गत 'जयपूर फूट' च्या माध्यमातून मला स्वत: च्या पायावर उभा राहण्यासाठी ख-या अर्थाने एक आधार मिळाला, असे त्यांनी सांगितले.  


            ग्रामीण भागामध्ये महिला बचतगटाचे जाळे मोठ्या विश्वासाने आणि उमेदीने उभे राहिले आहे. उमेद अभियानाअंतर्गत महिलांना बचत गटाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध झाल्यामुळे महिला स्वयंपूर्ण होत आहेत. स्वामी समर्थ महिला बचतगटासाठी हातनुर येथील अनिता बिडवे आणि वंदना पवार यांना दुग्धव्यवसायासाठी आर्थिक मदत मिळाली. कल्पना चावला बचत गटासाठी सुनीता नलावडे यांना दहा लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे.


            शासन आपल्या दारी या अभियानामध्ये पशुसंवर्धन, कृषी, आत्मा त्याचप्रमाणे वनविभाग, कामगार विभाग, आदिवासी विभाग आणि इतर महत्त्वपूर्ण विभागाच्या विविध योजनांचा लाभ या उपक्रमात देण्यात आला.


            ‘शासन आपल्या दारी’ या अभियानाची जिल्हा प्रशासनाने केलेली ही तयारी उत्तम असल्याचे मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी केलेल्या कौतुकाने जिल्हा प्रशासनातील अधिकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. पिण्याचे पाणी, जेवण तसेच उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून सावलीचा मंडप याची सुविधा व नेटके नियोजन कौतुकास्पद होते. नागरिकांना योजनांची माहिती आणि लाभ मिळावेत यासाठी प्रत्येक विभाग तत्परतेने कार्यरत होता. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या आगमनावेळी प्रत्येक लाभार्थ्यांनी आपल्या मोबाईलचा टॉर्च सुरू करत हात उंचावत त्यांचे स्वागत केले.


0000

मातीशी नाळ आणि शेतकऱ्यांना साथ

 मातीशी नाळ आणि शेतकऱ्यांना साथ


            औरंगाबाद दि. २६ : (जिमाका) : राज्यातील शेती आणि शेतकरी हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. याचाच प्रत्यय आज कन्नड येथील कार्यक्रमात उपस्थितांना आला. राज्यातील शेतकऱ्यासाठी विविध हिताचे निर्णय मुख्यमंत्र्यानी घेतले आहे. कधी शेतीच्या बांधावर जात पिकाची पाहणी करणे असो किंवा गारपीट व अवकाळीमुळे हतबल झालेल्या शेतकरी बांधवाना दिलेला मदतीचा हात आणि आधार असो हे नेहमीच त्यांच्या कर्तव्य दक्षतेने व तळमळीने काम करण्याच्या शैलीतून दिसून येते.


            मुख्यमंत्री असून देखील ते एक शेतकरी असल्याचा प्रत्यक्ष अनुभव स्वत: लाभार्थ्यांसाठी ट्रॅक्टर आणि कम्बाईंड हार्वेस्टर वाटपाच्या वेळी आला.पीक काढणीसाठी वापरण्यात आलेल्या हार्वेस्टरची माहिती घेऊन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी जवळपास ५०० मीटर ट्रॅक्टर आणि हार्वेस्टर चालवले. हा क्षण लाभर्थ्यांसाठी खऱ्या अर्थाने सुखद ठरला. त्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना ट्रॅक्टरच्या चाव्या सुर्पूद केल्या.


            आपुलकीची भावना, शेतकरी, कष्टकरी यांच्या प्रती असलेला जिव्हाळा आणि त्यांच्या हितासाठी मुख्यमंत्री म्हणून जे काही करता येईल ते करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्याच्या निर्णयातून दिसतो.   

कन्नड येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘शासन आपल्या दारी’ अभियानाचा शुभारंभ

 कन्नड येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘शासन आपल्या दारी’ अभियानाचा शुभारंभ


सुमारे दीड लाख लाभार्थ्यांना ५ हजार ४५७ कोटींच्या निधीचे वाटप


'शासन आपल्या दारी' अभियान एक क्रांतिकारी निर्णय


-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


            औरंगाबाद दि २६ (जिमाका)- सर्वसामान्य नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी शासकीय कार्यालयात चकरा माराव्या लागू नये म्हणून राज्य शासनाने ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमामुळे लाभार्थ्यांना एकाच छताखाली अनेक योजनांचा लाभ मिळत असल्याने हा उपक्रम राबविण्याचा निर्णय क्रांतिकारी ठरत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. 


            औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड येथे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते राज्य शासनाने सुरु केलेल्या 'शासन आपल्या दारी' अभियानाचा आज शुभारंभ करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.


            केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड, पालकमंत्री संदीपान भुमरे, सहकार मंत्री अतुल सावे , कृषी मंत्री अब्दुल सत्तार, आमदार सर्वश्री हरिभाऊ बागडे, रमेश बोरनारे , उदय सिंग राजपूत, कृषी आयुक्त सुनील चव्हाण, जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना आदी उपस्थित होते.


            शासकीय योजना सुलभपणे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ अभियान राज्यात राबविण्यात येत असून लाखो नागरिकांना त्याचा लाभ मिळतो आहे. आज जिल्ह्यातील १ लाख ४९ हजार ५७२ लाभार्थ्यांना ५ हजार ४५७ कोटी रुपयांच्या निधीचे वाटप होत आहे. शासनाने जलसिंचनाच्या २८ प्रलंबित योजनांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिल्यामुळे ६ लाख हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. 'नमो शेतकरी सन्मान योजना' बळीराजाला लाभदायी ठरत आहे, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले.


            सर्वसामान्यांचे, कष्टकऱ्यांचे, शेतकऱ्यांचे आणि समाजातील सर्वच घटकांचे हे सरकार असून त्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेत आहे. केंद्राप्रमाणे राज्यामध्ये ‘नमो शेतकरी सन्मान योजना’ राबविण्यात येत असून केंद्राप्रमाणे राज्यानेही ६ हजार रुपयांची मदत दिलेली आहे. आकांक्षित जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील १५ हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे. एनडीआरएफच्या नियमात बदल करून ही मदत दुप्पटीने वाढवून आता तीन हेक्टर करण्यात आली आहे. गोगलगायींमुळे शेतीच्या नुकसानीची देखील आता भरपाई शासन देत असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले.


            मराठवाड्यातील शेतकऱ्यांना जोडधंदे करण्यासाठी वाढीव निधी देण्यात येत आहे. मागेल त्याला शेततळे, ठिबक सिंचन, अस्तरीकरण अशा अनेक योजनासाठी शासन निधी देण्यात येत आहे, असे सांगून मनरेगाअंतर्गत १० लाख शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे. शेतकऱ्यांसाठी काही नियम शिथिल केले आहेत. शासन बळीराजाच्या पाठिशी भक्कमपणे उभे आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिली.


            राज्याच्या विकासाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे पाठबळ आहे. कृषी क्षेत्रातील पायाभूत विकासासाठी २० हजार कोटी तर रेल्वे तसेच रस्ते विकासासाठी १३०० कोटी रुपये दिले आहेत. मराठवाड्यातील महत्त्वाकांक्षी वॉटर ग्रीड प्रकल्पासाठी केंद्राकडे निधीची मागणी करणार आहोत, आणि केंद्र सरकार नक्कीच भरीव निधी देईल, असा विश्वास मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी व्यक्त केला. प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या नेतृत्वामुळे देशाची अर्थव्यवस्था ११ व्या क्रमांकावरून ५ व्या क्रमांकावर आलेली आहे. ही आपल्या देशाची प्रगती आहे. जी- २० चे अध्यक्षपद आपल्याला मिळाले हा देखील आपला सन्मान आहे, हे सांगून केंद्राच्या आणि राज्याच्या माध्यमातून गरिबांसाठी अनेक योजना राबविल्या जात आहेत त्यांचा लाभ घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी केले.


            केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड म्हणाले, जनतेला केंद्र आणि राज्य शासनाच्या अनेक योजनांचा लाभ देण्यात येत आहे. नमो किसान सन्मान योजना, पीक विमा योजना, जनधन योजनेचा लाभ घेणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. प्रधानमंत्री आयुष्यमान योजनेतंर्गत देशात ५० कोटी लोकांनी योजनांचा लाभ घेतला आहे. केंद्र सरकारने कृषि क्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठी १ लाख कोटी रुपयांचा निधी ठेवलेला असल्याचेही ते म्हणाले.


            ‘शासन आपल्या दारी’ अभियानाचे सर्व यंत्रणांनी उत्तम प्रकारे नियोजन केले आहे. या उपक्रमामुळे अनेक लाभार्थ्यांना विविध प्रकारचा लाभ मिळणार आहे. नागरिकांनी या उपक्रमाचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी केले.


            या उपक्रमाच्या माध्यमातून आज अनेक लाभार्थ्यांना विविध विभागांच्या योजनांचा लाभ एकाच छताखाली मिळत आहे. कै. गोपीनाथराव मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेच्या माध्यमातून १०० दिवसाच्या आत २ लाख रुपयांची मदत मयताच्या कुटुंबियांना मिळत आहे. आज या उपक्रमाच्या माध्यमातून १ लाख २५ हजार लोकांना एकाचवेळी लाभ मिळणार आहे, असे कृषिमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.           


            सहकार मंत्री अतुल सावे म्हणाले, राज्यात अनेक विकासाची कामे सुरू आहेत. जल जीवन मिशन ही महत्त्वाकांक्षी योजना असून या योजनेचा लाभ राज्यातील जनतेला मिळत आहेत. शेतकऱ्यांना १ रुपयात विमा संरक्षण मिळत आहे, तर ५ लाखांचा आरोग्य विमा देखील मिळत आहे. सहकार विभागाच्या महात्मा जोतिबा फुले सन्मान योजनेचे अनेक लाभार्थी आहेत. हे सरकार शेतकऱ्यांचे आहे. शासनाने ६९ हजार हेक्टर जमीन कर्जमुक्त केली असल्याचेही ते म्हणाले.


            कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी केले. ते म्हणाले, ‘शासन आपल्या दारी’ अभियानाच्या माध्यमातून वरिष्ठ अधिकारी शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी जनतेच्या दारात जात आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी व्यापक प्रयत्न करण्यात येत आहेत. महसूल विभागांतर्गत १७ हजार २४८, ग्रामविकास विभाग ११ हजार ५४५ , कृषी विभाग ६४ हजार १८४, नगरविकास विभाग ११ हजार ८१४ इतक्या लाभार्थ्यांना अनेक विभागाच्या योजनांचा लाभ देण्यात येत असल्याचेही ते म्हणाले.


            यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात लाभवस्तू व प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.या उपक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ उपलब्ध करुन देण्यात आला. देशसेवेमध्ये विशेष कार्यामुळे नवल भाऊसाहेब दफादार यांना ‘मेन्शन इज डिसपॅच’ पदक देवून तसेच राजाभाऊ दगडुबा करपे यांना घेतलेल्या कर्जावर तीन लाख रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले. महसूल व सामाजिक न्याय विभागाकडून देण्यात येणाऱ्या विविध दाखल्यांचे देखील वितरण करण्यात आले. तसेच जिल्ह्यातील ‘ग्रामसुरक्षा दला’च्या हेल्पलाईनचा देखील शुभारंभ यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला.


0000



 क्षणचित्रे-


• कन्नड येथे कार्यक्रमस्थळी शासनाच्या विविध विभागांच्या योजना, उपक्रमांची माहिती देणारे स्टॉल्स लावण्यात आले होते, या स्टॉल्सवर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.


• कृषि, उद्योग, ग्रामविकास, शिक्षण आदी विभागांच्या योजनांमधील ट्रॅक्टर्स, व्यावसायिक वाहने, हार्वेस्टर यंत्रांची आकर्षक सजावट करण्यात आली होती.


• सर्व स्टॉल्सला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देऊन पाहणी केली.



समृद्धी महामार्ग महाराष्ट्राचे भाग्य बदलणारा ठरणार

 समृद्धी महामार्ग महाराष्ट्राचे भाग्य बदलणारा ठरणार  


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


राज्यातील सर्व जिल्हे द्रुतगती महामार्गाने जोडणार


समृद्धी महामार्गाच्या शिर्डी ते भरवीर (ता. इगतपुरी) या ८० किलोमीटर लांबीच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण


            शिर्डी, दि. २६ मे, २०२३ (उमाका वृत्तसेवा) - हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गामुळे राज्याचे २४ जिल्हे जोडले जाणार आहेत. विकासाचा हा महामार्ग महाराष्ट्राचे भाग्य बदलणारा ठरणार आहे. डिसेंबर २०२३ पर्यंत समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा पूर्ण करण्यात येईल. त्याचबरोबर येत्या काळात राज्यात समृद्धी सारखे अनेक प्रकल्प‌ राबविण्यात येतील. राज्यातील सर्व जिल्हे द्रुतगती महामार्गाने जोडण्यात येतील. अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली.


            जेऊर कुंभारी (ता.कोपरगाव) शिर्डी पथकर प्लाझा येथे हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या शिर्डी ते भरवीर (ता. इगतपुरी) या ८० किलोमीटर लांबीच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल,पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सदाशिवराव लोखंडे, खासदार डॉ.सुजय विखे पाटील, आमदार राम शिंदे, आ.नरेंद्र दराडे, आ.मोनिका राजळे, राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक, मुख्यमंत्र्याचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, प्रधान सचिव श्रीकर परदेशी, नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ आदी उपस्थित होते. यावेळी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या कोनशिलेचे अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले.


            मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांनी जे स्वप्न पाहिले होते त्या स्वप्नांची समृद्धीच्या रूपात पूर्तता झाली आहे. विक्रमी वेळेमध्ये जमीन अधिग्रहण करण्यात आले. शेतकऱ्यांना आरटीजीएसच्या माध्यमातून मोबदला रक्कम देण्यात आली. सर्व अडथळ्यांवर मात करून हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला‌. विकासाच्या या महामार्गामुळे राज्याच्या कृषी, उद्योग व पर्यटनाला निश्चितच वाव मिळणार आहे. असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.


            समृद्धीसारख्या रस्त्यांचे जाळे निर्माण करणे काळाची गरज आहे. समृद्धीत आंतरराष्ट्रीय दर्जाचे १३ कृषी प्रकल्प साकार होणार आहेत. समृद्धी सोबत नागपूर ते गोंदिया हा महामार्ग प्रकल्प साकार होणार आहे. नागरिकांना सरकारी कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागू नये यासाठी ‘शासन आपल्या दारी’ मोहीम राबविण्यात येत आहे. याचा हजारो नागरिकांना फायदा होत आहे. शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून वार्षिक १२ हजार रूपयांची मदत करण्यात येत आहे. लेक लाडकी योजनेतून मुलींच्या भविष्यासाठी शासनाने तरतूद केली आहे.


‍ शिर्डी विमानतळाच्या ६०० कोटींच्या प्रस्तावित टर्मिनल इमारतीचे भूमिपूजन जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करण्यात येईल. अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.


            उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्याचा विकास करायचा असेल तर विकासात मागास असलेला भाग मुंबई व पोर्टशी जोडणे अत्यंत आवश्यक होते. समृद्धी महामार्ग राज्याचा आर्थिक कॅरिडॉर ठरणार आहे. यामुळे राज्यातील १५ जिल्ह्यांचे भाग्य बदलणार आहे. ७०१ किलोमीटर महामार्गाची उभारणी विक्रमी अशा ९ महिन्याच्या कालावधीत पूर्ण होणारा समृद्धी हा देशातला एकमेव महामार्ग आहे. महामार्गासाठी केलेल्या भूसंपादनाचा शेतकऱ्यांना विक्रमी मोबदला देण्यात आला. पुढील सहा महिन्यात समृद्धी प्रकल्प पूर्ण करण्यात येईल. महामार्गावर वाहन चालकांनी वाहन चालवितांना वेग मर्यादा पाळावी. असे आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.


            समृद्धी महामार्ग, ट्रान्स हॉर्बर लिंक रोड, कोस्टल रोड सारख्या प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यातील पायाभूत सुविधा बळकट होणार आहेत. नागपूर ते गोवा, मुंबई ते गोवा या महामार्गामुळे येत्या काळात महाराष्ट्राचे चित्र बदलण्यास मदत होणार आहे. महाराष्ट्राच्या सर्वसामान्यांच्या जीवनात परिवर्तन घडविण्याचे काम शासन करत आहे. असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.


            महसूलमंत्री श्री.विखे पाटील म्हणाले की, समृद्धी महामार्गामुळे शिर्डी व परिसराच्या विकासाला चालना मिळणार आहे. रोजगाराच्या संधी मिळणार आहेत. यामुळे हा परिसर मुंबई, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भाशी जोडला जाणार आहे. समृद्धीच्या भूसंपादनासाठी शिर्डी व परिसरातील शेतकऱ्यांनी सहकार्य केले. शिर्डी विमानतळाच्या ६०० कोटींच्या टर्मिनल इमारतीमुळे विमान फेऱ्या वाढणार आहेत.


समृद्धी महामार्ग दुसऱ्या टप्प्याची वैशिष्ट्ये -


            समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्यात ७ मोठे पूल, १८ छोटे पूल, वाहनांसाठी ३० भुयारी मार्ग, हलक्या वाहनांसाठी २३ भुयारी मार्ग, ३ पथकर प्लाझावरील तीन इंटरचेंज, ५६ टोल बूथ, ६ वे ब्रिज आदी सुविधांचा समावेश आहे. शिर्डी ते इगतपुरी तालुक्यामधील भरवीर पर्यंतचे काम पूर्ण झाले आहे. प्रकल्पाच्या या दुसऱ्या टप्प्याचा खर्च ३२०० कोटी रुपये असून लांबी ८० कि मी आहे. दुसऱ्या टप्प्यात आजपासून ७०१ कि.मी पैकी आता एकूण ६०० कि.मी लांबीचा समृद्धी महामार्ग वाहतुकीस खुला झाला आहे.


00000

Featured post

Lakshvedhi